कोल्हापूरचं साहित्य संमेलन (विजय तरवडे)

vijay koparkar write article in saptarang
vijay koparkar write article in saptarang

कोल्हापूरच्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी रमेश मंत्री यांची निवड झाली होती. मंत्री यांची "-महानगर' ही वेगळ्या धर्तीची प्रेमकथा आणि जेम्स बॉंडचं विडंबन करणारी "जनू बांडे' ही व्यक्तिरेखा माझी अतिशय आवडती. त्यामुळं त्यांचं अभिनंदन करणारं पोस्टकार्ड मी त्यांना निवडीनंतर धाडलं. त्यांचं आभाराचं उत्तर आल्यावर आनंद झाला. अध्यक्षपदी निवड झाल्यावर त्यांचा पुण्यात महाराष्ट्र साहित्य परिषदेत सत्कार होणार होता, तेव्हा त्या कार्यक्रमाच्या थोडं आधी त्यांना भेटून माझ्या संग्रहातल्या त्यांच्या सर्व पुस्तकांवर मी स्वाक्षऱ्या घेतल्या. "-महानगर'ची प्रत माझ्याकडं नव्हती. बाजारातही उपलब्ध नव्हती. शान्ता शेळके यांच्या संग्रहात "-महानगर' असल्याचं समजल्यावर त्यांना मी ती प्रत मागितली. शान्ताबाईंना भेटायला मंत्री त्यांच्या घरी जाणार होते. त्या भेटीच्या वेळी तिथं थांबून "-महानगर'वर मी स्वाक्षरी घेतली आणि खूश झालो.

माझ्या माहितीत आणि स्मरणात फक्त कोल्हापूरच्याच संमेलनात आयोजकांनी संमेलनस्थळी रसिकांना नेण्या-आणण्याची, तिथं उत्तम हॉटेलमध्ये उतरण्याची आणि भोजनाची मोफत सोय केलेली होती. पुण्याहून दोन बस जाणार होत्या. "रवींद्र भट यांना तातडीनं भेट,' असं रवींद्र पिंगे यांचं पोस्टकार्ड संमेलनाच्या काही दिवस आधी मला यासंदर्भात आलं. त्यानुसार मी भट यांना भेटलो. एका बसमधल्या मंडळींच्या यादीत माझं नाव समाविष्ट झालं. आमच्या बसमध्ये सुहास शिरवळकर, प्रा. गं. ना. जोगळेकर, सुधीर गाडगीळ, हेमा लेले, रवींद्र जगताप, सुलभा तेरणीकर आदी होते. आम्ही भल्या सकाळी निघालो. निघताना मोफत चहा मिळाला. वाटेत स्वखर्चानं न्याहारी घेतली. एक वाजता कोल्हापूरला पोचलो. हॉटेलमध्ये जाऊन आपापल्या खोल्यांमध्ये सामान टाकलं आणि मग डायनिंग हॉलमध्ये आलो.
"मोफत भोजन वगैरे सेवा आज संध्याकाळपासून मिळणार आहेत आणि आत्ताच्या जेवणाचे पैसे ज्यानं त्यानं द्यायचे आहेत,' असं जेवायला बसल्यावर हॉटेलचालकांनी जाहीर केलं. रोजच्या मोफत चहा-न्याहारी-जेवणाची कूपनही आम्हाला यादीनुसार वाटण्यात आली.

मेनू कार्डवरच्या डावीकडच्या आणि उजवीकडच्या स्तंभांकडं बघत आणि खिसे चाचपत लोक जेवले आणि आपापल्या बिलाचे पैसे खिशातून काढले व कॅशिअरकडं निघाले. त्याच वेळी गंमत झाली. हॉटेलचालकाकडून घोषणा होत असताना आणि आमची जेवणं झाली तेव्हा जोगळेकरसर हॉटेलातल्या त्यांच्या खोलीतच होते. डायनिंग हॉलमध्ये आलेले नव्हते. ते नंतर आल्यामुळं त्यांना बिलाचा हा ताजा "फतवा' ठाऊक नव्हता. बिलाचे पैसे देण्यासाठी आम्ही रांग धरलेली असतानाच ते कडाडले ः ""हा काय चावटपणा आहे? आम्ही बिलाचे पैसे अजिबात देणार नाही. तुम्ही आयोजकांना ताबडतोब फोन लावा आणि बोलावून घ्या.'' त्यांचा रुद्रावतार बघून हॉटेलचालकानं संमेलनाच्या आयोजकांना फोन लावला. फोनवर बोलणं झालं. त्यानंतर "कुणीही जेवणाचं बिल देऊ नका; शिवाय संमेलनाच्या मंडपात चहा-न्याहारी-जेवणासाठीची कूपन दिली असली तरी सकाळी इथं रूमवरही चहा मोफत मिळेल,' असं हॉटेलचालकांनी जाहीर केलं. हे ऐकून सर्वत्र पुणेरी आनंदाची लहर पसरली!
माझ्या समोर थोडं पुढं असलेले एक कविवर्य त्यानंतर पुन्हा मागं जाऊन टेबलवर बसले आणि त्यांनी एका दहीवाटीची ऑर्डर दिली. दहीवाटीची किंमत माझ्या पक्की लक्षात आहे. आठ रुपये. वेटरनं दहीवाटी आणि साखर आणून दिल्यावर कविवर्यांनी दही-साखर खाल्ली आणि तृप्त होत समोरच्या कागदी रुमालानं आपलं तोंड पुसत ते उठले. हेच कविवर्य नंतर संध्याकाळी चारच्या सुमाराला आमच्या खोलीत डोकावले. आम्ही चहा घेत होतो. त्या वेळी कविवर्यांनी आमच्या "ज्ञाना'त भर घातली. ते म्हणाले ः "तुम्हाला "विशेष पेयपान' चालत असेल, तर
एक टिप देतो. इथल्या वेटरनं मला सांगितलं आहे, की पाच कप चहा घेतल्याची सही तुम्ही वेटरच्या डायरीत केलीत, तर चहाऐवजी तो तुमच्या "विशेष पेयपाना'ची सोय करू शकेल!''
* * *

संमेलनाच्या पहिल्या दिवशी सकाळी चहाची वाट बघत मी बाल्कनीत उभा होतो. आमच्याच मजल्यावरच्या पलीकडच्या एका सुईटच्या बाथरूमच्या दिशेनं अगदी गोड आवाजात कुणी महिला आळवून आळवून गात होती ः "इलू इलू...इलू इलू...'दुपारी तिचं नाव समजलं.

कोल्हापूरमध्ये हिंडताना अनेक ठिकाणी रमेश मंत्री आणि संयोजक डी. वाय. पाटील यांचे मोठे फ्लेक्‍स लावलेले दिसले. संमेलनाध्यक्षांचे फ्लेक्‍स यापूर्वी किंवा नंतरही कधी पाहण्यात आले नाहीत. अध्यक्षीय भाषणाच्या वेळीही कार मंचाच्या अगदी जवळ आली होती आणि तीतून उतरून संमेलनाध्यक्ष थेट मंचावर गेले होते. कोल्हापूरच्या संमेलनात पिंगे यांच्यामुळं निर्मला मोने, सुलभा तेरणीकर, वासंती घैसास यांच्याशी परिचय झाला. एका संध्याकाळी परिसंवाद टाळून पिंगे यांच्यासमवेत स्वैर भटकंती केली. कोल्हापूर पाहिलं. सुप्रसिद्ध पद्मा हॉटेलमध्ये जेवलो.
* * *
कोल्हापूरचं संमेलन केवळ एवढ्यासाठीच लक्षात राहिलं असं नाही. आमच्या पिढीत लोकप्रिय असलेल्या विनोदी लेखकांपेक्षा अगदी वेगळ्या बाजाच्या शुद्ध विनोदी "अद्भुतिका' मंत्री यांनी रचल्या आहेत. "सह्याद्रीची चोरी,' "सोलकढीचा सुपरमॅन' -"मुंबई ते बांडुंग' ही सहज आठवलेली काही नावं. मंत्री यांच्या जनू बांडेचं अधिक कौतुक व्हायला हवं होतं असं वाटतं. अतिशय निराश मनःस्थितीतल्या वाचकाला किंवा खचलेल्या अवस्थेतल्या वाचकाला जनू बांडे हसवतो आणि धीर देतो. मंत्री यांच्या निधनानंतर मी "हास्याचे सुकले बाग' या शीर्षकाचा लेख लिहिला होता. त्यांचे पुत्र राजेंद्र मंत्री यांच्याशी फेसबुकवर परिचय झाल्यावर त्यांना मी त्या लेखाचं कात्रण दिलं आणि राजेंद्र यांनी ते त्यांच्या सर्व नातलगांना पाठवलं, तेव्हा मला मंत्री यांच्या ऋणातून मुक्त झाल्यासारखं वाटलं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com