जबाबदारीचे सार्थक करीन: राजदूत अतुल गोतसुर्वे
उत्तर कोरियातील मावळते राजदूत डॉ मित्रा वशिष्ठ मायदेशी परतले आहेत. दिल्लीत श्री काय युंग यंग हे उत्तर कोरियाचे भारतातील राजदूत होत. राजदूतपदी नेमणूक होण्यापूर्वी गोटसुर्वे हे "इंडियन कौन्सिल ऑफ कल्सचर रिलेशन्स" च्या संचालकपदी होते. विशेष म्हणजे, पुणे येथे पासपोर्ट कार्यालयात असताना कार्यालयाचा केलेला कायापालट व दिलेली गतिमान पासपोर्ट सेवा यासंदर्भात ते विशेष ओळखले जातात.
"भारताचे हित जपण्याच्या जबाबदारीचे मी सार्थक करीन." असे भारताचे उत्तर कोरियातील नवनियुक्त राजदूत अतुल मल्हारी गोतसुर्वे यांनी प्योंगयॉंगला रवाना होण्यापूर्वी "सकाळ" बरोबर बोलताना सांगितले.
ते म्हणाले, "जगात सर्वाधिक चर्चेचा विषय बनलेल्या उत्तर कोरियात राजदूतपदी नियुक्ती करून भारत सरकारने माझ्यावर मोठी जबाबदरी टाकली आहे. अण्वस्त्र युद्धाच्या उंबरठ्यावर पोहोचलेल्या देशाचे दक्षिण कोरियाबरोबर एकाएकी चांगले संबंध प्रस्थापित झाल्याने केवळ आशिया नव्हे, तर जागतिक शांततेसाठी या घडामोडी आंतरराष्ट्रीय राजकारणाला कलाटणी देणाऱ्या ठरणार आहेत."
भारताने उत्तर कोरियाबरोबर 1962 मध्ये कौन्सुलर दर्जाचे व 1973 मध्ये दूतावासाच्या पातळीवर संबंध प्रस्थापित केले.
दोन्ही देशांच्या ऐक्याबाबत विचारता, गोतसुर्वे म्हणाले, की हा दोन्ही देशांचा प्रश्न असून, तो त्यांनी सोडवायचा आहे. त्याबाबत माझे मत संयुक्तिक ठरणार नाही. ""कोरियन पेनिन्सुलामध्ये झालेल्या ऐतिहासिक घटनांचे भारताने स्वागत केले आहे. दोन्ही कोरियांनी सकारात्मक पावले टाकल्यास परस्परांच्या विकासाचा मार्ग खुला होईल. त्याचप्रमाणे, अण्वस्त्रांचे पूर्णतः निःशस्त्रीकरण झाल्यास उत्तर कोरियावर संयुक्त राष्ट्रसंघाने व अन्य राष्ट्रांनी लादलेले जाचक निर्बंध उठविले जातील. त्याचा अनुकूल परिणाम व्यापारवृद्धीवर होईल."" भारत-उत्तर कोरियाच्या व्यापाराची वार्षिक उलाढाल 1 अब्ज डॉलर्सवर पोहोचली आहे. 2013 मध्ये हे प्रमाण 60 दशलक्ष डॉलर्स होते. उत्तर कोरियाला आपण पेट्रोलियमजन्य वस्तू, औषधे, सोन्या चांदीचे अलंकार व मोटारींचे भाग आदी निर्यात करतो."
"दुतर्फा सांस्कृतिक संबंध विकसित करण्याचा मी प्रयत्न करीन," असे सांगून, गोतसुर्वे म्हणाले, की यापूर्वी भारताचे अनेक कलाकार वसंतऋतूत पोंग्यांगला जायचे.
दरम्यान, उत्तर कोरियातील मावळते राजदूत डॉ मित्रा वशिष्ठ मायदेशी परतले आहेत. दिल्लीत श्री काय युंग यंग हे उत्तर कोरियाचे भारतातील राजदूत होत. राजदूतपदी नेमणूक होण्यापूर्वी गोटसुर्वे हे "इंडियन कौन्सिल ऑफ कल्सचर रिलेशन्स" च्या संचालकपदी होते. विशेष म्हणजे, पुणे येथे पासपोर्ट कार्यालयात असताना कार्यालयाचा केलेला कायापालट व दिलेली गतिमान पासपोर्ट सेवा यासंदर्भात ते विशेष ओळखले जातात.
त्यांनी 2004 मध्ये परराष्ट्र सेवेत प्रवेश केला.1976 मध्ये सोलापूरमध्ये त्यांचा जन्म झाला. पुण्यातील एमआयटीमधून त्यांनी बीई सिव्हिल पदवी घेतल्यानंतर सावित्रीबाई फुले विद्यापिठातून एलएलबीची पदवी संपादन केली. 2006-7 दरम्यान त्यांनी मेक्सिको, क्यूबा येथील दूतावासात महत्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या. परराष्ट्र मंत्रालयाच्या दक्षिण अमेरिका व कॅरिबियन विभागात उप सचिवपदी व त्यांनतर पुणे येथील पासपोर्ट कार्यालय प्रमुख म्हणून त्यांनी कार्य केले आहे. उत्तर कोरियातील भारतीय दूतावास छोटा असून, त्यात चार अधिकारी काम करतात.
भारत व उत्तर कोरियादरम्यानचे संबंध जेमतेम आहेत. कारण, उत्तर कोरिया व पाकिस्तानदरम्यान असलेली मैत्री. दोन्ही देशांनी एकमेकांना चोरट्या मार्गाने अनेक वर्ष अण्वस्त्र निर्मितीसाठी मदत केली. पाकिस्तानकडे असलेली क्षेपणास्त्रे उत्तर कोरियन बनानटीची आहेत. उत्तर कोरियाने केलेल्या क्षेपणास्त्र व अण्वस्त्र चाचण्यांबाबतही भारताने टीका केली आहे. तथापि, दुतर्फा व्यापार वाढावा, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ऑक्टोबर 2010 मध्ये पोंग्यांग येथे झालेल्या सहाव्या आंतरराष्ट्रीय औद्योगिक प्रदर्शनात भारताने भाग घेतला होता. 2002 ते 2004 दरम्यान उत्तर कोरियात मोठा दुष्काळ पडला होता. तेव्हा भारताने दोन हजार टन धान्य पाठविले होते. तसेच. 2010 मध्ये उत्तर कोरियाने केलेल्या विनंतीवरून संयुक्त राष्ट्रसंघाच्या कार्यक्रमाखाली 10 लाख डालर्स किंमतीचा 1300 टन गहू व डाळी पाठविल्या होत्या. 2015 मध्ये उत्तर कोरियाचे परराष्ट्रमंत्री री सू यॉंग यांनी दिल्लीला भेट देऊन परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांची भेट घेतली होती. त्यावेळी, उत्तर कोरियाच्या अण्वस्त्र निर्मितीबाबत चर्चा झाली. तथापि, त्याच दरम्यान पाकिस्तानला पाठिंबा देणारे निवेदन उत्तर कोरियाने केल्याने उत्तर कोरियाला अतिरिक्त मानवी साह्य देण्याच्या विनंतीवर भारत व उत्तर कोरिया दरम्यान कोणताही समझोता होऊ शकला नाही.