व्हाईट हाऊसचा भूलभुलैय्या

White House
White House

अमेरिकेचे 45 वे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 20 जानेवारी 2017 रोजी आपल्या पदाची शपथ घेतली, त्यावेळी व्हाईट हाऊस व कॅपिटोल हिल येथे झालेल्या निरनिराळ्या ऐतिहासिक घटना जगाला पाहावयास मिळाल्या. व्हाईट हाऊस हे जगातील एकमेव महासत्तेच्या अध्यक्षाचे निवासस्थान. ट्रम्प येथे आठवड्यातील किती दिवस राहणार व न्यूयॉर्कमधील आलिशान ट्रम्प टॉवरमध्ये किती दिवस घालविणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. येथे राहणाऱ्या अध्यक्षाच्या पत्नीला "फर्स्ट लेडी " म्हणतात. परंतु, "व्हाईट हाऊस हे "फर्स्ट फॅमिली हाऊस" असे म्हटले जावे," असा ट्रम्प यांचा आग्रह आहे. कारण त्यांचे कुटुंबच येथे राहणार आहे. पत्नी मालियाना सुरूवातीचे काही महिने व्हाईट हाऊसमध्ये राहाणार नाही, असेही वृत्त आहे. परंतु, त्यांच्या कन्या इव्हांका व टिफनी,चिरंजीव एरिक, जावई (इव्हांकाचे पती) जारेड कुचनर, दहा वर्षाचा बॅरन विल्यम ट्रम्प हे व्हाईट हाऊसचे रहिवासी होणार. बॅरन विल्यम सोडता अन्य कुटुंबिय ट्रम्प यांना शासन चालविण्यास साह्य करणार आहेत. अमेरिकेत आता खऱ्या अर्थाने "घराणेशाही" नांदणार आहे.

व्हाईट हाऊसमध्ये प्रथम पाऊल ठेवणाऱ्यासाठी ती एक गूढ इमारत, भूल भुलैय्या असल्याचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांच्या सहकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यांना आलेल्या मजेशीर अनुभवांचे वर्णन त्यांनी गेल्या आठवड्यात प्रसिद्ध झालेल्या "टाईम" या साप्ताहिकात नमूद केले आहे. 27 जानेवारी 2001 रोजी मी व्हाईट हाऊसला भेट दिली होती. त्यावेळीही मला तसा अनुभव आला. तेथील गुप्तचर विभागचा अधिकारी बरोबर असल्याने त्यातील सारी दालने पाहता आली होती. विशेष म्हणजे, त्यावेळी व्हाईट हाऊसला बाहेरून पाहणाऱ्यांनी फार वेळ गर्दी करू नये, यासाठी सायकलवरून या प्रासादतुल्य इमारतीला वळसा घालीत हातातील भोंग्यावरून लोकांना अधिक न थांबण्याचा आदेश देणारा एक तरूण अधिकारी मी पाहिला होता. 11 सप्टेंबर 2001 रोजी न्यूयॉर्कच्या वर्ल्ड ट्रेड सेन्टरवर दहशतवाद्यांनी हल्ला केल्यावर मात्र जनतेसाठी व्हाईट हाऊसचे पर्यटन बंद करण्यात आले होते. आता ते पुन्हा खुले करण्यात आले आहे.

व्हाईट हाऊसचे क्षेत्रफळ 55 हजार चौरस फूट. केट ब्रोवर या लेखिकेनुसार, "व्हाईट हाऊसमध्ये स्वयंपाकी, फुलवाले, बटलर्स, सफाई कामगार मिळून शंभर कर्मचारी आहेत." सहा मजली इमारतीची देखभाल करणे, एक दिव्यच असते. जगप्रसिद्ध हॉटेलस्‌ व टोलेजंग इमारती बांधण्याचा अनुभव ट्रम्प यांना असला, तरी त्यांच्याबरोबर येणारे अधिकारी व कर्मचारी यांना व्हाईट हाऊसमध्ये काही महिने गोंधळल्यासारखं होणार हे निश्‍चित. "ओबामा यांची कन्या मालिया हिला अधिक एकांत हवा होता. परंतु, तिच्या खोलीचे नूतनीकरण करण्यासाठी अधिकृत परवानगी मिळण्यास काही महिने लागले. बिल क्‍लिंटन अध्यक्ष असताना त्यांची कन्या चेलसी आजारी पडली, तेव्हा हिलरी क्‍लिंटन स्वतः दुसऱ्या मजल्यावरील स्वयंपाक घरात गेल्या व तिच्यासाठी स्क्रॅम्बल्ड एग बनविण्याची तयारी करू लागल्या. पण त्यांना तवा सापडेना. तेव्हा तिथं असलेला बटलर त्यांना म्हणाला, "खालच्या मजल्या वरून ऑमलेट घेऊन येतो." त्याला नकार देत हिलरीं म्हणाल्या, "मला तिला स्क्रॅम्बल्ड एग व ऍपलज्यूस द्यायचंय, अमेरिकेत अन्य ठिकणी राहात असतो, तर मी तेच नसतं का केलं?" जॉर्ज एच डब्ल्यू बुश यांना व्हाईट हाऊस सोडताना त्यांची पत्नी बार्बारा बुश यांना कर्मचाऱ्याची इतकी तीव्र आठवण झाली, की धावत धावत अक्षरशः साऱ्या बटलर्सना त्या अलिंगन देत सुटल्या. जुन्या अध्यक्षांचा निरोप व नव्या अध्यक्षाचे आगमन, या दरम्यान कर्मचाऱ्यांना तयारीसाठी केवळ सहा तास मिळतात, तेव्हा एकच धावपळ होत असते.

ओबामा यांच्या सल्लागारांना तोच अनुभव आला. ज्येष्ठ सल्लागार डॅन पीफर यांनी म्हटलय, "शपथविधी होण्यापूर्वी आम्ही गोठवणाऱ्या थंडीत बसलेलो असतो. इतक्‍या परिश्रमानंतर आपला नेता अध्यक्ष होणार, या आनंदात होतो. आम्हाला बसने व्हाईट हाऊसमध्ये नेऊन सोडण्यात आले. खोल्यात संगणक ठेवलेले होते. "पासवर्ड घाला," अशी सूचना होती. तो घातला की, तुम्ही शासन चालविण्यास मोकळे होता."" पण, ज्येष्ठ सल्लागार व्हॅलेरी जॅरेट यांच्यानुसार, ""व्हाईट हाऊस मधील आणखी एक मेख म्हणजे, तिथं लॅपटॉप नव्हते, आयफोन नव्हते, की आयपॅड नव्हते. आणि तुम्ही स्वतःच्या (लॅपटॉप, आयफोन्स ) वस्तू आणल्या, तर त्या वापरता येत नव्हत्या. हे सारं आश्‍चर्यजनक होतं. इमारत अत्याधुनिक म्हणाल, तर तशीही नाही."" अध्यक्षांचे भाषण लिहिणारे संचालक कॉडी केनन म्हणतात,की गुगल डॉक, वायफाय उपलब्ध नाही. तुम्हाला काम करावं लागतं, ते केवळ इमेलवर. त्यावर व ब्लॅकबेरीवरून क्षणभर देखील नजर हटविता येत नाही. नाही तर, क्षणाक्षणाला येणाऱ्या सूचना, आदेश चुकण्याची भीती असते. तसे झाले, तर मूळ सूचना काय होती, हे शोधण्यात तासंतास जाऊ शकतात. तसे झाले की खैर नसते.

सपर्क संचालक जेन प्साकी व अन्य अधिकाऱ्यांना बाथरूम कुठे हे माहीत नव्हतं. पहिल्या मजल्यावर एक आहे, हे समजायला दुसरं वर्ष उजाडावं लागलं. पूर्व सचिव लिसा ब्राऊन यांना आठवतं,की त्या कार्यालयात बसल्या असता अचानक ओबामा आत आले. व्हाईट हाऊसमधील त्यांचा दुसरा दिवस होता. ओव्हल कार्यालयात अथवा अन्यत्र जायचं कसं, हे त्यांनाही उमगत नव्हतं. आर्थिक मंडळाचे अध्यक्ष जेसन फर्मान वेस्ट विंगमध्ये जाऊन खोल्या पाहात होते, तेव्हा दोन खोल्यांपैकी एक महिलांची बाथरूम असल्याचे वेळीच ध्यानात आले, म्हणून बरे झाले. ओबामा यांचे ज्येष्ठ सल्लागार ब्रियान डेसी खोली सापडेना म्हणून वेस्ट विंगच्या लॉबीत चक्क दोन दिवस ठिय्या मारून बसले होते. डिजिटल विभागाचे माजी संचालक मॅकॉन फिलिप यांना व्हाईट हाऊस व आयसेन हॉवर इमारत म्हणजे विचित्र गुहा (कॅटॅकोंब) वाटते. केटी लिटल यांनी ट्रम्प यांच्या अधिकाऱ्यांना सल्ला दिलाय, की त्यांनी प्रथम व्हाईट हाऊस पूर्णतः पाहावे, त्याचा नकाशा समजावून घ्यावा. नकाशाचे दालन कुठले आहे, हे त्या स्वतः पाहावयास गेल्या आणि नजिकच्या खोलीचा दरवाजा उघडतात, तो काय समोर ओबामा व प्रमुख न्यायाधीश जॉन रॉबर्टस हे चर्चेत मग्न असल्याचे दिसले. ओबामा यांचे उपसल्लागार योहनेस अब्राहम म्हणतात, की व्हाईट हाऊसमधील गुप्तचर खात्याचे अधिकारी मदत करण्यास तत्पर असतात. पण वागणुकीचा एक नियम सर्वानी ध्यानात ठेवायचा असतो, की कुणाशीही वागताना आदबीने वागायचे. फुशारकी टाळायची. पारदर्शक वागणूक महत्वाची. सर्वात मोठी उणीव भासते,ती कुटुंबाला वारंवार भेटण्याची संधि मिळतेच, असे नाही. शिवाय, घरी परतण्यास उशीर का झाला, याचे खरे कारण तुम्ही सांगू शकत नाही. बऱ्याच गोष्टी गोपनीय ठेवाव्या लागतात. रजा, सुट्ट्या तर जवळजवळ पूर्णपणे विसराव्या लागतात. मिशेल ओबामा यांचे प्रथम वृत्त सचिव मॅककॉर्मिक लेलिव्हेल्ड यांनी केलेले वर्णन चपखल आहे. त्यांनी म्हटले आहे," व्हाईट हाऊस इज ऍन ऑफिस, ए होम अँड ए म्युझियम!"

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com