फलित - भारत आसियान शिखर परिषदेचे 

विजय नाईक
मंगळवार, 30 जानेवारी 2018

आसियानमधील व्हिएतनाम, सिंगापूर, इंडोनेशिया ही तीन राष्ट्रे अधिक महत्वाची. आसियानबरोबर असलेल्या सुमारे 70 अब्ज डॉलर्स व्यापारापैकी बव्हंशी व्यापार या देशांबरोबर चालतो. याचा अर्थ उरलेल्या सात राष्ट्रांबरोबर व्यापारवद्धी करावी लागेल. परस्पर व्यापाराचे प्रमाण 2022 अखेर 200 अब्ज डॉलर्स पर्यंत नेण्याचे उद्दिष्ट आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 नंतर प्रथमच आसियान संघटनेच्या दहा राष्ट्रप्रमुखांना शिखर परिषदेसाठी प्रजासत्ताक दिनी आमंत्रित करून पूर्वेकडील दृष्टीधोरणाच्या दिशेनं एक महत्वाचे पाऊल पुढे टाकले. 2014 मध्ये शपथविधी समारंभास त्यांनी सार्क संघटनेच्या आठ सदस्य राष्ट्रप्रमुखांना आमंत्रित करून शिष्टाईचा नवा पायंडा पाडला होता. 

1991 मध्ये केंद्रात आलेल्या पी.व्ही.नरसिंह राव यांच्या सरकारने "लुक इस्ट पॉलिसी"(पूर्वेकडील दृष्टीधोरण) चा प्रारंभ केला. 2014 मध्ये नरेंद्र मोदी सरकारने त्यास अधिक गती देण्याच्या उद्देशाने धोरणाचे "लुक इस्ट पॉलिसी" वरून "ऍक्‍ट इस्ट पॉलिसी" ( पूर्वेकडील कृती धोरण) असे नामकरण केले. त्यावेळी आसियानचा सहभागी होऊन 23 वर्षे उलटली होती. 2017 मध्ये या भागीदारीला 25 वर्षे पूर्ण झाली. 2012 मध्ये आसियान संघटनेचा भारत पूर्णवेळ वाटाघाटींचा(फुल डायलॉग)सहकारी झाला. शिखर परिषदेला मिळालेल्या अनुकूल प्रतिसादाकडे पाहता, हिंदी व प्रशान्त महासागरातील राष्ट्रसमूह मोठया आशेने भारताकडे पाहात आहे, हे दिसून आले. आसियान राष्ट्रे भौगोलिकदृष्ट्या चीन नजिक आहेत. चीनचे विस्तारवादी धोरण व दक्षिण चीन समुद्रातील हस्तक्षेप, यास भारतासह या राष्ट्रांचा आक्षेप आहे. चीन ऑक्‍टोपसप्रमाणे अधिपत्य गाजवू पाहातोय. परंतु, भारतापासून या राष्ट्रांना कोणताही धोका नाही. त्यामुळे परस्पर मैत्रीचे असंख्य लाभ होणार आहेत, ही जाणीव राष्ट्रप्रमुखांच्या भेटीतून प्रतीत होत होती. भारताने स्वतःहून पुढाकार घ्यावा, असे गेली काही वर्षे या नेत्यांना वाटते. 

1967 साली स्थापन झालेल्या आसियान सदस्य राष्ट्रातील म्यानमार हे नवोदित लोकशाही राष्ट्र. तेथे अद्याप लष्कराचे वर्चस्व आहे. अन्य लोकशाही राष्ट्रात मलेशिया, इंडोनेशिया व व्हिएतनाम यांचा समावेश होतो. थायलॅंड व ब्रुनेई राजेशाहीप्रणित लोकशाही आहे, तर सिंगापूरमध्ये नियंत्रित लोकशाही, व लाओस व कंबोडिया ही एकपक्षीय गणराज्ये आहेत. त्यातील काही "एशियन टायगर्स" होत भारत व आसियान सहकार्य साधल्यास त्याचा लाभ सुमारे 1.7 अब्ज लोकांना होणार आहे. देशाच्या 69 व्या प्रजासत्ताक दिनाला उपस्थित असलेल्या नेत्यात आंग सान सू की (म्यानमारच्या प्रमुख कौन्सेलर), अध्यक्ष जोको विडोडो (इंडोनेशिया), पंतप्रधान ली सियेन लूंग (सिंगापूर), पंतप्रधान एनगुएन फुक (व्हिएतनाम), अध्यक्ष रॉड्रिगो दुतर्ते (द फिलिपीन्स), पंतप्रधान नजीब रझाक (मलेशिया), पंतप्रधान प्रयुत छान-ओछा (थायलॅंड) व ब्रुनेईचे नरेश हसनल बोलाकिया यांचा समावेश होता. कोणत्याही नेत्याबरोबर जवळीक साधायची असेल, तर दिसताच क्षणी त्यांना मिठी मारायची मोदी यांची "स्टाईल" आहे. ती बहुचर्चित व काहीशी वादग्रस्तही. त्यांची खिल्ली उडवणारी एक चित्रफीत कॉंग्रेस पक्षाने नेमकी या शिखर परिषदेच्या आधी प्रकाशित केली. त्यामुळे की काय, वरील नेत्यांचे स्वागत करताना एकालाही अलिंगन देताना पंतप्रधान दिसले नाही. सर्वांबरोबर ते केवळ दीर्घ हस्तांदोलन करीत होते. 

"शेअर्ड व्हॅल्यूज्‌, कॉमन डेस्टीनी" हे परिषदेचे बोधवाक्‍य. त्याला अनुसरून 25 व 26 जानेवारी रोजी झालेल्या भेटी व वाटाघाटींनंतर प्रकाशित करण्यात आलेल्या छत्तीस कलमी जाहीरनाम्यानुसार, भारत व आसियान योजना कार्यान्वित करण्याचे ठरले. परस्परात 30 चर्चागट असून, निरनिराळ्या प्रकल्पांच्या प्रगतीबाबत आढावा घेण्यात येतो. आसियानमध्ये भारताची बाजू मांडण्याचे काम आजवर सिंगापूर करीत होता. ते कार्य आता व्हिएतनाम करणार आहे. व्हिएतनाम नजिकच्या समुद्रात खनिज तेल शोधण्यास भारत साह्य करीत आहे. त्याला दोन वर्षापासून चीन विरोध करतोय. तरीही भारताने ते काम सोडलेले नाही. व्हिएतनामचे पंतप्रधान एनगुएन फुक यांनी दिलेले भारत-व्हिएतनाम थेट विमानसेवेचे आश्‍वासन संपर्कवृद्धी व जनतेच्या पातळीवर संबंध वाढविण्यास उपयोगी पडेल. तसेच, व्हिएतनाम व भारताच्या अंतरिक्ष संशोधन संस्थादरम्यान झालेला समझोता आसियानमधील सर्व देशांना उपयोगी पडणार आहे. त्याद्वारे भारताचा रिमोट सेन्सिंग उपग्रह त्यांना उपयोगी पडणार आहे. 

आसियानमधील व्हिएतनाम, सिंगापूर, इंडोनेशिया ही तीन राष्ट्रे अधिक महत्वाची. आसियानबरोबर असलेल्या सुमारे 70 अब्ज डॉलर्स व्यापारापैकी बव्हंशी व्यापार या देशांबरोबर चालतो. याचा अर्थ उरलेल्या सात राष्ट्रांबरोबर व्यापारवद्धी करावी लागेल. परस्पर व्यापाराचे प्रमाण 2022 अखेर 200 अब्ज डॉलर्स पर्यंत नेण्याचे उद्दिष्ट आहे. तथापि, चीन व आसियानच व्यापाराचे 473 अब्ज डॉलर्स (2016) ते प्रमाण पाहता, आपण किती मागे आहोत, याची कल्पना येते. याचा अर्थ चीनला चेकमेट करण्यासाठी भारताला अथक प्रयत्न करावे लागतील. आसियानमधील प्रत्येक राष्ट्राचे जकात, आयात निर्यात विषयक कायदे व भारताचे कायदे यात समन्वय साधण्यावर चर्चे दरम्यान भर देण्यात आला. समाधानाची बाब म्हणजे, आसियान राष्ट्रांनी भारतात आजवर केलेली 515 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक होय. भारत म्यानमारदरम्यानचा कालादान बहुआयामी प्रकल्प, मेकॉंग गंगा प्रकल्प, तसेच या देशांना जोडणारे रस्ते यांचे काम अतिशय धीम्या गतीने चालले आहे. या भागातील सागरी व नद्यांतील वाहतुकीत चीन आक्रमक भूमिका घेतोय. त्याला आवर घालावा लागेल. अमेरिका, भारत, जपान, ऑस्ट्रेलिया, दक्षिण कोरियासह आसियान राष्ट्रांच्या मते दक्षिण चीन समुद्र चीनची जागीर नसून, तो आंतरराष्ट्रीय जलमार्ग असल्याने त्यातून वाहतूक करण्याचे स्वातंत्र्य सर्व राष्ट्रांना आहे, याची जाणीव चीनला ठेवावी लागेल. त्यातून वर्षाकाठी सुमारे 500 अब्ज डॉलर्सच्या मालाची वाहतूक होते. 

राजकीय, महासागरातील सामरिक सहकार्य ठरले.भारत-अमेरिका व जपान दरम्यान पश्‍चिम बंगालच्या उपसागरात होणाऱ्या नौदलाच्या संयुक्त सरावाप्रमाणे आसियान व भारताच्या नौदलाचे संयुक्त सराव करण्याचे जेव्हा ठरेल, तेव्हा खऱ्या अर्थाने चीनला सामुहिकरित्या उत्तर दिले जाईल. कॉंग्रेसचे डॉ मनमोहन सिंग यांचे सरकार असताना दिल्लीत झालेल्या एका परिषदेत व्हिएतनामला दक्षिण चीन परिसरात साह्य करण्याची तेथील परराष्ट्र मंत्र्याने केलेली सूचना त्यावेळचे परराष्ट्र मंत्री सलमान खुर्शीद यांनी अमान्य केली होती. या दृष्टीकोनात मोदी पंतप्रधान झाल्यापासून बराच अनुकूल बदल झाला व व्हिएतनाम हा भारताचा सच्चा मित्र बनला. 

मलेशिया इस्लामिक देशांच्या संघटनेचा (ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कन्ट्रीज) सदस्य. संघटनेच्या परिषदातून मलेशिया काहीसा पाकिस्तानच्या बाजूला झुकतो, असे काही वर्षे दिसून येते. उलट, भारतीय संस्कृतीतील रामायण, महाभारत व बौद्ध धर्माचा प्रसार शतकानुशतके आसियान सह दक्षिण पूर्वेतील अन्य देशात झाल्याने त्या देशात कोणत्या ना कोणत्या स्वरूपात रामायण साजरे केले जाते. महाभारतातील कृष्ण, अर्जुन, गरूड यांना इश्‍वर मानले जाते. जकार्ताच्या मुख्य चौकात अर्जुनाचा भव्य पुतळा आहे. फिलिपीनो भाषेत आजही तब्बल आठशे संस्कृत शब्द वापरले जातात. मलेशियाच्या नव्या राजधानीचे नाव पुत्रजया आहे. या देशातील अनेक कलापथकांनी परिषदेदरम्यान रामायाणाचे बॅले सादर केले, बालीचे रामायण जगप्रसिद्ध आहे. पंतप्रधान मोदी यांच्या निवासस्थानातील पंचवटी सदनात बालीच्या रामायणाची छायाचित्रे ठेवण्यात आली आहेत. बौद्ध सर्किट व नालंदा विद्यापीठास आसियानच्या पर्यटन व शिक्षणाच्या उद्दिष्टांशी जोडण्याची योजना आखण्यात आली असून, येत्या काही वर्षात त्याचे दृष्य परिणाम पाहावयास मिळतील.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vijay Naik writes about ASEAN countries and India