सीमा सुरक्षेचे आव्हान 

मंगळवार, 31 ऑक्टोबर 2017

म्यानमारविषयक संयुक्त राष्ट्रसंघाच्या माजी महासरचिटणीस बान-की-मून व कोफी अन्नान यांचे 2010 ते 2016 दरम्यानचे सल्लागार राजदूत विजय नांबियार यांच्यामते, "रोहिंग्यांचा लोंढा भारतात येईल काय, अशी भीती केंद्राला वाटत असल्याने त्यांना परत पाठविण्याचे सरकारने ठरविले आहे."

देशाच्या सीमाप्रदेशाकडे पाहिल्यास उत्तर सीमेवर अधुनमधून कुरघोडी करणारा चीन, पश्‍चिम सीमेवर युद्धखोर पाकिस्तान व पूर्व सीमेवर मैत्रीपूर्ण व्यवहार असलेला बांगलादेश दिसतो. नेपाळ, भूतान, श्रीलंका, म्यानमार हे ही आपले शेजारी. "चीन सीमेवर इंडो तिबेटन सीमादल" तैनात आहे, तर बांगलादेश व पाकिस्तान सीमेवर सीमासुरक्षा दलाची (बॉर्डर सिक्‍युरिटी फोर्स -बीएसएफ) रात्रंदिवस टेहाळणी सुरू असते. सीमासुरक्षा दलास "फ्रन्ट लाईन ऑफ डिफेन्स" म्हटले जाते. पाकिस्तान सीमेवरील सीमा सुरक्षा दल हे लष्कराच्या मार्गदर्शनाखाली काम करीत असले, तरी त्याचा गुप्तचर विभाग हा सर्वात महत्वाचा समजला जातो. 

सीमासुरक्षा दलाचे महासंचालक के.के.शर्मा म्हणतात, की "सरकंडा" अथवा "एलिफन्ट ग्रास" (पंधरा ते सोळा फूट उंच गवत)मुळे पाकिस्तानला लागून असलेला सीमाप्रदेश टेहाळणी करण्यास जसा कठीण आहे, तितकाच ब्रह्मपुत्रा व अन्य नद्या व नाल्यांमुळे बांग्लादेशनजिक सीमेची देखरेख अत्यंत कठीण आहे. तेथून येणारे बांग्लादेशी निर्वासित व रोहिंग्या यातील फरक ओळखणे कठीण. गेल्या दहा वर्षात सुमारे 40 हजार रोहिंग्या भारतात आले. म्यानमारच्या राखीन प्रदेशातून बांग्लादेशात आलेल्या रोहिंग्या निर्वासितांची संख्या सुमारे 6 लाख असून, त्यापैकी काहींनी भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्यास परिस्थिती आणखी बिकट होईल. 

म्यानमारविषयक संयुक्त राष्ट्रसंघाच्या माजी महासरचिटणीस बान-की-मून व कोफी अन्नान यांचे 2010 ते 2016 दरम्यानचे सल्लागार राजदूत विजय नांबियार यांच्यामते, "रोहिंग्यांचा लोंढा भारतात येईल काय, अशी भीती केंद्राला वाटत असल्याने त्यांना परत पाठविण्याचे सरकारने ठरविले आहे."

के.के. शर्मा व विजय नांबियार यांना "इंडियन असोसिएशन ऑफ फॉरेन अफेअर्स करस्पॉंडन्टस्‌" या संघटनेने सीमासुरक्षा व रोहिंग्यांची समस्या या विषयावर चर्चा करण्यास अलीकडे आमंत्रित केले होते. यातून अनेक नवे पैलू प्रकाशात आले. शर्मा म्हणाले, की भारत-बांग्लादेश सीमेची एकूण लांबी 4 हजार 96.7 कि.मी असून, त्यापैकी सुमारे एक हजार कि.मी. सीमेवर कुंपण नाही. लोंकांची घरे थेट आंतरराष्ट्रीय सीमेला लागून आहेत. काही घरांच्या खोल्या भारतात व त्यांचे आंगण बांग्लादेशात, अशी स्थिती आहे. गेल्या काही वर्षात सर्वात मोठी समस्या दुभत्या जनावरांची बांग्लादेशात चोरट्या मार्गाने होणारी निर्यात, ही होय. या व्यतिरिक्त सोने, मद्य आदी पदार्थांचाही समावेश आहे.पश्‍चिम बंगालमध्ये दुभत्या जनावरांची हत्या करण्यावर बंदी नाही. काही वर्षांपूर्वी या जनावरांच्या निर्यातीचे प्रमाण वर्षाला 22 ते 23 लाख इतकं प्रचंड होतं. ते आता 5 ते 6 लाखावर आलं आहे. सीमा सुरक्षा दलाच्या कारवाईमुळे प्रमाण घटलय. बांग्लादेश सीमेत एका पशूच्या आयातीवर पाचशे टका जकात आकारली जाते. त्यामुळे चोरटी आयात किती झाली, याची माहिती मिळण्यास मदत होते. गेल्या काही वर्षात बांग्लादेशातील सुमारे शंभर तस्करांना सीमासुरक्षा दलाने नेस्तनाबूत केले. पण 2013 पासून प्राणघातक शस्त्रे न बाळगण्याचे धोरण अमलात आणले. त्यामुळे सीमेवरील चकमकीत होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण घटले आहे. शस्त्रांऐवजी "पंपगन"चा वापर होतोय. गेल्या वर्षी चकमकीत सुमारे दीडशे लोक जखमी झाले होते. त्याचे प्रमाण शंभरवर आले आहे. 

सीमासुरक्षा दलाच्या जवानांपुढे आसाम, मेघालय, मिझोराम, त्रिपुरा आदी राज्यातील सीमासुरक्षा जीवघेणी ठरते, ती तेथे सेलेब्रल मलेरियाच्या प्रादुर्भावामुळे. औषधोपचारात 24 तासांची दिरंगाई झाल्यास रुग्णाचा मृत्यू ठरलेला. दलाच्या परिभाषेत "एफडीएल (फॉरवर्ड डिफेन्डेड लोकॅलिटीज)" मधील हवामान अतिशय प्रतिकूल असते. 15 हजार 600 फूट उंच सीमेवर शून्याखाली 25 ते 30 डिग्री सेंटिग्रेड तापमानात जवानांना वावरावे लागते. ढगफुटी, दरड कोसळी आदींचा अचानक सामना करावा लागतो. 

शर्मा यांच्या मते, "जम्मूला लागून असलेली पाकिस्तानची सीमा अत्यंत सक्रीय असून, त्यात पाकिस्तानतर्फे लादण्यात येणाऱ्या गोळीबार व अन्य शस्त्रांमुळे सामावर्ती भागातील अनेकांना प्राण गमावावे लागतात. अशा चकमकीत भारतातर्फे 51 एमएम वा 81 एमएम व पाकिस्तानतर्फे 62 एमएम व 82 एमएम मॉर्टर्सचा वापर केला जातो."" 

"सीमासुरक्षा दलाची 1 डिसेंबर 1965 साली स्थापना झाली, तेव्हा त्यात 25 बटालियन होत्या. (एका बटालियनमध्ये साधारणतः 300 ते 800 जवान असतात) आता दलामध्ये 186 बटालियन्स असून, सीमा सुरक्षा पाहणारे जगातील हे सर्वात मोठे दल (अंदाजे दीड लाख जवान) बनले आहे,"" असे शर्मा अभिमानाने सांगतात. ते म्हणतात, की आम्हाला आधुनिक शस्त्रांपेक्षा गरज आहे, ती अत्याधुनिक उपकरणांची. बीएसएफने त्याबाबत नुकत्याच सुरू केलेल्या "कॉप्रिहेन्सिव इंटेग्रेटेड मॅनेजमेन्ट सिस्टीम" या प्रकल्पांतर्गत जम्मूमधील प्रत्येकी पाच कि.मीच्या दोन पट्ट्यात प्रकल्प लागू करण्यात येणार आहे. त्यात "हॅंड हेल्ड थर्मल इमेजर्स" वापरण्यात येतील. त्यांचे वैशिठ्य म्हणजे, त्यात "हीट सिग्नेचर"(शारिरीक तापमान मापक)ची व्यवस्था असल्याने दुरून (दोन ते तीन कि.मी वरून) येणारी व्यक्ती अथवा जनावर अचूक हेरता येते. या व्यतिरिक्त "नाईट व्हिजन डिव्हायसेस", कॅमेरे, रडार्स आदींचा वापर करण्यात येईल. या व्यवस्थेमुळे (स्मार्ट फेन्स) मुळे सुरक्षा दलाला आगाऊ इशारे मिळतील. तेथून सूचना-इशारा मिळाला, की पुढची योजना करणे सोपे जाईल. सीमा अधिक सुरक्षित होईल. एका प्रश्‍नाला उत्तर देताना,"" बजरंगी भाईजान" या चित्रपटात दिसणारे बोगदे खरे नाहीत,"" असे सांगून शर्मा म्हणाले, की राजस्तानमधील जमीन वालुयुक्त आहे. त्यामुळे, तेथे बोगदा बांधणे अशक्‍य आहे.तो बांधताना माणूस स्वतःच गाडला जाण्याची शक्‍यता अधिक. उलट जम्मू व पंजाबमधील जमीन घट्ट असल्याने तेथे बोगदे बांधणे शक्‍य आहे. 

अतिरेक्‍यांनी केलेल्या घुसखोरीबाबत 23 सप्टेंबर रोजी शर्मा यांनी पाकिस्तान रेंजर्सच्या महासंचालकाबरोबर बोलणी केली. व त्यात संशयास्पद हालचाल दिसली, की त्याची सूचना एक रंगीत "ट्रेसर" सोडून दुसऱ्या बाजूला द्यायची, असे ठरले असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे, ""नशिले पदार्थ नियंत्रण कार्यालय, इंटेलिजन्स ब्युरो, आर अँड एडब्ल्यु (रॉ), सेनादल याबरोबर सातत्याने संपर्क चालू असतो,"" असे ते म्हणाले. मानवी अथवा नैसर्गिक संकटांच्या वेळीही सीमासुरक्षा दलाने काम केले असून, त्याबाबत दलाला गौरवान्वित करण्यात आले आहे. 

राजदूत विजय नांबियार यांच्यानुसार, "रोहिंग्यांचा प्रश्‍न सोडविण्यासाठी राष्ट्रसंघाचे माजी महासरचिटणीस कोफी अन्नान यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली असून, त्यांच्यासाठी आंतरराष्ट्रीय निधी उभारावा, अशी शिफारस करण्यात आली आहे. रोहिंग्यांपैकी काहींना भारत विरोधी कारवाया करण्यास पाकिस्तानमधील जामत उद-दावाचा म्होरक्‍या हाफीझ सईद उचकावित असून, पश्‍चिम सीमेप्रमाणेच पूर्व सीमेवरून दहशतवादाचा प्रवेश होणार नाही, यासाठी भारताला सतर्क राहावे लागेल."

Web Title: Vijay Naik writes about BSF and border security