डोकलम-लष्करी चष्म्यातून 

Vijay Naik writes about India and China dispute on Doklam issue
Vijay Naik writes about India and China dispute on Doklam issue

डोकलममध्ये रस्ता बांधण्याच्या उद्देशाने 16 जून रोजी चीनने घुसखोरी केली व ती ध्यानात येताच भारतीय सेनेने तेथे जाऊन त्यांना रोखून धरले. ही घटना होऊन 64 दिवस उलटले.

लष्करातील विश्‍वसनीय सूत्रांनुसार, "चीनी व भारतीय सैन्य जैसे थे सीमेवर परतण्याबाबत अद्याप कोणताही समझोता न झाल्याने वाद निवळण्यास काही महिने लागू शकतात. सिक्कीम सीमेवरील नाथू-ला खिंड भारताच्या ताब्यात आहे. तथापि, तेथून चार पाच कि.मीवरील जेलापा ही खिंड चीनच्या ताब्यात आहे. भूतान, भारत व चीनला लागून असलेला हा टापू उंचसखल डोंगरांनी व्यापलेला आहे. सिक्कीम व लडाख भागात सीमेवर सैन्य, युध्दात वापरण्यात येणाऱ्या तोफा, वाहने आदी नेण्यासाठी आवश्‍यक असलेली पायाभूत रचना भारताकडे आहे. बऱ्यापैकी रस्ते आहेत. तसेच, आपण उंचावर असल्याने शत्रूवर लक्ष ठेवणे सोपे आहे, तथापि, अरूणाचल प्रदेशात मात्र परिस्थिती चांगली नाही.

लष्करी माहितीनुसार, "डोकलमलचा डोंगराळ टापूत एकीकडून दुसऱ्या टोकापर्यंत पायी जाण्यासाठी तीन ते 30 दिवस लागू शकतात. उन्हाळ्यात बर्फ वितळल्याने टेकड्या, डोंगर पार करणे सोपे, तथापि, हिवाळ्यात सारे बर्फाच्छादित असल्याने प्रवासास आणखी वेळ लागू शकतो. याचाच अर्थ, येथे चीनला सैन्याच्या हालचाली करण्यास जड जाऊ शकते. चीनने भले तिबेटमध्ये रणगाडे आदींचा सराव केला असो, ते बर्फाळ प्रदेशात नेणे व त्यांची मदत घेऊन हल्ले चढविणे तितके सोपे नाही. रणगाड्यात वापरण्यात येणारे डीझेल थंडीमुळे थिजते. त्यामुळे रणगाडे चालू करण्यास वेळ लागतो. तेवढ्यात वायुदलातर्फे त्यावर हल्ले होऊन ते निकामी होऊ शकतात. म्हणूनच, अशा टापूत हालचाली करण्यासाठी सैनिकांची कुमक, त्यांना देण्यात येणारे डोंगरी युद्धाचे प्रशिक्षण, तुकड्यांतील सैनिकांची संख्या, रस्ते आदी पायाभूत रचना हे घटक प्रामुख्याने महत्वाचे ठरतात. चीन व भारताच्या आपापल्या सैन्याची हालचालही हे घटक ध्यानात घेऊनच होईल."" कारगिलमध्ये झालेल्या युद्धात तोलोलिंगमधील टायगर हिल येथे झालेल्या डोंगरी लढाईत निष्णात असलेल्या भारतीय जवानांनी पाकिस्तानच्या सैनिकांना वेचून वेचून नेस्तनाबूत केले, याचा विशेषोल्लेख करावा लागेल. 

लेह लडाख मधील "चुमार" हे भारत चीन दरम्यान असलेल्या प्रत्यक्ष ताबारेषेवरील ठिकाण. तेथे 2014 मध्ये चीनने केलेल्या घुसखोरीबाबत सैन्यादरम्यान समझोता होण्यास दोन आठवड्यापेक्षा अधिक काळ लागला, तर दौलत बेग ओल्डी परिसरातील डेपसॅंग खोऱ्यात दोन्ही बाजूकडून सैन्य माघारी जाण्यास तीन आठवडे लागले होते. अर्थात, या समस्या फक्त द्विपक्षीय होत्या. त्यामुळे परस्परांच्या लष्करी अधिकाऱ्यांनी ध्वज बैठका घेऊन चर्चेद्वारे प्रश्‍न सोडविला. डोकलममध्ये भारत-चीन व्यतिरिक्त भूतान हा तिसरा घटक आहे. डोकलममध्ये "स्टॅंड-ऑफ" असतानाच लडाखमधील 15 हजार फूट उंचीवरील पोंगॉंग या 135 चौरस कि.मी च्या तळ्यातील (पोंगॉंग त्सो) सीमेचे चीनी बोटींनी उल्लंघन करण्याची घटना गेल्या आठवड्यात घडली. या तळ्याचा एक तृतीअंश भाग भारताच्या, व दोन तृतीअंश चीनच्या ताब्यात आहे. तळ्याभोवती उंच डोंगर आहेत. तळ्यावर दाट धुके परसल्यास सीमा परिसरही धूसर होतो. त्यामुळे टेहाळणी करणाऱ्या बोटी एकमेकाच्या हद्दीत शिरण्याची शक्‍यता अधिक असते.

परिसर अद्याप पूर्णपणे बर्फमय झालेला नाही. भारताकडे आजवर एक तृटी होती, ती म्हणजे, चीनकडे आधुनिक बोटी होत्या व आपल्याकडे जुन्या बोटी होत्या. त्यामुळे वेग व उपकरणांबाबत आपण मागे होतो. परंतु, गेल्या काही महिन्यात भारतानेही पोंगॉंगमध्ये आधुनिक बोटी दाखल केल्या आहेत. त्यामुळे, जलमय सीमेचे चीनी बोटींनी केलेले उल्लंघन भारतीय सेनेच्या तत्काळ ध्यानात आले व चीनी बोटींना परतावे लागले. चीनी सैन्याच्या हालचालींवर बारकाईने नजर ठेवावी लागत आहे, याचे कारण चीनने ल्हासा (तिबेट)पर्यंत बांधलेला रेल्वेमार्ग व निर्माण केलेले रस्त्यांचे सुमारे पन्नास हजार कि.मी.चेजाळे. त्यामुळे, चीनी सैन्य सीमेवर पोहोचण्यास वेळ लागणार नाही. तथापि, तज्ञांनुसार, ""भारताला सर्व कल्पना असून, त्यादृष्टीने आपणही तयार आहोत."

विश्‍वसनीय सूत्रांनुसार, "डोकलम व हिमालयातील सीमेवर कोणतेही बांधकाम करायचे असेल, तर ते जून ते सप्टेंबर या तीन महिन्यात करावे लागते. रणगाडे, तोफा यांची वाहतूक या दरम्यान करणे सोयीचे असते. एकदा का बर्फवृष्टी सुरू झाली, की सारे काम ठप्प, अथवा अत्यंत जिकिरीचे होते. डोकलमच्या संदर्भात समाधानाची एक बाब म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरून केलेल्या व चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी जुलैमध्ये झालेल्या सैनिकांच्या संचलनापुढे केलेल्या भाषणात "डोकलम" या शब्दाचा टाळलेला उल्लेख, ही होय.""लष्करी तज्ञ व परराष्ट्र मंत्रालयातर्फे "शिष्टाचाराच्या माध्यमातून चर्चे"चा वारंवार उल्लेख होत आहे. त्यामुळे, भारताने अजूनही समझोत्याची आशा सोडलेली नाही. चीनच्या "ग्लोबल टाईम्स" दैनिकाने कितीही आगपखड केली, तरी भारत सरकार व वृत्तपत्र माध्यमांनी पाळलेला संयम, याचा विशेष उल्लेख करावा लागेल. "सीमेवरील वाद वाटाघाटींनी सोडवायाचे,"" असे ठरले असताना, वाद उकरून काढण्याच्या चीनच्या अरेरावीला भूतान व जपान व अमेरिका यांनी दाखविलेला विरोध, बरेच काही बोलून जातो.

दक्षिण चीन समुद्रातील वादग्रस्त बांधणी, त्या परिसरातील अनेक देशांबरोबर असलेले मतभेद, याकडे पाहता, ""अनेक आघाड्यावर वैमनस्याचे वातावरण निर्माण करणे चीनलाही परवडणार नाही,"" असे लष्करातील विश्‍वसनीय सूत्रांचे म्हणणे आहे. एक गोष्ट मात्र निश्‍चित, की दिवसेंदिवस भूतानवरील चीनचा दबाव वाढत जाणार आहे, तो कमी करण्यासाठी भारताला शिष्टाईकौशल्य दाखवावे लागेल. त्याच प्रमाणे, चीनच्या हल्ल्यास तोंड देण्यास सज्ज राहावे लागेल. आपली बाजू मांडण्यासाठी चीन एकाच वेळी दोन तीन देशात राजदूत पाठवून त्या देशांचे मन वळविण्याचा प्रयत्न करतो. त्यादृष्टीने, डोकलम चीनने प्रथम नकाशाचा आधार घेतला. नंतर तिथं भारतीय सैन्याच्या हालचालींचे "मॉक चित्रण" दाखवून भारताने कशी घुसखोरी केली, हे दाखविण्याचा प्रयत्न केला. नंतर, श्‍वेतपत्रिकाही काढली. तथापि, भारताने "सायलेंन्ट डिप्लोमसी" करून अन्य देशांना भारताची भूमिका समजावून सांगितली. तज्ञांच्या मते, ""सिक्कीममधील "चिकन्स नेक" परिसराला धोका उद्भवणार नाही. तसे काही झाल्यास, सामना करण्यास भारतीय सेना तयार आहे."" सिक्कीममध्ये "झीरो पॉईंट" नजिक चीन सीमेवर मराठा रेजिमेन्ट तैनात असून, ते चोखपणे आपले काम करीत आहेत. अनेक ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची छायाचित्रे व भगवे झेंडे पाहून कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यास मावळे तयार आहेत, याचीच खात्री पटते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com