कुलदीप नायर : एक पर्व संपले 

Kuldeep Nayyar
Kuldeep Nayyar

ज्येष्ठ पत्रकार, संपादक व लेखक कुलदीप नायर (वय 95) यांचे काल रात्री प्रदीर्घ आजारानंतर दुःखद निघन झाले. भारतीय पत्रकारितेतील एक पर्व संपले. भारत-पाकिस्तान दरम्यान त्यांनी नागरी पातळीवर अनेक वर्ष शिष्टाई केली. दोन्ही देशांचे संबंध सामान्य व्हावे, यासाठी ते दोन्ही देशातील उच्च नेत्यांशी संपर्क साधून होते. "साऊथ एशिया फ्री मिडिया एसोसिएशन" या संघटनेच्या पाकिस्तान, भारत व अन्यत्र झालेल्या परिषदांना ते उपस्थित असत. राजकीय परिस्थिती, पत्रकारांचे स्वातंत्र्य,संहिता या विषयावर झालेल्या परिसंवादातून त्यांची वारंवार भेट होत असे. तेव्हा बातचीतही होई. अनेक वर्षांपूर्वी नायर "सकाळ" साठी स्तंभलेखन करायचे. मी त्यांना भेटे, तेव्हा ते आवर्जून दोन गोष्टी विचारीत," सकाल का कैसे चल रहा है? सर्क्‍युलेशन कितना हो गया है?" त्यांना माहिती देता, त्यांच्या चेहऱ्यावर हास्य झळकायचे. 

कुलदीप नायर यांनी पत्रकारिता गाजविली त्या दिवसात, ना फेसबुक, ना, ट्‌विटर, ना, व्हॉटस्‌अप आदी सोशल मिडिया अस्तित्वात होता. ट्रोलिंग होत नव्हते. त्या काळात राजकीय नेत्यांशी कोणत्या पत्रकाराची किती जवळीक आहे व त्या आधारे तो कोणती गुपिते प्रकाशात आणू शकतो, यावर त्याचा कस लागे. कुलदीप नायर यांनी त्या काळात अनेक "स्कूप्स" प्रकाशात आणले. पाकिस्तानचे अण्वस्त्र निर्मिती करणारे डॉ ए.क्‍यू. खान यांच्याबरोबर झालेली भेट व त्यानंतर त्यांनी केलेला गौप्यस्फोट, तसेच पाकिस्तानचे माजी अध्यक्ष अयूब खान व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची ताक्‍शंद मधील भेट व त्यांचा आकस्मिक झालेला मृत्यू, याचे व अनेक बातम्या मागील बातम्यांचे, त्या मिळविण्यासाठी केलेल्या प्रयत्नाचे तपशीलवार वर्णन त्यांनी त्यांच्या "स्कूप" या पुस्तकात केले आहे. 

शेवटपर्यंत त्यांना एक खंत वाटत होती. तिच्या विषयी ते वारंवार बोलत. 19 मार्च 2017 रोजी "एनडिटीव्ही"चे पत्रकार रविश कुमार यांना गांधी शांति प्रतिष्ठानतर्फे उत्कृष्ट पत्रकारितेचे पारितोषक त्यांच्याहस्ते देण्यात आले. त्यावेळी झालेल्या समारंभातही त्यांनी तो विषय छेडला. उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री आदित्यनाथ यांच्याबाबत बोलताना ते म्हणाले, की जनतेने उत्तर प्रदेशाला दिलेल्या कौलाचा मला आदर आहे. परंतु, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ एका विशिष्ठ विचारसरणीचे आहेत. ते मुसलनानांविरूद्ध खुल्लमखुल्ला बोलतात. एका विशिष्ट जातीविरूद्ध ते आहेत. अशा परिस्थितीत,"" जनता भी बिखर जाती है, इधर उधर हो जाती है."" त्यावेळी, कोणती गोष्ट चुकीची, कोणती योग्य, हे सांगणे पत्रकारितचे कर्तव्य ठरते." "काही महिन्यापूर्वी जामिया मिलिया विद्यापिठाला मी भेट दिली होती. तेथील काही मुस्लिम म्हणाले, " हमे जान, माल का खतरा है, हमे व्होट नही चाहिये, सुरक्षा चाहिये" असे सांगून नायर म्हणाले, की देशात 80 टक्के हिंदू आहेत. त्यांनीच सुरक्षेचे (अल्पसंख्यांकासाठी) वातावरण निर्माण केले पाहिजे.

"भारतीय घटनेनेच कायद्यासमोर प्रत्येक नागरिकाला समान मानले आहे, याचा आदर व्हावयास हवा. 1946 मध्ये मी लाहोरच्या लॉ कॉलेजमध्ये शिकत होतो. महंमद अली जिन्हाही त्याच कॉलेजमध्ये होते, ते म्हणायचे की हिंदू व मुसलमानांनी वेगळे व्हावयास हवे. मला वाटायचे की आपली राहाणी सारखी, खाणेपिणे, संवयी सारख्या, मग वेगळेपण कशासाठी . जिनांना विरोध करायचे ते अबुल कलम आझाद. ते म्हणायचे, "जिना काही म्हणोत, हिंदुस्तानही माझा आहे." अखेर, फाळणीच्या दिवसात कॉलेजमधील भटारखानेही वेगवेगळे झाले. एक हिंदूंसाठी, एक मुसलमानांसाठी. त्यावेळी मुस्लिम लीगचे नेते ""हिंदूंना पाकिस्तानात राहू दिले जाणार नाही, असे सांगू लागले. अखेर आम्ही हिंदुस्तानात येण्यासाठी निघालो. एकीकडे आम्ही येत होतो. तर दुसऱ्या बाजूने मुस्लिम पाकिस्तानच्या दिशेने येत होते. याच स्थलांतरात 10 लाख हिंदुमुस्लिम मारले गेले. ते कशासाठी? दोन्ही देशात शांतता नांदावी, या उद्देशाने आजही मी सीमेवर जाऊन मेणबत्ती लावतो. तेव्हा त्या घटनेची आठवण होते. मला असे वाटते, की दोन्ही देशात "सौम्य सीमा" (सॉफ्ट बॉर्डर) हवी, जेथून कोणत्याही भारतीयाला व पाकिस्तानी माणसाला एकमेकांच्या देशात जाता येणे सोपे व्हावे.""दोन्ही देशात संबंध सामान्य व्हावे, यासाठी प्रयत्न करणारे ते "शांतिदूत" होते. 

त्यांनी पत्रकारिता व राजकारण, भारत- पाकिस्तान संबंध यावर पंधरा पुस्तके लिहिली. त्यातील "बियॉंड द लाईन्स" हे आत्मचरित्र, "डिस्टंट नेबर्स," "ए टेल ऑफ द सबकॉन्टिनेन्ट," "इंडिया आफ्टर नेहरू," "वॉल ऍट वाघा," "इंडिया पाकिस्तान रिलेशनशिप," "द जजमेन्ट," "स्कूप" व "इंडिया हाऊस" ही प्रत्येक पत्रकाराने वाचली पाहिजे. 

कुलदीप नायर हे केवळ विश्‍लेषक पत्रकार व लेखक नव्हते, राजदूत म्हणूनही त्यांनी उत्तम कामगिरी बजावली. स्वातंत्र्योत्तर काळात त्यांना भारताचे वॉल्टर लिपमन म्हटले, तर अतिशयोक्ती ठरणार नाही. मार्च 1990 मध्ये त्यांची ब्रिटनमध्ये भारताच्या उच्चायुकपदी नेमणूक झाली. 1997 मध्ये ते राज्यसभेवर सदस्य म्हणून नियुक्त झाले. आण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाला त्यांनी पाठिंबा दिला होता. गेल्या काही वर्षात मागील पिढीतील स्टेट्‌समनचे सी. आर. इराणी, "आउटलुक"चे विनोद मेहता, खालिज टाईम्सचे स्तंभलेखक एस.निहाल सिंग, स्तंभलेखक इंदर मलहोत्रा यांचे निधन झाले. तत्पूर्वी पत्रकारिता गाजविणारे द टाईम्स ऑफ इंडियाचे गिरिलाल जैन, दिलीप पाडगावकर, द स्टेटस्‌मनचे एस. सहाय याच्या श्रेणीतील नायर हे समकालीन पत्रकार होत. गेल्या पाच वर्षात ते बरेच थकले होते. तरीही वृत्तस्वातंत्र्याचा विषय निघाला व त्याविषयी परिसंवाद असला, की त्याला वक्ते अथवा श्रोते म्हणूनही ते आवर्जुन उपस्थित राहात. युपीए सरकार असो, की मोदी यांचे एडीए सरकार असो, ज्यावेळी त्यांनी वृत्तपत्र स्वातंत्र्याला जखडणारी विधेयके, वटहुकूम लागू करण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी कुलदीप नायर यांनी त्याविरूद्ध झालेल्या पत्रकारांचे मोर्चे, निदर्शने यांना सक्रीय पाठिंबा दिला. वयाच्या नव्वदीत असतानाही एक जागरूक, संवेदनशील, सौम्यभाषी पण लढाऊ पत्रकार म्हणून त्यांची प्रतिमा ध्यानात राहील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com