राजधानी अन्‌ मराठी संस्कृती 

मंगळवार, 26 सप्टेंबर 2017

दिल्ली मराठी प्रतिष्ठानाला आशीर्वाद आहे, तो केंद्रीय महामार्ग व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांचा. त्यांनी त्याचे साह्यक वैभव डांगे यांच्यावर कार्यक्रम आयोजनाची जबाबदारी टाकली. त्यांनी गेल्यावर्षी इंडिया गेटच्या सान्निध्यात दिवाळीच्या पूर्वसंध्येवर महेश काळे यांच्या शास्त्रीय संगीताचा "दिवाळी पहाट" हा अत्यंत श्रवणीय कार्यक्रम आयोजित केला.

दिल्ली व नजिकच्या शहरातील मराठी लोकांची संख्या सुमारे तीन लाखांवर जाऊन पोहोचली आहे. मराठी माणूस म्हटला, की मराठी मित्रमंडळे आलीच. सुमारे पंचेचाळीस मराठी सांस्कृतिक मंडळे दिल्लीत आहेत. नजिकची शहरे होत, नोयडा, गाझियाबाद, फरीदाबाद व गुडगाव (गुरूग्राम). या मंडळांतून वर्षभर कोणते न कोणते सांस्कृतिक कार्यक्रम चालू असतात. त्यात मराठी नाटकं, शास्त्रीय संगीत, भावगीत गायन, प्रतिथयश व्यक्तींच्या प्रगट मुलाखती, भाषणं, खाद्यमेळावे, तैलचित्र व अन्य चित्रांची प्रदर्शने आदींचा समावेश होतो. या क्षेत्रात सक्रीय असलेल्या संस्थांत प्रामुख्याने महाराष्ट्र सांस्कृतिक समिती, वनिता समाज, जेएनयू मधील प्रा. मनीश दाभाडे यांचे महाराष्ट्र डेव्हलपमेन्ट अँड प्रमोशन सेंन्टर, सुहास बोरकर यांची महाराष्ट्र सांस्कृतिक आणि रणनीती अध्ययन समिती, महाराष्ट्र सरकारचा सांस्कृतिक विभाग व दिल्ली मराठी प्रतिष्ठान यांचा समावेश होतो. 

त्यात अलीकडे भर पडली आहे, ती "आमची दिल्ली प्रतिष्ठान " या नव्या सांस्कृतिक उपक्रमाची. महाराष्ट्र सांस्कृतिक समितीचे अध्यक्ष रा.मो.हेजीब यांचे नुकतेच निधन झाल्याने दिल्लीच्या सास्कृतिक विश्‍वातील एक महत्वाचे पान गळून पडले. हेजीब ही व्यक्ती नसून संस्था होती. महाराष्ट्र सरकारच्या माहिती खात्याच्या संचालक पदावरून मुक्त झाल्यावर त्यांनी मराठी संस्कृतीचे जतन व प्रगटन करण्याचे काम हाती घेतले व गेली अर्धदशक एकहाती चालविले. या कार्यात त्यांना पत्नी नीना हिचा हातभार होताच. काही संस्कृतिप्रेमींच्या साह्याने ते कार्य त्या पुढे चालवित आहेत. सांस्कृतिक क्षेत्रात राष्ट्रपतींचे माजी एडीसी कर्नल काकतीकरही सक्रीय आहेत. 

दिल्ली मराठी प्रतिष्ठानाला आशीर्वाद आहे, तो केंद्रीय महामार्ग व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांचा. त्यांनी त्याचे साह्यक वैभव डांगे यांच्यावर कार्यक्रम आयोजनाची जबाबदारी टाकली. त्यांनी गेल्यावर्षी इंडिया गेटच्या सान्निध्यात दिवाळीच्या पूर्वसंध्येवर महेश काळे यांच्या शास्त्रीय संगीताचा "दिवाळी पहाट" हा अत्यंत श्रवणीय कार्यक्रम आयोजित केला. प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी या निवेदिका होत्या. यंदा प्रतिष्ठानतर्फे 21 ऑक्‍टोबर रोजी नव्या पिढीचे गायक राहुल देशपांडे व मधुरा दातार यांच्या सुरेल गाण्यांची मैफल "दिवाळी पहाट" घेऊन येणार आहेत. सूत्रचालक आहेत सुप्रसिद्ध निवेदक सुधीर गाडगीळ. गेल्या वर्षीच्या "दिवाळी पहाट"ला प्रचंड प्रतिसाद मिळाला. वैभव डांगे यांना या कार्यात मदत करीत आहेत विजय सातोकर व प्रमोद मुजुमदार हे दोन पत्रकार. 

"आमची दिल्ली प्रतिष्ठान" सुरू केले आहे, ते पीटीआय वृत्तसंस्थेचे माजी संपादक विजय सातोकर व त्यांची पत्नी सुषमा यांनी. विजय सातोकर पीटीआयचे कोलंबो व काबूल येथील खास वार्ताहर होते. त्यांनी विडा उचललाय तो येत्या 6 ते 16 ऑक्‍टोबर येथील इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्राच्या इमारतीत छत्रपती शिवरायाच्या एकशेवीस तैलचित्रांचे भव्य प्रदर्शन भरविण्याचा व त्यानिमित्ताने दिल्लीला "छत्रपतीमय" करून टाकण्याचा. प्रथमच हे प्रदर्शन दिल्लीत भरत आहे. सातोकर त्यांना साह्य लाभले आहे, पुण्यातील ड्रग फौंडेशनचे व हातभार लावलाय, पुण्यातील "भाषा" संस्थेच्या अध्यक्ष स्वाती राजे यांनी. प्रदर्शनाचे स्थळ पाहून विचारविनिमय करण्यासाठी शिवछत्रपतीचे चरित्रकार शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी अलीकडे दिल्लीला दोन वेळा भेट दिली. बाबासाहेब 95 वर्षांचे असले, तरी त्यांच्या विचारातील ताजेपण व शिवाजीवरील भक्ती यांचा परिचय त्यांच्याबरोबर बोलताना अनेकांना आला. बाबासाहेबांनी या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्यांनीही प्रदर्शनाबाबत स्वारस्य दाखविले आहे. गेल्या वर्षी जूनमध्ये मुंबईतील जहांगीर आर्ट गॅलरीत पंधरा दिवस चाललेल्या या प्रदर्शनाला 80 हजार लोकांनी भेट दिली. त्याचे उद्घाटन राज्यपाल विद्यासागर राव व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले होते. 

दिल्लीतील प्रदर्शनाचे उद्घाटन लोकसभेच्या सभापती श्रीमती सुमित्रा महाजन यांच्या हस्ते होणार असून, समारोप केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते होईल.यावेळी केंद्रीय मंत्री समारंभाच्या अध्यक्षस्थानी असतील. प्रदर्शनाला दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीश सिसोदिया भेट देणार असून, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या व्यतिरिक्त परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव ज्ञानेश्‍वर मुळे यांचे "शिवाजी ए सुपर डिप्लोमॅट", अखिल भारतीय मराठी साहित्य सम्मेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांचे " भाषा, साहित्य आणि संस्कृती - काल आज आणि उद्या" या विषयावर भाषणे होणार आहेत. प्रदर्शनास भेट देण्यासाठी राजकीय नेते, दिल्लीस्थित कलाकार, शालेय विद्यार्थी, देशोदेशींचे राजदूत याना आमंत्रणे देण्यात आली असून, सातोकर यांचे सारे कुटुंबच, चिरंजीव मिहिर, स्नुषा निधी, श्‍वशुर कृष्णन व पत्नी साधना कार्यरत आहेत. 

प्रदर्शनाचे प्रमुख आकर्षण भारतीय कलेचे अग्रणी तैलचित्रकार जहांगिर पी.वाझिफदार यांनी काढलेले राजा शिवाजी हे तैलचित्र (पोर्ट्रेट) असेल. त्यास "पट्टीचे तैलचित्र" म्हटले जाते. पट्टीचे याचा अर्थ त्याची प्रतिकृती कुणीही बनवू शकणार नाही, असे ते असल्याची पावती बाबासाहेब पुरंदरे यांनी दिली आहे. 2010 मध्ये वाझिफदार यांनी ते पूर्ण केले, तेव्हा ते 90 वर्षांचे होते. बाबासाहेबांपासून वाझिफदार बिल्डर्सचे कंपनीचे संचालक दीपक गोरे यांनी स्फूर्ती घेऊन सैह्याद्रिच्या कडाकपारीतील शिवरायाचे सारे किल्ले,गड पायी घातले. गोरे यांनी चित्रकार श्रीकान्त चौगुले व त्यांचे चिरंजीव गौतम चौगुले यांना तैलचित्रातून शिवछत्रपतीचे "स्वराज्यपर्व" निर्माण करण्याचे कार्य दिले. त्यातून शंभरावर अधिक तैलचित्रांची निर्मिती झाली आहे. ती प्रदर्शनात ठेवण्यात येतील. 

आणखी एक आकर्षण म्हणजे महाराष्ट्र सरकारतर्फे अरबी समुद्रात उभारल्या जाणाऱ्या शिवछत्रपतींच्या नियोजित पुतळ्याची तीस फुटी छोटी प्रतिकृती प्रांगणात ठेवण्यात येईल. प्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांच्यातर्फे पुतळा तयार करण्यात येत आहे. प्रदर्शनाव्यतिरक्त कार्यक्रमात शिवशाहीतील खाद्यपदार्थ, चित्रकला स्पर्धा, शिवाजीच्या जीवनावरील पुस्तकविक्री व नाट्यकृतीही सादर केल्या जाणार आहेत.

Web Title: Vijay Naik writes about Marathi culture and Delhi