शुजात बुखारींची हत्या आणि काश्‍मीरखोरे 

Shujaat Bukhari
Shujaat Bukhari

काल श्रीनगरच्या लाल चौकातील भर बाजारपेठेत अतिरेक्‍यांनी "रायझिंग काश्‍मीर"चे संपादक डॉ. शुजात बुखारी यांची हत्या केली. त्यात त्यांचा अंगरक्षकही ठार झाला व दुसरा अत्यवस्थ आहे. शुजात बुखारी यांचा माझा गेल्या अनेक वर्षांचा स्नेह होता. एक निकटचा मित्र एकाएकी निघून गेला, याची हळहळ तर आहेच, परंतु, काश्‍मीरच्या खोऱ्यातील एक धाडसी, सूज्ञ व ज्येष्ठ पत्रकार गेल्याचे दुःख राज्यात तसेच, पत्रकार समुदायात व्यक्त केले जात असून, पत्रकार संघटनांतर्फे हल्ल्याचा जोरदार निषेध व्यक्त करण्यात आलाय. शुजातचे बंधू बशारत बुखारी राज्य सरकारमध्ये मंत्री असूनही त्याला वाचवू शकले नाही. शुजातच्या कुटुंबावर एकाएकी कोसळलेल्या आघाताची कल्पना करणे कठीण. 

गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी अलीकडे श्रीनगरला दिलेल्या भेटीत परिस्थितीची पाहणी करून मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती व राज्यपाल एन.एन.व्होरा यांच्या बरोबर चर्चा केली. रमझानच्या दिवसात केंद्राने केलेल्या शस्त्रसंधीचे (सीझफायर) शुजातने स्वागत केले होते. ""किमान काही काळ काश्‍मीरच्या खोऱ्यात शांतता नांदेल व सामान्य नागरिकांच्या दैनंदिन अडचणी कमी होतील,"" असे मत त्याने व्यक्त केले होते. कार्यालयातून बाहेर येऊन गाडीत बसताच, मोटरसायकलस्वार अतिरेक्‍यांनी त्यांच्यावर गोळ्यांचा भडीमार केला. यावरून, सुजात कधी सापडतोय, याचीच वाट ते पाहात होते, हे स्पष्ट होते. हल्ल्याचे श्रेय अद्याप कोणत्याही अतिरेकी संघटनेने घेतलेले नाही. परंतु, हल्ल्याद्वारे जम्मू काश्‍मीरमधील तमाम पत्रकारांना या घटनेने एकप्रकारे इशारा दिला आहे. तेथील वृत्तपत्रे, पत्रकार यांच्यावर आधीच सरकारी व लष्करी निर्बंध असतात. दहशतवाद्यांच्या कारवाया, हल्ले वाढले, की खोऱ्यातील मोबाईल्स, इंटरनेट, एमटीएनएल आदी संपर्क साधने बंद होतात. कुणाशीही बोलता येत नाही. बातम्या पाठविणे कठीण होते. हालचालीवरही निर्बंध येतात. अशा परिस्थितीत शुजात ने "रायझिंग काश्‍मीर" हे दैनिक चालू ठेवलेच, तो चौफेर लिखाणही करीत होता. 

त्याच्या लेखांची लिंक तो मला गेली अनेक वर्षे नित्याने पाठवित होता. काश्‍मीरचे राजकारण, तेथील परिस्थितीची त्याला नस ना नस ठाऊक होती. त्यामुळेच, त्याचे लेख देशात व परदेशात प्रसिद्ध होत. द हिंदूच्या "फ्रन्टलाईन"नियतकालिकात त्याचे सदर प्रसिद्ध होत होते. खोऱ्यातील परिस्थिती चिघळली, की मी त्याला फोन करून ती जाणून घेत असे. दिल्लीत आल्यास नेहमी भेट होई. 25 मे रोजी त्याने पाठविलेल्या लेखाचे शीर्षक होते, " फ्रॉम र्हेटॉरिक टू रिअलिटी - दिल्ली मस्ट ट्रीट काश्‍मीर ऍज पालिटिकल प्रॉब्लेम" या लेखात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 20 मे रोजी जम्मू व काश्‍मीरला दिलेल्या एका दिवसाच्या भेटीवर त्याने भाष्य केले होते. "पंतप्रधानांनी हा प्रश्‍न राजकीयदृष्ट्या सोडविण्याचा मुद्दा पुन्हा एकदा टाळला," असे नमूद करून, "" लष्कर ते पोलीस, बुलेट टू बुलेट व बुलेट टू स्टोन या राज्य सरकारच्या धोरणात काहीही फरक झालेला नाही,"" असे त्याने म्हटले आहे. युद्धबंदीचा उल्लेख करीत "दगडफेक करणाऱ्या हजारो तरूणांना सरकारने माफ केले होते,"असे सांगून त्यांना मुख्य प्रवाहात येण्याचे आवाहन मोदींनी केले. बुखारी म्हणतात, की 2016 मधील बुर्हाण वाणीच्या मृत्यूंनतर झालेल्या उत्सफूर्त उठावापासून काश्‍मीरमधील स्थिती चिघळलेलीच आहे. 3 एप्रिल 2018 रोजी श्रीनगर -जम्मू महामार्गावरील बोगद्याचे उद्घाटन करताना मोदी यांनी काश्‍मीरी तरूणांपुढे दोन पर्याय ठेवले होते- "टूरिझम (पर्यटण) वा दहशतवाद (टेररिझम)." माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या "काश्‍मिरियत" या शब्दाचा मोदी उल्लेख केला, परंतु, "जम्हुरियत व इन्सानियत" हे शब्द टाळले." बुखारीच्या मते," 2019 मधील सार्वत्रिक निवडणुकाकडे पाहाता, प्रलंबित झालेली सार्क राष्ट्रांची परिषद घेण्याचा विचार मोदी करतील. परंतु, त्यासाठी काश्‍मीरमधील परिस्थिती निवळणे व पाकिस्तानबरोबर संबंधात सुधार होणे गरजेचे असेल."" 

काश्‍मीरमध्ये शस्त्रसंधिच्या संदर्भात शुजातने "सकाळ" चे प्रतिनिधी संतोष शालिग्राम यांना अलीकडे मुलाखत दिली होती. तसेच, 2014 मध्ये "काश्‍मीरी पंडितांचे पुनरवसन" या विषयी 10 जुलै सविस्तर लेखही लिहिला होता. त्याचे विचार परखड परंतु, दोन्ही बाजूंचा समन्वय साधणारे होते. शुजातच्या हत्येने भारत पाकिस्तान वाटाघातीतील दुसऱ्या फळीची (ट्रॅक टू) जबाबदार व्यक्ती हरपली आहे. 

महानगरातून वार्तांकनाचे काम करणाऱ्या पत्रकारांना अतिरेक्‍यांची फारशी भीती नसते. बंगलोर मध्ये पत्रकार झालेली गौरी लंकेश यांची हत्या धर्मांध प्रवृत्तींनी केल्याचे दिसत आहे. अंडरवर्ल्डवर प्रकाशझोत टाकणारा ज्येष्ठ पत्रकार ज्योतिर्मय रे याची जून 2011 मध्ये हत्या करण्यात आली. ते "मिड डे" मध्ये काम करीत होते. त्याच्या खुनास जबाबदारी असलेल्या कुख्यात गुंड छोटा राजन याला तब्बल सात वर्षांनंतर जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. 

देशातील कॉन्फ्लिक्‍ट झोन्स (संघर्षग्रस्त प्रदेश) मध्ये काम करताना पत्रकारांना जीव तळहातावर घेऊनच चालावे लागते. या प्रदेशात पहिला क्रमांक जम्मू काश्‍मीरचा असून, अन्य प्रदेशात छत्तीसगढ, महाराष्ट्र, आंध्र, मध्यप्रदेश, बिहार, उत्तर प्रदेश यातील नक्षलप्रवण जिल्यांचा समावेश आहे. मेघालय, मणिपूर, नागालॅंड, आसाम, त्रिपुरा आदी इशान्येतील राज्यांचाही समावेश होतो. इशान्य राज्यात विघटनवादी संघटना अनेक वर्ष सक्रीय आहेत. या संघटनांचे म्होरके रोज वृत्तपत्रांना पत्रके पाठवून ती छापण्यासाठी दबाव आणतात. त्यातील बव्हंशी सरकार व पत्रकारांना धमकावणारी असतात. अरूणाचल प्रदेशातील इटानगरच्या "अरूणाचल टाईम्स"च्या सहसंपादक श्रीमती तोंगम रीना यांच्यावर 15 जुलै 2012 रोजी प्राणघातक हल्ला झाला. अतिरेक्‍यांनी केलेल्या गोळीबारामध्ये त्यांच्या मणक्‍याला गंभीर जखम झाली. औषधोपचार करण्यासाठी त्यांना काही महिने दिल्लीतील रूग्णालयात काढावे लागले. अखेर 12 सप्टेंबर 2013 रोजी हत्येमागील प्रमुख आरोपी युमलाम आचुंग पोलिसांना शरण गेला. तोंगम रीना यांनी "स्क्रोल इन" या संकेतस्थळासाठी लिहिलेल्या लेखात 2017 मध्ये त्रिपुरामध्ये शंतनू भौमिक व सुदीप दत्त भौमिक या दोन पत्रकारांच्या झालेल्या खुनाचा उल्लेख केला आहे. "पत्रकारांच्या सुरक्षेचा प्रश्‍न किती गंभीर बनला आहे, हे या घटनांवरून ध्यानात येते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com