विषवृक्षाची फळं (विजय साळुंके)

vijay salunke
vijay salunke

श्रीलंकेत "ईस्टर संडे'च्या दिवशी दहशतवादी गटानं नुकताच तीन चर्च आणि परदेशी पर्यटकांनी गजबजलेल्या तीन आलिशान हॉटेलांवर आत्मघाती हल्ले करून साडेतीनशेहून अधिक लोकांचा बळी घेतला. धर्मकेंद्री दहशतवाद जगाच्या कानाकोपऱ्यात थैमान घालत असताना अनपेक्षित आणि धक्कादायक घटना घडत आहेत. या सगळ्या घटनांची मुळं नेमकी कशात आहेत, त्यातून काय बोध घ्यायचा; दहशतवादाचा फटका बसलेल्या देशांसह इतर देशांनीही कशा प्रकारे बघायला हवं आदी गोष्टींचं विश्‍लेषण.

भूकंपासारखी नैसर्गिक आपत्ती पूर्वसूचना देऊन येत नाही. भूकंपात जीवितवित्ताची प्रचंड हानी होऊनही सर्वसामान्य पापभिरू माणूस निसर्गाला दोष देत नाही, दिलाच तर दैवाला दोष देतो. वैज्ञानिकांनी अभ्यासाद्वारे पृथ्वीवरचं भूकंपप्रवण क्षेत्र निश्‍चित केलं असून, प्रशांत महासागराभोवतालचं कडं- "पॅसिफिक रिंग' हा धोकादायक टापू ठरला आहे. मात्र, दहशतवादाचा असा कोणताही विशिष्ट टापू म्हणून दाखविण्यासारखी स्थिती राहिलेली नाही. न्यूझीलंडसारख्या एका कोपऱ्यातल्या शांत देशात गेल्या महिन्यात एका ऑस्ट्रेलियन गोऱ्या वर्चस्ववादी माथेफिरूनं मशिदीवर हल्ला करून 42 लोकांना ठार केलं. त्यानंतर महिन्याच्या अंतरानं श्रीलंकेत "ईस्टर संडे'चं निमित्त साधून स्थानिक मुस्लिम दहशतवादी गटानं तीन चर्च आणि परदेशी पर्यटकांनी गजबजलेल्या तीन आलिशान हॉटेलांवर आत्मघाती हल्ले करून साडेतीनशेहून अधिक लोकांचा बळी घेतला. जखमींची संख्या पाचशेहून अधिक असून, त्यातले बरेच जीवन-मृत्यूच्या सीमेवर झुंजत आहेत.

ख्रिस्ती धर्मात येशू ख्रिस्तांना सुळावर चढवण्यात आल्यानंतर त्यांचा पुनर्जन्म झाला, त्या दिवसाला - ईस्टर संडेला महत्त्व आहे. हल्लेखोरांनी हाच दिवस निवडला. त्यामागं न्यूझीलंडमधल्या घटनेच्या सूडाचा विचार असावा. या हल्ल्याची जबाबदारी "इस्लामिक स्टेट'नं स्वीकारल्याचं जाहीर झालं आहे. आत्मघाती हल्लेखोर श्रीलंकेचे स्थानिक नागरिक होते. कट्टर इस्लामचा प्रचार करणाऱ्या "राष्ट्रीय तौहीद जमात' संघटनेचे हे सदस्य होते. न्यूझीलंडमधल्या हल्ल्याची जबाबदारी ख्रिश्‍चनांच्या कोणत्याही ज्ञात-अज्ञात-बनावट संघटनेनं स्वीकारलेली नव्हती. अनेकदा दहशतवादी कारवाया करणारे आणि त्याची जबाबदारी स्वीकारणारे भिन्न असतात. जबाबदारी स्वीकारण्यामागं आपली दहशत, दबदबा वाढवण्याचा हेतू असतो. श्रीलंकेतल्या सरकारनं "इस्लामिक स्टेट'च्या दाव्याला अजून तरी महत्त्व दिलेलं नाही. स्थानिक कट्टरपंथीय इस्लामी गटाचा परदेशातल्या दहशतवादी गटाशी संपर्क आहे किंवा नाही, याची या सरकारला खात्री नाही. ताज्या हल्ल्याबाबत भारताकडून तीनदा गुप्त सूचना पुरवूनही तिथली सरकारी यंत्रणा गाफील राहिली. आता सरकार या चुकीबद्दल माफी मागत आहे.

दहशतवादाची धार्मिक बाजू
अमेरिकेसारख्या प्रगत देशात विद्यापीठात, शाळांत, बाजारात एखादा माथेफिरू तरुण बेछूट गोळीबार करतो आणि पाच-पन्नास लोक बळी जातात. शिक्षणातून बाहेर फेकल्या गेलेल्या, कौटुंबिक कलहाचा बळी ठरलेल्या अथवा नशेच्या आहारी गेलेल्यांकडून असं कृत्य घडतं आणि अशा घटना अमेरिकेबाहेर अन्य विकसित देशांतही वारंवार घडतात. जीव घेणाऱ्या शस्त्रांच्या सहज उपलब्धतेवर तिथं चिंताही व्यक्त केली जाते. परंतु, अमेरिकेतली "गन लॉबी' राजकारण्यांना मुठीत ठेवून आहे. श्रीलंका आणि अन्य ठिकाणच्या दहशतवादी हल्ल्यांना धार्मिक बाजू आहे. पॅलेस्टाईनमध्ये जेरुसलेमच्या परिसरात जन्मलेल्या ख्रिश्‍चन, ज्यू आणि इस्लाम या तीन जुळ्या धर्मांमध्ये भारत-पाकिस्तानसारखं वैर आहे. ख्रिश्‍चन आणि मुस्लिमांमध्ये तर इसवीसन 1096 ते 1229 या दरम्यान सहा धर्मयुद्धं झाली. आपल्या धर्मियांची पवित्र तीर्थक्षेत्रं सुरक्षित ठेवण्यासाठी, त्यांच्यावर ताबा ठेवण्यासाठी ही युद्धं होती. परंतु या युद्धानिमित्तानं होणाऱ्या "युद्धयात्रां'द्वारे व्यापारवृद्धी झाली, तसंच अरब संस्कृती युरोपात पोचली. या धर्मयुद्धांचा राजकारण वा धार्मिकदृष्ट्या फार मोठा परिणाम झाला नाही. परंतु, आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या दूरगामी प्रभाव पडला. धर्मयुद्धांमुळं मध्ययुगीन युरोपात प्रबोधन सुरू झालं. युरोपीय ख्रिश्‍चनांचा मुस्लिम कलेशी परिचय झाला. अरबांचं भूगोलाविषयीचं ज्ञान, वैज्ञानिक कामगिरीचा युरोपला लाभ झाला. युरोपनं प्रबोधनकाळात मोठी झेप घेतली. इस्लामी समूहानं युरोप व्यापण्याच्या; तसंच आशिया-आफ्रिका खंडात विस्तार करण्याच्या महत्त्वाकांक्षेपायी आपल्या ज्ञानात वृद्धी केली नाही. तलवारबाजीतच ते अडकले. प्रगत युरोपनं आशिया, आफ्रिका आणि अमेरिका खंडात वसाहती स्थापून शोषण केलं. या इतिहासाची चीड असणाऱ्या इस्लामी धर्मगुरूंनी जगभरच्या ख्रिश्‍चनांच्या दहा-पंधरा टक्केच कमी संख्येनं असलेल्या इस्लामला अग्रस्थानी नेण्याची जी भूमिका मांडली, तेच "इस्लामिक स्टेट'चं अधिष्ठान बनलं. सारं जग इस्लाममय करणं हाच अनेक इस्लामी पीठांचा "धर्म' बनला. प्रेषित पैगंबर असेपर्यंत इस्लाम सौदी अरेबियापुरताच मर्यादित होता. त्यानंतरच्या दीडशे वर्षांतच त्याचा चौफेर विस्तार झाला. "इस्लामिक स्टेट' वैचारिकदृष्ट्या मध्ययुगातच रमलेलं असल्यानं त्याचे अनुयायी जगभरातल्या "काफिरां'चा विनाश करून इस्लाममय जगाच्या ध्येयानं पछाडले गेले आहेत.

अमेरिका आणि इतर देश
दुसऱ्या महायुद्धात साम्यवादी सोविएत रशियानं ऍडाल्फ हिटलरच्या पराभवात निर्णायक भूमिका बजावल्यामुळं अमेरिकेसारखं भांडवलशाही राष्ट्र अस्वस्थ झालं होतं. युद्धोत्तर काळात सोविएत साम्यवादाचा प्रभाव निर्माण होऊ नये यासाठी आपली ताकद दाखविण्यासाठी अमेरिकेनं आधीच शरण आलेल्या जपानवर दोन अणुबॉंब टाकले. साम्यवादाचा प्रसार, विस्तार रोखण्यासाठी सौदी अरेबिया आदी इस्लामी देशांना हाताशी धरलं. पाकिस्तानही त्याच हेतूनं गळाला लागलं होतं. सोविएत रशियानं इराणमधले अयातुल्ला अली खोमेनी यांच्या नेतृत्वाखालच्या इस्लामी क्रांतीचा धसका घेत अफगाणिस्तानमध्ये आपली फौज पाठवून मध्य आशियातील आपल्या मुस्लिमबहुल प्रजासत्ताकांचं रक्षण करण्याचा प्रयत्न केला. हीच संधी साधून अमेरिकेनं रशियनांना पिटाळून लावण्यासाठी इस्लामी मूलतत्त्ववादी कट्टरतेला खतपाणी घातलं. सौदी सत्ताधीशांची त्यासाठी मदत घेण्यात आली. जगभरचे जिहादी (धर्मयोद्धे) गोळा करण्याच्या कामात पाकिस्तान "स्वयंसेवक' बनला. त्यातून त्याला आर्थिक आणि शस्त्रास्त्रविषयक लाभ झाला. याच काळात अमेरिकेची गुप्तचर संस्था सीआयएनं "अल्‌ कायदा'ची निर्मिती केली. अफगाणिस्तानात मुजाहिदींनी नजीबची सत्ता संपविल्यानंतर विविध जिहादींची "तालिबान' तयार करण्यात पाकिस्तानी लष्कराच्या आयएसआय या गुप्तचर संस्थेनं महत्त्वाची भूमिका बजावली. पश्‍चिम आशियात शियाबहुल इराकचा पाडाव करण्यात आल्यानंतर इराक-सीरिया-इराण ही शियापंथीय साखळी भक्कम होऊ नये, यासाठी सीआयए आणि इस्राईलची गुप्तचर संस्था "मोसाद' यांनी "इस्लामिक स्टेट' उभी केली. या कामी बहाबी कट्टरपंथाचे समर्थक सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिरातीनं आर्थिक भार उचलला. सारं जग इस्लाममय करण्याचं बीज पोटात रुजल्यावर "अल्‌ कायदा', "तालिबान', "इस्लामिक स्टेट' आपल्या जन्मदात्यांवर उलटल्या. सीरियात बशर अल्‌ असदची राजवट संपवता आली नाहीच; उलट "इस्लामिक स्टेट'शीच लढण्याची वेळ आली. श्रीलंकेतल्या "इस्लामिक स्टेट'च्या प्रेरणेनं वा अप्रत्यक्ष सहभागानं झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या तपासकार्यात अमेरिकी फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनचं (एफबीआय) पथक दाखल झालं आहे. ही माहिती अमेरिकेच्या श्रीलंकेतल्या राजदूतानंच दिली आहे.

आगीची धग
कोणत्याही हेतूनं आग लावली, तरी ती नियंत्रणात राहीलच असं नसतं. ही आग पश्‍चिम आशिया ओलांडून अमेरिका, युरोप, आशियात सर्वत्र पसरली. अमेरिकेवरील 9/11 चा दहशतवादी हल्ला, त्यानंतर भारतात संसदेवरचा हल्ला, (2001), मुंबईवरचा 26/11 चा हल्ला (2009), नंतर युरोपात ब्रिटन, फ्रान्स, बेल्जियम, जर्मनी, स्पेन असा विस्तार होत गेला. इस्लामी कट्टरतावादाची स्वतःला झळ पोचूनही तेच हत्यार रशिया आणि चीनमध्ये अस्थैर्य निर्माण करण्यासाठी वापरण्यात आलं. रशियातल्या चेचेन आणि चीनचा पश्‍चिम प्रांत शिन ज्यांगमधले तुर्की वंशाचे उईघूर मुस्लिम यांना चिथावण्यात आलं. अफगाणिस्तानमधल्या इस्लामी धर्मयोद्‌ध्यांची मोहीम संपल्यानंतर पाकिस्तानी तालिबाननंही आपल्या जन्मदात्यांना हिसका दाखवला. इस्लामी कट्टरतावादी दहशतवादाच्या वणव्यात आफ्रिका आणि आशिया खंडातले अनेक देश होरपळले. श्रीलंकेत 26 वर्षांच्या यादवीनंतर आता इस्लामी मूलतत्त्ववादी उपद्रवी ठरू लागले आहेत. ज्युलियन असांजनं "विकीलिक्‍स'द्वारे अमेरिकादी देशांचं हे कारस्थान उघडकीस आणलं होतं. आता त्याला अद्दल घडविण्यासाठी केवळ अमेरिकाच नाही, तर कृष्णकृत्यात अडकलेल्या सर्वच सत्ता आतूर आहेत.
श्रीलंकेत दहशतवादी हल्ल्याबाबतची पूर्वसूचना आपल्या गुप्तचरांनी पुरवल्याबद्दल आपल्या सरकारनं अजून स्वतःची पाठ थोपटली नसली, तरी ध्रुवीकरणाच्या अजेंड्याला अनुकूल अशी पार्श्‍वभूमी लोकसभेच्या उरलेल्या चार टप्प्यांतल्या मतदानाला तयार झाली आहे. धर्मसंस्थेचं जोखड झुगारल्यामुळंच पाश्‍चात्य जगात आधी वैज्ञानिक संशोधन, त्यातून औद्योगिक युग निर्माण झालं. त्या आधारे व्यापारवृद्धीतून जगाला व्यापणारी सत्ता निर्माण झाली. आपल्याकडचे काही गट स्वातंत्र्यापासूनच धर्माचं प्राबल्य असलेली राजसत्ता उभी करण्याचं स्वप्न पाहात आले आहेत. पुराणातल्या वांग्याचं भरीत वाढून जनतेची भूक मिटत नाही, तरीही तथाकथित वैदिक वैभवाचं गाजर दाखवत धार्मिक कट्टरतेचं बीज पेरण्याचा प्रयत्न थांबलेला नाही. ज्या इस्लामी मूलतत्त्ववादाचा, कट्टरतेचा द्वेष करायचा, त्यांचंच अनुकरण करत सत्तेचा खेळ करायचा, असंच चालू आहे.

दहशतवादाबाबतचं दुहेरी धोरण
धर्मकेंद्री दहशतवाद जगाच्या कानाकोपऱ्यात थैमान घालत असतानाही दहशतवादाची व्याख्या करणं संयुक्त राष्ट्रसंघाला जमलेलं नाही, याचं कारण प्रत्येक देशाचं दहशतवादाबाबतचं दुहेरी धोरण आहे. "गुड तालिबान - बॅड तालिबान' फॉर्म्युला सर्वच अंमलात आणतात. दहशतवादाविरुद्ध लढण्यासाठी एकत्र येण्याचं, सहकार्याचं आवाहन आणि निर्धार पोकळ ठरला आहे. बहुराष्ट्रीय कंपन्या अथवा कॉर्पोरेट्‌स, धर्मांध शक्ती आणि मतलबी राजकारणी यांची युती यांच्या हातमिळवणीमुळे दहशतवादाविरुद्धची लढाई अवघड बनली आहे. या पार्श्‍वभूमीवर न्यूझीलंड, श्रीलंका, मालदिवसारख्या छोट्या देशांची परवड लक्षात येते. ही परकी कारस्थानं हाणून पाडण्यासाठी आपल्या देशातल्या सर्व धार्मिक, वांशिक गटांमधला संशय दूर करून एकजूट साधण्याचा मार्ग राजकीय हितसंबंधांसाठी सोईचा नसला, तरी अनिवार्य ठरतो. श्रीलंकेत एक इस्लामी धर्मगुरू गेली तीन वर्षं कट्टरतावादाचा प्रचार करत होता. त्याला अटकाव झाला नाही. प्रभाकरनचा पाडाव होण्याच्या खूप आधी श्रीलंकेचे पहिले पंतप्रधान बंदरनायके यांच्यापासूनच सत्तर टक्के सिंहलींचं वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न झाला. ताज्या घटनेनंतर मुस्लिमविरोधी वातावरणाचा लाभ उठवण्यास माजी अध्यक्ष महिंदा राजपक्षे यांनी कंबर कसली आहे.

श्रीलंका जात्यात तर आपण सुपात अशी परिस्थिती आहे. केंद्रात भारतीय जनता पक्षाचं सरकार आल्यापासून धार्मिक ध्रुवीकरणाच्या आगीशी खेळ चालू आहे. सतराव्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं त्यात आणखी तेल ओतलं जात आहे. यातून दुखावलेल्या काहींचा "इस्लामिक स्टेट', "आयएसआय' वापर करून उपद्रव करू शकतात. दहशतवादातल्या गंभीर गुन्ह्यांचा आरोप असणाऱ्या व्यक्तीला उमेदवारी आणि तिचं पंतप्रधानांकडून समर्थन ही बाब दुखावल्या गेलेल्यांना चिथावणी ठरू शकते. दहशतवादाच्या मुकाबल्यासाठी सत्ताधाऱ्यांचा निःपक्षपाती दृष्टिकोन, निर्धार, सुरक्षादलं आणि गुप्तचर विभागाचा तटस्थपणा आवश्‍यक असतो. गेल्या पाच वर्षांत त्याचाच ऱ्हास झाला आहे. कोलंबोत घडलं ते आपल्याकडे घडू शकते, तेव्हा आतापासूनच सावध रहायला हवं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com