अवाढव्य माणूस (विजय तरवडे)

saptarang
saptarang

"किर्लोस्कर' मासिकात असताना ह. मो. मराठे पुण्यातल्या नवोदित आणि प्रथितयश लेखकांचा मेळावा भरवायचे. एसएनडीटीमधल्या एका मेळाव्याला वर्गणी भरून मी गेलो होतो. तिथं जशी नवोदित लेखक, नवकवी-कवयित्री यांची मांदियाळी होती, तसेच लोकप्रिय आणि इंटुक लेखकांचेदेखील दोन समूह होते.

नवोदितांच्या सादरीकरणानंतर लोकप्रिय आणि इंटुक लेखकांची भाषणं, प्रकट मुलाखती झाल्या. त्यादरम्यान एका इंटुक लेखकानं लोकप्रिय लेखकांची वरवरची स्तुती करताना अकारण हिणकस शेरा मारला ः "काही व्यक्ती लेखक म्हणून सामान्य असल्या तरी माणूस म्हणून थोर असतात.'
त्यांच्या विधानाचा कुणी प्रतिवाद केला नाही; पण माझ्या मनात प्रतिक्रिया
उमटली, की काही लोक लेखक म्हणून थोर असले तरी माणूस म्हणून क्षुद्र असू शकतात.***
संमेलनात माझ्या प्रत्यक्ष परिचयातले सुहास शिरवळकर, अनिल बळेल, वासंती इनामदार, सुधाकर नेर्लेकर वगैरे लेखक आलेले आठवतात. अनिल बळेल संयोजकांपैकी एक होते.

संमेलन संपताना बळेल मला म्हणाले ः ""शिवाजी सावंतांना लक्ष्मी रोडवर सोडायचं काम कर.'' त्यानुसार मी त्यांना लुनावर घेऊन निघालो; पण ते म्हणाले ः ""आपण रिक्षानं जाऊ.'' आम्ही रिक्षा करून गेलो आणि त्यांना विजय चित्रपटगृहाजवळ सोडून तीच रिक्षा वळवून मी परत आलो. रिक्षातून उतरताना त्यांनी माझ्या हातात दहा रुपयांची नोट दिली. त्या छोट्या प्रवासात त्यांनी मला फक्त नाव-गाव विचारलं आणि जुजबी चौकशी केली. जास्त बोलले नाहीत. नंतर काही दिवसांनी चित्रकार ल. म. कडू यांच्यामुळं आम्ही पुन्हा भेटलो. कडू यांच्याकडून त्यांना काही चित्रं हवी होती. त्याविषयीचं स्मरणपत्र
पाठवताना पोस्टकार्डवर फक्त तीन-चार प्रश्नचिन्हं काढून त्यांनी चित्रांविषयीची "विचारणा' केली होती. ती चित्रं काढल्यावर आम्ही त्यांना एका हॉटेलात भेटलो. गप्पा मारताना विषय निघाला तेव्हा शिवाजीरावांनी श्रीकृष्णाच्या जीवनावरच्या त्यांच्या नियोजित कादंबरीची रूपरेषा आम्हाला सांगितली. कादंबरीत योजलेली काही पल्लेदार वाक्‍यंदेखील अगदी हळू आवाजात आम्हाला ऐकवली. मात्र, कादंबरीचं नाव (युगंधर) त्यांच्या मनात तेव्हा निश्‍चित झालेलं नसावं. काही दिवसांनी "सोबत' या साप्ताहिकात "युगंधर'मधले काही तुकडे प्रकाशित झालेले वाचले.

हॉटेलातल्या त्या गप्पांमध्ये प्रकर्षानं जाणवलेली गोष्ट म्हणजे, शिवाजीराव मोकळेपणाने बोलले; पण कुणाच्याही पाठीमागं कुणाहीबद्दल वाईट बोलले नाहीत. त्यांच्या पाठीमागं त्यांची थट्टा-नालस्ती करणारा एखादा मित्र त्यांना नक्की ठाऊक असणार; पण कुणाबद्दलही ते वाईट बोलले नाहीत.
शिवाजीरावांच्या सगळ्या कादंबऱ्या अवाढव्य असतात. सालंकृत, पल्लेदार आणि भपकेबाज वाक्‍यांनी-वर्णनांनी खच्चून भरलेल्या असतात; पण प्रत्यक्ष भेटीत ते अगदी साध्या भाषेत बोलायचे. ह. मो. मराठे यांनी आयोजिलेल्या त्या कार्यक्रमात शिवाजीरावांची प्रकट मुलाखत
झाली होती, तेव्हा संयोजकांनी विचारलेल्या प्रश्नांची जशी दिलखुलास उत्तरं त्यांनी दिली होती, तशीच प्रेक्षकांनी विचारलेल्या खोचक प्रश्नांचीदेखील समर्पक उत्तरं त्यांनी दिली.
***
पुण्यात पूर्वी दरवर्षी मे महिन्यात मॅजेस्टिक बुक स्टॉलच्या गच्चीवर साहित्यिक गप्पांचा लोकप्रिय कार्यक्रम होत असे. त्याचं सूत्रसंचालन स. शि. भावे करत. कार्यक्रमाच्या दिवशी जे साहित्यिक गप्पांमध्ये भाग घेणार असतील, त्यांची पुस्तकं खालच्या मजल्यावर शोकेसमध्ये मांडलेली असत. कार्यक्रमासाठी आलेल्या सगळ्या श्रोत्यांना दुकानातलं कोणतंही पुस्तक किमान 15 टक्के सवलतीत मिळू शके. त्यासाठी कोणतीही मेम्बरशिप, योजना वगैरे अटी नसायच्या. गच्चीच्या खालच्या मजल्यावर असलेल्या हॉलमध्ये अभ्यागतांना चहा-बिस्किटं दिली जात. लेखिका वसुधा माने या उपक्रमाला गमतीनं "साहित्यिकांचं हळदी-कुंकू'असं म्हणायच्या. साहित्यिक गप्पांचा कार्यक्रम संध्याकाळी होई. गच्चीवर पश्‍चिमेला मोठा कापडी फलक आणि त्या फलकाखाली वक्ते इत्यादी बसत. समोर सतरंज्या अंथरलेल्या असत. शे-दोनशे श्रोते मांडी घालून बसत. काहीजण कठड्यावर बसत. हळूहळू
सूर्यास्त होऊ लागला की आणि आकाश तांबूस होऊन काळवंडलं की स्टेजवरचे ज्येष्ठ साहित्यिक बघताना, त्यांच्या गप्पा ऐकताना उगाच मन कातर होई. एका प्रकट मुलाखतीच्या वेळी श्री. पु. भागवत, राम पटवर्धन आणि स. शि. भावे असे तिघं बसलेले अजून आठवतात. तिघांचे सदरे पांढरे होते, हा तपशील आणि चित्र उगीचच ठळक स्मरणात आहे. केशरी रंगाच्या हाफ बुशशर्टमधले ग. वा. बेहेरे
एकेक जिना कष्टानं चढत एका कार्यक्रमाला वरपर्यंत आलेले आणि कोपऱ्यात खुर्चीवर बसलेले आठवतात. त्या वेळी ते नुकतेच हृदयविकारातून बाहेर पडलेले होते.
या उपक्रमात एकदा शिवाजी सावंतांची प्रकट मुलाखत झाली होती. चाहत्यांची भरपूर गर्दी होती. संयोजकांनी सुंदर प्रश्न निवडले होते; पण का कोण जाणे गप्पा रंगल्या नाहीत. विचारलेल्या सगळ्या प्रश्नांवर भरभरून बोलण्याऐवजी शिवाजीरावांनी घाईघाईनं किंवा नाराजीनं एकेका वाक्‍यात उत्तरं दिली. कार्यक्रम अर्ध्या तासातच आटोपला.
यानंतर शिवाजी सावंत भेटले ते त्यांच्या लेखनातूनच.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com