राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चन ! (विजय तरवडे)

विजय तरवडे vijaytarawade@gmail.com
रविवार, 22 एप्रिल 2018

हिंदी सिनेमात राज कपूर-दिलीपकुमार-देव आनंद यांचा जमाना ओसरून राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चन ज्या क्रमानं आणि ज्या कालखंडात सुपरस्टार झाले, त्याच क्रमानं आणि साधारणतः त्याच काळात मराठीत बाबूराव अर्नाळकर, चंद्रकांत काकोडकर यांचा जमाना थोडा सरला आणि दोन नवे "सुपरस्टार' आले. आधी आलेले सुपरस्टार - यांना आपण "क्ष' म्हणू या - राजेश खन्नाप्रमाणे अफाट लोकप्रिय होते. ते झंझावाताप्रमाणे आले. त्यांनी स्वतःची प्रकाशनसंस्था उभारली. दरमहा आठ रहस्यकादंबऱ्या ते लिहीत-लिहून घेत. म्हणजे त्यांनी महिला-लेखनिक नेमल्या होत्या. त्यांना ते डिक्‍टेशन देत. भव्य यश त्यांनी झोकात उपभोगलं.

हिंदी सिनेमात राज कपूर-दिलीपकुमार-देव आनंद यांचा जमाना ओसरून राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चन ज्या क्रमानं आणि ज्या कालखंडात सुपरस्टार झाले, त्याच क्रमानं आणि साधारणतः त्याच काळात मराठीत बाबूराव अर्नाळकर, चंद्रकांत काकोडकर यांचा जमाना थोडा सरला आणि दोन नवे "सुपरस्टार' आले. आधी आलेले सुपरस्टार - यांना आपण "क्ष' म्हणू या - राजेश खन्नाप्रमाणे अफाट लोकप्रिय होते. ते झंझावाताप्रमाणे आले. त्यांनी स्वतःची प्रकाशनसंस्था उभारली. दरमहा आठ रहस्यकादंबऱ्या ते लिहीत-लिहून घेत. म्हणजे त्यांनी महिला-लेखनिक नेमल्या होत्या. त्यांना ते डिक्‍टेशन देत. भव्य यश त्यांनी झोकात उपभोगलं. त्यांच्या पाठोपाठ थोड्या अंतरानं सुहास शिरवळकर यांचा उदय झाला. शिरवळकर यांनी श्रीयुत "क्ष' यांच्याकडं आपल्या कथा दिल्या. "क्ष' यांनी त्या वाचून काही अंतःप्रेरणेनं त्या परत केल्या. राजेश खन्नाला अमिताभ बच्चनबाबत ही अंतःप्रेरणा झाली नव्हती, तो बेसावध होता; पण शिरवळकर यांनी आपला मोर्चा अन्यत्र वळवला. त्यांच्यादेखील दरमहा चार कादंबऱ्या प्रकाशित होऊ लागल्या.

या दोघांच्या कादंबऱ्यांचं वैशिष्ट्य म्हणजे, मराठी पुस्तकवितरकांच्या मुख्य प्रवाहाशी त्यांचा काडीमात्र
संबंध नव्हता. भरपूर कमिशन, अनुदानित ग्रंथालयं, शाळा-कॉलेजांकडून केली जाणारी खरेदी, शासकीय टेंडर्स या सर्व गोष्टींवर दोन्ही लेखक अजिबात अवलंबून नव्हते. त्यांची एकही कादंबरी अभिप्रायासाठी कोणत्याही नियतकालिकाकडं, समीक्षकाकडं किंवा कुठंही "सप्रेम भेट' गेली नाही. या कादंबऱ्या प्रकाशित झाल्यावर विविध छोटे बुक स्टॉल्स, एसटी स्थानकं वगैरे ठिकाणी जात आणि प्रत्यक्ष वाचक त्या विकत घेत. एका महिन्यात हजार प्रतींची आवृत्ती संपत असे. या दोघांखेरीज त्याच काळात काकोडकर, सुभाष शहा, दिवाकर नेमाडे, एस. एम. काशीकर वगैरे लेखकदेखील आपापला वाचकवर्ग राखून होते. अर्नाळकरांच्या नव्या आवृत्त्यादेखील बाजारात दिसत. म्हणजे त्या काळात प्रसारमाध्यमं, समीक्षक किंवा अनुदानाच्या कुबड्या न घेता किमान वीस हजार पुस्तकं लोक दरमहा विकत घेऊन वाचत असत. श्रीयुत "क्ष' यांचं यश राजेश खन्नाच्या यशाप्रमाणेच संपुष्टात आलं. वृद्धत्वाची त्यांनी काही तरतूद न केल्यामुळं पुढं ते खूपच अडचणीत आले. शिरवळकर मात्र काळाबरोबर बदलत राहिले. मिळालेलं यश त्यांनी टुकीनं उपभोगलं आणि मध्यमवर्गीय गृहिणीप्रमाणे पुरवून पुरवून वापरलं. न्यूज प्रिंटचा जमाना ओसरल्यावर व्हाईट प्रिंटच्या विश्वात शिरून जम बसवला. लोकप्रियता आणि खप सातत्यानं राखला. आपल्या एका कादंबरीला अनंत काणेकर यांची प्रस्तावना घ्यावी अशी शिरवळकर यांची इच्छा होती. ज्यांची पुस्तकं मोठ्या संख्येनं स्वतः वाचक विकत घेऊन वाचत अशी व्हाईट प्रिंटच्या विश्वातली आणि स्वतंत्र प्रवाहातली तेव्हाची सहज आठवणारी काही नावं अकारविल्हे अशी ः चिंतामणी लागू, नारायण धारप, बाबा कदम, व. पु. काळे, विजय देवधर, शैलजा राजे, सुहास शिरवळकर. या पुस्तकांना तेव्हाच्या परिभाषेत कौतुकानं "काउंटर सेल'ची पुस्तकं असं म्हटलं जाई.
* * *

या क्षेत्रातल्या असंख्य गमती मी पाहिल्या. शिरवाळकर यांचं यश पाहून त्यांच्या प्रकाशकानं एका महिन्यात स्वतःच एक कादंबरी लिहिली. त्यातला नायक पोलिस इन्स्पेक्‍टर होता. शेवटच्या प्रकरणात त्यानं गुंडांशी मारामारी केली आणि सगळ्यांचा निःपात केल्यावर एका बारमध्ये बसून वेटरला एक पेग बिअर मागितली! श्रीयुत "क्ष' यांचा एक नायक भलताच चपळ होता. शत्रू चालून आल्यावर तो काय करीत असे ते लेखकाच्या शब्दात ः "त्याने अशी काही हालचाल केली की त्याला स्वतःला देखील समजले नाही!' एका कादंबरीत शत्रूच्या उंच इमारतीत शिरण्यासाठी नायक कारमधून प्रचंड वेगानं इमारतीभोवती घिरट्या घालतो आणि मग वेगवान कारचं दार उघडून उडी मारतो ती थेट इमारतीच्या गच्चीत!

एका नवोदित लेखकाचं आख्खं आयुष्य पुणे जिल्ह्यातल्या एका तालुक्‍यात गेलं होतं. मुंबई शहराची त्याला अजिबात माहिती नव्हती. त्यानं स्मग्लिंगवर कादंबरी लिहिली. त्यात स्मग्लर चोरीचं सोनं गेट वे ऑफ इंडियापर्यंत आणतो. तिथं त्यानं समुद्राच्या तळाशी एक भुयार खोदलेलं असतं आणि त्या भुयारातून सगळं सोनं घेऊन तो पुणे जिल्ह्यातल्या तालुक्‍यात येतो. कादंबरीचा नायक त्या तालुक्‍यातला पोलिस कमिशनर असतो! दोघांची तालुक्‍यातच झुंज होते...! विद्याधर पुंडलिक यांच्या एका कथेत नायक फ्रिजमध्ये व्हिस्कीची बाटली ठेवतो असं वर्णन होतं. त्या वेळी "ठणठणपाळ' यांच्यासह अनेकांनी या वर्णनाची थट्टा केली होती; पण रहस्यकथांच्या दालनात अनेक नायक आणि खलनायक फ्रिजमध्ये व्हिस्कीच्या बाटल्या ठेवत असत! एका थरारकथेत नायक विमान चालवत असतो. त्याला जमिनीवर खलनायकाची कार दिसते. तो विमान खाली वळवतो आणि बाणाप्रमाणे विमानाचं टोक कारचं छत फोडून कारमध्ये घुसतं. खलनायक जागच्या जागी खलास होतो! एका कादंबरीत, स्मग्लर लोक अमेरिकेहून जहाजानं स्कॉचच्या बाटल्या आणत, असंही वाचलं होतं. एका कादंबरीचा नायक चीनमध्ये जातो. तिथं खलनायकाच्या टोळीतले सहा कुंगफू-पटू त्याच्यावर चाल करून येतात. त्याच वेळी नायकाला जवळ पडलेली काठी दिसते आणि लहानपणी शाखेत शिकलेले हात आठवतात. तो काठी उचलून सर्व कुंगफू-पटूंचा बीमोड करतो. एका पेरी मेसन कथेचा अनुवाद करताना लेखकानं मजा केली होती. पेरी मेसनला भेटण्यासाठी पोलिस येतात. पेरी मेसन बाहेर गेलेला असतो. I am afraid, he is not in the office या वाक्‍याचा अनुवाद करत सीमा ऊर्फ डेला स्ट्रीट म्हणते ः ""मला भीती वाटतेय, ते कचेरीत नाहीत!'' पण हे असं असलं तरी या भाबड्या लेखनाला एक रंजनमूल्य होतं आणि वाचकांचा खराखुरा आश्रय होता. या सगळ्या लेखनात अश्‍लील वर्णनं तुरळकच असायची.

Web Title: vijay tarawade write article in saptarang