प्रेम करणारे वाचक (विजय तरवडे)

vijay tarawade
vijay tarawade

गेल्या पिढीतले वाचक लेखकांवर प्रेम करायचे. त्या प्रेमाची पद्धत चाकोरीबद्ध असे. लेखकांना खुशीपत्रं लिहायची...त्यांची आलेली उत्तरं जपून ठेवायची...लेखकांना जेवायला-राहायला बोलवायचं...त्यांचं आतिथ्य करायचं...त्यांच्या बरोबर फोटो काढायचे...शक्‍य असेल तर त्यांच्यावर लेख वगैरे लिहायचे... स्वतः लिहिलेलं पुस्तक त्यांना अर्पण करायचं...उत्साहाच्या भरात या प्रेमाचं जमेल तेवढं प्रदर्शन करायचं...समोरच्याला क्वचित या प्रदर्शनाचं अजीर्णही होतं; पण चाहत्यांना त्याची पर्वा नसते. त्यांच्या परीनं त्यांचं प्रेम खरंच असतं. व. पु. काळे यांच्यावर प्रेम करणारे वाचक भलतेच सुखी. कारण, वपुंनी त्यांच्या पत्रांचं पुस्तक "प्लेझर बॉक्‍स' प्रकाशित केलं. सुहास शिरवळकरांच्या चाहत्यांची पत्रंदेखील "प्रिय सुशि'मध्ये' नुकतीच संकलित झाली आहेत. दोघांच्या चाहत्यांची फेसबुक पेजेसही आहेत.

शान्ता शेळके यांना नव्वदच्या दशकात एक मोठा पुरस्कार मिळाला होता आणि कार्यक्रम पुण्यापासून बराच दूर होता. म्हणून मी त्यांच्या सोबत गेलो होतो. ज्या गावात कार्यक्रम होता, त्या गावातल्या एका धनाढ्य साहित्यप्रेमींच्या घरी मुक्कामाची सोय केलेली होती. दर वर्षी तिथं होणाऱ्या पुरस्कार सोहळ्यासाठी येणाऱ्या पुरस्कारविजेत्या लेखकाची मुक्कामाची सोय आणि आतिथ्य ते आवर्जून आणि निरपेक्षपणे करत असत. मात्र, त्यांना छायाचित्रांची अपार हौस होती. आमची अनेक छायाचित्रं त्यांनी काढली. ते आल्बम बघणं हा त्यांच्या आनंदाचा भाग असावा. काही वर्षांनी त्यांच्या घरी लग्न निघालं. लग्नसमारंभ पुण्यात होता. शान्ताबाईंनी मंगलाष्टकं लिहिली होती. त्यांची सुबक पुस्तिका आर्ट पेपरवर छापून अभ्यागतांना प्रती वाटण्यात आल्या होत्या. लग्नाला पुण्यातले मान्यवर साहित्यिक आले होते. त्यांत पु. ल. देशपांडेदेखील होते. ते एकटेच आले होते. मंगलाष्टकं झाल्यानंतर बाहेर येऊन ते एका वेताच्या खुर्चीवर शांत बसून राहिले. त्यांना पाहून मी जवळ गेलो आणि नमस्कार करून थोडं जुजबी बोलून त्यांच्या शेजारी खुर्ची ओढून बसलो. अनेक जण येऊन त्यांना नमस्कार करून किंवा पाया पडून जात होते.
***

देवीदास बागूल यांनी लेखकांच्या कृष्ण-धवल फोटोंची स्वतःची शैली विकसित आणि प्रस्थापित केल्यावर अनेक छायाचित्रकारांनी लेखकांचे कृष्ण-धवल फोटो काढायला सुरुवात केली. त्यातल्या एका अजब कलाकाराशी माझी योगायोगानं ओळख झाली. त्याच्या विक्षिप्तपणाचे अनेक किस्से आहेत; पण इथं फक्त चाहत्याच्या भूमिकेतले किस्से देण्याचा विषय आहे. या मित्राच्या कुटुंबातल्या जवळच्या व्यक्तीचं अकाली निधन झालं. तेव्हा सांत्वनार्थ आम्ही भेटायला गेलो. आम्ही गेलो तेव्हा त्या घटनेला काही काळ लोटला होता. अशा वेळी बोलायचं ते बोलून झाल्यावर त्यानं बोलायला सुरवात केली. अचानक आलेलं आजारपण, रुग्णालय, निधन वगैरे सांगून झाल्यावर तो म्हणाला ः ""जयवंत दळवींनी सांत्वनपत्र पाठवलं आहे. ते तिथंच समोर टीपॉयवर ठेवलं आहे. पंख्याच्या वाऱ्यानं ते फडफडतं तेव्हा त्यातून दळवींचा चेहरा साकार होऊन डोळ्यांसमोर येतो...ऊर भरून येतो वगैरे...पुलंना फोन केला होता, त्यांनी फोनवरच धीर दिला आणि स्वतःला जपायला सांगितलं. ही मोठी माणसं म्हणजे आपल्या आयुष्यातले दीपस्तंभ आहेत...'' वगैरे. त्यानं आम्हाला हे सांगितल्यावर थोड्या वेळानं आणखी काही स्नेही आल्यावर त्यांनाही पुन्हा त्यानं तसंच सांगितले. त्याला झालेलं दुःख खोटं नव्हतं;
पण... असो.
***

शान्ता शेळके यांची एक जवळची मैत्रीण आजारी होती. अत्यवस्थ होती म्हणून आम्ही तिला भेटायला गेलो. रुग्णालयात स्पेशल खोली होती. मैत्रीण अर्धवट ग्लानीत होती. शरीराला सलाईन आणि दोन कसल्या तरी नळ्या तिला जोडलेल्या होत्या. डोळे मिटलेले होते. शेजारी कुटुंबातली एक मुलगी बसलेली होती. तिनं त्या रुग्ण बाईंच्या कानात ओरडून सांगितलं ः ""आत्याबाई (शांन्ताबाईंचं घरगुती संबोधन) आल्या आहेत''. मात्र, काही प्रतिसाद आला नाही. आम्ही थोडा वेळ बसून राहिलो. मध्येच एकदा ती मैत्रीण डोळे न उघडता जोरात ओरडलीः ""भाई, भाई, पुलं.'' आम्हाला काही समजलं नाही. शेजारी बसलेली मुलगी म्हणाली ः ""त्या कालपासून पुलंची आठवण काढताहेत. त्यांना आम्ही निरोप दिला आहे. तुम्हीपण जमलं तर पुलंना सांगा. पाच मिनिटं ते भेटायला आले तर फार बरं होईल.'' शान्ताबाईंनी होकार दिला आणि आम्ही परतलो. या घटनेनंतर काही दिवसांनी त्या मैत्रिणीचं निधन झाल्याची बातमी वाचली.
***

माझे नोकरीतले एक वरिष्ठ चक्क साहित्यप्रेमी (आणि अर्थातच पुलंचे चाहते) होते. पुलंच्या सत्तराव्या वाढदिवशी त्यांना रवींद्र पिंगे-मी-रवींद्र जगताप अशा तिघांच्या नावानं आणि तीन पिढ्यांच्या वतीनं म्हणून मी एक शुभेच्छापत्र पाठवलं होतं. पुलंनी माझ्या पत्त्यावर आभाराचं पत्र पाठवलं, तेव्हा वरिष्ठांनी त्याची फोटो कॉपी काढून एक दिवस नोटीस बोर्डावर लावली होती आणि माझं अभिनंदन केलं होतं.
***

आता एका अफलातून चाहतीची हकीकत ः दौंडला असताना माझा तिच्याशी परिचय झाला होता. ती पुलंची म्हणे कट्टर भक्त होती. पुलंच्या निधनानंतर माझा पत्ता शोधून भेटायला आली. पुलंवर तिनं श्रद्धांजलीपर लेख लिहिला होता आणि तिला तो माझ्या ओळखीनं छापून आणायचा होता.
पुलंची "ययाती' ही कादंबरी अतिशय आवडल्याचा उल्लेख तिनं या उपरोक्त लेखात केला होता!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com