आठवणींतले धारप (विजय तरवडे)

vijay tarawade
vijay tarawade

लेखक म्हणून नारायण धारप माझ्या आयुष्यात अगदी लहानपणी आले. त्यांची "दिवा मालवू नका' ही कादंबरी आमच्या घरात होती. लहान मुलांनी वाचू नये म्हणून प्रौढांनी ती लपवून ठेवली होती. लपवलेली असल्यानं तिच्याबद्दल मनात आकर्षण उद्भवलं. एकदा घरात कुणी मोठी माणसं नसताना मित्र आलेला होता. दोघांना वाटलं की ज्याअर्थी प्रौढ माणसांनी हा अंक आपल्यापासून लपवून ठेवला आहे, त्याअर्थी नारायण धारप काहीतरी वेगळं - म्हणजे चंद्रकांत काकोडकरांसारखं - लिहीत असतील. आम्ही ती लपवलेली कादंबरी शोधून काढली आणि दोघांनी शेजारी बसून वाचायला सुरवात केली. काही पानं वाचल्यानंतर लक्षात आलं, की हे आपल्या अपेक्षेपेक्षा खूपच निराळं आहे...श्वास रोखून धरायला लावणारं, स्तिमित करणारं; पण तरी नेटानं पुढं जात राहिलो. पुढं भीती इतकी दाटून आली की आम्ही चक्क देवघरासमोर बसलो. सर्व देवांना नमस्कार केले आणि तिथंच बसून उरलेली कादंबरी वाचून काढली. पुढं अनेक वर्षांनी त्यांना प्रत्यक्ष भेटण्याची संधी लाभली. ज्येष्ठ पत्रकार एकनाथ बागूल यांनी एकदा मला सुचवलं ः "दर रविवारी तुला आवडणाऱ्या एकेका ज्येष्ठ लेखकाच्या मुलाखती घ्यायला सुरवात कर.' त्या मालिकेत एका ज्येष्ठ कादंबरीकारांची मुलाखत घेऊन आरंभ केला आणि नंतर नारायण धारपांना फोन केला. त्यांनी संमती आणि वेळ दिल्यावर त्यांच्या घरी जाऊन पोचलो. "समग्र नारायण धारप' मी वाचून काढलं होतं आणि काही पुस्तकं दोन-दोन, तीन-तीन वेळाही वाचली असली तरी पुस्तकांची नावं सांगणं शक्‍य नव्हतं. कारण, त्यांच्या पुस्तकांची संख्या अफाट आहे आणि पुनर्मुद्रण करताना पुस्तकातल्या कथांचे क्रम बदलल्यामुळं कथासंग्रहांची नावंही बदलली आहेत; पण त्यांची कथानकं लक्षात होती. त्यांच्या घराच्या बाल्कनीत बसून कोकम सरबत घेत आम्ही बोलायला सुरवात केली. संध्याकाळच्या धूसर प्रकाशात त्यांची चष्मा लावलेली गव्हाळ मूर्ती उगाचच गूढ भासत होती! "समर्थ कथां'वर त्यांना मी काही विचारलं नाही. कारण, त्यावरून
त्यांना अनेकांनी विचारून झालं असणार, असं माझं मत होतं. धारपांची एक कादंबरी विख्यात अमेरिकी कवी-कथाकार-समीक्षक एडगर ऍलन पो याच्या एका कल्पनेवर आधारित आहे. तीवर आधी बोललो. पन्नासेक वर्षांपूर्वी सिंहगड रस्त्यावर आतासारखी वस्ती आणि वर्दळ होण्यापूर्वी तिथल्या भागाची आठवण करून देणारी त्यांची "सैतान' ही कादंबरी अतिशय गाजली होती. तीवर बोललो. हळूहळू गप्पांची गाडी विज्ञानकथांवर आली. मी मला आवडलेल्या कथांचा आशय किंवा कथानकं सांगत होतो आणि त्यातल्या स्वतंत्र कथा कशा सुचल्या, कोणत्या मूळ इंग्लिश कथेवरून बीज मिळालं हे धारप प्रांजळपणे सांगत होते. कुमार वाचकांसाठी लिहिलेली आणि मला अतिशय आवडलेली "कपटी कंदार' ही विज्ञानकथा त्यांनी उल्लेखिली. एका भयकथेत त्यांनी नायकावर आलेल्या संकटाला अतिशय मजेदार उपमा दिली आहे. भूत नायकाचा पाठलाग करत असतं आणि नायक धावत असतो; पण त्याचा धावण्याचा वेग अपुरा असतो. धारप म्हणतात ः "ज्याप्रमाणे 1/2+/1/4+1/8+1/16 ही श्रेणी पूर्णपर्यंत कधीच पोचणार नाही, त्याप्रमाणे नायक सुरक्षित अंतरावर कधीच पोचणार नव्हता.' हे त्यांना मी सांगत असताना ते गालात हसत होते. आमच्या वेळी गाजलेले दोन भयपट म्हणजे "द ओमेन' आणि "द एक्‍झॉर्सिस्ट'. हे दोन्ही चित्रपट त्याच नावाच्या कादंबऱ्यांवर आधारित आहेत. "दोन्हींपैकी श्रेष्ठ कोणता?' या प्रश्नावर धारपांनी "द ओमेन'ला पसंती दिली होती. -मनसोक्त गप्पा मारून उठल्यावर लक्षात आलं, की धारप जरी मनमोकळेपणानं बोलले असले तरी मीही त्यांच्यापाशी भरभरून बोललो होतो. "मुलाखतीत फोटो छापू नका,' अशी विनंती निरोप घेताना त्यांनी केली होती; पण दैनिकात गेल्यावर निरोपांची काहीतरी गल्लत झाली असावी आणि दैनिकानं फोटोसह मुलाखत प्रकाशित केली. त्यामुळं मी पुन्हा धारपांच्या घरी जायला धजावलो नाही. त्यांच्याशी अधिक मैत्र जुळण्याचा योग हुकला तो हुकलाच. विज्ञानविषयक उदंड लेखन करणारे ज्येष्ठ लेखक निरंजन घाटे यांचा धारपांशी निकटचा परिचय होता. त्यांनीही धारपांच्या काही आठवणी सांगितल्या. "धारपांना जादूटोणा करता येतो,'

असा ग्रह त्यांच्या "समर्थ कथा' वाचून अनेक वाचकांचा झाला होता. त्यानुसार, लोक त्यांच्याकडं त्यासंदर्भातली मदत किंवा सल्ला मागायला येत! आणि अर्थातच निराश होऊन परतत.

आमच्या घराजवळच रास्ता पेठेत एका जुन्या वाड्यासमोर काही कामानिमित्त थांबले असताना धारपांना "लुचाई' ही त्यांची प्रसिद्ध भयकथा सुचली होती. तो जुना वाडा कोणता हे आता शोधून काढणं दुरापास्त आहे. तुमच्या-आमच्यासारखी धारपांनादेखील भुताखेतांची किंवा अज्ञाताची भीती वाटणं साहजिक होतं. पूर्वी ते घरीच आपल्या खोलीत बसून शांत चित्तानं लेखन करत; पण एकदा ते असे एकाग्र चित्तानं लेखन करत असताना पत्नीनं चहा देण्यासाठी खोलीचं दार वाजवलं. त्या आवाजानं एकदम दचकून त्यांच्या हातातल्या पेनचं निब समोरच्या कागदात आरपार शिरलं, घाम फुटला आणि अनवस्था प्रसंग ओढवला. यानंतर धारपांनी घरी लेखन करणं सोडलं आणि त्यांच्या दुकानात बसूनच ते लेखन करू लागले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com