साहित्यिक भेटू लागले... (विजय तरवडे)

साहित्यिक भेटू लागले... (विजय तरवडे)

साहित्याविश्वाशी, नामवंत साहित्यिकांशी निगडित असे कितीतरी किस्से-आठवणी प्रसृत होत असतात, त्यांच्याविषयीच्या आख्यायिका-दंतकथा सांगितल्या जातात. हे एक प्रकारे त्या त्या साहित्यिकाचं ‘लघुचरित्र’च असतं. असे असंख्य किस्से आणि आठवणी या सदरातून दर आठवड्याला उलगडल्या जातील...

मा  झं सगळं आयुष्य पुण्यात सोमवार पेठेत गेलं. ‘पाचशे मीटर’ हा शब्दप्रयोग तूर्तास बदनाम झाला आहे; पण माझ्या घराच्या प्रत्येक दिशेला पाचशे मीटरच्या परिसरात कमल देसाई, शंकर पाटील, सुहास शिरवळकर, शैलजा राजे, अमृत गोरे आणि सुमित्रा भावे एवढे साहित्यिक राहत असत. त्यातल्या कुणाशी तेव्हा ओळख नव्हती आणि त्यांचं काही वाचलेलंही नव्हतं. पाठ्यपुस्तकांतून भेटलेले आणि तेव्हा हयात असलेले तीन साहित्यिक म्हणजे आचार्य प्र. के. अत्रे, ना. सी. फडके आणि वि. स. खांडेकर. सहावीत असताना आमच्या शाळेच्या स्नेहसंमेलनाला अध्यक्ष म्हणून आचार्य अत्रे आले होते. प्रत्यक्ष पाहिलेले ते पहिले साहित्यिक. आठवीत गेल्यावर आणखी दोन साहित्यिक प्रत्यक्ष पाहिले. घराजवळ "पॅरडाईज लायब्ररी' होती. तिथं काचेच्या शोकेसमध्ये ना. सी. फडके, चंद्रकांत काकोडकर, शैलजा राजे, ज्योत्स्ना देवधर आदींच्या पुस्तकांची रंगीत मुखपृष्ठं लावलेली असत. एकदा कुणीतरी सांगितलं की यातल्या शैलजा राजे शेजारच्या बोळातच राहतात. एका शनिवारी शाळा सुटल्यावर आम्ही काही मित्र त्यांचं घर शोधत गेलो आणि दार वाजवलं. त्यांनी दार उघडलं.
‘‘काय रे?’’
‘‘तुम्ही शैलजा राजे आहात का?’’
‘‘काय हवंय?’’
‘‘काही नाही. आम्ही ‘पॅरडाईज लायब्ररी’च्या काचेत तुमच्या पुस्तकांची चित्रं बघितली,’’ मित्र म्हणाला. ‘‘बराय,’’ असं म्हणत त्या दार लावू लागल्या. तेवढ्यात अचानक मला काहीतरी सुचलं आणि मी म्हणालो ः ‘‘तुमची सही द्याल का?’’ आणि घाईघाईनं मी दप्तर उचकलं. योगायोगानं मराठीच्या वर्गपाठाची वही सापडली. ती उघडून त्यांच्यापुढं धरली. त्यांनी माझं नाव, शाळेचं नाव, इयत्ता, तुकडी आणि नंतर ‘विषय ः मराठी वर्गपाठ' हे वाचून स्मितहास्य केलं.
‘‘तू जे मागतोयस त्याला ‘सही’नव्हे, तर ‘स्वाक्षरी’म्हणतात,’’ वहीच्या पहिल्या पानावर स्वाक्षरी करत त्या म्हणाल्या.

‘‘बरं,’’ म्हणून मी त्यांच्याकडून वही घेतली, स्वाक्षरी पाहिली आणि आनंदानं वही दप्तरात कोंबून मागं वळलो. तेव्हा त्या म्हणाल्या ः ‘‘विजय, ‘आभारी आहे’ असं म्हण.’’
‘‘हो, हो, आभारी आहे. Thank you ’’ म्हणून आम्ही निघालो. खूप आनंदात होतो. पुढच्या आठवड्यात मात्र माझ्या या आनंदावर विरजण पडलं. गुरुवारी मराठीचा तास होता. मराठीच्या जमदग्नी बाईंनी वही तपासताना पहिल्या पानावर ती स्वाक्षरी पाहिली आणि मला म्हणाल्या ः ‘‘हात पुढं कर.’’
हातावर छडीचे दोन फटके बसले आणि वहीचं पान फाडून टाकावं लागलं. पुढं राजेबाईंशी माझी मोठेपणी चांगली ओळख झाल्यावर मी त्या वेळी घडलेला हा प्रकार त्यांना सांगितला. त्यावर त्यांनी ‘काय बोलणार?’ याअर्थी खांदे उडवले.
***

याच काळात ना. सी. फडके यांची ‘गीत जुने, सूर नवे’ही कादंबरी नुकतीच ‘स्वस्त पुस्तक योजने’त प्रकाशित झाली होती. ‘वाट चुकल्याचा आनंद’ हा फडके यांचा धडा आम्हाला होता. अप्पा बळवंत चौकातल्या एका दुकानात जाऊन मी ही कादंबरी पाहिली आणि फडके यांचा पत्ता दुकानदाराला विचारला. त्यानं आठ्या न घालता एका चिठोऱ्यावर तो लिहून दिला. मी एक पोस्टकार्ड आणलं आणि कादंबरी (न वाचताच!) अतिशय आवडल्याचं पत्र फडके यांना लिहिलं. काही दिवसांनी त्यांच्याकडून आभार मानणारं कार्ड आलं. वळणदार अक्षरात त्यांच्या लेखनिकानं एका वाक्‍यात माझे आभार मानले होते आणि खाली फडके यांनी केलेली सही होती. हे पत्र मी दप्तरात जपून ठेवलं. इंग्लिशच्या श्‍याम अत्रे सरांचा मी थोडा लाडका होतो. मधल्या सुट्टीत स्टाफरूमच्या दारात त्यांना मी ते पत्र भीतभीतच दाखवलं. त्यांनी मात्र छडी न मारता ‘झकास’ म्हणून माझं कौतुक केलं. शालेय जीवनात एवढे तीनच साहित्यिक प्रत्यक्ष दिसले-भेटले; पण त्या काळात अवांतर वाचन खूप झालं ते ‘रविवार सकाळ’मधल्या ‘टिपलेला उत्कृष्ट उतारा’ या सदरामुळं. कोणत्याही मराठी पुस्तकातला आवडलेला उतारा वाचक पाठवत असत. संपादकांनी त्या उताऱ्यांमधून निवडलेला एक उतारा प्रसिद्ध होई आणि वाचकाला एक रुपया मिळे. एका रफ वहीत मी ते उतारे लिहून ठेवायचो. वि. स. खांडेकर, शिवाजी सावंत यांच्या साहित्यकृतींमधले पल्लेदार भाषेतले उतारे त्या वेळी जास्त लोकप्रिय होते. गं भा. निरंतर, अनंत काणेकर आणि वि. द. घाटे यांचेही उतारे मी वाचलेले आठवतात. शाळेच्या पेटी-वाचनालयात वाचलेली ‘साखरझोप’ (गं. भा. निरंतर), ‘विजेची वेल’ (अनंत काणेकर), ‘गुजगोष्टी’ (ना. सी. फडके) आणि ‘साष्टांग नमस्कार’ (आचार्य अत्रे) ही पुस्तकं कधीच विस्मरणात गेली नाहीत. ‘साष्टांग नमस्कार’ हे नाटक शनिवारी शाळा सुटल्यावर मित्र देवेंद्र थावरे आणि मी मिळून शिवाजीनगर रेल्वेस्टेशनच्या पायरीवर बसून फिदीफिदी हसत वाचून काढलेलं अजून आठवतं. अत्रे यांना प्रत्यक्ष भेटता आलं नाही; पण मोठा झाल्यावर त्यांच्या कन्या, ज्येष्ठ कवयित्री शिरीष पै यांना भेटून गप्पा मारताना त्यांच्या पप्पांना भेटल्याची मनोमन कल्पना केली आणि अत्रे यांना भेटल्याचा, त्यांच्याशी गप्पा मारल्याचा आनंद मिळवला! साहित्यविश्वातल्या अशा कितीतरी आठवणी...आणि किस्से. या आठवणी आणि किस्से म्हणजे जणू काही त्या त्या साहित्यिकाचं ‘लघुचरित्र’च! कालयंत्रात बसून गतकाळातल्या अशाच वेगवेगळ्या साहित्यिकांविषयीच्या छोट्या-मोठ्या आठवणींची सफर या सदरातून आपण करू या...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com