फर्डे फर्नांडिस (विनायक पाटणकर)

vinayak patankar
vinayak patankar

जॉर्ज फर्नांडिस नावाचा झंझावात नुकताच (29 जानेवारी) विसावला. सर्वार्थानं एक वादळी आयुष्य ते जगले. "झुंजार नेता', "बंदसम्राट' अशा बिरुदांनी संबोधले जाणारे फर्नांडिस हे संरक्षणमंत्री म्हणूनही तितकेच कर्तव्यपरायण, कार्यतत्पर होते. जवानांविषयीची त्यांचा जिव्हाळा, कळकळ अनोखी होती. त्यांच्या या पैलूंचं दर्शन.

ज्यांना आपण "जनतेचे खरे सेवक' म्हणू शकू, असे फार थोडे राजकीय नेते
गेल्या तीन दशकांत होऊन गेले. जनतेचं कल्याण हे एकच लक्ष्य समोर ठेवून जे नेते जगले त्यांत जॉर्ज फर्नांडिस यांचं नाम प्रामुख्यानं घेतलं जाईल. त्यागी वृत्ती आणि जनसेवा यासाठी त्यांनी सर्व आयुष्य वेचलं. सर्वसामान्यांशी जवळचं नातं जोडण्यासाठी आणि त्यांचा विश्वास संपादन करण्यासाठी त्यांनी अत्यंत साधी जीवनशैली अंगीकारली होती. त्यांची निरिच्छ वृत्ती त्यांच्या पेहरावापासून ते आहारापर्यंत दिसून येत असे. साधा खादीचा कुडता, पायजमा (हे कपडे ते स्वतः
धूत असत असं म्हणतात) परिधान केलेली आणि पायात चपला अडकवलेली त्यांची मूर्ती सर्वांच्या परिचयाची होती. "आपण सर्वसामान्यच आहोत' याचा विसर पडू नये म्हणून त्यांच्या सरकारी वाहनामध्येदेखील ते मागं न बसता नेहमी ड्रायव्हरच्या शेजारी बसत असत; परंतु अशा या साध्या माणसाचा मात्र काम समोर आलं की जणू काही "कायाकल्प'च व्हायचा. त्यांचं पूर्ण लक्ष समोरच्या विषयावर केंद्रित व्हायचं. त्यांच्या डोळ्यांत अशा वेळी एक वेगळीच चमक येई आणि त्यांच्या देहबोलीमध्येही एक वेगळेपण दिसू लागे. त्यांचं असं असामान्य आणि वेगळं व्यक्तिमत्त्व मी लष्करात असताना आणि ते संरक्षणमंत्री असताना मला जवळून पाहायला आणि अनुभवायला मिळालं हे माझं भाग्य. त्यांची आणि माझी पहिली भेट झाली ती सन 1997 मध्ये कश्‍मीरमध्ये कुपवारानामक जागी. त्या वेळी भारतीय लष्कराच्या ज्या एका पायदळ डिव्हिजनचा मी प्रमुख होतो त्या डिव्हिजनला त्यांनी भेट दिली होती. त्या वेळी काश्‍मीरमधली एकंदर परिस्थिती बरीच गंभीर होती. पाकिस्तानी सैन्य नियंत्रणरेषेपलीकडून सातत्यानं गोळीबार करत असे. सीमेपलीकडून घुसखोरीच्या कारवायाही होत होत्या आणि काश्‍मीर खोऱ्यामध्ये दहशतवादाला उधाण आलं होतं. त्यामुळे तो भाग अत्यंत संवेदनशील आणि लष्करी दृष्टिकोनातून महत्त्वाचा समजला जात होता. फर्नांडिस यांचं आगमन झालं आणि काही गोष्टी मला प्रकर्षानं जाणवल्या. ते केंद्र सरकारमधले एक प्रमुख मंत्री असूनदेखील त्यांच्याबरोबर काही लवाजमा नव्हता. त्यांच्या नेहमीच्या पेहरावात ते आले, थोडा प्राथमिक संवाद झाला आणि मी त्यांना सुरक्षाविषयक परिस्थितीची माहिती द्यायला सुरवात
केली. माझा प्रत्येक शब्द ते काळजीपूर्वक ऐकत आहेत हे मला जाणवत होतं. अधूनमधून एखादा पैलू पूर्णपणे आणि बारकाईनं समजून घेण्यासाठी त्यांनी अतिशय योग्य आणि सखोल प्रश्नही विचारले. त्यावरून माझ्या लक्षात आलं की या विवरणातून नेमके गाभ्याचे मुद्दे त्यांनी टिपले होते आणि बरोबर त्यांच्यावरच प्रश्न केले होते. त्या पहिल्या सादरीकरणानंतर त्यांच्या अनेक भेटी झाल्या आणि प्रत्येक भेटीमध्ये मी त्या वेळच्या परिस्थितीची माहिती त्यांना दिली व त्यांच्याशी चर्चा केली. त्यांची प्रगल्भ विचारशक्ती आणि अनेक महत्त्वाच्या विषयांवर एकाच वेळी लक्ष देण्याची क्षमता अतिशय प्रभावी आहे ही गोष्ट मला वेळोवेळी जाणवली. बोलणं कमी आणि ऐकणं जास्त हा अनेक थोर नेत्यांचा स्वभावधर्म असतो आणि तो फर्नांडिस यांच्यात पुरेपूर होता.

सन 1997 ते 2003 या काळात जेव्हा जेव्हा त्यांनी दुर्गम आणि खडतर जागी असलेल्या ठाण्यांना भेट दिली, तेव्हा तेव्हा मुद्दाम वेळात वेळ काढून ते जवानांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी आणि विचार समजून घ्यायचे. कठीण हवामान आणि धोकादायक स्थिती कधीही त्यांच्या भेटींच्या आड आली नाही; किंबहुना जिथं धोका जास्त आणि परिस्थिती अवघड होती तिथं ते जास्तीत जास्त वेळा भेट देत असत. सियाचिनसारख्या अतिशय आव्हानात्मक जागी ते जितक्‍या वेळा गेले होते त्याच्या
निम्म्या वेळाही कुणी दुसरे मंत्री किंवा नेते गेले नसतील. फर्नांडिस हे प्रसिद्धिपराङ्मुख होते. वर्तमानपत्रांच्या मथळ्यांद्वारे आणि छायाचित्रांद्वारे स्वतःच्या कामगिरीचा गवगवा आणि गौरव करून घेणं त्यांच्या स्वभावातच नव्हतं. त्यांना अनेक भाषा येत होत्या; परंतु जवानांशी संपर्क साधण्यासाठी भाषेची गरजच त्यांना कधी भासली नाही. त्यांची आस्था आणि त्यांच्या विचारांची पारदर्शकता जवानांपर्यंत सहजरीत्या पोचत असे. इतकंच नव्हे तर, आपल्या अडचणी समजून घेऊन संरक्षणमंत्री त्यावर
उपाय करतील, अशी जवानांना खात्रीदेखील वाटत असावी. त्यामुळेच जवानांनाही त्यांच्याशी स्पष्टपणे बोलण्यात धाकधूक वाटत नसे.

एकदा कुपवारा सेक्‍टरमधल्या एका ठाण्यावर मी त्यांना घेऊन गेलो असताना त्यांचं परतीच्या प्रवासाचं हेलिकॉप्टर येण्यास विलंब झाला आणि अचानक त्यांच्याशी अनौपचारिक चर्चा करायची संधी मला मिळाली. तेव्हा मी त्यांना सुचवलं, "माझ्या दक्षिणप्रांतीय जवानांना काश्‍मीरहून घरी पोचायला आणि तिथून परत येण्यासाठी सुमारे आठ ते दहा दिवस लागतात; त्यामुळे त्यांना जेमतेम चौदा दिवसांची आकस्मिक रजा (Casual Leave ) घेणं परवडत नाही.

ईशान्यप्रांतीयांकरिता हवाई दलाच्या विमानांची जशी साप्ताहिक कोरियर सेवा आहे तशी दक्षिणप्रांतीयांनाही मिळू शकली तर तेही आकस्मिक रजेचा उपयोग करून घेऊ शकतील.' आमचं बोलणं संपेपर्यंत त्यांचं हेलिकॉप्टर आलं आणि ते रवाना झाले. त्यानंतर एका आठवड्यातच आम्हाला एक चांगली बातमी मिळाली. ती बातमी होती हैदराबादला जाण्यासाठी साप्ताहिक कोरियरची सोय करण्यात आल्याची! (या गोष्टीचा शेवट मात्र सुखाचा झाला नाही. संरक्षणमंत्री फर्नांडिस रवाना झाल्यानंतर सुमारे अर्ध्या तासानंतर पाकिस्तान्यांनी त्या ठाण्यावर तोफा डागल्या आणि त्यांत ज्या जवानांशी त्यांची चर्चा झाली होती त्यापैकी चारजणांना हौतात्म्य लाभलं. ही बातमी कळताच फर्नांडिस यांना अत्यंत दुःख झालं आणि त्यांनी लगेच मला फोन करून हळहळ व्यक्त केली. याशिवाय, त्यांनी स्वहस्ते एक पत्र लिहून शोकसंदेशही पाठवला).

ता. 13 डिसेंबर 2001 रोजी दहशतवाद्यांनी संसदेवर केलेल्या हल्ल्यानंतर भारतानं
"ऑपेरेशन पराक्रम'ची घोषणा केली आणि युद्धाचं वारं वाहू लागलं. त्यानंतर फर्नांडिस यांच्या काश्‍मीरभेटींमध्ये आणखीच वाढ झाली. त्याच सुमारास "मला पुन्हा काश्‍मीर खोऱ्यात पाठवावं' अशी विनंती मी केली होती, तिला मान्यता मिळाली आणि मी तातडीनं श्रीनगरला पोचलो. सर्वसाधारणपणे अतिमहत्त्वाच्या व्यक्तींचे (VIPs) दौरे अनेक दिवसांच्या पूर्वतयारीनुसार आखले जातात; पण फर्नांडिस यांचं तसं नव्हतं. मला एकदम दुपारी फोन यायचा, की मंत्रिमहोदय दुसऱ्या दिवशी सकाळी येत आहेत. अर्थात माझ्या कुपवाराच्या आधीच्या अनुभवामुळे मला या गोष्टी माहीत होत्या आणि त्यामुळे आमची नेहमीच मानसिक तयारी असायची. "उरी विभागाला (आता ती जागा सर्वपरिचित झाली आहे!) भेट द्यायची आणि तिथल्या जवानांशी चर्चा
करण्याची संरक्षणमंत्र्यांची इच्छा आहे,' असं आम्हाला एकदा एका संदेशाद्वारे कळवण्यात आलं. त्यानुसार, ते श्रीनगरला आल्यावर मी त्यांना घेऊन उरीला पोचलो. "जवानांचा उत्साह आणि मनोबल वाढवण्यासाठी त्यांना काही तरी द्यायचं आहे, काय द्यावं?' असं फर्नांडिस यांनी प्रवासादरम्यान मला वाटेत विचारलं. त्यावर मी त्यांना म्हणालो ः ""माझ्या जवानांचं मनोबल अत्युच्च आहे आणि त्यांच्यात उत्साहही भरपूर आहे. तुम्हाला पाहून तर तो आणखी शिखरावर पोचेल, तेव्हा त्यांना अधिक काही देण्याची गरज वाटत नाही.'' माझं बोलणं त्यांना फारसं पटलेलं दिसलं नाही म्हणून मी पुन्हा म्हणालो, ""फार तर जवान तुमच्याकडं नियंत्रणरेषा ओलांडायची परवानगी मागतील.'' त्यांनी माझं बोलणं हसण्यावारी नेलं.

फर्नांडिस यांनी नेहमीप्रमाणे तिथल्या अधिकाऱ्यांकडून संरक्षणस्थितीचा आढावा घेतला आणि नंतर ते जवानांबरोबर गप्पा मारण्यासाठी बसले. माझ्याशी वाटेत चर्चा झालेल्या विषयासंबंधी त्यांनी जवानांना खोदून खोदून प्रश्न केला आणि माझ्या अपेक्षेप्रमाणेच जवानांनीही "आपल्याला काहीही नको' असल्याचंच सांगितलं. शेवटी, त्यांनी फारच आग्रह धरल्यावर एका जवानानं धीर करून विचारलं ः
""साहेब, आम्हाला दुसरं काहीही नको. केवळ नियंत्रणरेषा पार करण्याचा सिग्नल द्याल का?'' ते ऐकताच फर्नांडिस यांच्या चेहऱ्यावरचं गांभीर्य नाहीसं होऊन त्याजागी एक मनःपूर्वक स्मित उमटलं. त्यांचं विमान श्रीनगरच्या विमानतळावरून आमचा निरोप घेऊन दिल्लीला जायला निघेपर्यंत ते स्मित त्यांच्या चेहऱ्यावर कायम होतं. त्या दिवशी आम्हाला एक खरा संवेदनशील आणि कर्तव्यनिष्ठ नेता पाहायला मिळाला. श्रीनगरहून माझी बदली दिल्लीच्या लष्करी मुख्यालयात झाली आणि त्यामुळं मला कामाच्या संदर्भात फर्नांडिस यांना अधूनमधून भेटण्याची संधी मला मिळत गेली. त्यांना सशस्त्र सेनेच्या तिन्ही दलांबद्दल किती कळकळ होती आणि विशेषकरून सीमेवर तैनात असलेल्या लष्कराच्या, नौदलाच्या आणि वायुदलाच्या प्रत्येक व्यक्तीसाठी काही ना काही सतत करत राहण्याची मनापासून इच्छा होती, हे मला प्रत्येक भेटीत जाणवलं.

सर्व जवानांनाही त्यांच्या सेवाभावाबद्दल आणि कर्तव्यपरायणतेबद्दल अत्यंत आदर वाटत असायचा. फर्नांडिस हे खरोखरच एक असामान्य व्यक्ती होते. कामगारांचे नेते म्हणून असोत किंवा देशाचे संरक्षणमंत्री म्हणून असोत, जी जबाबदारी त्यांनी हाती घेतली किंवा त्यांच्यावर सोपवली गेली तीत ते स्वतःला पूर्णपणे झोकून देत असत. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी याचं ते मूर्तिमंत प्रतीक होते. अशा या भारताच्या सुपुत्राला लष्कराचा अखेरचा सलाम.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com