कुरुलकर हेरगिरीच्या जाळ्यात का अडकले? vinod raut writes Dr Pradip Kurulkar in spy net arrested crime drdo | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dr Pradip Kurulkar

कुरुलकर हेरगिरीच्या जाळ्यात का अडकले?

डीआरडीओ या देशातील प्रमुख संरक्षण साहित्य निर्मिती आणि संशोधन करणाऱ्या संस्थेतील ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप कुरुलकर यांना हेरगिरीच्या आरोपावरून अटक केली आहे. त्यानंतर अनेक धक्कादायक खुलासे बाहेर येत आहेत. डॉ. कुरुलकर यांच्यासारखे सावज पाकिस्तानने कसे टिपले, आपली काऊंटर इंटेलिजन्स यंत्रणा कुठे अपयशी ठरली, हनीट्रॅपचे सापळे कसे रचले जातात, याबद्दल सांगितले आहे गुप्तचर खात्याचा प्रदीर्घ अनुभव असलेले पोलिस अधिकारी शिरीष इनामदार यांनी...

कसे हेरतात सावज?

कुरुलकर हे काही महिन्यांत सेवानिवृत होणार होते. या वयात ते हनी ट्रॅपमध्ये कसे अडकले, असा प्रश्न अनेक जण करतात. मात्र द्रोह, विद्रोह, प्रेम, आसक्ती, आवड निर्माण होणे या सगळ्या मानसिक अवस्था आहेत. याला वयाचे बंधन नाही. या भावना आयुष्यात वेगवेगळ्या टप्प्यावर वेगवेगळ्या प्रकारे उफाळून येतात. वयाची पन्नाशी उलटलेले लोकसुद्धा पत्नीशी प्रतारणा करतात. या सर्व मानसिक अवस्था आहेत.

शत्रूला जी माहिती पाहिजे ती सहजपणे म्हणजे ओपन सोअर्सने उपलब्ध झाली असती, तरी शत्रू राष्ट्राने एवढा द्राविडी प्राणायम घातला नसता. इंटेलिजन्सचा अर्थ असा आहे की, अशी माहिती जी सहजासहजी मिळत नाही, अत्यंत गुप्त आहे, ती गुप्त ठेवण्यासाठी शत्रूने प्रयत्नांची पराकाष्ठा केली आहे. ही माहिती काढण्यासाठी तिथली व्यवस्था भेदावी लागते. हे एक तंत्र आहे. म्हणून त्याला इंग्रजीत इंटेलिजन्स असे सुरेख नाव दिले आहे. एखाद्या राष्ट्राच्या संरक्षण व्यवस्थेसाठी अत्यंत महत्त्वाची ठरणारी माहिती, साहजिक कठोर परिश्रमातून मिळवावी लागेल. अशी माहिती मुळात संघटनेतील नवख्या माणसाकडून मिळणार नाही, ती डॉ. प्रदीप कुरुलकर किंवा त्या पदावर बसलेल्या उच्चपदस्थांकडून मिळेल.

हेरगिरी प्रकरणात कुणी साधासुधा पकडला जात नाही, कळीच्या पदावर असलेल्याकडे गुप्त माहितीचा एक्सेस असतो. कुरुलकर हे बोलके होते. उस्ताही, राष्ट्राभिमानी होते. मात्र हे सर्व गुण अवगुणात बदलण्यासाठी काही सेकंद लागतात. तो क्षण निसटतो आणि तोच क्षण शत्रूने पकडला, तर घुसखोरी करण्यासाठी ते महत्त्वाचे कारण ठरते. हे माहिती नसणे एवढे कुरुलकर निर्बुद्ध नव्हते; मात्र तरीही त्यांनी आत्मसंयमाचे कवच का भेदू दिले, हा कळीचा मुद्दा आहे.

गळ कसा टाकला जातो?

एखादी शत्रुपक्षातली व्यक्ती, अधिकारी ज्याच्याकडे संवेनदशील माहिती असते, अशांचा अभ्यास केला जातो. त्या व्यक्तींचे प्रोफाईल बारकाईने तपासले जातात. ठराविक माहिती पाहिजे असे निश्चित होते, तेव्हा ती माहिती कोण देऊ शकते, याची एक यादी तयार केली जाते. ती यादी अजून शॉर्ट लिस्ट केली जाते. या प्रक्रियेला टॅलेंट स्पॉटिंग म्हणतात.

पुढची व्यक्ती कोण आहे, त्याची विचारधारा, आवडीनिवडी, तो किती प्रोटेक्टिव किंवा डिफेन्सिव आहे, तो सध्याच्या सरकारपासून आनंदी आहे की नाही, त्याचे चारित्र्य, गरजा, कौटुंबिक पार्श्वभूमी आणि बालपण याची बारीक छाननी केली जाते. इंटेलिजन्स हा मूळात मानसिक खेळ आहे. ही माहिती आल्यावर मग या माणसाला वश कसे करायचे, त्यासाठी गळ टाकणे सुरू होते. त्या व्यक्तीच्या चंचलपणाचा फायदा घेतला जातो. त्यासाठी टॅलेंट स्पॉटिंग करतात.

आईस ब्रेकिंग

टॅलेंट स्पॉटिंगमध्ये कुठल्या व्यक्तीवर जाळे टाकायचे, ते ठरते. त्यापुढची प्रक्रिया असते ती म्हणजे आईस ब्रेकिंगची. त्या व्यक्तीशी कसे भिडायचे, याकरिता त्या देशातील असलेले ॲसेट वापरले जातात. फिजिकल ब्रेकिंग किंवा सायबर ब्रेकिंग या माध्यमातून सावज ब्रेक केले जाते. तो मासा गळाच्या अवतीभोवती फिरायला लागतो. गळ अधिक आकर्षक केला जातो. सुरुवातीला एकदम शॉक लागू नये म्हणून हाय-हॅलोपर्यंत बोलणे असते. पुढे त्याची तीव्रता वाढवली जाते. यासोबत पुढची व्यक्ती कशाप्रकारे व्यक्त होत आहे, ते सातत्याने अभ्यासले जाते. ही खूप मोठी प्रोसेस आहे.

कुरुलकरसारखे सोर्स तयार करण्यासाठी कुठल्याही एजन्सीला वर्षानुवर्षे लागतात. कधी कधी दशके जातात. मात्र एकदा असा माणूस गळाला लागला की तो मोठी ॲसेट ठरतो. पुढची कित्येक वर्षे वापरता येतो. त्याच्या माध्यमातून इतरांना भरती करता येते. एकदा सावज कह्यात आले की त्याला सुरुवातीला छोटी-मोठी कामे सोपवली जातात. त्या वेळी त्या व्यक्तीच्या आजूबाजूला गुलाबी रम्य वातावरण असते.

सावजाला वाटायला लागते की त्याच्यावर कामाचा तणाव आहे, फार जबाबदारीचे काम आहे. त्यामुळे मला रिलॅक्स करण्याचा अधिकार आहे, तिथेच तो वाहवत जातो. सुरुवातीला ऑफिसची जुजबी माहिती काढून घेतली जाते. मग प्रश्नांची डिग्री वाढवली जाते. त्या प्रक्रियेत महत्त्वाची माहिती विचारली जाते, ती सांगितली की तो मासा गळाला लागला, असे समजले जाते. तो ट्रॅप होतो. हेरगिरीच्या ट्रॅपमध्ये एकदा माणूस फसला, की त्याचे परतीचे सर्व मार्ग बंद होतात.

बिंग केव्हा फुटले?

सध्या सावज जाळ्यात अडकवण्याचे काम अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि सोशल मीडियामुळे थोडे सोपे झाले आहे; मात्र फार जोखमीची माहिती असेल तर ती प्रत्यक्ष भेटून द्यावी लागते. पेन ड्राईव्ह, सीडी, हार्ड कॉपी, वस्तू असेल ती द्यावी लागते. त्याला सिक्रेट वार्ता म्हणतात. मग हे सर्व माहितीची देवाणघेवाण वाढली की कधीतरी आपली काऊंटर इंटेलिजन्सी नावाची यंत्रणा सक्रिय होते. ही यंत्रणा उच्चपदस्थ अधिकाऱ्यावर नजर ठेवून असते. कधी तरी कुरुलकर त्यांच्या रडावर आले असावेत. मग कुरुलकर यांच्यावर सातत्याने लक्ष्य ठेवले गेले. त्यांच्याविरुद्धचे सर्व पुरावे हाती लागल्यावर डीआरडीओने पुणे एटीएसकडे गुन्हा दाखल केला. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता.

दिसते तसे नसते...

कुरुलकर यांच्या प्रकरणात आपल्या काउंटर इंटेलिजन्स यंत्रणा फेल झाल्या. अयशस्वी ठरल्या. कुरुलकर यांची बॉडी लँग्वेज काय आहे, ते परदेश वारीवर कुणासोबत जातात, त्यांचे बँक बॅलन्स, प्रोटोकॉल आणि शिष्टाचार जे पाळावे लागतात, ते कुरुलकर पाळत होते का, कुरुलकर यांचा पाय कुठे घसरला, ते काऊंटर इंटेलिजन्सला का कळले नाही, हा मोठा प्रश्न आहे. हेरगिरी प्रकरण सुरू झाल्यावर कुरुलकर यांना एक्सपोज होण्याची भीती वाटत होती. ती लपवण्यासाठी त्यांनी वैयक्तिक विचारधारेचा वापर इमेज बिल्डिंगसाठी सुरू केला.

आपली निष्ठा दाखवण्यासाठी गरज नसताना सार्वजनिक व्यासपीठावर भाषण देणे हा त्यातील एक प्रकार होता. याचा अर्थ कुरुलकर हे काम गेल्या दशकापासून करत होते; मात्र अलिकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पॉवर कॉरिडॉरशी लांगूलचालन सुरू झाल्याने फेवरटीझमचा प्रकार सुरू झाला. त्यातून फायदे लाटण्यावर सर्वांचे लक्ष केंद्रित झाले. परिणामी काऊंटर इंटेलिजेन्सची धार बोथट झाली. दिसते तसे नसते, हे गुप्तचर खात्याचे पहिले तत्त्व आहे. आपण तेच इथे विसरलो. त्यामुळे कुरुलकर यांचे राष्ट्रवाद, सावरकरांचे विचार आणि देशाचे संरक्षण या विषयावर बोलणे आणि प्रत्यक्षातील कृती यात मोठी तफावत आहे.

जबाबदारीसाठी फीट नव्हते

सोशल मीडियामुळे स्वत:ला मिरवण्याची वृत्ती सर्वत्र निर्माण झाली आहे; मात्र जबाबदारीचे भान विसरले जाते. संवेदनशील कामगिरीवर असताना सोशल मीडियावर राहण्याइतका निर्बुद्धपणा जगात दुसरा नाही. प्रदीप कुरुलकर यांचे सोशल मीडिया किंवा सार्वजनिक ठिकाणचे वागणे, बोलणे बघितले तर कुरुलकर कधीच या पदासाठी फीट व्यक्ती नव्हते, हे सहज लक्षात येईल. त्याहीपेक्षा भयंकर म्हणजे निवृत्तीनंतर कुरुलकर हे सल्लागारसारख्या अधिक मोठ्या आणि संवेदनशील पदावर जाणार होते. ते देशाच्या दृष्टीने किती घातक ठरले असते?

हनीट्रॅप

हनीट्रॅप हे गुप्त वार्ताचे अतिशय प्राचीन तंत्रज्ञान आहे. त्याला चाणक्याने त्याच्या अर्थशास्त्रात विषकन्या असे म्हटले आहे. पुरुषाची दोलायमान मानसिक परिस्थिती बघून स्त्रीचा वापर करण्याची पद्धत फार प्राचीन आहे. सध्या आपण आभासी जगात राहण्याचे शिकलो आहे. अनेकदा त्याचे एडिक्शन होते. त्याचा वापर शत्रुराष्ट्र करून घेतात. जुन्या काळात प्रत्यक्ष आणि फोनवर हनीट्रॅप लागायचा. आताच्या आभासी जगात ते जास्त परिणामकारक झाले आहे. आभासी जगाचा वास्ताविकतेशी तसा काही संबंध नाही; तरीदेखील आपण तासन् तास व्हॉट्स ॲपवर पडून राहतो. त्याचाच फायदा घेतला जातो.

गुप्तवार्ता संकलनाची नऊ कौशल्ये

शेकडो वर्षांपासून गुप्तवार्ता संकलनाची नऊ प्रमुख कौशल्ये आहेत. आजही तीच कायम आहेत. केवळ बदलते तंत्रज्ञान आणि विज्ञानामुळे जुन्या गुप्त माहिती संकलनाचा शार्पनेस आणि क्षमता वाढली आहे. असे म्हटले जाते की, जगात सर्वात जुने व्यवसाय दोनच आहेत. एक म्हणजे वेशाव्यवसाय आणि दुसरे म्हणजे गुप्त वार्ता संकलन. अगदी प्राचीन काळापासून हेरगिरीच्या तंत्राला सुरुवात झाली होती. गुप्त चौकशी, टेहळणी (सर्विलेन्स), कसून विचारपूस (इटंरॉगेशन), कव्हर, अॅनीबी म्हणजे एखाद्या विशिष्ट वेळेत, ठिकाणी उपस्थित राहण्याचे कसब म्हणजे विश्वास बसेल असे खोटे कारण देणे.

गुप्त संपर्क साधणे आणि एजंट रनिंग म्हणजे शत्रूच्या गोटातील माणूस वश करणे किंवा आपला माणूस तिकडे बेमालूनपणे पेरणे. गुप्तहेरीचे सर्व तंत्र आजमवण्यासाठी ‘लपवणे’ आणि ‘शोधून काढणे’ ही दोन महत्त्वाची उपतंत्रे आहेत. जगातील सर्वच देश आणि गुप्तचर यंत्रणा ते आपले मित्र असो शत्रुराष्ट्र ही नऊ कामे अव्याहतपणे करतात. हे सर्व कौशल्य काउंटर इंटेलिजन्ससाठी (प्रतिगुप्तवार्ता) वापरतो. ज्या वेळी आपण शत्रूची माहिती काढून घेतो, त्या वेळी आपले कर्तव्य असते की, आपली माहिती शत्रराष्ट्र काढून तर घेत नाही ना, यासाठी काऊंटर इंटेलिजन्स असे म्हटले जाते. यातील एक तत्त्व विसरलात तरी खेळ खल्लास होतो.