भारताची 'खाद्यधानी' (विष्णू मनोहर)

vishnu manohar
vishnu manohar

दिल्ली ही भारताची राजधानी आहेच, पण अनेक पदार्थांची रेलचेल असल्यानं ती भारताची "खाद्यधानी'ही आहे. चाट मसाला घालून मिळणाऱ्या सॅलडपासून ते छोटे-भटुरे, मिठाया, बिर्याणीपर्यंत अनेक पदार्थ खवय्यांना तृप्त करतात. अगदी स्वस्त खाण्यापासून ते महागातल्या महाग पदार्थांपर्यंत सर्व काही मिळणाऱ्या या खाद्यसंस्कृतीची सफर...

दिल्ली ही भारताची राजधानी. यमुना नदीच्या पश्‍चिम तटावर वसलेलं हे शहर मला लहानपनापासूनच आवडायचं. याचा दोन भागांमध्ये विस्तार आहे. जुनी दिल्ली आणि नवी दिल्ली. जुनी दिल्ली हे मुघल साम्राज्याचा वारसा चालवणारं आणि तटबंदींनी वेढलेलं शहर, तर नवी दिल्ली एकदम चकचकीत! मोठमोठे रस्ते, त्यांच्या आजूबाजूने विस्तीर्ण बगीचे, उंच भव्य इमारती आणि सगळीकडं स्वच्छता. या भागात सायकल, रिक्षाला मज्जाव आहे; पण खर सांगू? दिल्ली म्हटलं, की सायकल रिक्षाशिवाय मजा नाही. जंतरमंतर, पुराना किला, जामा मस्जिद, फतेपुरी इथं रिक्षांची आणि खाण्या-पिण्याची रेलचेल असते.

इंग्रजांनी कोलकत्त्याहून सन 1911 मध्ये आपली राजधानी दिल्लीला आणली आणि तो भाग नवी दिल्ली या नावानं ओळखला जाऊ लागला. त्या भागाचा नियोजनबद्ध पद्धतीनं विकास केला गेला. प्रसिद्ध वास्तुशास्त्रज्ञ लुटिन्स आणि बेकर यांनी अतिविशाल आणि भव्य अशी इंग्रजांची राजधानी इथं विकत केली. मोठमोठे रस्ते, त्याच्या बाजूला सर्व ऋतूंत बहरणारी, नियोजनबद्ध पद्धतीनं लावलेली वृक्षराजी, त्याचबरोबर मोठमोठे भव्य चौक, राजपत्रित अधिकाऱ्यांचे भव्य बंगले निर्माण केले. राजधानीचं शहर असल्यामुळं विमानसेवा; तसंच रस्ते यांनी भारताच्या सर्व भागांशी हे शहर जोडण्यात आलं. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 1, 2, 8, 10 आणि 24 इथूनच सुरू होतात. नवी दिल्लीस उत्तर रेल्वेचं मुख्यालय आहे. नवी दिल्ली आणि जुनी दिल्ली ही इथली मुख्य स्थानकं. त्याचबरोबर तिलक ब्रिज, कॅनाट प्लेस, ओखला, गुडगाव, वल्लभगड, गाझियाबाद, सूरजकुंड, हजरत निजामुद्दिन, तुघलकाबाद, फरिदाबाद ही इतर स्थानकं. हा प्रदेश महाभारताइतकाच प्राचीन आहे. इथं पांडवांनी इंद्रप्रस्थ या आपल्या राजधानीची स्थापना केली होती. त्यानंतर प्राचीन, मध्ययुगीन मुघल, ब्रिटिश आणि स्वातंत्र्योत्तर काळातली संस्कृती आणि वास्तुशिल्पांचा अतिसुंदर असा समन्वय पाहायला मिळतो.

दिल्ली राजधानीचं शहर असल्यामुळे इथं निचितच लोकांची ये-जा जास्त. गल्लोगल्ली परदेशी पर्यटक दिसतील. आजूबाजूच्या राज्यांतले लोक चरितार्थ चालवण्यासाठी इथं आले आणि येताना नकळत आपली खाद्यसंस्कृतीही आणली.

सगळ्यांचं पोट भरणारं शहर
दिल्ली ही भारताची राजधानी आहे, तशीच खाण्यापिण्याच्या बाबतीतही! तिला मी "खाद्यधानी' म्हणीन. इथं माणूस पाच रुपयांपासून दहा हजार रुपयांपर्यंत पोट भरू शकतो. लाल किल्ल्याच्या आसपास फूटपाथवर तुम्हाला कित्येक खोमचेवाले दिसतील. अगदी कमी किंमतीत तुम्ही इथं पोट भरू शकाल. शेगडीवर काटकोनात ठेवलेली हंडी, त्यात असलेले छोले, बाजूला लोणचं आणि लच्छेदार सॅलड. इथंच तुम्हाला अजून एक प्रकार पाहायला मिळतो तो म्हणजे अक्षरश: बादलीत असलेली भाजी आणि पिशवीत ठेवलेल्या पोळ्या अथवा नान. दिल्लीला गेल्यावर मी एक संध्याकाळ वेगळी काढून ठेवतो. त्यावेळी मी चांदणी चौकातून फत्तेपुरीपर्यंत एक रिक्षा करतो. फत्तेपुरीला उतरून थोडं समोर गेलं, तर उजवीकडे गल्लीच्या तोंडाशी काके-दी-हट्‌टी नावाचं दुकान चालतं. मला कित्येक जणांनी इथं जाऊन टेस्ट करायला सांगितलं; पण तिथलं बाह्य रूप पाहून माझी हिंमत झाली नाही; पण एकदा हा योग आला. मी तिथं गेलो आणि त्या दुकानाच्या प्रेमातच पडलो. आतमध्ये गेल्यावर पाच-सहा प्रकारचे नान, जिरा राईस, शाही पनीर आणि दोन साध्या भाज्या असं जेवण. जेमतेम 25 लोक बसू शकतील एवढी जागा; पण सकाळी दहापासून रात्री 11 पर्यंत हाऊसफुल! तिथं गेल्यावर 10 ते 15 मिनिटं वेटिंग असतंच. इथलं एक नान तिघंजण मिळून खाऊ शकतात. 30 किंवा 35 रुपयांचं नान- यात भरपूर मसाला भरलेला, मसाल्यातले प्रकार म्हणजे आलू मसाला, गोबी मसाला, मूली का मसाला किंवा पनीर याबरोबर दुधी-भोपळ्याचं रायतं आणि बटरचा एक चौकोन हे एवढं समोर आलं, की क्‍या बात है! काही बघायला नको!... तुडुंब पोट भरून बाहेर आलं, की उजवीकडं तुम्हाला एक मिल्कशेकवाला दिसेल. त्याच्याकडं बाराही महिने तुम्हाला मॅंगो मिल्कशेक मिळेल. तिथला फालूदा आणि मिल्कशेक न खाता आलं, तर माझ्या मनात सतत अपराधीपणाची भावना टोचत असते. त्यामुळं कितीही पोट भरलं असलं, तरी मी हे तिलक शेक किंवा फालुदा खाल्ल्याशिवाय तिथून येत नाही.

सॅलड आणि चाट मसाला
इथला माझा आवडीचा अजून एक छंद म्हणजे सकाळच्या वेळी भूक लागली असताना रस्त्याच्या कडेला मुळा, गाजर, बीट याचं सॅलड खाणं या सॅलडबरोबर चाट मसाला नावाचा जो प्रकार असतो निव्वळ अप्रतिम. यानं भूक तर भागतेच; पण पोट भरत नाही- उलट पुढं अजून काहीतरी छान खाण्याकरीता पोटात जागा होते. तसं म्हटलं, तर नुसत्या खाण्याकरीता दिल्लीत एक आठवडा थांबावं- तोसुद्धा कमी पडेल. मी दिल्लीला गेलो, की पहाडगंजला मेन बाजार इथलं माझं एक हॉटेल ठरलेलं आहे. छोट्या गल्लीत असलेलं हे हॉटेल आतून मात्र एकदम चकाचक आहे. इथं राहण्याचे दोन फायदे. एक तर बऱ्याच वेळा जात असल्यामुळं सगळे लोक ओळखतात आणि इथं जवळच असलेलं छोटेलालची बेडमी पुरी मला अतिशय आवडते. सकाळी हॉटेलच्या खाली उतरल्याबरोबर गरमागरम चहा, त्याबरोबर ब्रेड आणि भरपूर बटर खाणं हा माझा आवडता छंद. कुठंही जायला या गल्लीतूनच बाहेर पडावं लागतं. त्यामुळे रस्त्यावर थाटलेली बरीच दुकानं दिसतात आणि नवीन-नवीन माहिती मिळते. स्टेशनवरून या गल्लीत शिरताना उजवीकडं थोडं आतल्या बाजूला एक छोले-भटुरेवाला आहे. त्याच्याकडं मिळणारा पनीर भटुरा आणि पिंडी छोले खायलाच हवेत. तेही फक्‍त सतरा रुपयांत.

दिल्ली मेट्रो ट्रेननं पटेल चौकला उतरायचं. स्टेशनच्या बाहेर पडल्यावर डावीकडून सरळ सरळ गेलं, की झाडांनी आच्छादित असा एक एरीया दिसतो. तिथं रस्त्यावरच वेगवेगळ्या प्रकारच्या गाड्या तुम्हाला दिसतील. त्यात चायनीज, साऊथ इंडियन, चाटवाले, भेळ, पिझ्झा, बर्गरपासून छोले-भटुऱ्यापर्यंत सगळ्या गाड्या दिसतील. आल्हादायक वातावरणात तुमच्यासमोर सगळे पदार्थ तयार होत असतात. ही पण मजा एकदा घ्यायला हवी. अगदी पोट फुटेस्तोवर खाल्लं, तरी पाच व्यक्‍तींचं बिल पाचशे ते सहाशे रुपयांच्या घरात जातं. यानंतर तुम्ही गुगलवर सर्च इंजिनमध्ये बी.टी. डब्लू हा असा शब्द टाकलात, तर तुम्हाला बिट्टू टिकियावाला याचं काउंटर दिल्लीत कुठं-कुठं आहेत हे कळेल आणि त्याची मजा मात्र बिट्टूच्या ठेल्यावर जाऊनच घ्यावी.

दिल्लीतल्या प्रसिद्ध जामा मस्जिदजवळ मुघलाई जेवणाची मजा तुम्हाला घेता येईल. याशिवाय झोरबाच्या समोर एक इस्लामिक सेंटर आहे, तिथं तुम्हाला मुस्लिम पद्धतीचं अप्रतिम जेवण मिळेल. बाकी करीम्सबद्दल तर सर्वांनाच माहीत आहे. त्यांच्या अनेक ब्रॅंचेस आहेत आणि तंदूर रोटी, नान, पराठा या उत्तर भारतीय पदार्थांचा तुम्हाला कंटाळा आला, तर कॅनॉट प्लेसला "सर्वना' या फूड जॉइंटमध्ये तुम्ही जा! आणि तिथं तुम्हाला अस्सल साऊथ इंडियन पद्धतीचं जेवण आणि इतर पदार्थ मिळतील. तसं तिथं थोडं महाग आहे; पण स्वच्छता, नीटनेटकेपणा आणि मुख्य पदार्थांबरोबर ज्या पाच-सहा प्रकारच्या चटण्या तिथं मिळतात, त्यामुळं आपण मोजलेले पैसे वाया जात नाहीत.

दिल्लीची बिर्याणी, मिठाई
भारतातली काही शहरं अशी आहेत, की त्या नावाच्या शहराबरोबर एखाद्या पदार्थांचा उल्लेख असतो. जसा कोल्हापूरचा पांढरा-तांबडा रस्सा, पुण्याची मिसळ, जळगावची शेव-भाजी, नागपूरचं सावजी, लखनौचे कबाब; तसंच दिल्लीची बिर्याणी. दिल्लीला जाऊन बिर्याणी न खाता परत येणं म्हणजे पाप करण्यासारखं आहे. बिर्याणी खायची असेल, तर जुन्या दिल्लीत "हुमणू की बिर्याणी' नावाचा एक दुकान आहे. तिथं समोरच एक पाटी लिहिली आहे. "लो कर लो बात, यही है असली हुमणू!' कारण याची बिर्याणी इतकी प्रसिद्ध आहे, की या नावानं दोन-तीन दुकानं उघडली आहेत आणि गंमत म्हणजे बिर्याणीचं पार्सल घेऊन गेलात, तर ती बिर्याणी तुम्हाला दहा रुपयांनी स्वस्त पडते. नाही म्हणायला काही दुकानं सदर बाजारलासुद्धा सापडतात. या सर्व प्रकारांबरोबर मिठाईतसुद्धा दिल्ली मागं नाही. आसपासच्या मोठ्या शहरांमधून लोक इथं व्यवसायाला आले, त्याबरोबर त्यांची संस्कृतीसुद्धा आली, खाण्याच्या पद्धती आल्या आणि मिठाईचं एक नवीन दालन दिल्लीकरांसाठी उघडलं- कोलकत्याचा हल्दीराम. अनेक प्रकारच्या मिठायांबरोबर हल्दीरामची चाटसुद्धा प्रसिद्ध आहे. मिठाईकरीता अजून एक नाव घ्यावं लागेल, ते म्हणजे "भिकाजी की मिठाई.' करोलबागेतलं प्रसिद्ध असं ठिकाण. काही वर्षांपूर्वी मी तिथं आपल्या भाकरीएवढ्या जाडीची जवळपास तेवढीच मोठ्ठी साय आणि त्याबरोबर सुहारी म्हणजेच पुरीचा एक प्रकार खाल्ला होता आणि गंमत म्हणजे यात साखर नव्हती. साखर हवी असेल, तर वेगळी पिठी साखर वरून घालायची. खरं सांगतो, त्या दुधाची गोडी इतकी अप्रतिम होती, की मला साखरेची गरजच पडली नाही.

वैविध्य जपणारी खाद्यसंस्कृती
दिल्ली हे राजधानीचं ठिकाण असल्यामुळं फक्त भारतातलेच नव्हे, तर देश-विदेशातले लोकही इथं येतात. त्यामुळं इथं अनेक प्रदर्शनं भरतात. त्यातली काही महत्त्वाची ठिकाणं म्हणजे दिल्ली हाट (हाट म्हणजे बाजार), प्रगती मैदान, सूरजकुंड का मेला. इथं आंतरराष्ट्रीय स्तरावरची प्रदर्शनं भरतात. भारतातल्या विविध प्रांतातून आलेले लोक त्या-त्या प्रांतात तयार होणाऱ्या वस्तूंबरोबर पदार्थांचेही स्टॉल लावतात. त्यामुळं भारतातल्या विविध भागांतल्या खाद्य-संस्कृतीची आपल्याला ओळख होते. म्हणून दिल्लीत असाल, तर या ठिकाणी प्रदर्शनांचा शोध घ्या आणि एकदा जाऊनच बघा. काही दिवसापूर्वी अक्षरधाम मंदिरात गेलो असताना तिथं मोठ्ठे फूड मॉल मला दिसले आणि ते फूड मॉल तिथले संन्यासी चालवत होते. त्यामुळं स्वच्छता आणि नीटनेटकेपणा तर होताच; पण तिथली जेवणं म्हणजे विविध प्रांतातल्या जेवणांचा मेळ होता. यात कुठंही कांदा, लसूण वापरलेला नव्हता. शुद्ध तुपाचा घमघमाट आणि सगळीकडं लख्ख, नीटनेटकं वातावरण. सेल्फ सर्व्हिस असली, तरी एका उत्साहानं वातावरण भरलं होतं. तिथं मला एक छान रेसिपी मिळाली. होतं मटर पनीरच; पण मटाराचे दाणे दुधात शिजवलेले होते आणि त्यात पनीर तळून टाकलेलं होतं. चवीला मीठ आणि थोडीशी काळी मिरी घातली होती. त्याबरोबर गरम पराठे म्हणजे निव्वळ एकच शब्द म्हणजे क्‍या बात है !
दिल्लीत मिळणारे काही प्रसिद्ध प्रकार पाहू या ः

दूध मटर की सब्जी
साहित्य ः हिरवे मटार 1 वाटी, पनीर 1 वाटी, दूध 3 वाट्या, भाजलेली कणीक 1 चमचा, मीठ चवीनुसार, कोथिंबीर 1 चमचा, हिरवी मिरची 3-4, साजूक तूप 1 चमचा.
कृती ः सर्वप्रथम पनीर थोड्या तेलावर परतून घ्या. नंतर दूध गरम करायला ठेवा, दूध उकळल्यावर त्यामध्ये मटार आणि परतलेलं पनीर घाला. मटार शिजल्यानंतर चवीनुसार मीठ, हिरवी मिरची घालून कणकेच्या पेस्टनं घट्ट करावं. वरून तूप आणि कोथिंबीर घालून सर्व्ह करावं.

पिंडी छोले
साहित्य ः काबुली चणे 2 वाट्या, आवळा सुपारी 2 चमचे, धणे 2 चमचे, शहाजिरे अर्धा चमचा, सौंप 1 चमचा, सुंठ 1 तुकडा, ओवा अर्धा चमचा, अनारदाणे 3 चमचे, काळी मिरी अर्धा चमचा, लवंग अर्धा चमचा, वेलची अर्धा चमचा, जायपत्री अर्धा चमचा, तूप पाव वाटी, लसूण पेस्ट 1 चमचा, कांद्याची पेस्ट अर्धी वाटी, हळद, तिखट, मीठ चवीनुसार, कोथिंबीर पाव वाटी.
कृती ः 2 वाट्या काबुली चणे, 2 चमचे आवळा सुपारी पाण्यात 3 ते 4 तास लोखंडाच्या कढईत भिजवून नंतर शिजवून घ्या. त्यामुळं ते काळपट होतील. 2 चमचे धने, अर्धा चमचा शहाजिरे, 1 चमचा सौंप, 1 सुंठेचा तुकडा, अर्धा चमचा ओवा, 3 चमचे अनारदाणे, काळी मिरी अर्धा चमचा, लवंग अर्धा चमचा, वेलची अर्धा चमचा, जायपत्री अर्धा चमचा हे सर्व वेगवेगळे भाजून एकत्र करून पावडर करा. पातेल्यात पाव वाटी तूप घेऊन त्यामध्ये 1 चमचा लसूण पेस्ट, अर्धी वाटी तळलेल्या कांद्याची पेस्ट चांगली भाजून नंतर यात कुटलेला मसाला आणि छोले घाला. चवीनुसार हळद, तिखट, मीठ घालून मंद आचेवर शिजवून कोथिंबीर घालून सर्व्ह करा.

भटुरे
साहित्य ः मैदा 3 वाट्या, रवा अर्धी वाटी, मीठ अर्धा चमचा, यीस्ट 1 चमचा, दही अर्धी वाटी, तेल 2 चमचे.
कृती ः 3 वाट्या मैद्यात अर्धी वाटी रवा, अर्धा चमचा मीठ, 1 चमचा फुलवलेलं यिस्ट, अर्धी वाटी दही, 2 चमचे तेल घालून थोडं गरम पाणी घेऊन मैदा भिजवा. थोडा वेळ मुरत ठेवून परत एकदा तेलाच्या हातानं मळून घ्या. नंतर याचे गोळे तयार करून 10-15 मिनिटं झाकून ठेवा. हातावरच पसरवून गरम तेलात किंवा तूपात तळून घ्या. छोले भटुऱ्यांसोबत तळलेली मिरची, कांदा, लोणचं किंवा चिंचेची चटणी सर्व्ह करा.

बेडमी पुरी
साहित्य ः मुगाची डाळ 1 वाटी, कणीक 1 वाटी, आलं 1 चमचा, जिरे 1 चमचा, धणे अर्धा चमचा, मेथीपूड अर्धा चमचा, मीठ चवीनुसार, ओवा अर्धा चमचा, तेल पाव वाटी.
कृती ः सर्वप्रथम मुगाची डाळ भिजत घाला. भिजवलेली मूग डाळ, आलं, जिरे, धणे, मेथीपूड आणि मीठ एकत्र मिक्‍सरमध्ये वाटून घ्या. वाटताना मात्र पाणी घालून नये. नंतर कणीक, ओवा, मीठ घालून एका परातीत घालून मुगाचा वाटलेला गोळा घाला. त्याला तेलाचा हात लावून कोमट पाण्यानं पीठ घट्ट मळा. नंतर त्याची नेहमीप्रमाणं पुरी लाटून गरम तेलात तळून घ्या.

शाही पनीर
साहित्य ः काजू 1 वाटी, मगज 1 वाटी, पनीर 200 ग्रॅम, व्हिनेगर 2 चमचे, तेल पाव वाटी, व्हाईट पेपर पावडर 1 चमचा, वेलची पावडर अर्धा चमचा, दही अर्धी वाटी, मीठ-साखर चवीनुसार, दूध 4 चमचे, फ्रो क्रीम 4 चमचे, कोथिंबीर 4 चमचे.
कृती ः सर्वप्रथम 1-1 वाटी काजू मगज घेवून उकळून त्याची पेस्ट तयार करा. 200 ग्रॅम पनीरचे त्रिकोणी तुकडे करून तळून घ्या. काजू-मगज घेऊन त्यामध्ये तीनपट पाणी, 2 चमचे व्हिनेगर, पाव वाटी तेल, 1 चमचा व्हाईट पेपर पावडर, वेलची पावडर, अर्धी वाटी दही घालून भरपूर तेल सुटेस्तोवर उकळवा. थोडं जास्त घट्ट करून यात शेवटी चवीनुसार मीठ, साखर, थोडं दूध, लोणी घाला. नंतर तळलेले पनीरचे तुकडे, फ्रो क्रीम आणि कोथिंबीर घालून सर्व्ह करा.

काबुली नान
साहित्य ः काबुली चणे 1 वाटी, कांदा अर्धी वाटी, अनारदाणे 1 चमचा, चाट मसाला अर्धा चमचा, जिरे पावडर अर्धा चमचा, मिरची 3-4, कोथिंबीर 3 चमचे, मैदा 1 किलो, यीस्ट 20 ग्रॅम, तेल 50 ग्रॅम, दही 100 ग्रॅम, मीठ 10 ग्रॅम.
कृती ः एक वाटी भिजवलेले काबुली चणे कूकरमध्ये मऊसर शिजवून घ्या. त्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा, 1 चमचा अनारदाणे, अर्धा चमचा चाट मसाला, अर्धा चमचा जिरे पावडर, चवीनुसार बारीक चिरलेली मिरची आणि कोथिंबीर घालून मिश्रण एकत्र करा. 1 किलो मैदा घेऊन त्यामध्ये 20 ग्रॅम फुललेलं यीस्ट, 50 ग्रॅम तेल, 100 ग्रॅम दही, 10 ग्रॅम मीठ आणि थोडं कोमट पाणी घालून व्यवस्थित भिजवून घ्या. 15-20 मिनिटं त्याला झाकून ठेवा. नंतर त्याचा एक गोळा घेऊन काबुली चण्याचं मिश्रण पुरणाप्रमाणं त्यात भरून पोळी लाटा. तंदूरवर किंवा ओव्हनमध्ये पोळी शेकून बटर लावून सर्व्ह करा.

फालुदा
साहित्य ः तुळशीचं बी पाव वाटी, रबडी 1 वाटी, कुल्फी 1 नग, रुहअफजा सिरप 4 चमचे,
बदाम-पिस्ते पाव वाटी, दूध अर्धी वाटी.
कृती ः सर्वप्रथम तुळशीचं बी धुवून दुधात भिजवून ठेवा. 1 ग्लासमध्ये सर्वप्रथम रबडी त्यावर तुळशीचं बी, नंतर कुल्फी, बदाम पिस्त्याचे काप आणि सर्वांत शेवटी रुहअफजा सिरप घालून लगेच सर्व्ह करा.

पनीर दम बिर्याणी
साहित्य ः 2 वाट्या बासमती तांदूळ, 3 टेबल स्पून साजूक तूप, 1 मोठा कांदा, 1 चमचा आलं-लसूण पेस्ट, 1 चमचा तिखट, अर्धा चमचा हळद, दीड चमचा धणे-जिरे पूड, 1 चमचा बिर्याणी मसाला, 1 वाटी दही, मटार-फ्लॉवर-गाजर प्रत्येकी पाव वाटी वाफवून, पनीरचे तळलेले चौकोनी तुकडे 1 वाटी, लवंगा-मिरी-जायपत्री, चक्रीफूल, दगडफूल, दालचिनी, तमालपत्र आवडीनुसार, 1 चमचा जिरे, चवीनुसार मीठ
कृती ः दह्यात तिखट, हळद, कोथिंबीर, पुदिना घालून त्यात सर्व भाज्या आणि पनीरचे तळलेले मोठे चौकोनी तुकडे घालून एकत्र करून घ्यावेत. तुपावर थोडे खडे मसाले घालून तांदूळ परतून घेऊन मोकळा भात शिजवून घ्यावा. एका जाड बुडाच्या पातेल्यात साजूक तूप घेऊन त्यावर प्रथम खडे मसाले, नंतर कांदा आणि आलं-लसूण पेस्ट घालून परतावं. यातलं निम्मं मिश्रण काढून बाजूला ठेवावं. जाड बुडाच्या पातेल्यात खाली भाजीचा थर लावून वर भाताचा थर लावा. त्यावर पुन्हा भाजीचा थर द्यावा आणि पुन्हा भाताचा थर द्यावा. झाकण ठेवून पातेलं मंद आचेवर तव्यावर ठेवून दहा मिनिटं बिर्याणी शिजवून घ्यावी. सर्व्ह करताना वरती तळलेले काजू आणि कांदा घालावा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com