खाद्य संस्कृतीचा "मध्य' (विष्णू मनोहर)

vishnu manohar
vishnu manohar

मध्य प्रदेशची खाद्यसंस्कृती अतिशय वैविध्यपूर्ण आहे. मध्य प्रदेश भारताच्या मध्य भागात असल्यामुळं देशाच्या संपूर्ण खाद्यसंस्कृतीचं दर्शन इथं होतं. इंदूर, भोपाळ, ग्वाल्हेर, उज्जैन अशा ठिकाणी अनेक उत्तमोत्तम पदार्थ मिळतात. इंदुरी सराफा तर जगप्रसिद्ध आहे. अनेक वेगळे पदार्थ मध्य प्रदेशातून आले आणि आता ते खवय्यांचे लाडके बनले आहेत.

नावाप्रमाणं भारताच्या मध्यभागी असलेला हा प्रदेश क्षेत्रफळाच्या दृष्टीनं भारतातला दुसरा सर्वांत मोठा प्रदेश म्हणून ओळखला जातो. या प्रदेशाच्या इतिहासाची सुरवात सम्राट अशोक यांच्या आगमनानं झाली. सर्वप्रथम सम्राट अशोक यांनी मध्य प्रदेशातल्या उज्जैन या शहरावर आपलं शासन प्रस्थापित केलं. पूर्वी मध्य भारतातला बहुतांश भाग गुप्त साम्राज्याचा अधीन होता. अकराव्या शतकाच्या सुरवातीला मध्य भारतात मुस्लिम शासकांचं आगमन झालं. त्यामुळं असं लक्षात येतं, की मध्य प्रदेशच्या खाद्यसंस्कृतीवर उत्तर प्रदेश किंवा दिल्लीचा पगडा आहे. मध्य भारत मुघल साम्राज्याचा एक सर्वांत मोठा हिस्सा राहिलेला आहे. मराठ्यांचा प्रभाव सुरू होण्यापासून इसवीसन 1794 पर्यंत मध्य भारतावर मराठ्यांचा बोलबाला राहिला. परंतु, पुढं ब्रिटिश शासनकर्त्यांनी इथं आपले पाय पसरवले. इंदूरमधल्या राणी लक्ष्मीबाई, गोंडच्या महाराणी कमलापती आणि राणी दुर्गावती इत्यादी महान स्त्री-शासकांनी उत्कृष्ट शासनकर्त्या म्हणून देशाच्या इतिहासात आपलं नाव सुवर्णाक्षरांनी लिहायला भाग पाडलं. देश स्वतंत्र झाल्यावर 1 नोव्हेंबर 1956 रोजी मध्य प्रदेशची एक घटकराज्य म्हणून स्थापना झाली. छत्तीसगड हा सन 2000 पूर्वी मध्य प्रदेशचाच एक भाग होता. मध्य प्रदेशच्या उत्तरेला उत्तर प्रदेश, पूर्वेला छत्तीसगड, पश्‍चिमेला राजस्थान व गुजरात आणि दक्षिणेला महाराष्ट्र आहे. मध्य प्रदेशात अनेक सण साजरे करतात. त्यात आदिवासींचा एक महत्त्वपूर्ण सण म्हणजे भगोरिया. हा सण आदिवासी लोक आपल्या पारंपरिक पद्धतींनी साजरा करतात. खजुराहो, भोजपूर, पचमढी आणि उज्जैनमध्ये शिवरात्रीला पारंपरिक कला आणि संस्कृतीचं सुंदर दर्शन होतं. ग्वाल्हेरमध्ये तानसेन संगीत समारोह, मैहरमध्ये उस्ताद अलाउद्दीन खॉं संगीत समारोह, उज्जैनमध्ये कालिदास समारोह आणि खजुराहोमध्ये नृत्य समारोह प्रसिद्ध आहेत. जबलपूरमध्ये संगमरवराच्या दगडांसाठी प्रसिद्ध असलेल्या भेडाघाट इथं आता नव्यानं नर्मदा उत्सवाला सुरवात झालेली आहे. नैसर्गिक सौदर्यांसाठी मध्य प्रदेश पूर्वीपासून प्रसिद्ध आहे. इथल्या पवित्र तीर्थस्थळांमध्ये पचमढी, माहेश्‍वर, ओंकारेश्‍वर, उज्जैन, चित्रकूट आणि अमरकंटक यांचा समावेश आहे.

आता तुम्ही म्हणाल, की खाण्याबद्दल बोलताबोलता मी ही माहिती का देतो आहे? त्याचं कारण असं, की खाद्यकोशाच्या निमित्तानं भारतातले हे सगळे भाग माझ्या पाहण्यात येतात आणि खाण्याच्या पदार्थांच्या शोधात असताना ओघाओघानं ही माहिती मला मिळते. प्रत्येक भागाला स्वत:ची अशी एक वेगळी खाद्यसंस्कृती असते. मध्य प्रदेश हा भाग भारताच्या मध्य भागात असल्यामुळं देशाच्या संपूर्ण खाद्यसंस्कृतीचं दर्शन तुम्हाला इथं होतं. इंदूर, उज्जैन ही खाण्यासाठी प्रसिद्ध ठिकाणं. इंदुरी सराफा तर जगप्रसिद्ध आहे. त्याचबरोबर इंदूरवासीयांची सकाळची न्याहारी पोहे आणि जिलेबीशिवाय होत नाही. असं म्हणतात, की दररोज पाच हजार किलो पोहे इंदुरी खवय्ये फस्त करतात. गेल्या काही वर्षांपासून इंदूरला चौकाचौकांत उपवासाची खिचडीसुद्धा हातगाडीवर मिळते. बरं, इथली उपवासाची खिचडी वेगळी असते. एका भांड्यात पाणी उकळत असतं. त्यावर छिद्रं-छिद्रं असलेलं दुसरं भांडं ठेवतात. नंतर त्यात भिजवलेला साबुदाणा घालतात आणि त्यावर झाकण ठेवतात. तुम्ही आर्डर केली, की त्यातला थोडा गरम साबुदाणा तो घेणार. त्यात दाण्याचं कूट, तयार बटाट्याचा चिवडा आणि वरून मीठ, लिंबू, साखर मिसळून झटक्‍यात प्लेट तुमच्यासमोर ठेवणार. त्यावर एक लिंबाची फोड आणि तळलेली हिरवी मिरची ठेवायला मात्र विसरणार नाही. अशी दुकानं जागोजागी दिसतात. इंदूरला अजून एक प्रकार मी खाल्ला तो म्हणजे उपवासाचा वडा-भात. भाजणीचे वडे तळून ते शिजवलेल्या भगरीमध्ये कुस्करून त्यावर जिऱ्यांची फोडणी घालतात. वर जोडीला फोडणीच ताकं किंवा दाण्याची आमटी असा हा अप्रतिम वडा-भाताचा प्रकार मी तिथं खाल्ला. असे वेगवेगळे प्रकार इंदूरलाच खावे. म्हणूनच की काय- तिथं अन्नपूर्णा देवीचं मंदिर आहे.

चविष्ट दहीवडा
इंदूरच्या सराफामध्ये एक दहीवडेवाला बसतो, त्याचं नाव जोशी दहीवडेवाला. त्याची खासियत अशी, की तो छान गाणी म्हणत दहीवडा बनवतो. आपलं नाव हळूच विचारून त्या गाण्यामध्ये गुंफतो. एका मोठ्या द्रोणात एकच चपटा दहीवडा येतो. प्रथम दहीवडा, त्यावर भरपूर मलईदार दही आणि बोटांच्या पाच चिमटी करून त्यात पाच वेगवेगळे मसाले हातानं लीलया टाकून तो द्रोण गरगर फिरवत वर फेकतो. त्यामुळं हे छान मिक्‍स होतं आणि ही सगळी करामत आपण आश्‍चर्यानं बघत असताना दहीवडा केव्हा आपल्यापुढं येतो, हे कळतसुद्धा नाही. हा दहीवडा इतका छान असतो, की केव्हा संपतो हेही कळत नाही. यामध्ये अजून एक गंमत असते ती म्हणजे अशी तुमची आणि जोशीजींची तार जुळली आणि तुम्ही दहीवडा खात असताना मध्ये ताज्या दह्याचा गंज आला, तर ते आग्रहानं बोलवून त्यातलं दही देतील. तेही मुक्‍तहस्ते. या सराफामध्ये आजकाल चायनीजच्या गाड्याही दिसू लागल्या आहेत. याचबरोबर साऊथ इंडियन रेसिपीजसुद्धा दिमतीला असतात. इथला मक्‍याच्या कणसापासून तयार केलेला चिवडा प्रसिद्ध आहे. नाव जरी चिवडा असलं, तरी हा कुरकुरीत चिवडा नसतो. मक्‍याची कणसं किसून तव्यावर मीठ, मसाला टाकून त्यात परतून शिजवून द्रोणात आपल्याला देतात. अशाच पद्धतीचा शिरासुद्धा मिळतो. गोडामध्ये गुलाबजाम, मुगाचा हलवा, रबडी घेवर, जिलेबी इत्यादी पदार्थांचा समावेश असतो. इथं शिकंजी नावाचा प्रकार असतो. तो मी चाखून पाहिला. यामध्ये दही घातलं म्हणून मला आवडला नाही. पातळ केलेल्या श्रीखंडासारखा काहीसा होता. उत्तर प्रदेशातली शिकंजी यापेक्षा थोडी वेगळी आहे. एका कोपऱ्यावर तुम्हाला गराडू लिहिलेलं दिसेल. नाव वेगळं असल्यामुळे कुतूहलापोटी आपण तिथं जातो. एका मोठ्या तव्यावर साजूक तुपात बटाट्यासारखा उकडलेला पदार्थ तळतात आणि त्यावर चाट मसाला इत्यादी टाकून देतात. गराडू म्हणजे रताळ्याचाच एक प्रकार आहे.

गजक, कचोरी, पराठे
जानेवारी महिन्यात इथं गेलात, तर गजक खायला मिळतात. गजक हे तिळापासून तयार करतात. इथल्या रामबागेत रानडे यांची प्रसिद्ध कचोरी आहे. तिला "लालबालटीची कचोरी' असंसुद्धा म्हणतात. याचं कारण खूप वर्षांआधी रानडे यांनी हे दुकान सुरू केलं, तेव्हा दुरून दुकान दिसावं म्हणून दुकानाच्या समोर लाल रंगाची प्लॅस्टिकची बादली टांगत आणि त्यामध्ये एक दिवा ठेवत. याच कारणामुळे ती "लालबालटीची कचोरी' म्हणून प्रसिद्ध झाली आणि आजही ती त्याच नावानं ओळखली जाते. याशिवाय इंदूरला एक गणपती मंदिर प्रसिद्ध आहे. त्याचं नाव खजराणा गणो मंदिर. तिथल्या प्रसादात मिळणारा बुंदीचा लाडू इतकी अप्रतिम असतो, की आमचे एक मित्र दर्शनासाठी नाही; पण लाडवासाठी जरूर मंदिरात येतात. याशिवाय विजय चाटमंदिरचे चाटचे प्रकार बरेच प्रसिद्ध आहेत. यांची छप्पनभोग आणि सराफा अशी दोन्ही ठिकाणी दुकानं आहेत. मी इंदूरला गेलो त्यावेळी तिथं जत्रा नावाचा खाद्य महोत्सव सुरू होता. या खाद्य महोत्सवात दर दिवशी लाखाच्यावर लोक येतात. एक आठवडा हा महोत्सव चालतो आणि याची खासियत अशी, की यात दीडशेच्या वर स्टॉल लागले असतात आणि सगळीकडं फक्‍त मराठी जेवण मिळतं. इथं अन्नपूर्णा केटरर्सच्या स्टॉलला मी भेट दिली. तिथं मला अप्रतिम अशी झुणका-भाकर, बरोबर अस्सल वऱ्हाडी ठेचा खायला मिळाला. याशिवाय तिथं लिहिलं होतं, की "इथं खास जळगावहून आणलेल्या वांग्याचं भरीत मिळेल.' माझ्या नशिबानं मला इंदूरला जळगावी वांग्याचं भरीत खायला मिळालं. चौकशी केल्यावर असं कळलं, की वैशंपायन यांचा तो स्टॉल होता. यांचा केटरिंगचा मोठा व्यवसाय आहे. तिथं ते दाल-बाफले आणि दालवडे यासाठी प्रसिद्ध आहेत. त्याशिवाय मेन मार्केट रोड इथले बाबूलाल पराठेवाल्याचे पराठे फार प्रसिद्ध आहेत. त्याचा तवा जवळपास 12 मिलिमीटर जाडीचा असतो. मोठे, गरमागरम वेगवेगळ्या प्रकारचे पराठे, त्याबरोबर मुक्‍तहस्ते टाकलेलं लोणी आणि सोबत दही-साखरेची वाटी इथं मिळते.

आगळेवेगळे "मख्खन बडे'
यानंतर भोपाळकडं वळूयात. ही मध्य प्रदेशची राजधानी. इथं असणारा "बडा तालाब' म्हणजे समुद्रासारखा दिसणारा तलाव. याच्या काठावर वर्षभर ऊस, पुदिना आणि लिंबाचं सरबत मिळतं. भोपाळच्या "मनोहर डेरी'चाही उल्लेख करावा लागेल. इथलं साऊथ इंडियन प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर दिल्लीनंतर कुठला छोला-भटूरा आवडला असेल तो इथलाच. याशिवाय मिठाया, डेअरी प्रॉडक्‍ट्‌स संपूर्ण भोपाळमध्ये उपलब्ध असतात. सिटी मार्केटमध्ये "हजारीलाल के मख्खन बडे' नावाचा मिठाईचा प्रकार मिळतो. हा काहीसा आपल्या बालुशाहीसारखा प्रकार आहे. मात्र, तो कसंही करून खाऊन यायलाच पाहिजे. कसंही करून यासाठी म्हटलं, की तो मिळतच नाही. केल्याबरोबर संपून जातो. एखादा तास रांगेत लागल्यानंतर या "मख्खन' वड्याचं दर्शन होतं. प्रत्येकी दोन प्लेटच्यावर हा मिळणार नाही. तसं म्हटलं, तर भोपाळची अशी वेगळी खाद्यसंस्कृती नाही. तरीपण सर्वसाधारण मोठ्या शहरामध्ये हवं असं जेवण तिथं मिळतं. "बडा तालाब'च्या किनारी असलेली रणजित हॉटेल आणि विन्सेंट हॉटेल ही भोपाळमधली प्रसिद्ध हॉटेल्स; पण तुम्हाला घरगुती प्रकारचं साधं जेवण हवं असेल, तर राजश्री हॉटेलला पर्याय नाही. शाकाहारी भोजनासाठी एम. पी. पुरा इथलं "बापू की कुटिया' प्रसिद्ध आहे. याच्या दोन शाखा आहेत.

मध्य प्रदेशात इब्राहिमपुरा इथं कबाब चांगले मिळतात. मध्य प्रदेशातलं मुलताई हे माझं आजोळ. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमेवर हे गाव आहे. मुलताई म्हणजे हिंदी आणि मूळतापी म्हणजे मराठी. अशी दोन नावं या गावाला. इथं तापी नदीचा उगम झाला. त्यामुळं गाव मंदिरांनी वेढलेलं, संध्याकाळी पाच वाजले, की घंटानाद ऐकू येतो. सगळ्या मंदिरांत मिळणारा प्रसाद खात तापीला चक्‍कर मारणं हा आमचा दिनक्रम. बरं, सगळ्या मंदिरांत प्रसादही वेगळे. कुठं गूळ-फुटाण्याचा लाडू, तर कुठं काळ्या वाटाण्याची उसळ. देशमुखांच्या राममंदिरातला हलवा-पुरीचा प्रसाद मला अजूनही आठवतो. याशिवाय गोटा लाडू नावाचा प्रकार तिथं मिळतो. सातूचं पीठ आणि गुळाची काकवी यापासून तयार केलेला कडक असा लाडू. इथून जवळच वाघोडा नावाचं गाव आहे. इथले मुठीत मावतील असे आंबे चोखून खाण्यात जी मजा आहे, ती हापूस आंब्यातसुद्धा नाही. माझ्या आजीचा मोठा वाडा होता. सकाळी न्याहारीला आम्ही भावंडं बसायचो, तेव्हा आदल्या दिवशीची शिळी पोळी, त्याबरोबर आंब्याचं लोणचं, कच्च्या शेंगदाण्याचं तेल आणि गुळाचा खडा ही न्याहारी. कुठल्याही पंचतारांकित हॉटेलच्या पक्वान्नांना लाजवेल अशी ही न्याहारी; पण आता ते दिवसही गेले आणि ती मजाही गेली. मात्र, मला आठवण आली, की मी असा प्रकार खातो. तुम्हीसुद्धा खाऊन बघा.

पराठ्यांचे वेगवेगळे प्रकार
आता आपण ग्वाल्हेरकडं वळू. मला ग्वाल्हेर मनापासून आवडतं. किल्ल्याचं शहरं असल्यामुळं वस्त्याही तशाच. या किल्ल्यांमध्ये ग्वाल्हेर किल्ला, भूलभूलैया असलेला मानसिंग पॅलेस, जयविलास पॅलेस पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. ही शिंदे घराण्याची राजधानी असल्यामुळं काही वस्त्यांमध्ये जुनं वैभव अजूनही दिमाखात उभं आहे. इथल्या लष्कर भागात सराफा बाजारात गेलात, तर पन्नास-साठ वर्षं जुनं "दहली पराठेवाला' हे दुकान आहे. वेगवेगळ्या पराठ्यांबरोबरच विनाकांद्याचे, विनालसणाचे पराठे हवे असतील, तर तेही आपल्याला मिळतात. त्यानंतर नया बाजार इथला एस. एस. कचोरीवाला, पाटणकर बाजारातलं पंडित स्वीट्‌स हे अतिशय प्रसिद्ध आहे. बहादुरा स्वीट्‌सच्या बुंदीच्या लाडवांना विसरून चालणार नाही. इथं लाडू बनवून ठेवत नाहीत, तर बनवून देतात ही यांची खासियत. सकाळी सातपासून लाडू तयार व्हायला सुरवात होते. रात्री बारा-एकपर्यंत दुकान उघडं असतं. मी तीन तास उभं राहून हा खेळ गंमतीनं पाहत होतो.

कालाजाम आणि रबडी
जबलपूर, लखनादौन इथं मिळणारा कालाजाम निव्वळ अप्रतिम. लखनादौर इथं कालाजामबरोबर रबडी खाण्याची पद्धत आहे. इथली एक आठवण सांगतो. नागपूरहून जबलपूरला जाणारी बस रात्री साडेआठ वाजता निघते आणि मध्यरात्री कधीतरी लखनादौर येतं. लखनादौर लागण्याआधी गावाबाहेर रबडी व कालाजामची दुकानं लागतात आणि ती दुकानं 24 तास सुरू असतात. तुम्हाला आश्‍चर्य वाटेल; पण इथं बसमधले ऐंशी टक्‍के लोक खाली उतरून मध्यरात्री कालाजाम आणि रबडी खात असतात आणि नुसतंच खात नाहीत, तर पार्सलही बांधून घेऊन जातात. इथली पार्सलची व्यवस्था पण वेगळी. मातीच्या मडक्‍यामध्ये रबडी आणि गुलाबजाम पार्सल करून देतात आणि हा सगळा प्रकार लाकडावर होतो, त्यामुळं त्याला एक वेगळी चव असते. मी तर म्हणीन, की भारताला रबडी जिलेबी, दही इमरती खाण्याची सवय मध्य प्रदेशानंच लावली. हिवाळ्याच्या दिवसांत मिळणारा भरपूर मलई असलेला मटार चिवडा जबलपूरमध्येच खावा. हा मटार चिवडा कसा बनवतात हे पाहूयात.

मटार चिवडा
साहित्य : हिरवे मटार 1 वाटी, जाड पोहे 1 वाटी, सोंप 1 चमचा, आलं-लसूण पेस्ट 2 चमचे, हिरवी मिरची, कोथिंबीर पेस्ट 4 चमचे, मीठ, साखर चवीनुसार, मलई अर्धी वाटी.
कृती : पोहे पाण्यानं भिजवून ठेवावेत. तेलामध्ये मोहरी फोडणीला घालून त्यात आलं-लसूण, कोथिंबीर आणि हिरवी मिरचीची पेस्ट चांगली परतून घ्यावी. त्यानंतर त्यात मटार घालून चांगले शिजवावेत. थोडं पाणी घातलं, तरी चालेल. मटार चांगले शिजून पाणी सुकल्यावर त्यात पोहे, चवीनुसार मीठ, साखर आणि मलई टाकावी. जास्तीत जास्त मलई टाकल्यानं चिवड्याची लज्जत अजूनच वाढते.

मटार चिवड्यासोबत खायची चटणी
साहित्य : घोटलेलं दही 1 वाटी, किसमिस अर्धी वाटी (किसमिस रात्रभर भिजवून ठेवावेत), आलं किसलेलं अर्धी वाटी, खोबरं अर्धी वाटी, मीठ, साखर चवीनुसार.
कृती : सर्व साहित्य चांगलं एकत्र करून त्याची चटणी बनवून घ्यावी आणि ती मटार चिवड्याबरोबर खावी.

इंदुरी पॅटिस
साहित्य : बटाटे पाऊण किलो, ब्रेड 100 ग्रॅम, वाटाणे 150 ग्रॅम, आमचूर पाव चमचा, तेल तळण्यासाठी, हिरव्या मिरच्या 3-4, आल्यांचा तुकडा 1 इंच, कांदे 100 ग्रॅम, कोथिंबीर पाव वाटी, लिंबाचा रस 1 चमचा, गरम मसाला चिमूटभर.
कृती : बटाटे उकडून घ्या. नंतर सोलून चांगल्या प्रकारे एकत्रित करा. ब्रेडचे तुकडे पाण्यात भिजत इेवा. काही वेळानं त्यातून पाणी निथळून गेल्यावर ब्रेड बटाट्यामध्ये मिक्‍स करा. त्यामध्ये मीठ, लिंबाचा रस मिक्‍स करा. वाटाणे मिक्‍सरमध्ये जाड बारीक भरडून घ्या. त्यात कापलेला कांदा टाका आणि खरपूस भाजून घ्या. नंतर बारीक चिरलेली मिरची आणि आलं टाका. भरडलेल्या वाटाण्यांत मीठ टाका आणि वाटाणे चांगल्या प्रकारे शिजवा. त्यानंतर कोथिंबीर, गरम मसाला व आमचूर टाका आणि चांगल्या प्रकारे मिक्‍स करा. बटाट्याच्या मिश्रणापासून छोटे क्‍युब तयार करा आणि वाटाण्याचं मिश्रण प्रत्येक क्‍युबमध्ये भरा. त्यानंतर क्‍युबचं तोंड बंद करून तेलात मंद आचेवर तळा.

इंदुरी चाट
साहित्य : भिजलेला साबुदाणा 1 वाटी, शिंगाड्याचं पीठ 1 वाटी, किसलेला बटाटा 1 नग, दाण्याचं कूट अर्धी वाटी, हिरवी मिरची 1 चमचा, कोथिंबीर 3 चमचे, भाजलेले जिरे 1 चमचा, मीठ, लिंबू, साखर चवीनुसार, ओलं खोबरं 2 चमचे.
कृती : शिंगाड्याचं पीठ भिजवून त्यात चवीनुसार मीठ, तिखट घालून त्याची शेव पाडून घ्यावी. नंतर किसलेला बटाटा तळून घ्यावा. एका पातेल्यात पाणी गरम करून त्यावी चाळणी किंवा कापड बांधा. त्यात साबुदाणा टाकून वर झाकण ठेवा. सर्व्ह करतेवेळी त्यातला गरम साबुदाणा, दाण्याचं कूट, मीठ, लिंबू, साखर, कोथिंबीर एकत्र करा. वरून शेव, बटाट्याचा किस आणि ओलं खोबरं पसरवून खायला द्या.

पनीर प्रदेश
साहित्य : बारीक कापलेलं पनीर 1 वाटी, दाण्याचं कूट अर्धी वाटी, हिरव्या मिरच्या 3-4, कोथिंबीर 4 चमचे, मीठ, लिंबू, साखर चवीनुसार, तेल 4 चमचे.
कृती : फ्रायपॅनमध्ये तेल गरम करून प्रथम जिरे, हिरवी मिरची, त्यानंतर पनीर टाकून परतून घ्यावं. त्यानंतर त्यात दाण्याचं कूट आणि उरलेलं साहित्य टाकून परतून थोडी वाफ आणून खायला द्यावं.

टिप : हा प्रदेश प्रकार शोधण्यामागचं कारण म्हणजे प्रदेश करायचं म्हटलं की साबुदाणा 2-3 तास अगोदर भिजवावा लागतो आणि तो कधी-कधी चिकट होतो, त्यामुळं प्रदेश चांगला लागत नाही. याचबरोबर साबुदाण्यापेक्षा पनीरमध्ये कितीतरी पौष्टिक तत्त्वं आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com