पूल

विश्‍वनाथ पाटील
मंगळवार, 31 ऑक्टोबर 2017

आपले इच्छित ध्येय आणि आपली सध्याची स्थिती यांच्यामध्ये खूपच अंतर असते. या ध्येयापर्यंत जाणारा रस्ताही खाचखळग्यांचा असतो. ध्येयाकडे जाणाऱ्या काही रस्त्यांमुळे तर अचानक संपल्यासारखीच परिस्थिती निर्माण होते. अशावेळी पुढे जाताच येणार नाही या धारणेतून प्रवासच थांबतो. इथे पूल बांधण्याची फार गरज असते. हा पूल दूरदृष्टी, अचूक नियोजन, परिश्रम आणि धाडसाच्या माध्यमातून बांधावा लागतो.

जोडणी करणे यासाठी पूल उपयुक्त ठरतो. रस्त्यात मोठा अडथळा आल्यास त्यावर मात करण्यासाठी पूल बांधला जातो. रस्त्याची एकसलगता राखण्यासाठी पूल नितांत गरजेचा असतो. मार्गात आलेली दरी, नदी ओलांडण्यासाठी पूल हा दुवा ठरतो. एकमेकांपासून खूप दूर असणारे दोन बिंदू पुलामुळे एकमेकांशी जोडले जातात. त्या दोन बिंदूंमध्ये पुलामुळे सहसंबंध निर्माण होतो. 

डोंगराची दोन टोके स्वतंत्रपणे अस्तित्वात असतात. आपल्यापासून काही अंतरावर आपल्यासारखेच एक दुसरे टोक अस्तित्वात आहे हे त्या दोन्ही टोकांनाही ठाऊकच नसते. मग कुणीतरी त्या डोंगरातून रस्ता बांधायचे ठरवते. डोंगरातला हा रस्ता सोपा होण्यासाठी डोंगराची ही एकमेकांपासून दूर असणारी टोके जोडली जातात, सांधली जातात. त्यांना सांधण्याचे काम पुलामुळे सोपे होते. या पुलामुळे आजवर एकमेकांपासून विभक्त असणारी ही टोके अगदी एक होऊन जातात. 

आपल्या आयुष्यामध्ये असे अनेक पूल गरजेचे असतात. आपले इच्छित ध्येय आणि आपली सध्याची स्थिती यांच्यामध्ये खूपच अंतर असते. या ध्येयापर्यंत जाणारा रस्ताही खाचखळग्यांचा असतो. ध्येयाकडे जाणाऱ्या काही रस्त्यांमुळे तर अचानक संपल्यासारखीच परिस्थिती निर्माण होते. अशावेळी पुढे जाताच येणार नाही या धारणेतून प्रवासच थांबतो. इथे पूल बांधण्याची फार गरज असते. हा पूल दूरदृष्टी, अचूक नियोजन, परिश्रम आणि धाडसाच्या माध्यमातून बांधावा लागतो. एकदा का तो बांधला की, मग यशाकडे जाण्यासाठी नवा सोपा मार्ग तयार होतो.

कामाच्या जागी हुद्यानुसार मोठी उतरंड असते. कुणी मोठ्या पदावर, कुणी अगदी छोट्या पदावर असे विभाजनच असते. या उतरंडीच्या दरम्यान मोठमोठ्या दऱ्या असतात. जणू या दऱ्या त्या पदांवरील माणसांना एकमेकांपासून विभक्त ठेवण्यासाठी कार्यरत असतात. पदावर काम करणारी माणसेदेखील या दऱ्या आणखी रुंद कशा होतील याचीच पुरेपूर काळजी घेत असतात. अशी एकमेकांपासून विभक्त असणारी माणसे कामाचा महामार्ग आखू शकत नाहीत. एकदिलाने काम होण्यासाठी पदांच्या दरम्यान असणाऱ्या दऱ्या ओलांडण्यासाठी पूल बांधावे लागतात.

सगळ्या प्रकारच्या नातेसंबंधात ज्याची त्याची आपापली भूमिका असते. ती असायलाच हवी. भिन्न भूमिकांमुळे वैविध्याचा लाभच होतो; पण जेव्हा भूमिकांमध्ये ताठरपणा येतो तेव्हा नात्यात असणारी माणसे आपापले बेट तयार करतात. ही बेटे एकमेकांपासून दूरच असतात. या बेटांमध्ये सुसंवाद फारसा होतच नाही. नाती फुलण्यासाठी या बेटांच्या दरम्यान पूल बांधावे लागतात. एकदा का ही पूल बांधणी झाली की, मग सगळी नाती आपलीशी वाटू लागतात. 

पुलाची बांधणी व्हायला हवी हे पटत असले तरीदेखील तो बांधायचा कुणी? या अहंभावामुळे पुलांची उभारणीच होत नाही. माझ्या बाजूने मीच का पूल बांधायचा, अशीच बहुतांशी वेळा धारणा होते. या धारणेवर मात करायला हवी. बांधलेल्या पुलाचा फायदा जसा इतरांना होणार आहे तसाच तो आपल्यालाही होणार आहे हे लक्षात घ्यायला हवे. दुसऱ्याकडून बांधणी होईल अथवा नाही याचा विचार न करता आपल्या बाजूने विटा रचायला सुरवात करायला हवी. आपण एक विट रचली तर कदाचित समोरून दोन विटा रचल्या जातील. मग बघता बघता दरी गायब होईल आणि सुसंवादाचा, सुयशाचा, सफलतेचा पूल उभा राहील.

vishvanath१६@gmail.com

Web Title: Vishwanath Patil article