अन्यायाविरोधात एल्गार!

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 5 फेब्रुवारी 2017

वाडा संस्कृतीत एकमेकांची विचारपूस, संवाद होत असे, तो फ्लॅटसंस्कृतीत हरवला आहे. सुदृढ समाजासाठी हा संवाद आवश्‍यकच आहे. घराबाहेर वावरतानाही समाजाचा घटक म्हणून आपली भूमिका व्यवस्थित निभावल्यास रस्त्यावरील छेडछाड, मारामारी अशा प्रकारांना आळा बसू शकेल. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील वातावरण चांगले आहे, कधी कधी एखादी घटना गालबोट लावून जाते. या घटना होऊ नयेत, यासाठी आपण सर्वांनीच पुढाकार घेतला पाहिजे.
- राधिका फडके, पोलिस निरीक्षक, सायबर गुन्हे शाखा

अन्यायाविरोधात एल्गार!
महिलांवरील वाढत्या अत्याचारांना पायबंद घालून उचित न्याय मिळवून देण्यासाठी 'लैंगिक छळ प्रतिबंधक' कायद्यांतर्गत महापालिका स्तरावर 'महिला तक्रार निवारण समिती' कार्यरत आहे. समितीच्या माध्यमातून पीडितेच्या तक्रारीचे निराकरण होत असल्याने, अन्याय-अत्याचाराविरोधात एल्गार करण्यासाठी महिला निर्धोकपणे पुढे येत आहेत. महिलांच्या तक्रारींचा वाढता रेटा लक्षात घेऊन एक मुख्य समिती आणि प्रत्येक प्रभागनिहाय एक समिती तसेच आरोग्य मंडळ आणि शिक्षण मंडळाची एक समिती अशा एकूण 17 समित्या महापालिकेअंतर्गत कार्यरत आहेत. एकाच ठिकाणी तक्रारींचा ओघ वाढल्यास निपटारा होण्यास अधिक वेळ दवडू शकतो, यासाठी क्षेत्रीय कार्यालयनिहाय समित्या तयार केल्या आहेत. प्रभागस्तरीय समित्यांमध्येच त्या-त्या ठिकाणच्या तक्रारींचे निवारण केले जाते. त्याचा अहवाल मुख्य समितीकडे पाठविला जातो. एखादा निर्णय अयोग्य वाटल्यास मुख्य समिती त्यामध्ये योग्य ते फेरबदल करू शकते. अशा प्रकारे या समितीचे कामकाज चालते.

समितीकडे येणाऱ्या तक्रारी प्रामुख्याने कामाच्या ठिकाणी होणाऱ्या मानसिक आणि लैंगिक छळाशी संबंधित असतात. काही तक्रारींमध्ये पुरुष सहकाऱ्याची अरेरावी, असंगत वर्तन, दबाव यांमुळे येणारा तणाव असा सूर असतो. मानसिक छळाची तक्रार दाखल करता येऊ शकते, याबाबत पूर्वी पुरेशी जागरूकता नव्हती. कायद्याच्या प्रभावामुळे महिलांमध्ये जागृती वाढली आहे. समितीचे कामकाज पूर्णपणे गोपनीय ठेवले जाते. तक्रारदार महिलेचे नाव कोणत्याही कारणास्तव उघड केले जात नाही. त्यामुळे महिलेच्या मनातील पहिली भीती जाते. संबंधित महिलेची बाजू समजून घेतली जाते. साक्षीदारांची साक्ष होते. तक्रार असलेल्या व्यक्तीचीही बाजू ऐकली जाते. रीतसर सुनावणी होते. केसचा परिपूर्ण अहवाल तयार करून तो आयुक्तांकडे पाठविला जातो. समिती शिक्षा सुचवू शकते; मात्र अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार आयुक्तांनाच असतो. आरोप सिद्ध झाल्यास योग्य ती शिक्षा होते. समितीकडे तक्रार दाखल झाल्यानंतर निर्णय होईपर्यंतची सर्व प्रक्रिया कायद्यानुसार होते. या प्रक्रियेला पुरेसा वेळ द्यावा लागतो.
आजवर समितीकडे आलेल्या 90 टक्के तक्रारींचा निपटारा होतो, असा अनुभव आहे. पीडित महिलेला योग्य न्याय मिळवून दिला जात असल्याने तक्रारी दाखल करण्यासाठी महिला बिनधोकपणे पुढे येत आहेत, हेच या कायद्याचे यश म्हणता येईल.
- उल्का कळसकर, अध्यक्ष, महिला तक्रार निवारण समिती
***

सामाजिक भान वाढवायला हवे!
महिला, मुलींवर अत्याचार, त्यांची फसवणूक अशा घटना आपल्या आजूबाजूला घडताना दिसतात. सामाजिक स्वास्थ्य बिघडविणाऱ्या या गोष्टींना वेळीच थांबवले पाहिजे. यासाठी पोलिस प्रयत्नशील आहेतच; पण समाजानेही जागरूक राहून अशा घटनांविरोधात आवाज उठवला पाहिजे. अलीकडच्या काही घटना पाहिल्यास राग, सूड, संपत्तीची लालसा किंवा अविचार अशी काही कारणे असल्याचे दिसेल. मुलांवर होणारे संस्कार या ठिकाणी अधिक महत्त्वाचे वाटतात. हल्ली मुलांनी एखादी गोष्ट मागितल्यावर ती त्याला लगेच आणून दिली जाते. मुलांच्या हट्टामुळे अनेकदा पालकही नाइलाजाने मुलांची मर्जी सांभाळतात. यातून मुलांची नकार पचवायची क्षमताच विकसित होत नाही. खरे तर, चांगल्या-वाईट गोष्टींची कल्पना पालकांनी योग्य वयात मुलांना द्यायला हवी. टीव्ही, तसेच आधुनिक तंत्रज्ञानामुळे नव्या पिढीपर्यंत अनेक गोष्टी पोचत असतात. आपली मुले काय करतात, कोठे जातात याबद्दल पालकांनी मोकळेपणाने मुलांशी संवाद साधायला हवा. घरातील प्रत्येकाचे स्वातंत्र्य जपताना आपुलकीने संवादही घडायला हवा. स्त्री-पुरुष समानता मान्य केली, तरी महिलांनी सामाजिक भान ठेवले पाहिजे.

स्वातंत्र्य असले तरी त्याचे स्वैराचारात रूपांतर होऊ देऊ नये. आपण कोणत्या ठिकाणी, कोणत्या प्रसंगासाठी आलो आहोत, त्याप्रमाणे आपली वेशभूषा, वर्तन असायला हवे. समोरच्या व्यक्तीशी तुम्ही कसे वागता, किती मोकळेपणाने बोलता यावरून ती व्यक्ती तुमच्याबद्दलचे मत बनवत असते. त्यामुळे आपल्या वागण्या-बोलण्याकडेही मुलींनी लक्ष दिले पाहिजे. त्याचवेळी कोणी तुम्हाला गृहीत धरणार नाही, याचीही काळजी घेतली पाहिजे. प्रत्यक्ष जगण्यातील ही गोष्ट सोशल मीडियावर वावरतानाही लागू होते. अनाहूत व्यक्तीशी फार न बोलणे, ओळख नसताना 'फ्रेंड रिक्वेस्ट' स्वीकारणे किंवा संबंध वाढवणे टाळावे. कोणी त्रास देत असल्यास घरच्यांना सांगावे किंवा पोलिसांत तक्रार करावी.
महिलांच्या सुरक्षेसाठी वेगवेगळी ऍप्स व छोटी उपकरणेही आता उपलब्ध झाली आहेत. पोलिसांच्या '100' क्रमांकावर संपर्क साधून, किंवा प्रतिसाद या ऍपवरून संपर्क साधल्यास पोलिसांकडून तुम्हाला त्वरित मदत मिळू शकेल. सुरक्षित वातावरण निर्माण करण्यासाठी पोलिसिंग चांगल्या प्रकारे झाले पाहिजे. वाडा संस्कृतीत एकमेकांची विचारपूस, संवाद होत असे, तो फ्लॅटसंस्कृतीत हरवला आहे. सुदृढ समाजासाठी हा संवाद आवश्‍यकच आहे. घराबाहेर वावरतानाही समाजाचा घटक म्हणून आपली भूमिका व्यवस्थित निभावल्यास रस्त्यावरील छेडछाड, मारामारी अशा प्रकारांना आळा बसू शकेल. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील वातावरण चांगले आहे, कधी कधी एखादी घटना गालबोट लावून जाते. या घटना होऊ नयेत, यासाठी आपण सर्वांनीच पुढाकार घेतला पाहिजे.
- राधिका फडके, पोलिस निरीक्षक, सायबर गुन्हे शाखा
***

बोलते राहण्याची गरज...
कामाच्या ठिकाणी किंवा इतर सार्वजनिक ठिकाणी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे होणारी छेडछाड, हा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. बहुतेक वेळा बदनामी होईल, आपल्याकडेच बोट दाखविले जाईल, या भीतीपोटी अनेक युवती मूग गिळून गप्प बसतात. आता 'गप्प बसण्यापेक्षा बोलते होण्याची गरज आहे,' असा निर्धार युवती व्यक्त करत आहेत.

तक्रारीचे धाडस करा
कामाच्या ठिकाणी छेडछाड होत असल्याचे निदर्शनास आल्यास स्वतः खंबीर होऊन संबंधित व्यक्तीला धडा शिकवला पाहिजे. तरीही 'त्या' व्यक्तीने त्रास दिल्यास तत्काळ वरिष्ठांकडे तक्रार केली पाहिजे. घरातील वडीलधाऱ्यांनाही विश्‍वासात घेऊन सत्य घटना सांगितली गेली पाहिजे. घरचा खंबीर पाठिंबा आपल्यासोबत असल्यास लढण्याचा विश्‍वास मिळतो. वेळप्रसंगी पोलिसांकडे तक्रार करायचेही धाडस केले पाहिजे.
- चारुलता ढोरे

प्रतिकार करायला शिका
छेडछाडीमुळे अनेक महिला घाबरून जातात. यामुळे समस्या अधिक गंभीर होत जाते. मुळात पीडित महिलेने खंबीरपणे स्वसंरक्षणासाठी पुढाकार घेतला पाहिजे. समोरच्या व्यक्तीला प्रतिकार केला पाहिजे. त्यामुळे निम्म्याहून अधिक प्रश्‍न सुटतात. माझ्याबाबत असा प्रसंग घडल्यास मी स्वत:च 'त्या' व्यक्तीला समज देईन. माझ्या पातळीवर हे प्रकरण सोडविण्याचा प्रयत्न असेल. तरीही त्रास सुरू राहिल्यास ही बाब कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कानावर घालेन. गरज पडल्यास पोलिसांकडे रीतसर तक्रार दाखल करेन.
- रीना गुरव

प्रकरण वेळेत हाताळा
माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात काम करताना संवाद कौशल्य महत्त्वाचे असते. त्यामुळे काहीवेळा आपल्या बोलण्याचा किंवा वागण्याचा काहीजण चुकीचा अर्थ घेऊ शकतात. असे झाल्यास परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रकरण गंभीर वळण होण्यापूर्वी योग्यरीत्या हाताळणे योग्य ठरते. अशा प्रसंगांमुळे मानसिक तणाव जाणवत असल्यास कार्यालयातील वरिष्ठ, जवळचे मित्र-मैत्रिणी, घरातील व्यक्तींना वेळीच सांगणे गरजेचे आहे.
- वर्षा शेंडे

Web Title: voice against sexual harrasment of women at work