esakal | दिवाळी पुराणग्रंथांतली! (वा. ल. मंजूळ)
sakal

बोलून बातमी शोधा

w l manjul

दिवाळी पुराणग्रंथांतली! (वा. ल. मंजूळ)

sakal_logo
By
वा. ल. मंजूळ

दीपोत्सव अर्थात दिवाळीचा उल्लेख अनेक पुराणग्रंथांमधून आलेला आहे. त्या काळी दिवाळी कशी साजरी केली जात असे, याच्याही काही पद्धती या ग्रंथांमधून आढळतात. आजपासून (4 नोव्हेंबर) दिवाळी सुरू होत आहे. त्यानिमित्त विविध पुराणग्रंथांमधला या सणाविषयीचा हा धावता परिचय...

दिवाळी हा सण "दीपा'शी अर्थातच दिव्याशी संबंधित आहे. दिवे उजळणं, दिव्याची आरास करणं, शोभेचं दारूकाम करून प्रकाशाची उधळण करणं, सुगंधी द्रव्यानं स्नान, नवीन वस्त्रांचा वापर, पक्वान्नभोजन, आप्तेष्टांना भेटी देणं असं त्याचं स्थूल स्वरूप आहे. हा सण तसा कोणत्याही एका देवाप्रीत्यर्थ नसतो. सध्या तर हा सण सहा दिवस साजरा केला जातो...त्याचं स्वरूप साधारणतः असं असतं.1) वसूबारस (गाईची पूजा), 2) धनत्रयोदशी, धनतेरस (धनाची; द्रव्याची पूजा), 3) नरकचतुर्दशी (कृष्णानं नरकासुराचा वध करून गुलाम स्त्रियांची केलेली मुक्तता आणि नंतर त्यांच्याशी केलेला विवाह), 4) लक्ष्मीपूजन, अश्विन अमावास्या (लक्ष्मीची पूजा), 5) कार्तिक शुद्ध प्रतिपदा (पाडवा, विष्णूनं बळिराजावर मिळवलेला विजयोत्सव), 6) कार्तिक शुद्ध द्वितीया (यमद्वितीया/भाऊबीज, बहीण-भावाच्या प्रेमाचा दिवस)
दिवाळीला "भविष्योत्तर पुराणा'त "दीपालिका', "राजमार्तंड' ग्रंथात "सुखरात्री', "कामसूत्रा'त "यक्षरात्री', हेमाद्रीच्या "व्रतखंडा'त "सुखसुप्तिका' "निर्णयसिंधू' आणि "कालतत्त्वविवेचन' या ग्रंथात "कौमुदिउत्सव' असं म्हटलेलं आहे.
***

गुजरात-सौराष्ट्रात धनत्रयोदशीला धनतेरस म्हणतात. "या दिवशी अपमृत्यूचा विनाश आणि यमदेवतेच्या गौरवाकरता दिवे लावावेत' असं (पद्मपुराण ः 6.124.4-5) धर्मशास्त्र सांगतं. मात्र, "नरकचतुर्दशीपासून दिवाळी साजरी करावी, असं "भविष्योत्तर पुराणा'त (अ. 140) सांगितलं आहे.
"सर्वसामान्य माणसाला मृत्यूनंतर स्वर्ग किंवा नरक या दोनच गती आहेत', असं धर्मशास्त्र सांगतं म्हणून नरकाचं भय वाटणाऱ्यांनी सूर्योदयापूर्वी तैलयुक्त अभ्यंग स्नान करावं. अपामार्ग वृक्षाची पानं, नांगरलेल्या शेतातली मातीची ढेकळं आणि पानाचे काटे आपल्या मस्तकाच्या वरून फेकावेत. यमदेवतेला तीळमिश्रित पाण्यानं तर्पण करावं. नरकाचं निवारण व्हावं म्हणून सकाळी घराबाहेर एकतरी दिवा लावावा. संध्याकाळी विविध देवळांत, मठांत, शस्त्रगृहांत, वृक्षांच्या पारावर, सभागृहात आणि लोक एकत्र येण्याच्या ठिकाणी दिव्यांची सुंदर आरास करावी. एक कल्पना अशी आहे, की दीपावलीच्या चतुर्दशीच्या दिवशी लक्ष्मी ही तेलात आणि गंगा ही उदकात वास्तव्य करते आणि दोहोंच्या स्पर्शानं - दर्शनानं त्या व्यक्तीला यमलोकाचं दर्शन होत नाही. सध्या काही ठिकाणी महाराष्ट्रात आंघोळीनंतर पायाखाली कारीत (चिरोटा) नावाचं फळ चिरडतात. हे फळ बहुधा नरकासुराचं प्रतीक मानलेलं असावं. "तैलाभ्यंग स्नान सूर्योदयाच्या सुमारास करावं, अगदी संन्याशानंसुद्धा अभ्यंगस्नान करावं,' असं "धर्मसिंधू' या ग्रंथात नमूद आहे. नरकाच्या भीतीनं यमराजाला संतुष्ट करण्यासाठी या दिवसाला आरंभीच्या काळात नरकचर्तुदशी हे नाव पडलं असावं. पुढं श्रीकृष्णानं नरकासुराचा वध या दिवशी केला. नरकासुर हा कामरूप या देशातल्या प्राग्ज्योतिषपूरचा राजा. याचा जन्म विचित्र मानला गेला आहे. वराहावतारात विष्णूचा पृथ्वीशी संयोग होऊन हा राजा जन्माला आला. यानं देव, राजे आदींच्या सोळा हजार कन्यका विवाहासाठी राजवाड्यात कोंडून ठेवल्या होत्या. कृष्णानं नरकासुराला मारून त्या कन्यकांशी विवाह करून त्यांना सामाजिक प्रतिष्ठा मिळून दिली. (विष्णुपुराण अध्याय 5, भागवतस्कंध 10) तो हा स्त्रीमुक्तीच्या युवतीप्रतिष्ठेचा दिवस नरकचतुर्दशी!

"वर्षक्रियाकौमुदि' आणि "धर्मसिंधू' या ग्रंथात असं सांगितलं आहे, की आश्विन वद्य 14 आणि अमावास्या या दोन्ही दिवशी हातात मशाल घेऊन सायंकाळी रस्त्यावर हिंडावं; जेणेकरून पितृपंधरवडाकाळी श्राद्धपक्षासाठी आलेल्या पितरांना त्यांचा परतीचा मार्ग सापडून ते त्यांच्या जागी पोचावेत. "कृत्यतत्त्व' या मध्ययुगीन काळातल्या ग्रंथांत नरकचर्तुदशीला तैलाभ्यंगस्नान, यमतर्पण, नरकासाठी एक दीप लावणं, (सकाळी), रात्री दीपोत्सव, शिवाची पूजा, नक्तभोजन (म्हणजे फक्त रात्री जेवण करणं) करावं असं म्हटलेलं आहे. या चर्तुदशीला "भूतचर्तुदशी' असंही म्हणतात. पहिल्या चारी दिवशी अभ्यंगस्नान मात्र आवश्‍यक असल्याचं या ग्रंथात म्हटलेलं आहे.
***

आश्विन वद्य अमावास्या हा दिवाळीतला महत्त्वाचा दिवस. पुराणानुसार, या दिवशी सूर्योदयापूर्वी अभ्यंगस्नान, (अलक्ष्मी, अवदसा दूर होण्यासाठी) सकाळीच लक्ष्मीपूजन करावं. स्त्रियांनी पुरुषांना ओवाळावं. या दिवशी खूप गोष्टी कराव्यात, असं "भविष्यपुराणा'त वर्णिलं आहे. उदाहरणार्थ ः 1) राजानं तो दिवस बळिराजाचा म्हणून साजरा करावा, 2) लोकांनी घरी नृत्य-गायनादी कार्यक्रम करावेत, 3) मध्यरात्री पुरुषमंडळींना झोप येऊ लागल्यास नगरवासी महिलांनी सुपे आणि ढोल वाजवून आपल्या अंगणात आलेल्या अलक्ष्मीला हाकलून द्यावं, 4) त्याच दिवशी सायंकाळी संसारी गृहस्थानं कुटुंबात लक्ष्मीपूजन करावं, 5) चौक, मंदिर, स्मशान इत्यादी शुभ-अशुभ जागी दिव्यांची आरास करावी; जेणेकरून अलक्ष्मी निघून जाईल, 6) भुकेलेल्याला अन्नदान करावं.

बंगालमध्ये कालिमातेची पूजा या दिवशी करतात. ही देवता लक्ष्मीचं आणि सरस्वतीचंही रूप आहे असं मानतात. सध्याच्या काळात या दिवशी व्यापारीवर्ग, दुकानदारवर्ग जमाखर्चाच्या चोपड्यांची पूजा करतो. या दिवशी जुनी खाती बंद करून नवीन खाती उघडण्यात येतात. ज्या रात्री लक्ष्मीची पूजा होते त्या रात्रीला "सुखरात्री' असं म्हणतात. कारण, सूर्य तूळ राशीत असतो आणि त्यामुळेच लक्ष्मी जागृत असते. काही ग्रंथांनुसार, सुखरात्रीला केवळ लक्ष्मीचीच नव्हे तर कुबेराचीही पूजा करावी. (भविष्यपुराण, वर्षक्रियाकौमुदि, पृष्ठ 469)
***

कार्तिक शुद्ध प्रतिपदा हा दिवस "दिवाळी पाडवा' म्हणून ओळखला जातो. या सणातला हा महत्त्वाचा दिवस. शुभदिन. दिवाळीत ज्या दिवशी स्वाती नक्षत्र असतं, तो शुभ आणि प्रशस्त दिवस असतो, असं "धर्मसिंधू' मध्ये म्हटलेलं आहे. तैलाभ्यंग स्नान या दिवशी महत्त्वाचं असतं. या दिवसाला बलिप्रतिपदाही असंही म्हणतात. या दिवशी बलीची पूजा करावी, त्याला उद्देशून यथाशक्ती दाने द्यावीत, त्यामुळे अक्षय्य पुण्य मिळतं आणि विष्णूचा संतोष होतो, असं "भविष्योत्तर पुराणा'त म्हटलेलं आहे. बलीच्या पूजेचा काल रात्रीचा असतो. बलिराजाची कथा वामनपुराण (अः77), मत्स्यपुराण (अः245), कर्मपुराण (अः1-17) या ग्रंथांत समग्र आलेली आहे. या कथेवर पाणिनीच्या काळात संस्कृत नाटक लोकप्रिय होतं, म्हणजे या कथा-नाटकाचा काल दोन हजार वर्षांपूर्वीचा आहे, असं म्हणता येईल.

बलिप्रतिपदेला (दिवाळी पाडवा) वारप्रतिपदा (वामनपुराण), द्यूतप्रतिपदा (कृत्यतत्त्व) असंही
म्हटलं जातं. या दिवशी शिव-पावती द्यूत खेळले होते, त्यात शंकराचा पराभव झाला होता म्हणून या दिवशी सकाळी पुरुषांनी पण लावून खेळ खेळावा, त्यात ज्याचा विजय होईल त्याला पूर्ण वर्ष भाग्याचं जाईल, असं पुराणात म्हटलं आहे. भारतातल्या अनेक प्रांतांत या दिवशी जुगार खेळतात. नेपाळसारख्या छोट्या देशात पणाला लावलेली रक्कम सन 1955 मध्ये रुपये 30 लाख इतकी होती, अशी नोंद आहे. बलीच्या राज्याच्या दिवशी दिव्याची आरास लक्ष्मीला स्थिर करते. या दिवशी बलीच्या पूजेसह गाई-बैलांची पूजा, गोवर्धन पर्वताची पूजा, पालिबंधन पूजा (रस्त्याचं रक्षण करणाऱ्या लोकदेवता) केली जाते. जे लोक मथुरेच्या जवळ राहतात ते गाईच्या शेणाचा किंवा शिजवलेल्या अन्नाचा गोवर्धन तयार करून या दिवशी कृष्णपूजा करतात. अन्नाच्या पर्वताला चित्रकूट असंही म्हणतात. शिवाय, घरोघरी शेणाच्या गवळणी-कृष्ण करायची त्या भागातल्या खेड्यांमध्ये पद्धत आहे. याचं सविस्तर वर्णन "वराहपुराणा'त (अः164) आलेलं आहे. मार्गपाली पूजाविधीत कुश अथवा काश गवताची दोरी करून त्या दोरीची पूजा करून "रस्सीखेच' हा खेळ पूर्वी खेळत असत (निर्णयसिंधू). नरकचतुर्दशी ते पाडवा या सोहळ्याला "कौमुदीमहोत्सव' म्हणतात. "भविष्योत्तर पुराणा'त याचा अर्थ दिलेला आहे. "कु' म्हणजे पृथ्वी, "मुदी' म्हणजे आनंदित होणं. या दिवशी बलीला पाण्यातली कमळं अपर्ण करतात, म्हणूनही कौमुदी म्हणतात. वेदकाळात आश्‍विन महिन्यात "अश्वयुजी,' "आग्रायण,' "नवसस्येष्टी' अशा प्रकारचे यज्ञ करत असत.
***

भ्रातृद्वितीया/यमद्वितीया/भाऊबीज ः कार्तिक शुद्ध द्वितीयेला हा सण येतो. "भविष्योत्तर पुराणा'त यमाची भगिनी यमीनं स्वतःच्या घरी त्याला भोजन दिलं म्हणून भावा-बहिणीच्या प्रेमाचा हा दिवस मानतात, असं म्हणतात. या दिवशी भावानं दुपारचं जेवण बहिणीच्या घरी करावं, असं पुराणात म्हटलेलं आहे. असं केल्यानं आरोग्य-ऐश्‍वर्य वाढतं. या दिवशी बहिणीलाही वस्त्रालंकार यथाशक्ती द्यावेत, असंही पुराण सांगतं. ज्याला सख्खी बहीण नसेल त्यानं नात्यातल्या इतर वा मानलेल्या बहिणीला असं प्रेम द्यावं. "व्रतराज' या ग्रंथात याचं सविस्तर वर्णन आहे. यमुनेच्या तीरावरच्या गावांत बहीण-भावाची जत्रा भरून हा सण साजरा केला जातो. त्यात बहिणीनं ओवाळणं आणि भावानं काहीतरी देणं एवढाच विधी असतो. वास्तविक, भाऊबीज हा सण स्वतंत्र आहे; पण दिवाळीच्या सणाला तो जोडल्यास, सासरी असलेली बहीण माहेरी परतून या सणाच्या आनंदात भर घालेल म्हणून हा सण दिवाळीला जोडला गेला आहे.

ऋग्वेदासारख्या (10-10) प्राचीन ग्रंथात भगिनी-भ्राता यांच्या प्रेमसंबंधाला निरागस रूप देऊन या नात्याचा गौरव करण्यात आला आहे. त्याला महत्त्व देण्यासाठी यम-यमी ही भावा-बहिणीची कथा जोडली गेली आहे. जे विवाहित पुरुष आपल्या बहिणीला वस्त्रालंकार देऊन गौरवतात, त्यांची वर्षभर गृहकलहापासून आणि शत्रुपीडेपासून मुक्तता होते, अशी पुराणकालीन फलश्रुती आहे. बहिणीच्या हातचं भोजन खाल्ल्यानं भावाला आरोग्यसंपत्ती प्राप्त होते, अशीसुद्धा फलश्रुती आहे.

दीपावलीच्या सहा दिवसांच्या मोठ्या सणांमागची परंपरा-इतिहास-रूढी यांचा अभ्यास नावीन्यपूर्ण आहे. अर्थात आजच्या काळात या सगळ्या गोष्टी मागं पडल्या आहेत. सलग मोठी सुटी, दिवाळीचा बोनस, आणि सहलीला जाण्याची संधी यामुळे अनेक मंडळी आजच्या काळात वेगळ्या पद्धतीची दिवाळी साजरी करतात.

loading image
go to top