#FridayFeeling : 'सुरमय'मध्ये घ्या 'सी फूड'ची मजा!

Sea Food
Sea Food

वीकएण्ड हॉटेल - 
सी फूडची आवड असणारे अनेक जण ताजे आणि चमचमीत मासे खाण्यासाठी गोवा किंवा कोकण गाठतात. मात्र प्रत्येक वेळी ते शक्य होतेच असे नाही. अनेकदा आपल्याला सी फूडसाठी स्थानिक पर्याय शोधावे लागतात. पुण्यात सी फूडसाठी अनेक हॉटेल प्रसिद्धीस येत आहेत. त्यातच एका नव्या नावाची भर पडत आहे, ती म्हणजे ‘सुरमय’! या हॉटेलची सुरवात मे २०१७मध्ये डेक्कनला अगदी छोट्याशा जागेत झाली. त्यानंतर ग्राहकांचा वाढता प्रतिसाद पाहून कर्वे रोड येथे ‘सुरमय’ची शाखा सुरू करण्यात आली.

या हॉटेलच्या नावातही गंमत आहे. सी फूडमध्ये प्रसिद्ध असलेल्या सुरमई या माशाला बोली भाषेत ‘सुरमय’ असे संबोधले जाते. या हॉटेलमध्ये गेल्यानंतर जुनी मराठी गाणी कानावर पडतात, त्यामुळे ‘सूर-मय’ असा अजून एक अर्थ यातून निघतो. या हॉटेलच्या नावाप्रमाणे इथली ‘सुरमई थाळी’ प्रसिद्ध आहे. यामध्ये सुकटीची चटणी, तांदळाची भाकरी किंवा चपाती (आवडीप्रमाणे), भात, सोलकढी, माशाची करी व सुरमईचा फ्राय केलेला मोठा तुकडा येतो.

अशाच प्रकारे पापलेट, बांगडा, कोळंबी फ्राय, हलवा, रावस, खेकडे अशा विविध थाळी इथे मिळतात. या थाळीमध्ये फक्त फ्राय केलेला मासा बदललेला असतो, बाकी थाळी तशीच असते. ग्राहकांच्या आवडीप्रमाणे फक्त फ्रायही इथे दिले जाते. या डिशचे वैशिष्ट्य म्हणजे, यांचे सर्व मसाले हे तळ कोकणातून कच्चा माल आणून स्वतःच बनवलेले असतात. त्यामुळे मासे खाताना त्याचा एक घरगुती फ्लेवर असतो. मासे डीप फ्राय न करता तांदळाचा रवा लावून शॅलो फ्राय केलेले असतात. त्यामुळे यातील कुरकुरीतपणा छान लागतो. महत्त्वाचे म्हणजे, फ्राय करताना कॉर्नफ्लोअरचा वापर अजिबात केला जात नाही. मासे करण्यासाठी गावठी कोकनट व्हिनेगार, गोवन रिशादो (तांबडा मसाला), कॅफ्रिएल (हिरवा मसाला), विंदालु हे सर्व तिथेच तयार करून वापरले जातात. इथे अजून एक प्रकार प्रसिद्ध आहे, तो म्हणजे कोळंबी सागोती करी! यामध्ये कोळंबी करी आणि सोबत कोकणात प्रसिद्ध असलेले कोंबडी (मालवणी) वडे. सी फूड खायचे म्हणजे सोबत तांदळाची भाकरी किंवा कोंबडी वडेच छान लागतात. याचप्रकारे चिकन सागोतीही मिळते. कर्वे रोड येथील हॉटेलला चांगला प्रतिसाद मिळाल्याने याची नवीन शाखा सिंहगड रोड येथे लवकरच खव्वयांच्या भेटीस येणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com