धार्मिक आणि निसर्ग पर्यटनासाठी इगतपुरी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 जून 2019

कसे जाल
पुण्याहून सुमारे २४६ किलोमीटर. मुंबईहून - १२१ किलोमीटर आणि नाशिकहून - सुमारे २८ किलोमीटर. इगतपुरीमध्ये निवासासाठी अनेक हॉटेल आणि रिसॉर्ट आहेत. निवास आणि भोजनाची उत्तम सोय होऊ शकते.

वीकएंड पर्यटन - अरविंद तेलकर
प्राचीन काळापासूनच नाशिक जिल्ह्याला धार्मिक आणि आध्यात्मिक अधिष्ठान लाभलंय. धर्म, निसर्ग, जैविक आणि कृषी वैविध्यानं नटलेला हा जिल्हा समृद्धतेचं एक प्रतीक मानला गेला आहे. खुद्द नाशिक शहर आणि परिसरातील काळा राम, गोरा राम, सीतागुंफा, तपोवन, पांडव लेणी आणि बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेलं त्र्यंबकेश्‍वर ही धार्मिक ठिकाणं पर्यटकांना आकर्षित करतात. याच जिल्ह्याच्या दक्षिणेस आहे इगतपुरी नावाचं निसर्गरम्य ठिकाण. जवळच असणारं भंडारदरा धरण, धुक्‍याच्या दुलईत गुरफटणारा कसारा घाट, कावनई, त्रिंगलवाडी, टाकेद यांसारखी ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व असलेले किल्लेही पर्यटकांना आकर्षित करतात. पावसाळ्यात या परिसराचं देखणंपण अधिक खुलून येतं.

इगतपुरी आणि पुणे जिल्ह्यातील खंडाळा ही दोन्ही थंड हवेची ठिकाणं म्हणून ओळखली जातात. या दोहोंची उंचीही सारखीच, म्हणजे समुद्रसपाटीपासून सुमारे १९०० फूट. या परिसरातील अनेक धबधबे पावसाळ्यात इथं पर्यटकांची झुंबड उडवतात. या शहराजवळच असलेला धनुष्यतीर्थ धबधबा हा पर्यटकांचं विशेष आकर्षण आहे. त्याशिवाय इथल्या विपश्‍यना केंद्रातही देश-विदेशातून भाविक येत असतात. इगतपुरी शहराच्या सीमेवरच हे बौद्ध धर्माचं धम्मगिरी हे विपश्‍यना केंद्र आहे. म्यानमारच्या बौद्ध धर्मीयांनी बांधलेलं पारंपरिक बौद्ध शैलीतलं प्रवेशद्वार लक्ष वेधून घेणारं आहे.

इगतपुरीत राहून जवळपासची प्रेक्षणीय स्थळंही पाहता येऊ शकतात. या स्थळांमध्ये समावेश होतो वैतरणा धरण - २६ किलोमीटर, भंडारदरा - ५० किलोमीटर, खोडाळा - ३० किलोमीटर, देवबांधचं सुंदरनारायण गणेश मंदिर - ३५ किलोमीटर. त्याशिवाय ट्रेकर्ससाठीही या परिसरात असंख्य ठिकाणं आहेत. त्यापैकी महाराष्ट्रातलं सर्वांत उंच शिखर असलेलं कळसूबाई, अलंग-कुलंग गड, मदनगड, रतनगड, रिव्हर व्हॅली, उंट दरी, पाच धबधबे ही सुंदर ठिकाणं आहेत. कसारा घाटातील धुकं अनुभवणं हा एक आगळा अनुभव ठरू शकतो. इगतपुरी तालुक्‍यातील कुशेगावजवळचा नवरा-नवरीचा डोंगरही प्रसिद्ध स्थळांपैकी एक आहे. डोंगराच्या कुशीत वसलेलं, म्हणून कुशेगाव.

वाडीव्हरे फाट्यावरून वळाल्यानंतर पश्‍चिमेकडं सुमारे २० किलोमीटरवर कुशेगाव लागतं. ट्रेकिंग न करणाऱ्यांनाही दुरूनच डोंगर साजरा करता येईल. ऊन, वारा आणि पावसाच्या सततच्या माऱ्यानं, डोंगरावरील नवरा-नवरीचे सुळके विलोभनीय दिसतात.

कावनई हे ठिकाण पर्यटकांना निश्‍चितच लुभावणारं आहे. या ठिकाणी निसर्ग, गिर्यारोहण आणि धार्मिक पर्यटनाचा एकाचवेळी आनंद घेता येईल. हे ठिकाण सिंहस्थ कुंभमेळ्याचं मूळ स्थान श्री कपिलतीर्थ म्हणून ओळखलं जातं. इथं महादेवाचं एक सुंदर मंदिर आहे. सर्वांत पहिला कुंभमेळा याच स्थानावर झाल्याची आख्यायिका सांगितली जाते. या तीर्थावर पाण्याचे दोन दगडी कुंड आहेत. दोन्ही कुंडांना गोमुखं आहेत आणि त्यातून अखंडितपणे पाण्याची धार पडत असते. ही धार आतापर्यंत कधीच बंद पडलेली नाही. या तीर्थावर स्नान केल्यानं गंगासागर तीर्थाचं पुण्य प्राप्त होतं, अशी भाविकांची धारणा आहे. पावसाळ्याच्या सुरवातीच्या दिवसांत इगतपुरी परिसरात काजव्यांची लुकलुकणारी दुनिया अवतरते. निसर्गाचा महोत्सव अवघे काही दिवस चालतो.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Weekend Tourism Arvind Telkar maitrin supplement sakal pune today