#FridayFeeling : धुक्यात हरवलेली अंबोली!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 19 जुलै 2019

सर्वच क्षेत्रांत आत्मविश्वासाने मुक्त संचार करणाऱ्या महिलांच्या यशोगाथा, सेलिब्रेटी टिप्स, महिलांचे आरोग्य, ट्रेंड्स, पाककृती, सुरक्षिततेच्या दृष्टीने 'सेफ्टी झोन' वाचा 'सकाळ पुणे टुडे'च्या 'मैत्रीण' या पुरवणीत...

वीकएंड पर्यटन - अरविंद तेलकर
पावसाळा सुरू झाला, की भटक्यांचे पाय आपोआप निसर्गाशी एकरूप होण्यासाठी ताल धरू लागतात. कुटुंबवत्सल मंडळी आपापल्या कुटुंबासह वर्षासहलीचे बेत आखू लागतात. सर्व थरांतील भटक्यांसाठी एक धुंद करणारं ठिकाण आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात. अंबोली हे त्या ठिकाणाचं नाव. प्रचंड पावसाच्या या महाराष्ट्राच्या दक्षिणेकडील थंड हवेच्या गावात वर्षाला सुमारे ७५० सेंटिमीटर पाऊस पडतो. पावसाबरोबरच येणाऱ्या धुक्याचा अलगद, नाजूक स्पर्श मनाला मोहवून टाकतो. जोडीला दाट जंगल आणि जैववैविध्याने नटलेल्या डोंगरदऱ्यांचाही अनुभव चित्तथरारक असतो.

अंबोलीतलं सर्वांत मोठं आकर्षण आहे ते पारपोली गावाजवळचा सर्वांत मोठा धबधबा, हिरण्यकेशी नदीचा उगम असलेलं गुहा मंदिर आणि जवळच असलेला कावळेसाद पॉइंट.

amboli

अंबोली गाव हे बेळगाव-सावंतवाडी किंवा कोल्हापूर-गारगोटी-सावंतवाडी रस्त्यावर आहे. समुद्रसपाटीपासून सुमारे ६९० मीटर उंच असलेल्या या ठिकाणचं वास्तव्य, वर्षाच्या कोणत्याही ऋतूमध्ये आल्हाददायक वाटतं. सावंतवाडीच्या खेम-सावंत या राजघराण्याची ही उन्हाळी राजधानी होती. इथं त्यांचा एक छानसा राजवाडाही आहे. अंबोली गावात आजही संस्थानकालीन काही वाडे आणि घरं अस्तित्वात आहेत. स्वातंत्र्य चळवळीच्या काळात कोकणातल्या शिरोड्यामध्ये मिठाच्या सत्याग्रहासाठी जाताना महात्मा गांधी यांनी काही काळ अंबोलीत वास्तव्य केलं होतं. सध्याच्या अंबोली घाटातूनच ते शिरोड्याकडं मार्गस्थ झाले होते. अंबोली घाटातील रस्त्यांची बांधणी ब्रिटिश राजवटीत झाली आहे.

अंबोली परिसरात महादेवगड नावाचा एक डोंगरी किल्ला आहे. शिवकालीन बांधकामाचे काही अवशेष या गडावर पाहता येतात. अंबोली परिसरातील चौकुळचं जंगल अत्यंत दाट आहे. या जंगलात रानडुकरं, ससे, गवे, बिबटे, भेकर, रानमांजर चितळ आदी वन्यपशू आणि इतरत्र सहसा न दिसणारे अनेक पक्षी विहरत असतात. वन्यजीव छायाचित्रकारांसाठी अंबोली हे नंदनवन आहे. चौकुळच्या परिसरातच सुमारे ३० ते ४० गुहा सापडल्या आहेत. त्यातील काही गुहा आकारानं खूप मोठ्या आहेत.

amboli

अंबोलीहून सावंतवाडीकडं जाताना अंबोली घाटातून जावं लागतं. याच रस्त्यावर प्रसिद्ध पारपोलीचा धबधबा आहे. अंबोलीपासून ११ किलोमीटरवर कावळेसाद पॉईंट आहे. येथील एका कड्याला पडलेल्या उभ्या घळीतून प्रचंड वेगानं वारा वहात असतो. गावापासून ५ किलोमीटरवर हिरण्यकेशीचं गुहामंदिर आहे. मंदिरासमोर एक पुष्करिणी आहे. याच नदीवर बेळगावच्या रस्त्यावर प्रसिद्ध नांगरतास धबधबा आहे. धबधब्याची उंची अवघी ४० फूट असली, तरी त्यातून कोसळणाऱ्या पाण्याचा घनगंभीर आवाज उरात धडकी भरवतो. त्याशिवाय शिरगांवकर, नट, सावित्री, सनसेट, पूर्वीचा वस असे अन्य अनेक पॉईंट आहेत. अंबोली घाट उतरून गेल्यानंतर साटम महाराजांचे समाधीमंदिर आहे.

अंबोलीमध्ये महाराष्ट्र पर्यटन विभागाच्या रिसॉर्टसह अनेक हॉटेल आहेत. भोजन आणि निवासाची इथं उत्तम सोय होऊ शकते. स्थानिक गावकऱ्यांनीही हॉटेलं सुरू केली आहेत. मालवणी पद्धतीचं शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थ, खवय्यांना निश्र्चित समाधान देतील. येथील काही हॉटेलांचं ऑनलाइन बुकिंगही करता येतं.

 amboli

कसे जाल? - पुण्याहून अंबोलीला जाण्यासाठी बेळगावमार्गे आणि कोल्हापूर-गारगोटी-आजरामार्गे, असे दोन रस्ते आहेत. पुण्याहून अंतर सुमारे ३९० किलोमीटर. मुंबईकरांना मुंबई-गोवा महामार्गानं सिंधुदुर्गातल्या माणगावजवळून जाणाऱ्या रस्त्यानं अंबोली घाटमार्गे जाता येईल. हे अंतर आहे ५९० किलोमीटर. रत्नागिरीहून २१५ आणि बेळगावहून ६४ किलोमीटर. पुणे, मुंबई आणि कोल्हापूरहून अंबोलीला नियमित राज्य परिवहन सेवेच्या बस सोडल्या जातात. लोहमार्गानं जाणाऱ्यांना कोल्हापूर, बेळगाव किंवा कोकण रेल्वेनं सावंतवाडीपर्यंत जाता येईल. सावंतवाडीहून अनेक बस अंबोलीकडं सोडण्यात येतात.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Weekend Tourism Arvind Telkar maitrin supplement sakal pune today