निसर्गाचं देणं लाभलेला सिंधुदुर्ग

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2019

सर्वच क्षेत्रांत आत्मविश्वासाने मुक्त संचार करणाऱ्या महिलांच्या यशोगाथा, सेलिब्रेटी टिप्स, महिलांचे आरोग्य, ट्रेंड्स, पाककृती, सुरक्षिततेच्या दृष्टीने 'सेफ्टी झोन' वाचा 'सकाळ पुणे टुडे'च्या 'मैत्रीण' या पुरवणीत...

वीकएण्ड पर्यटन - अरविंद तेलकर
निसर्गानं मानवाला भरभरून दिलं आहे. नतद्रष्ट आणि कृतघ्न मानवानं मात्र निसर्गाच्या अनमोल देण्यावरच कुऱ्हाडीचे घाव घालण्यात समाधान मानलं. अशा परिस्थितीतही काही ठिकाणं वाचली. त्यातलंच एक ठिकाण आहे सिंधुदुर्ग जिल्हा. हिरव्यागार वनश्रीनं नटलेला, खळाळत्या नद्यांनी समृद्ध बनलेल्या या जिल्ह्याला भेट देण्यासाठी अनेक कारणं आहेत.

सिंधुदुर्गात विशाल सागर किनारे आहेत, ऐतिहासिक गडकिल्ले आणि जंजिरे आहेत, विस्तीर्ण खाड्या, ऐतिहासिक मंदिरं, आकर्षक धबधबे, जलवाहतुकीसाठी बंदरं, थंड हवेची ठिकाणं, लहानमोठे तलाव, संत-महंतांचे मठ, शेकडो वर्षांपूर्वी खोदलेल्या लेण्या इथं आहेत. अशा वैभवशाली जिल्ह्याची सफर नेहमीच आनंददायी ठरते.

सिंधुदुर्गात अनेक सागरकिनारे आहेत. त्यापैकी सर्वांत प्रसिद्ध आहेत तारकर्ली, देवबाग, निवती, मोचेमाड, रेडी आणि कुणकेश्र्वर. त्याशिवाय आचरा, केळुस, वायरीबांध, विजयदुर्ग, सागरेश्र्वर, सागरतीर्थ, चिवला, खवणे, तोंडवली, मुणगे, शिरोडा, वेळागर, रेडी इथले सागरकिनारेही पर्यटकांना आकर्षित करतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची राजधानी पुणे जिल्ह्यातून कोकणातील रायगड जिल्ह्यात हलवल्यानंतर, कोकणातील गड-किल्ल्यांनाही महत्त्व प्राप्त झालं होतं. शिवकाळात सागरकिनाऱ्याच्या रक्षणासाठी ठिकठिकाणी जंजिरेही बांधण्यात आले.

समुद्रकिनाऱ्यांवर बांधण्यात आलेल्या किल्ल्यांमध्ये निवती, यशवंतगड, राजकोट आणि सर्जेकोट किनाऱ्यांचं रक्षण करत. शिवापूरचे मनोहर-मनसंतोष हे जोड किल्ले, नारूरचा रांगणा, पारगड, शिवगड, वेताळगड, सोनगड, सिद्धगड, यशवंतगड, भैरवगड हे डोंगरी किल्ले. सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, पद्मदुर्ग आणि देवगड हे जंजिरे. आवरकिल्ला ऊर्फ आवडकोट, कुडाळकोट, कोटकामते, बलिपत्तन ऊर्फ खारेपाटण, नांदोशी गढीकोट, बांदाकोट, वेंगुर्लाकोट, सावंतवाडीकोट हे भुईकोट किल्ले आणि नारायणगड व महादेवगड हे जंगलात असलेले वनदुर्ग आहेत.

मालवण तालुक्यातल्या धामापूरचा तलाव, सावंतवाडीचा मोती तलाव आणि कुडाळ तालुक्यातला वालावलचा तलाव हे विशेष प्रसिद्ध आहेत. आचरा, कर्ली, कालावल, कोळंब, देवगड, मिठबाव, मोचेमाड, वाडातर आणि विजयदुर्ग इथं रुंद पात्रांच्या खाड्या आहेत. वैशिष्ट्यपूर्ण मंदिरांसाठी तर हा जिल्हा ख्यातकीर्त आहे. कुडाळ तालुक्यातल्या नारूरचं महालक्ष्मी मंदिर, मालवण तालुक्यातल्या आचरा इथलं रामेश्र्वर मंदिर, देवगड तालुक्यातल्या जामसंडेतलं दिर्बादेवी मंदिर, देवगड तालुक्यातलं कुणकेश्र्वर मंदिर, कणकवली तालुक्यातल्या नाटळचं रामेश्र्वर मंदिर, सावंतवाडी तालुक्यातल्या सोनुर्लीचं माउली मंदिर, वेंगुर्ला तालुक्यातल्या आरवलीचं वेतोबा मंदिर, परुळेचा (वेंगुर्ला) आदीनारायण, आंदुर्ल्याची (कुडाळ) चामुंडेश्र्वरी, वालावलचं (कुडाळ) लक्ष्मीनारायण, खारेपाटणचं (कणकवली) सूर्यनारायण, धामापूरची (मालवण) भगवतीदेवी, माणगावचं (कुडाळ) दत्त, कोटकामतेची (देवगड) भगवतीदेवी, आंगणेवाडीची (मालवण) भराडीदेवी, रेडीचं (वेंगुर्ला) गणेश ही प्रसिद्ध मंदिरं आहेत.

कोकणातलं एकमेव थंड हवेचं ठिकाण म्हणजे आंबोली. सावंतवाडी तालुक्यातलं हे प्रसिद्ध ठिकाण, जैववैविध्यानं नटलेलं आहे. विविध प्रकारचे वन्य पशुपक्षी इथं आढळतात. असंख्य प्रकारचे कृमी-कीटक आणि विविध प्रकारच्या वनस्पतींनी आंबोलीचं जंगल समृद्ध आहे. दरवर्षी इथं लाखो पर्यटक भेट देतात. आंबोली आणि नांगरतास हे इथले प्रसिद्ध धबधबे. कुडाळ तालुक्यातल्या आंबडपाल इथला नवनाथांपैकी मच्छींद्रनाथांचं स्थान असलेला देवाचा डोंगर, दाभोळचं (वेंगुर्ला) पूर्णानंदस्वामी, ओझरचं (मालवण) स्वामी ब्रह्मानंद, कणकवलीचं भालचंद्र महाराज, कोलगावचं (सावंतवाडी) सद्‍गुरू मियांसाब, दाणोलीचं (सावंतवाडी) साटम महाराज, पिंगुळीचं (कुडाळ) राऊळ महाराज, माणगावचं (कुडाळ) वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज इथल्या मठांमध्ये भाविकांची नेहमीच वर्दळ असते.

सिंधुदुर्गाला भेट देण्याचं आणखी एक महत्त्वाचं कारण म्हणजे इथली खाद्यसंस्कृती. शाकाहारी आणि मांसाहारी खवय्यांसाठी पर्वणीच. ओल्या खोबऱ्याचा वापर, हे इथल्या आहाराचं वैशिष्ट्य. शाकाहारामध्ये काळ्या वाटाण्यांची उसळ, तांदळाची भाकरी आणि सोलकढी विशेष लोकप्रिय. मांसाहारींसाठी तर विविध पर्याय उपलब्ध आहेत. कोळंबीचं सार, खेकडा मसाला, मालवणी तिखलं, तिसऱ्याचं सुकं, बांगड्याचं सार, तळलेले मासे, सुरमईचं सुकं, मालवणी वजरी, सुकं मटण अत्यंत चविष्ट लागतं.

आंबापोळी, फणसपोळी, मालवणी खाजा, कोकम सरबत, आंबावडी, तळलेले फणसाचे गरे, काजुगर, आवळा सरबत हा मेवा जिव्हा तृप्त करणारा आहे. समुद्रातल्या विविध राईड्स, स्नॉर्केलिंग, बोटिंगची मजा घेता येते.

कसे जाल -
पुण्याहून कऱ्हाड, करुळ घाटमार्गे कणकवली सुमारे ३४३ किलोमीटर किंवा कोल्हापूर-राधानगरी-फोंडाघाटमार्गे कणकवली ३३९ किलोमीटर. मुंबईहून गोवा महामार्गानं खेड-चिपळूणमार्गे सुमारे ४८२ किलोमीटर. पुण्या-मुंबईसह बहुतेक ठिकाणांहून सिंधुदुर्गात जाण्यासाठी राज्य परिवहन सेवेच्या एसटी बस धावतात. खासगी बसचाही पर्याय उपलब्ध आहे. सिंधुदुर्गातल्या सर्व शहरांमध्ये निवास आणि भोजनाची उत्तम सोय आहे. बहुतेक ठिकाणी रिसॉर्टही आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: weekend tourism arvind telkar sutaria maitrin supplement sakal pune today