जाणून घ्या आठवड्याचे भविष्य : 10 ते 16 नोव्हेंबर

श्रीराम भट 
रविवार, 10 नोव्हेंबर 2019

या पृथ्वीवर वळवळणारा प्रत्येक जीवजंतू लोकल एरिया नेटवर्कतर्फे (LAN) सूर्याच्या मेन सर्व्हरशी जोडला जातोच! मेन सर्व्हरचं कंट्रोल पॅनल हे सूर्याच्या जवळ असलेला बुध ग्रहच अधिकांशरीत्या सांभाळत असतो. 

मेन सर्व्हरशी जोडले जाऊ या! 
आपल्या ग्रहमालेचं एक कंट्रोल पॅनल आहे. या ग्रहमालेच्या कव्हरेज एरियामध्ये येणाऱ्या प्रत्येक जीवजंतूचं सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर ग्रहांच्या अधिकारात नियंत्रित केलं जातं. 

या पृथ्वीवर वळवळणारा प्रत्येक जीवजंतू लोकल एरिया नेटवर्कतर्फे (LAN) सूर्याच्या मेन सर्व्हरशी जोडला जातोच! मेन सर्व्हरचं कंट्रोल पॅनल हे सूर्याच्या जवळ असलेला बुध ग्रहच अधिकांशरीत्या सांभाळत असतो. 

पृथ्वीवरील जीवजंतूंच्या आंतर्बाह्य अशा जाणिवांच्या फाईल्स सतत ओपन होत असतात. सूर्याच्या मेन सर्व्हरचा आधार घेऊन फाकणाऱ्या जीवजंतूंच्या आंतर्बाह्य जाणिवा म्हणा किंवा कनेक्‍टिव्हिटी म्हणा, ही कनेक्‍टिव्हिटी आणि तिच्या गतीचं गणित हे सूर्याजवळच्या तल्लख बुद्धीच्या बुध ग्रहावरच अवलंबून असतं. बुध ग्रहाची गती सतत बदलत असते. हा बुध ग्रह सूर्याच्या कक्षेत सतत आपला अल्लडपणा दाखवत कधी वक्री, कधी मार्गी किंवा कधी अतिशय भरभर पावलं टाकत सूर्याच्या मेन सर्व्हरभोवती प्रदक्षिणा घालत असतो आणि त्याच्या कंट्रोल पॅनलशीच एखाद्या लहान मुलासारखा म्हणा किंवा तरुणासारखा म्हणा अक्षरशः खेळत असतो. बुध ग्रहावर सहा महिने दिवस असतो आणि सह महिने रात्र असते. असा हा सहा महिने दिवसपाळी आणि सहा महिने रात्रपाळी करणारा बुध मोठा द्वाड ग्रह आहे! 

मित्र हो, सप्ताहात ता. ११ नोव्हेंबर रोजी बुध हा सूर्याच्या अगदी जवळ असेल. असा हा कार्तिक पौर्णिमेच्या प्रभावक्षेत्रात होणारा बुधादित्य योग अतिशय दुर्मिळच होय. कार्तिक पौर्णिमेला सूर्याकडून हजारो अशा दिव्य किरणांचा वर्षाव होत असतो. त्या किरणांचं पोषण करून माणूस दिव्यशरीरी होत असतो किंवा तो तसा बनू शकतो! काया, वाचा आणि मन यांची अशी त्रिकरणशुद्धी करून सूर्यभगवानांच्या मेन सर्व्हरशी जोडलं जाणं हेच मनुष्यजन्माचं ध्येय असलं पाहिजे, नाहीतर माणूस हा जंतूच राहतो असंच आपली उपनिषदं सांगतात! यंदाच्या कार्तिक पौर्णिमेजवळच्या बुधादित्य योगातून आपण या मेन सर्व्हरशी बुधासारखे जोडले जाऊ या! 
=========== 
सरकारी कामं होतील 
मेष :
पौर्णिमेचं प्रभावक्षेत्र तुमच्या राशीला नावीन्यपूर्ण फळं देईल. रवी-बुध युतियोगाच्या पार्श्‍वभूमीवर भरणी नक्षत्राच्या व्यक्तींना पौर्णिमेच्या आसपासच्या काळात मानसन्मान मिळेल, अश्‍विनी नक्षत्राच्या व्यक्तींना याच काळात स्पर्धात्मक यशाची प्राप्ती होईल. विशिष्ट नोकरीचा लाभ. सरकारी कामं मार्गी लागतील. गुरुवार अचानक धनलाभाचा. 
=========== 
खरेदी-विक्रीच्या व्यवहारात लाभ 
वृषभ :
हा सप्ताह कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना वादग्रस्त पार्श्‍वभूमीवर खराबच. पौर्णिमेचं प्रभावक्षेत्र अनपेक्षित घटनांमुळे धावपळीचं. मनाविरुद्ध प्रवास करावा लागेल. बाकी, रोहिणी नक्षत्राच्या व्यक्तींना गुरुवार अतिशय शुभलक्षणी. विशिष्ट खरेदी-विक्रीच्या व्यवहारात मोठा लाभ. मृग नक्षत्राच्या व्यक्तींना शनिवार वैयक्तिक समारंभाचा. 
=========== 
नोकरीच्या संधी येतील 
मिथुन :
सप्ताह गाजवणारी रास. तरुणांना रवी-बुध युतियोगातून उत्तम लाभ. नोकरीच्या संधी येतील. पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्ती सुवार्तांमुळे सतत फ्लॅश न्यूजमध्ये राहतील. ता. १२ रोजी येणाऱ्या पौर्णिमेचा ग्रहांचा पट ऐतिहासिक शुभ फळं देईल. मृग नक्षत्राच्या व्यक्तींना विवाहयोग आहे. 
=========== 
विजयी षटकार माराल! 
कर्क :
ग्रहांचा पट शुक्रकलांच्या प्रकाशात झगमगाटी यश साजरं करेल. आश्‍लेषा नक्षत्राच्या व्यक्ती पौर्णिमेच्या प्रभावक्षेत्रात जीवनातले विजयी चौकार-षटकार मारतील. नोकरीतले, व्यवसायातले प्रश्‍न सुटतील. पुष्य नक्षत्राच्या व्यक्तींना गुरुवार अतिशय शुभलक्षणी. 
=========== 
यश खेचून आणाल 
सिंह :
सप्ताहातलं पौर्णिमेचं पॅकेज अतिशय शुभ. रवी-बुध युतियोगाची पार्श्‍वभूमी जीवनातले प्युअर सिक्वेन्स लावणारी. पूर्वा नक्षत्राच्या व्यक्ती यश खेचून आणतील. सप्ताहाचा शेवटी मघा नक्षत्राच्या व्यक्तींना मोठा मानमरातब मिळेल. उच्च शिक्षणाच्या संधी. 
=========== 
व्यावसायिक प्राप्ती वाढेल 
कन्या :
सप्ताहात रवी-बुध सहयोग मोठा परिणाम साधेल. व्यावसायिक प्राप्तीत मोठी वाढ होईल. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना नोकरीत भाग्योदयाच्या संधी येतील. पगारवाढ होईल. हस्त नक्षत्राच्या व्यक्तींना गुरुवार सुवार्तांचा. नूतन वास्तुप्रवेश होईल. पतीचा वा पत्नीचा भाग्योदय. 
=========== 
बढतीचा मार्ग मोकळा! 
तूळ :
सप्ताहाची सुरवात पौर्णिमेच्या फील्डवर तरुणांना उत्तमच. स्वाती नक्षत्राच्या व्यक्तींना मोठा धनलाभ. कलाकारांचा भाग्योदय. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाच्या शेवटी नावीन्यपूर्ण शुभ फळं मिळतील. नोकरीतल्या विशिष्ट घडामोडींमुळे बढतीचा मार्ग मोकळा होईल. 
=========== 
नवे व्यावसायिक पर्याय 
वृश्‍चिक :
राशीतल्या शुक्रभ्रमणातून दिवाळी चांगलीच रेंगाळेल. सप्ताहाची सुरवात मंगलमय सुरांची. नवे व्यावसायिक पर्याय उपलब्ध होतील. अनुराधा नक्षत्राच्या व्यक्तींना वैवाहिक जीवनात सुवार्ता मिळतील. ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्ती शुक्रभ्रमणाचा फायदा घेत बाजी मारतील. 
=========== 
विवाहासाठी ग्रीन सिग्नल! 
धनू :
हा सप्ताह चंद्र-शुक्रकलांचा उत्कर्ष करणारा. पौर्णिमेच्या प्रभावक्षेत्रातला रवी-बुध युतियोग लाभदायक. पूर्वाषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना मोठं ग्रासकोर्ट राहील, अर्थातच सतत ग्रीन सिग्नल मिळेल. विवाह उरकून घ्या! मूळ नक्षत्राच्या व्यक्तींना संकष्टी चतुर्थी गुरुकृपेची. 
=========== 
नोकरीत अनुकूल परिस्थिती 
मकर :
पौर्णिमेचं प्रभावक्षेत्र शुभग्रहांना उत्तम साथ देईल. फायदा करून घ्याच. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना नोकरी-व्यवसायात अनुकूल परिस्थिती राहील. वादग्रस्त खटली मिटतील. श्रवण नक्षत्राच्या व्यक्तींना गुरुवार अतिशय शुभलक्षणी. 
=========== 
शिक्षणात मोठं यश 
कुंभ :
मंगळवारच्या कार्तिकी पौर्णिमेचं मोठं भरतं राहील. अद्वितीय अशा रवी-बुध युतीचा प्रभाव राहील. पूर्वाभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्ती मोठा लाभ उठवतील. शिक्षणाच्या अंतिम टप्प्यात मोठं यश मिळेल. या सप्ताहाचा शेवट व्यावसायिक मोठ्या धनवर्षावाचा. शततारका नक्षत्राच्या व्यक्तींचा मानसन्मान. 
=========== 
व्यवसायातलं नैराश्‍य जाईल 
मीन :
सप्ताहातली पौर्णिमा शुभग्रहांना मोठं बळ देईल. व्यावसायिकांचं नैराश्‍य जाईल. उत्तराभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्ती कौटुंबिक सुवार्तांद्वारे धन्यता अनुभवतील. घरातल्या तरुणांचे प्रश्‍न सुटतील. रेवती नक्षत्राच्या व्यक्तींना ता. १४ व १५ हे दिवस भन्नाटच! 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: weekly horoscope 10 November to 16 November 2019

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: