जाणून घ्या आठवड्याचे भविष्य : 13 ते 19 ऑक्टोबर

जाणून घ्या आठवड्याचे भविष्य : 13 ते 19 ऑक्टोबर

कोजागरीचा भक्तिसूर! 
माणूस हा एक साक्षी आहे आणि हा माणूस नावाचा प्राणी आपल्या बालपण, तारुण्य आणि वृद्धत्व या तिन्ही अवस्था एकाच देहात अनुभवत असतो. रांगणारं बाळ हा देहच होतो, मुसमुसलेलं तारुण्य हा देहच अनुभवतो आणि खोकणारं, खवखवणारं, खाष्ट असं देहाचं वृद्धत्वही हा मनुष्य प्राणी अगदी चांगलं पोसतो किंवा जोपासतो! 

माणसाचं जीवन अर्थात माणसाचा देह हा एक द्रावण आहे. हे द्रावण एक अन्नच आहे. अन्नमय, प्राणमय, मनोमय आणि विज्ञानमय या चारी देहांना निरसून राहणारं साक्षित्व आकाशात नांदत असतं. प्रत्येक माणूस हा एक यज्ञाचं रूप आहे. ‘य’ हे अक्षर वायूशी संबंधित आहे आणि ‘ज्ञ’ हे अक्षर ज्ञानाशी संबंधित आहे. 

अन्नाद्‌भर्वान्त भूतानि पर्जन्याद्‍न्नसंभवः। 
यज्ञाद्‌भवन्ति पर्जन्यो यज्ञः कर्म समुद्भवः।। (भगवद्‍गीता) 

माणसाचं पंचभौतिक शरीर अन्नातून निर्माण होतं आणि या देहात प्राण संचरत असतो. अर्थातच प्राण वायूसंग धरत मनोमय होतो आणि हे मन बुद्धीला आणि अहंकाराला नाचवत विज्ञानाचा पसारा किंवा शब्दप्रपंच मांडतं. हा शब्दप्रपंच माणसाची प्राणशक्ती देहरूपानं भलत्याच ठिकाणी खर्ची पाडत असतो! माणसाचं जीवन हे यज्ञस्वरूप आहे. अर्थातच माणसाची जीवनवेदी ही मंत्रस्वरूपच आहे. त्यामुळंच ‘जीवनयज्ञ’ हा शब्द अवतरला. अशा या जीवनयज्ञातून मंत्राद्वारे भावसलील अवतरून पूर्णब्रह्म असलेल्या प्रसादरूप अन्नाचा उद्‌भव होतो. 

माणसाचं कर्म ज्यावेळी यज्ञस्वरूप होतं, त्यावेळीच त्या कर्माची ब्रह्मस्वरूप होण्याकडं वाटचाल होते. या चराचरात ब्रह्म व्यापून राहिलं आहे. माणसाचा शब्द किंवा जीवनमंत्र अक्षराला प्रसवणारा व्हायला पाहिजे. अर्थातच माणसाचा जीवनमंत्र ज्ञानयज्ञामध्ये आहुती घालणारा असला पाहिजे, तरच अन्नरूप ब्रह्मानंदाचा प्रसाद मिळू शकतो! 
मित्रहो, आज कोजागरी पौर्णिमा आहे. माणसानं आपला यज्ञरूप जीवनमंत्र सतत आळवला पाहिजे, तरच माणसाचं जीवन प्रसादरूप होऊ शकतं. माणसानं हरिभक्तीच्या संगतीनं भावांची संपत्ती गोळा करून, रसांची उन्नती करत कोजागरी साजरी केली पाहिजे. माणसाच्या जीवनगीताची भूपाळी शेवटी भैरवीचे सूर आळवत शिवरूपाचे ध्यान करत साक्षित्वाच्या प्रगाढ मौनात विसर्जित झाली पाहिजे! 

व्यावसायिक सरकारी कामं 
मेष : अश्‍विनी नक्षत्रव्यक्ती पौर्णिमेनंतर प्रचंड भरारी घेतील. ता. १४ आणि १५ हे दिवस सुवार्तांतून फ्लॅश न्यूजचे. विवाहयोग. व्यावसायिक मोठे पर्याय उपलब्ध होतील. ता. १८ चा शुक्रवार भरणी नक्षत्रास मोठा प्रवाही. व्यावसायिक सरकारी कामं. वादग्रस्त प्रकरणं मिटतील. 

वैवाहिक जीवनातून मोठ्या सुवार्ता 
वृषभ : पौर्णिमेचं प्रभावक्षेत्र मृग नक्षत्रास उत्तमच. वैवाहिक जीवनातून मोठ्या सुवार्ता. भागिदारीतून लाभ. तरुणांना ता. १८ चा शुक्रवार नोकरीच्या मुलाखतींतून प्रभाव टाकणारा. रोहिणी नक्षत्रास गुरुवारची संकष्टी पुत्रचिंता घालवणारी. व्यावसायिक वसुली. 

विवाहविषयक गाठीभेटींतून प्रभाव टाकाल 
मिथुन : आजच्या पौर्णिमेनंतर मोठा फॉर्म गवसेल. मोठा स्प्रिंट माराल. अर्थातच एखादी मॅरेथॉन जिंकाल. ता. १४ आणि १५ हे दिवस मोठे चमत्कार घडवतील. बुध-शुक्रांची मोठी खेळी राहील. आर्द्रा नक्षत्राचं मार्केटिंग यशस्वी होईल. विवाहविषयक गाठीभेटींतून प्रभाव टाकाल. पुनर्वसू नक्षत्रास नोकरी मिळेल. 

प्रीतीचं जाळं वीणाच 
कर्क : सप्ताहातल्या शुभग्रहांचं पॅकेज आपणास भरभरून देईल. गृहिणींनी या सप्ताहाचा फायदा करून घ्यावा. आजची पौर्णिमा खरेदीची. पुष्य नक्षत्रास एकूणच सप्ताह ख्यालीखुशालीचाच. आश्‍लेषा नक्षत्रास ता. १८ चा शुक्रवार मोठ्या प्रेमस्पंदनातून हृद्य. प्रीतीचं जाळं वीणाच. 

मुलाखतींसाठी तयार राहा 
सिंह : पौर्णिमेनंतरचं ग्रहांचं फिल्ड धावसंख्या रचणारं. तरुणांनो, दिवस वाया घालवू नका. नोकरीच्या मुलाखतींसाठी तयार राहा. पूर्वा नक्षत्रव्यक्ती बाजीगर होतील. मघा नक्षत्रास ता. १४ चा सोमवार संध्याकाळी मोठा प्रसन्न. प्रियतमा भेटेल. उत्तरा नक्षत्रास शुक्रवार गोड सुखस्वप्नांचा. 

तरुणांना मोठ्या संधी 
कन्या : पौर्णिमेचं प्रभावक्षेत्र भावनिक संदर्भातून खराब. हस्त नक्षत्रव्यक्तींनी दुष्टसंपर्क टाळावा. बाकी ता. १७ ते १९ हे दिवस शुभग्रहांच्या मंत्रालयातून मोठे साथ देणारे. तरुणांना मोठ्या संधी. नोकरीत प्रशंसा. चित्रा नक्षत्रास संकष्टीचा गुरुवार चंद्रोदयातून भाग्योदयाचा! 

विशिष्ट कायदेशीर प्रश्‍न सुटतील 
तुला : पौर्णिमेनंतर स्वाती नक्षत्रव्यक्ती प्रत्येक वन-डे जिंकणार आहेत. वैयक्तिक उपक्रमांतून मोठं यश मिळेल. ता. १४ आणि १५ ऑक्टोबर हे दिवस मोठे शुभसंबंधित. सप्ताहाचा शेवट विशाखा नक्षत्रास भाग्यबीज पेरणारा. विशिष्ट कायदेशीर प्रश्‍न सुटतील. शुक्रवार विवाहयोगाचा. 

नोकरीतल्या घडामोडी प्रसन्न ठेवतील 
वृश्‍चिक : आजची पौर्णिमा ज्येष्ठा नक्षत्रास मोठी शुभसूचक. नोकरीतल्या घडामोडी प्रसन्न ठेवतील. अनुराधा नक्षत्रास ता. १८ चा शुक्रवार धनचिंता घालवणारा. आजच्या पौर्णिमेजवळ विवाहेच्छूंना पसंतीचे संकेत. संध्याकाळ मोठ्या मनोरंजनाची. 

वैयक्तिक उपक्रमांतून यश 
धनू : आजच्या पौर्णिमेचं फिल्ड शुभग्रहांच्या साथसंगतीचंच. पूर्वाषाढा नक्षत्र वैयक्तिक उपक्रमांतून यश देणारं. सप्ताह घरातल्या तरुणांच्या यशाचाच. मूळ नक्षत्रास सप्ताहात कायदेशीर गोष्टींतून त्रास. मात्र, सप्ताहाची सुरवात तरुणांना छानच. विवाहयोग. परदेशी व्हिसा. 

शुभग्रहांची साथ मिळेल 
मकर : पौर्णिमेनंतर श्रवण नक्षत्राची भरारी. शुभग्रहांची मंत्रालयं २४ तास आपल्यासाठी उघडी राहतील. घ्या कामं करून. ता. १४ ते १६ हे दिवस आपल्या राशीस अतिशय वेगवान राहतील. आजची पौर्णिमा धनिष्ठा नक्षत्रास जीवनातलं एक उत्तम पॅकेज बहाल करेल. शुक्रवार मोठा शुभ. 

परदेशस्थ तरुणांचे भाग्योदय 
कुंभ : आजची पौर्णिमा सप्ताहाचा एक उत्तम ट्रॅक सुनिश्‍चित करेल. पूर्वाभाद्रपदा नक्षत्रास सप्ताह एकूणच धनसमृद्ध करणारा. ता. १७ आणि १८ हे दिवस विजयोत्सवाचे. परदेशस्थ तरुणांचे भाग्योदय. सप्ताह वास्तूविषयक निर्णय घेईल. शततारका नक्षत्रास संकष्टीचा दिवस सुवार्तांतून धन्यतेचा. 

तरुणांचं भाग्य उलगडेल 
मीन : आजची पौर्णिमा शुभशकुनीच. रेवती नक्षत्रास घरातल्या सुवार्तांची पार्श्‍वभूमी ठेवणारी. घरातल्या तरुणांचं भाग्य उलगडेल. उत्तराभाद्रपदा नक्षत्रास ता. १८ चा शुक्रवार यंदाच्या दिवाळीच्या सुखसमृद्धतेची अपूर्वता जाणवून देईल. शनिवारी प्रवासात जपा. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com