साप्ताहिक राशिभविष्य (१३ जून २०२१ ते १९ जून २०२१)

माणसाची शारीरिक आणि मानसिक अवस्था; आणि या अवस्थांचं व्यवस्थापन करणारा माणूस एक बुद्धिमान प्राणी समजला जातो.
Weekly Horoscope
Weekly HoroscopeSakal

क्षणोक्षणी कालबाह्य होणारं मनुष्यरूपी ॲप

माणसाची शारीरिक आणि मानसिक अवस्था; आणि या अवस्थांचं व्यवस्थापन करणारा माणूस एक बुद्धिमान प्राणी समजला जातो. माणसाचे जगण्याचे संदर्भ शारीरिक, मानसिक आणि व्यावहारिक पातळीवरून अजमावले जातात आणि हे संदर्भ लक्षात घेऊन त्याला एका विशिष्ट व्यावहारिक चौकटीत सामावून घेतलं जात असतं. शेवटी माणूस हा सध्याच्या कलियुगात एक व्यवहारच म्हणून गणला जातो. माणूस हा एक बोलण्याचा, ऐकण्याचा, स्पर्श करण्याचा आणि त्यानंतर तो एक लिहिण्याचा विषय बनत असतो. माणसाचा हा विषय ज्या वेळी कागदावर उतरतो, त्या वेळीच तो एक व्यवहार बनतो, तो एक दस्तऐवज बनतो. म्हणूनच तो पुढं एक व्यवस्थापनाचा विषय बनतो आणि हे व्यवस्थापनशास्त्रच ‘एचआर’ या पदाला प्राप्त होतं. असा हा एचआर असलेला आणि एचआर होणारा विज्ञानयुगातला तथाकथित माणूस एक प्रॉडक्‍ट म्हणूनच समजला जातो! मग ही प्रॉडक्‍ट असलेल्या माणसाची प्रॉडक्‍टिव्हिटी मल्टिनॅशनल होत असते. असा हा मल्टिनॅशनल एचआर व्यक्तींचा मोठा समूह निसर्ग पोटात घालून असतो. मित्र हो, जगण्याचा भरवसा देणारं माणसाचं व्यवस्थापन सध्या नैसर्गिक आपत्तींतून सतत कोलमडत आहे. सृष्टी किंवा प्रकृती म्हणा, कर्माच्या वस्त्रात गुंडाळून जिवाचं भरणपोषण करत असते.

जिवाच्या जगण्याचं व्यवस्थापन करणारी प्रकृती काळाचा हात पकडून उद्याचा भरवसा देत गाढ अर्थातच झोपेत लपेटून घेऊन जिवाला पुन्हा सूर्योदयी नवा जन्मच देत असते म्हणा ना! सध्याचा मेष राशीतील हर्षल, कर्क राशीत आलेला मंगळ आणि मकर राशीतील वक्री शनीची पार्श्‍वभूमी माणसाच्या व्यवस्थापनाचा कोणताही भरवसा देत नाहीये. हे सध्याचं ग्रहमान ‘ Man proposes and god disposes’ हा वैश्‍विक सिद्धांतच अधोरेखित करत आहे. माणसाचा जगण्याचा खरा प्राणवायू किंवा जगण्याचं खरं तत्त्वज्ञान बाजारात विकत मिळत नसतं, हेच सत्य आहे!

कलाकारांचा भाग्योदय

मेष : सप्ताहातील शुक्रभ्रमण आणि राशीच्या हर्षलची विशिष्ट स्थिती तरुणांना ऑनलाइन क्‍लिक होणारी. ता. १६ व १७ हे दिवस अश्‍विनी नक्षत्राच्या व्यक्तींना प्रकाशात आणणारे. कलाकारांचे भाग्योदय. प्रेम प्रकरणांना पालवी फुटेल. भरणी नक्षत्राच्या व्यक्तींसाठी ता. १४ व १५ हे दिवस प्रचंड कटकटीचे. कोरोनापेक्षा मानवी व्हायरस सांभाळा.

महत्त्वाची कामं हाती घ्या

वृषभ : बुध-शुक्राची अन्योन्य स्थिती सप्ताहात उत्तम वर्चस्व गाजवेल. महत्त्वाची कामं हातात घ्याच. ता. १६ व १७ हे दिवस आत्यंतिक प्रवाही, ओळखी-मध्यस्थीतून क्‍लिक होणारे. मृग नक्षत्राच्या व्यक्तींचं मार्केटिंग यशस्वी होईल. रोहिणी नक्षत्राच्या व्यक्तींचा शनिवारी कौतुकसमारंभ.

दोन दिवस चौकार-षटकारांचे

मिथुन : आपल्या राशीत रवीचं आगमन होत आहे. भाग्यातील गुरूचे हात बळकट होतील. ता. १६ व १७ या दिवसांत मारा चौकार-षटकार. विवाहविषयक गाठीभेटींतून चांगलेच कनेक्‍ट व्हाल. पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्ती प्रचंड फॉर्ममध्ये येत आहेत. आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्तींसाठी उद्याचा सोमवार ‘बॅड डे.’ गावगुंडांना सांभाळा. बेकायदा व्यवहार टाळा.

जुन्या गुंतवणुकीतून लाभ होईल

कर्क : वक्री शनीच्या ऑडिटखाली आहातच. उद्याचा सोमवार सार्वजनिक जीवनात सांभाळा. व्यावसायिक शत्रुत्वाच्या झळा बसू शकतात. बाकी ता. १६ व १७ हे दिवस एकूणच शुभसंबंधित. आश्‍लेषा नक्षत्राच्या व्यक्तींना जुन्या गुंतवणुकींतून लाभ. पुष्य नक्षत्राच्या व्यक्तींना अचानक प्रसिद्धीयोग. कलाकारांचे भाग्योदय.

परदेशी नोकरीचा योग

सिंह : सप्ताहात लक्ष वेधून घ्याल. पूर्वा नक्षत्राच्या व्यक्तींच्या महत्त्वाकांक्षा पूर्ण होतील. नोकरीतील महत्त्व वाढेल. ता. १६ व १७ हे दिवस अप्रतिमच राहतील. प्रेम प्रकरण मार्गी लावाच. मघा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहात परदेशी नोकरीची संधी! उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींसाठी उद्याचा सोमवार विचित्र गुप्तचिंतेचा.

मोठ्या स्वरूपाच्या गोड बातम्या येतील

कन्या : बुध आणि शुक्र या ग्रहांचं अन्योन्य स्थितीतील भ्रमण मोठं शुभसंबंधित राहील. तरुणांनो, आलेल्या संधींचा लाभ घ्याच. हस्त आणि चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा शेवट मोठ्या गोड बातम्या देणारा. नोकरीत कौतुक. व्यावसायिक धनवर्षाव. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींना प्रसिद्धीचे योग आहेत.

व्यावसायिक पतप्रतिष्ठा वाढेल

तूळ : रवीच्या राश्‍यंतरातून गुरुकृपेचं महत्त्व कळेल. अर्थात, सप्ताहात गुरुभ्रमण शक्तिसंपन्न होईल. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. १६ चा दिवस दिव्य प्रचिती देईल. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींसाठी बुध-शुक्राची अन्योन्यस्थिती व्यावसायिक पतप्रतिष्ठा वाढवणारी. स्वाती नक्षत्राच्या व्यक्तींना उद्याचा दिवस घरात बेरंगाचा. स्त्रीचे रुसवे-फुगवे.

ज्येष्ठ व्यक्तींची आर्थिक कोंडी फुटेल

वृश्‍चिक : सप्ताह बुध-शुक्राच्या विशिष्ट स्थितीतून व्यावसायिक लाभ देणारा. ज्येष्ठा व्यक्तींची आर्थिक कोंडी फुटेल. ता. १६ व १७ हे दिवस सुवार्तांतून प्रसन्नच ठेवणारे. पती वा पत्नीचा भाग्योदय लॉकडाउन उठवेल. अनुराधा नक्षत्राच्या व्यक्तींना नोकरीचे कॉल. उद्याच्या सोमवारी भांडणं टाळा.

मोठे लाभ व महत्त्वाकांक्षांची पूर्ती

धनू : शुक्रभ्रमणाचं पॅकेज चालूच राहील. शिवाय, रवीच्या राश्‍यंतरातून गुरूच्या मंत्रालयात वर्णी लागून महत्त्वाची कामं होतील. ता. १६ व १७ हे दिवस तरुणांच्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करणारे. मूळ नक्षत्राच्या व्यक्तींना मोठे लाभ होतील. पूर्वाषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना सोमवार विचित्र नुकसानीचा. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. १९ चा शनिवार मोठ्या सुवार्तांचा.

नोकरीत बढतीची चाहूल

मकर : वक्री शनीच्या पार्श्‍वभूमीवर मंगळभ्रमण घरगुती वादात विचित्र पैलू दाखवू शकतं. सोमवारी जपा. बाकी सप्ताहाचा शेवट व्यावसायिकांना छानच. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींसाठी सप्ताह स्पर्धात्मक यशाचा. नोकरीत बढतीची चाहूल. श्रवण नक्षत्राच्या व्यक्तींना सोमवारी वाहनभय. रस्त्यावर जपा.

तरुणांना अफलातून कालखंड

कुंभ : बुध-शुक्राची अन्योन्य स्थिती तरुणांना अफलातून फलदायी होईल. ता. १६ व १७ हे दिवस आपल्या राशीस एकूणच छान. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना विवाहयोग आहे. शततारका नक्षत्राच्या व्यक्तींना ता. १७ चा गुरुवार मोठ्या गुरुकृपेचा. पूर्वाभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्ती व्यक्ती सेलिब्रिटी होतील!

विशिष्ट स्वरूपाची सरकारी कामं फत्ते

मीन : रेवती नक्षत्राच्या व्यक्तींना बुध आणि शुक्राची विशिष्ट स्थिती ओळखी-मध्यस्थीतून मोठी लाभदायी होईल. विशिष्ट सरकारी काम फत्ते होईल. वास्तूचं स्वप्न साकारेल. सप्ताहाचा शेवट उत्तराभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना सुवार्तांची शृंखला ठेवेल. पूर्वाभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींसाठी परदेशी भाग्योदय. ओळखीतून विवाहयोग.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com