जाणून घ्या आठवड्याचे भविष्य : 15 ते 21 सप्टेंबर 

श्रीराम भट 
रविवार, 15 सप्टेंबर 2019

अनंतचतुर्दशीनंतरचं विसर्जन मनाला एका सूक्ष्मलोकाकडं घेऊन जात असतं. या सूक्ष्मलोकाचं नियमन करणारी महाशक्ती मनाचं पूर्ण विसर्जन झाल्याशिवाय भगवंताची भेटच घडवू देत नसते. 

तिथीमधलं तथ्य ओळखा! 
भगवंत आणि भगवंताची माया या ब्रह्मांडांत एक अद्भुत खेळ साजरा करत असतात. अनंत कोटी ब्रह्मांडनायक असलेला हा भगवंत त्रिलोकांना पोटात घालून एक महाशून्यावस्था भोगत असतो. अशा या भगवंताला कोणत्याही प्रकारचा त्रास न देता सप्तलोकांचा खेळ साजरा करणारी त्याची महामाया त्याच्या सन्निधच पहुडलेली असते. अशा या सौभाग्यपतिव्रतेची व्याप्ती आणि थोरवी फार मोठी आहे. त्यामुळेच हा सर्व लोकप्रपंच ती परस्पर निभावून नेत असते. इच्छाशक्ती, ज्ञानशक्ती आणि क्रियाशक्ती अशा त्रिशक्तींचा खेळ साजरा करणाऱ्या महामायेचा अधिकार फार मोठा आहे. 

अतिसूक्ष्म असा वासनाप्रपंच सांभाळणारी ही महामाया जीवाची असंख्य देहांतरे घडवून आणत असते. तसेच ती जीवाला अनेक लोकांतून फिरवते. जोपर्यंत माणसाचा वासनासंकल्प जागृत असतो तोपर्यंत त्याचा मनोलय होत नसतो. माणसाचा ज्या वेळी मनोलय होतो त्या वेळीच तो भगवंताच्या शेजघरात प्रवेश करतो आणि मगच तो भगवंताचा होतो; किंबहुना भगवंत त्या वेळीच त्याला मायेच्या बंधनातून सोडवून त्याला आलिंगन देतात आणि हाच तो अनंतचतुर्दशीनंतरचा विसर्जनसोहळा होय! आणि त्यानंतरच महालयारंभ सुरू होत असतो! 

अनंतचतुर्दशीनंतरचं विसर्जन मनाला एका सूक्ष्मलोकाकडं घेऊन जात असतं. या सूक्ष्मलोकाचं नियमन करणारी महाशक्ती मनाचं पूर्ण विसर्जन झाल्याशिवाय भगवंताची भेटच घडवू देत नसते. 

मित्र हो, आजपासून पितृपंधरवड्याला प्रारंभ होत आहे. अर्थातच महालयारंभ सुरू होत आहे. तिथीमधलं तथ्य जाणणारं तेच ज्योतिष! तिथी ही चंद्रकला आहे. अर्थातच, तिथी हा एक मन:स्पंद आहे आणि हा मन:स्पंद ज्या वेळी संकल्परहित होतो त्या वेळीच हा स्पंद अनंत ब्रह्मांडांना व्यापून उरतो आणि मग त्याची अनंत कोटी ब्रह्मांडनायकाशी गाठ पडते! 

व्यावसायिक लाभ होतील 
मेष : भरणी नक्षत्राच्या व्यक्तींना मंगळ-नेपच्यून प्रतियुतीची पार्श्‍वभूमी भ्रातृचिंतेची. मात्र, ता. २० व २१ हे दिवस आनंदपर्यवसायी असतील. व्यवसायात लाभांची एक मालिकाच राहील! तरुणांच्या मुलाखती यशस्वी होतील. अश्‍विनी नक्षत्राच्या व्यक्तींनी वाहनांपासून काळजी घ्यावी. 
=========== 
ऑनलाईन राहा, विवाह जुळेल! 
वृषभ : मृग नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाच्या सुरवातीला कायदेशीर गोष्टींतून त्रास होण्याची शक्यता. मात्र, सप्ताहाचा शेवट रोहिणी नक्षत्राच्या व्यक्तींना अप्रतिम असाच. प्रेमात पडाल! ऑनलाईन विवाहाची संधी. सोमवारी पुत्रचिंता दूर होईल. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना शनिवारी सुवार्ता मिळेल. 
=========== 
राहत्या जागेचा प्रश्‍न सुटेल 
मिथुन : सप्ताहाची सुरवात अतिशय शुभलक्षणी. मोठ्या व्यावसायिक लाभांचे संकेत सुखावतील. आर्द्रा नक्षत्रास सप्ताहात गाठी-भेटींतून मोठे लाभ. राहत्या जागेचा प्रश्‍न सुटेल. शुक्रवार तुमच्या राशीला अतिशय शुभ. ठोका चौकार-षटकार! 
=========== 
पूर्वसुकृत फळाला येईल! 
कर्क : गुरुभ्रमणाची अधिसत्ता या सप्ताहावर राहीलच. ता. १५ व १६ या दिवशी मोठी कृपा होईल. आश्‍लेषा नक्षत्राच्या व्यक्तींचं पूर्वसुकृत फळाला येईल. पुष्य नक्षत्राच्या व्यक्तींची गुप्त चिंता जाईल. शुक्रवार मोठ्या आनंदलहरींचा. आईचे आशीर्वाद पाठीशी राहतील. 
=========== 
मित्रसहकार्यातून मोठे लाभ 
सिंह : उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाची सुरवात विचित्र गाठी-भेटींची. अकारण गैरसमज होण्याची शक्यता. बाकी, सप्ताहाचा शेवट नोकरी-व्यवसायाच्या पार्श्‍वभूमीवर उत्तम भाग्यसंकेतांचा. पूर्वा नक्षत्राच्या व्यक्तींना शुक्रवार ‘खुल जा सिम्‌ सिम्’‌चा अनुभव देणारा. मित्रांच्या सहकार्यातून मोठे लाभ. प्रवासात प्रीतिकथा फुलेल! 
=========== 
तरुणी प्रीतीचं फूल देईल! 
कन्या : राशीच्या बुध-शुक्रांचा एक हंगाम राहील आणि पेरलेलं उगवेल! तरुणांना एखादी तरुणी प्रीतीचं फूल देऊन जाईल! 
हस्त नक्षत्राच्या व्यक्तींसाठी या सप्ताहाचा आरंभ आणि शेवट जीवनातली धावसंख्या रचून देणारा. क्षणचित्रं फेसबुकवर टाकाल! चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना आजचा रविवार पित्तप्रकोपाचा. 
=========== 
नोकरीत बढतीची चाहूल 
तूळ : वाहन चालवताना आज काळजी घ्या. रस्त्यावर अजिबात वाद घालू नका. बाकी, सोमवारी नोकरी-व्यवसायातल्या सुवार्ता कळतील. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींना बढतीची चाहूल. मॅनेजमेंटच्या ‘गुड बुक्‍स’मध्ये जाल! स्वाती नक्षत्राच्या व्यक्तींचं शुक्रवारी प्रियजनांच्या सहवासात कौतुक होईल. मोहरून जाल...सासुरवास विसराल! 
=========== 
इच्छापत्राद्वारे लाभ होईल 
वृश्‍चिक : सप्ताहातली शुभसंबंधित रास. बुध-शुक्राचा फुलोरा आणि गुरुभ्रमणाचं मांगल्य प्रसन्नतेचा अनुभव देईल. अनुराधा नक्षत्राच्या व्यक्तींना शुक्रवारी पितरांचे आशीर्वाद मिळतील. ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना गुरुभ्रमणाच्या अखत्यारीतून काही लाभ होतील. काहींना इच्छापत्राद्वारे लाभ. पुत्रोत्कर्ष. 
=========== 
वैवाहिक जीवनात कौतुक 
धनू: बुध-शुक्रांची षटकं अजून शिल्लक आहेतच. पूर्वाषाढा नक्षत्राच्या व्यक्ती धावांचा डोंगर रचतील. सप्ताहाचा शेवट मोठ्या जल्लोषाचा. वैवाहिक जीवनात कौतुकाचा वर्षाव होईल. मूळ नक्षत्राच्या व्यक्तींना सोमवारी नोकरीच्या मुलाखतीत यश येईल. 
=========== 
नोकरीची संधी व विवाहयोगही 
मकर : सप्ताह गाजवणारी रास! श्रवण नक्षत्राच्या व्यक्ती जणू अश्‍वमेध जिंकतील. ता. १६ आणि २० या दिवशी विक्रम प्रस्थापित होतील. नोकरीच्या संधींबरोबर विवाहयोगही येतील. नका करू पितृपंधरवड्याचा विचार. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना कायदेशीर बाबीत यश मिळेल. 
=========== 
ज्वालाग्राही वस्तूंचं भान ठेवा 
कुंभ : सुरवातीस मंगळभ्रमणाची धग राहील. आजूबाजूच्या ज्वालाग्राही वस्तू आणि व्यक्तींचं भान ठेवा. ‘नो स्मोकिंग झोन’चा नियम पाळा! बाकी, शततारका नक्षत्राच्या व्यक्तींना ता. १६ आणि २० हे दिवस नोकरी-व्यवसायातली वन डे जिंकून देतील. पूर्वाभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना शनिवार वैयक्तिक सुवार्तांचा. 
=========== 
‘मॅन ऑफ द मॅच’ व्हाल! 
मीन : शुभग्रहांच्या ‘लूज फील्डिंग’चा लाभ होईल. दुसऱ्यावर मोहनास्त्र टाकाल! अर्थातच ता. १६ आणि २० हे दिवस विवाहयोगाचे आणि व्यवसायाच्या उत्तम मार्केटिंगचे! नोकरीच्या मुलाखतींना यश मिळेल. रेवती नक्षत्राच्या व्यक्ती शेवटी ‘मॅन ऑफ द मॅच’ होतील. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: weekly horoscope 15 September to 21 September 2019