साप्ताहिक राशिभविष्य (१६ मे २०२१ ते २२ मे २०२१)

प्राक्तनाचा स्वेटर विणणारी प्रकृती, जीव जन्माला आल्यावर हा जीव जगण्यासाठी उभारा देणारा स्वेटर म्हणा किंवा झबलं म्हणा, तात्काळ चढवत असते.
Weekly Horoscope
Weekly HoroscopeSakal

शनीची शांकरी विद्या !

प्राक्तनाचा स्वेटर विणणारी प्रकृती, जीव जन्माला आल्यावर हा जीव जगण्यासाठी उभारा देणारा स्वेटर म्हणा किंवा झबलं म्हणा, तात्काळ चढवत असते. मी जगतो म्हणणारा माणूस प्रारब्धसंचिताच्या डबक्‍यातच पोहत असतो. हा प्रारब्धसंचिताच्या डबक्‍यात पोहणारा माणूसच ज्योतिषाचा विषय होतो म्हणा, किंवा जन्मपत्रिकेचं भेंडोळं होतो म्हणा!

जीव किंवा माणूस ही एक मर्यादा आहे. अमर्याद संसारसागरात पोहणारी ही तथाकथित मर्यादा आपला पोहण्याचा विक्रम साजरा करते म्हणे! प्राक्तन हे व्यक्तिगत असतं आणि नियती ही प्रकृतीची किंवा निसर्गाची असते. प्राक्तन हे नियतीच्या आधारानं जगत असतं. शहर आणि शहरवासी माणूस यांच्यातील फरक म्हणजेच प्राक्तन आणि नियती असं म्हटलं तरी चालेल!

नियती ही पंचमहाभूतांची आणि त्रिगुणांची घटना राबवत असते. आपली सूर्यमालाच एक नियती आहे आणि या नियतीचं बालक असलेला जीव हा नियतीच्या पत्रिकेतील एक पत्रिका आहे. त्यामुळंच ज्योतिषात सूर्यमध्यपद्धती आणि भूमध्यपद्धती या दोन पद्धती अस्तित्वात आल्या!

मित्र हो, सर्व ग्रह एका केंद्रबिंदूकडं लक्ष ठेवत सूर्याभोवती भ्रमण करत असतात. ग्रहांची कोणाशीही शत्रू-मित्रता नसते. माणूस विशिष्ट मर्यादेच्या ग्रहचौकटीत जन्माला येतो. ही मर्यादा ओळखणं म्हणजेच ज्योतिष जाणून घेणं होय. शनी ही एक मर्यादेची चौकट आहे. त्यामुळंच त्याच्या स्तंभीवक्री स्थितीला एक आध्यात्मिक अर्थ आहे! ज्योतिष हे अध्यात्म आहे. आपण सृष्टीचे मालक नसून सेवक आहोत हे जाणणं म्हणजेच शंकराचा सारथी असलेल्या शनीला जाणणं होय! सप्ताहात शनीची स्तंभी स्थिती राहील. त्यामुळंच सप्ताहात स्तब्धपणे चिंतन करत ही शनीची शांकरी विद्या जाणून घ्यावी!

उच्चशिक्षणासाठी परदेशगमन निश्‍चित

मेष : अश्‍विनी नक्षत्राच्या व्यक्तींना पूर्वसुकृतातून लाभ मिळतील. अर्थातच लाभातील गुरुभ्रमण दुर्गाष्टमीजवळ ता. १९ व २० या दिवसांत वेचक वेधक फळं देईल. तरुणांचा शैक्षणिक उत्कर्ष. उच्चशिक्षणासाठी परदेशगमन निश्‍चित होईल. भरणी नक्षत्राच्या व्यक्तींच्या सप्ताहाचा शेवट स्तंभी शनीच्या प्रभावातून सरकारी कायदेकानूंच्या संदर्भातून अडचणीचा. नोकरीत विचित्र ताण.

विक्रमांची नोंद होईल

वृषभ : राशीचे बुध-शुक्र उत्तम खेळी करतील. गाठीभेटींतून प्रभाव टाकाल. ता. २० व २१ हे दिवस विशिष्ट विक्रम नोंदवतील. विशिष्ट भूखंड सोडवून घ्याल. रोहिणी नक्षत्रास सप्ताहात ग्रहांचं बॅटिंग फिल्डच राहील. कृत्तिका नक्षत्रास नोकरी. मृग नक्षत्राच्या व्यक्तींसाठी मंत्रालयातून अनुमोदन आणि त्यातून भाग्यसंकेत. प्रेम प्रकरण रंगेल.

बेरोजगारांना नोकरी मिळेल

मिथुन : सप्ताहाचा शेवट स्तंभी शनीचा. राजकारणी व्यक्ती सांभाळा. संशयास्पद आर्थिक व्यवहार टाळा. बाकी आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्तींना बुध-शुक्राची स्थिती कलात्मक अभिव्यक्तींतून उत्तमच. ता. १९ ची बुधाष्टमी बेरोजगारांना नोकरी देणारी. पुनर्वसू नक्षत्रास सप्ताहाचा शेवट हितशत्रुपीडेचा. देण्या-घेण्यावरून वाद. खरेदीत जपा. कलाकारांचा भाग्योदय.

स्वतंत्र व्यावसायिकांना सुंदर काळ

कर्क : बारावा मंगळ आणि स्तंभी शनी यांचं एक विचित्र मळभ राहील. शत्रुत्वाच्या पार्श्‍वभूमीवर आश्‍लेषा नक्षत्राच्या व्यक्तींसाठी सप्ताहाचा शेवट दखलपात्र. गावगुंडांपासून जपा. बाकी बुध-शुक्राचं ग्राउंड स्वतंत्र व्यावसायिकांना ता. १९ व २० च्या अष्टमीच्या प्रभावात सुंदरच. एखादी लॉटरी लागेल.

नोकरीत साहेबांवर छाप पडेल

सिंह : सप्ताहाचा शेवट गुरुभ्रमणाच्या माध्यमातून मोठी भाग्यबीजं पेरणारा. सप्ताहात बुध-शुक्राची जोडगोळी नोकरीत साहेबांवर छाप पाडेल. पूर्वा नक्षत्रव्यक्तींनी नोकरीच्या संधींवर दबा धरून राहावंच. मघा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. २० चा गुरुवार मोठ्या सुवार्तांची पार्श्‍वभूमी ठेवेल. शनिवारी घरात वाद नकोत. वृद्ध व्यक्तींशी जपून बोला.

राजकारणी व्यक्तींना त्रासदायक

कन्या : सप्ताहात बुध आणि शुक्र या ग्रहांचं एक ग्राउंड राहील. हस्त नक्षत्राच्या व्यक्ती त्यांचा उत्तम लाभ घेतील. नोकरीसाठीच्या मुलाखती यशस्वी होतील. ता. १८ व १९ हे दिवस आत्यंतिक प्रवाही राहतील. सप्ताहाचा शेवट राजकारणी व्यक्तींना उपद्रवाचा. काहींना विचित्र गुप्तचिंता सतावेल. अप्रतिष्ठेचं भय.

उत्तम व्यावसायिक उलाढालीचा काळ

तूळ : सप्ताहातील शनी-मंगळाची स्थिती मोठी खराब. शत्रुत्व सांभाळाच. तरुणांना प्रेम प्रकरणातील वादळं सतावतील. स्वाती नक्षत्राच्या व्यक्तींसाठी सप्ताहाचा आरंभ आणि शेवट स्त्री-पुरुष संबंधांतून जपण्याचाच. बाकी ता. १९ व २० मे हे दिवस उत्तम व्यावसायिक उलाढालींचे. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींना शनिवार अकारण वादात ओढणारा. कोणतीही मध्यस्थी टाळा.

सुवार्ता मिळतील, शुभ कालखंड

वृश्‍चिक : सप्ताह वैवाहिक जीवनातून शुभसंबंधित. ता. १९ व २० हे अष्टमीच्या प्रभावक्षेत्रातील दिवस अनुराधा नक्षत्राच्या व्यक्तींना सुवार्तांतून फ्लॅशन्यूजमध्ये आणतील. सप्ताहाचा आरंभ आणि शेवट ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींसाठी प्रलोभनांतून अडचणीचा. व्यसनी मित्र टाळा. हातापायाच्या दुखापती जपा.

व्यावसायिक लाभ, तसंच सरकारी कामं होतील

धनू : सप्ताहात नाकासमोरच चाला. व्यावसायिक शॉर्टकट मारू नका. सप्ताहात त्वचाविकार सतावतील. पूर्वाषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना संसर्गातून त्रास. विशिष्ट औषधाची रिअँक्‍शन शक्‍य. मूळ नक्षत्राच्या व्यक्तींसाठी सप्ताह व्यावसायिक लाभाचा. सरकारी कामं होतील. पूर्वाषाढा नक्षत्राच्या व्यक्तींसाठी सप्ताह नोकरीत चांगलाच. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना परदेशात नोकरीची शक्यता.

नोकरीत प्रशंसा मिळवाल

मकर : स्तंभी शनीचा सप्ताह आणि मंगळाचा अंडरकरंट विशिष्ट जुनी खटली उकरून काढणारा. सप्ताहात जुनाट व्याधी सांभाळा. बाकी श्रवण नक्षत्राच्या व्यक्तींना बुध-शुक्राचं ग्राउंड नोकरीत प्रशंसापात्र करेल. ता. २१ चा शुक्रवार अतिशय सुगंधित असेल. धनिष्ठा नक्षत्रास शनिवार रुसव्याफुगव्यांतून त्रासाचा.

प्रिय व्यक्तींना दुखावू नका

कुंभ : सप्ताहात शुक्रभ्रमणाचं एक मॅजिक राहील. ओळखींतून उत्तम विवाहस्थळं येतील. घोळ घालू नका. उरका! शततारका नक्षत्राच्या व्यक्तींवर शुक्रभ्रमणाची मॅजिक चांगली अंमल करेल. वास्तुयोग. ता. १९ व २० हे दिवस आपल्या राशीस भन्नाटच! मात्र शनिवारी प्रिय व्यक्तींना दुखावू नका. घरातील लहान मुलं जपा.

परदेशात भाग्योदयाची संधी

मीन : आजचा रविवार मंगळभ्रमणाचा व्हायरस वाढवेल. सप्ताहात वागण्या-बोलण्यातील आचारसंहिता पाळाच. बाकी सप्ताह एकूणच नोकरीतील वातावरण पोषकच ठेवेल. ता. २१ मेचा शुक्रवार व्यावसायिकांचं लॉकडाउन उठवेल. उत्तराभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींसाठी परदेशी भाग्योदय. रेवती नक्षत्राच्या व्यक्तींना उत्तम विवाहस्थळं येतील. ऑनलाइन छाप पाडाल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com