जाणून घ्या आठवड्याचे भविष्य : 18 ते 24 ऑगस्ट

श्रीराम भट 
रविवार, 18 ऑगस्ट 2019

मित्रहो, ज्योतिष हे माणसाच्या जीवनाची सुरावट कशी आहे हेच बघण्याचा प्रयत्न करतं. माणसाच्या जीवनात चंद्रकलांचा उत्कर्ष भावसमृद्ध करणारा असेल, तरच माणसाच्या जीवनात गोपाळकाला साजरा होतो, नाहीतर जीवनात नुसतीच कालवाकालव होत असते! 

‘कृष्ण’ हे भक्तीचं कुलदैवतच आहे. कृष्ण हे विश्‍वाचं मन आहे, किंवा कृष्ण हा एक वैश्‍विक मनसागर आहे. या मनसागरात अनंत मनःस्पंदांचे तरंग उठत असतात आणि लय पावत असतात. सत्‌ चित्‌ आणि आनंद असा एकत्वानं नांदणारा सृष्टीचा भाव चंद्राच्या सोळा कलांच्या माध्यमातून आविष्कृत होत असतो. चंद्राच्या लाडक्‍या रोहिणी नक्षत्रावर कृष्णजन्म झाला. ज्योतिषशास्त्रात चंद्र म्हणजेच मन समजलं जातं. श्रीकृष्णाचा अवतार एक प्रकारचा योगगर्भ सूचित करतो. अष्टमीचा चंद्र चंद्रकलांचं एक सामरस्य सूचित करतो. माणसाचं शरीर हेच एक गोकुळ आहे आणि या गोकुळात श्रीकृष्ण परमात्म्याचा वास असतो. 

राम आणि कृष्ण ही सृष्टीची दैवतं होऊन बसली आहेत. सृष्टीचं ‘रामराज्यच’ आहे! त्यामुळंच ते सत्याश्रयी आहे. सृष्टीचं स्पंदन अतिशय निर्हेतुकपणे स्पंदित होत असतं. चंद्राच्या कला हे एक सृष्टीचं हळुवार स्पंदनच होय आणि हे स्पंदन एक प्रकारचा भावसुगंध पसरवत असतं. या भावसुगंधाचा आस्वाद प्रत्येकाला परिपूर्णपणे घेता येतो. सृष्टी कोणताही भेदभाव ठेवत नसते. सृष्टीला कोणीही शत्रू-मित्र नसतो. त्यामुळंच गुलाबाचा सुगंध प्रत्येकाला सारखाच येत असतो. तात्पर्य सृष्टी एका सत्यावर चालते आणि हे सत्यच चंद्राच्या सोळा कलांच्या माध्यमांतून माणसातल्या हृदयस्य कृष्णाला भावशृंगारातून आळवत असतं, किंवा आत्मरत होत असतं किंवा ते तसं व्हायला पाहिजे. सृष्टीतला समरस भाव अष्टमीला गोपाळकाला साजरा करत असतो. 
राममय जीवन सृष्टीतल्या सच्चिदानंदाचा स्वर पकडत, ज्यावेळी जीवनरूपी बासरीचे स्वर काढतं, त्यावेळी ते कुंजविहारी श्रीकृष्ण बनतं आणि तो स्वर राम, कृष्ण, हरि असाच असतो! 

मित्रहो, ज्योतिष हे माणसाच्या जीवनाची सुरावट कशी आहे हेच बघण्याचा प्रयत्न करतं. माणसाच्या जीवनात चंद्रकलांचा उत्कर्ष भावसमृद्ध करणारा असेल, तरच माणसाच्या जीवनात गोपाळकाला साजरा होतो, नाहीतर जीवनात नुसतीच कालवाकालव होत असते! 

नोकरीत वरिष्ठांच्या मर्जीत जाल 
मेष : सप्ताहातल्या ग्रहांचं फिल्ड शुभ युती-योगाच्या पार्श्‍वभूमीवर बाहेरच्या जगात सतत आगतस्वागत करणारं. मोठी अर्थप्राप्ती. अश्‍विनी नक्षत्रव्यक्ती संधींचा मस्त फायदा उठवेल. नोकरीत वरिष्ठांच्या मर्जीत जाल. प्रवासात बड्या व्यक्ती भेटतील. भरणी नक्षत्रास ता. १९ चा सोमवार बेरंगाचा. 

यशाचा सुखद धक्का मिळेल 
वृषभ : सप्ताहातल्या राशींच्या एक्‍स्चेंजमधली सतत सुवार्तांतून फ्लॅश न्यूजमध्ये राहणारी रास. कृत्तिका नक्षत्रव्यक्ती जीवनातल्या धावांचा वेग वाढवतील. ता. २१ ते २३ ऑगस्ट हे दिवस सुखद धक्का देणाऱ्या यशाचे. मृग नक्षत्रास गोपाळकाल्याचा दिवस हौले हौले करणारा. 

सहली-करमणुकीचा आनंद 
मिथुन : सप्ताहात मरगळ जाईल. सप्ताहात जीनिअस माणसांचा सहवास लाभेल. सहली-करमणुकीचा आनंद घ्याल. मृग नक्षत्रव्यक्तींना एखादा मानसन्मान मिळेल. आर्द्रा नक्षत्रास ता. २१ ते २३ ऑगस्ट हे दिवस जीवनातले सप्तरंग दाखवेल. धमाल कराल. पुनर्वसू नक्षत्रास नोकरीत लाभ. 

घरात मौल्यवान खरेदी 
कर्क : सप्ताहात विद्युत उपकरणांपासून जपा. घरातली व्रात्य लहान मुलं जपा. बाकी सप्ताह पुष्य नक्षत्रास सप्ताह नोकरीत आनंदोत्सव साजरा करणारा. घरात मौल्यवान खरेदी. आश्‍लेषा नक्षत्रास सोमवार प्रवासात बेरंगाचा. पुनर्वसू नक्षत्रास मंगळ-शुक्र योगातून व्यावसायिक तेजीतून लाभ. 

परदेशगमनाच्या संधी 
सिंह : राशीचे मंगळ-शुक्र सप्ताहात धमाल उडवतील. मघा नक्षत्रव्यक्ती आपल्यातल्या दिव्य कलागुणांचं प्रदर्शन करतील. ता. २१ ते २३ हे दिवस सर्व प्रकारांतून शुभ. अनेकांना परदेशगमनाच्या संधी. पूर्वा नक्षत्रास गोपाळकाला सर्वार्थानं शुभ. ता. २३ ता शुक्रवार ‘ये शाम मस्तानी’ करणारा. उत्तराचा पुत्रोत्कर्ष. 

मित्रांशी वाद नकोत 
कन्या : सप्ताह थोडा संमिश्र स्वरूपाचा राहील. मित्रांशी वाद नकोत. ता. १९ व २० ऑगस्ट हे दिवस चंद्र-शनी विचित्र योगातून गैरसमज करणारे. बाकी चित्रा नक्षत्रास ता. २३ व २४ ऑगस्ट हे दिवस भन्नाटच शुभफळं देतील. हस्त नक्षत्रास भेटवस्तूंतून लाभ. घरात सुवार्ता. 

घरात आनंदोत्सव साजरा कराल 
तुला : सप्ताहात खरा गोपाळकाला साजरा कराल. मंगळ-शुक्र योगाच्या माध्यमातून फोटोफिनिश यश संपादन कराल. चित्रा नक्षत्रव्यक्ती सप्तरंगांची उधळण करतील. घरात सतत आनंदोत्सव साजरा कराल. स्वाती नक्षत्रास ता. २१ दिवस अतिशय भावरम्य राहील. विशाखा नक्षत्रास परदेशगमन. 

वैवाहिक जीवनातून मोगरा फुलेल 
वृश्‍चिक : मंगळ-शुक्र सहयोगातून हा सप्ताह म्हणजे ‘हरियाली और रास्ता’ असाच राहील. वैवाहिक जीवनातून मोगरा फुलेल. अनुराधा नक्षत्रास नोकरीच्या मुलाखतींतून यश. ता. २३ चा शुक्रवार जीवनात संस्मरणीय राहील. ज्येष्ठा नक्षत्रास पुत्रलाभ. वास्तुप्रवेश. 

तरुणांचे प्रश्‍न सुटतील 
धनू : सप्ताहात मंगळ-शुक्र योगातून जीवनात सूरसजावट होईल. मूळ नक्षत्रव्यक्ती तारुण्याचा बहर अनुभवतील. ता. २१ व २२ हे दिवस जीवनातले ‘हम दोनों’ साजरा करतील. पूर्वाषाढा व्यक्तींचे वास्तुविषयक व्यवहार होतील. घरातल्या तरुणांचे प्रश्‍न सुटतील. 

संततीचे विवाह ठरतील 
मकर : धनिष्ठा नक्षत्रव्यक्ती सप्ताहातल्या बुध-गुरू योगाचा उत्तम लाभ घेतील. बुद्धिमान माणसं भेटतील. त्यांच्या सल्ल्याचा फायदा होईल. विशिष्ट जुन्या गुंतवणुकी फलद्रूप होतील. श्रवण नक्षत्रव्यक्तींना सप्ताहाचा शेवट सुवार्तांच्या प्रभावातून मोठा अप्रतिम. राजकीय लाभ. कोर्टप्रकरणांतून यश. संततीचे विवाह ठरतील. 

नोकरीत विशिष्ट पद मिळेल 
कुंभ : शततारका नक्षत्रव्यक्ती उत्सवसमारंभातून मिरवतील. विवाहेच्छूंनी आपले अँटिने रोखून ठेवावेत. मंगळ- शुक्र योगातून कलाकारांचं परदेशगमन. व्यावसायिक मोठी अर्थप्राप्ती. पूर्वाभाद्रपदा नक्षत्रास नोकरीत विशिष्ट पद मिळेल. यंदा दहीहंडी फोडणार आहात. संतदर्शन होईल. 

दिव्य अनुभूती येतील 
मीन : सध्या आपण गुरुभ्रमणाची कवचकुंडलं घालूनच फिरत आहात. श्रीकृष्णजन्माच्या या सप्ताहात आपणास दिव्य अनुभूती येतील. माणसाचं अंतरंग शुद्ध असेल, तर बाह्यरंगसुद्धा शुद्ध होतं. रेवती नक्षत्रव्यक्ती उत्तरोत्तर अतीव शुद्ध होत जातील. उत्तराभाद्रपदास लक्ष्मी प्रसन्न होईल. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: weekly horoscope 18 august to 24 august 2019