जाणून घ्या आठवड्याचे भविष्य : 20 ते 26 ऑक्टोबर

जाणून घ्या आठवड्याचे भविष्य : 20 ते 26 ऑक्टोबर

महासुखाच्या दिवाळीची पूर्वसंध्या! 
चराचर अर्थातच ‘चालणारं’ आणि ‘न चालणारं’ असं हे जग सूर्य-चंद्राधीन आहे हे मान्य करावंच लागेल. सूर्य हा ग्रह नसून तो तारा आहे याचं भान अनेकांना नसतं. पृथ्वी हा ग्रह आहे. पृथ्वीनामक कर्म सूर्याभोवती फिरत असतं, अर्थातच अमावास्या-पौर्णिमा साजऱ्या करत असतं. या पृथ्वीनामक कर्मावर आरूढ होऊन फिरणारे नर वा वानर हे मन, बुद्धी आणि अहंकार या उपटसुंभांना घेऊन आपल्या कर्तृत्वाचा डंका पिटत असतात! 

मन आणि बुद्धी या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत आणि हे नाणं हातात घेऊन शरीराच्या खोलीत माणसाचा अहंकार या नाण्यासह खणखणत, खुळखुळत असंख्य चाळे करत असतो! अध्यात्मात ‘बुद्धीचं वैभव’ असतं आणि ‘मनाची शांतता’ असते. संकल्परहित अशा आत्मभवनी प्रतिष्ठित झालेल्या बुद्धीचं वैभव प्रज्ञा आणि मेधा या शक्ती उपभोगत असतात. कीर्ती, श्रीः, वाक्‌, स्मृति, मेधा, धृति आणि क्षमा या स्त्रीशक्ती आत्मवैभवाचं रक्षण किंवा जतन करणाऱ्या आहेत असं भगवद्गीतेत सांगितलेलं आहे. 
पौर्णिमा-अमावास्येचं तत्त्व जाणणारं ज्योतिष अमावास्येला कमी लेखत नाही किंवा ते तसं लेखत नसावं. नाहीतर, एरवी अमावास्येला बदनाम करणाऱ्या सध्याच्या प्रॅक्‍टिकल मंडळींनी अमावास्येला लक्ष्मीपूजन साजरं केलं नसतं! 

ज्यांना काही इच्छा राहिली नाहीये किंवा ज्यांची श्रद्धा ‘सर्व काही भगवंत’ होऊन राहिली आहे, त्यांच्या लक्ष्मी पायाशी असतेच. ज्याची बुद्धी आत्मभुवनी प्रतिष्ठित झाली आहे तोच पूर्णपणे भवभयमुक्त होऊन खरा वैभवसंपन्न होत असतो आणि असे ज्ञानसंपन्न भक्तच लक्ष्मीपूजनाचे अधिकारी होतात! आणि अशी ही आत्मवैभव देणारी भाग्यलक्ष्मीच खरी महासुखाची दिवाळी साजरी करू शकते किंवा करते. दीपावली हा महाभाग्याचा महासण आहे. असं हे महद्भाग्य लक्ष्मीपूजनाच्या अमावास्येनंतर प्रतिपदेच्या चंद्रकोरीतून अवतरत असतं. जसं, माणूस भाग्यवान असून पायाळूसुद्धा आहे, शिवाय त्यानं डोळ्यात ज्ञानांजनाचं दिव्यांजनही घातलं आहे. मग अशा भाग्यवान माणसाला पाताळासकट सर्व लोकांतलं वैभव का बरं प्राप्त होणार नाही! 
मित्र हो, सप्ताहात शुक्रवारी गुरुद्वादशीच्या दिवशी, धनत्रयोदशीच्या दीपावलीच्या पूर्वसंध्येला आपण सर्वजण आत्मवैभवाकडे वाटचाल करू या! 
=========== 
भावरम्य क्षण अनुभवाल! 
मेष :
तुमच्या राशीला हा सप्ताह सप्तमस्थ शुक्रभ्रमणातून अतिशय मंगलमय राहील. वैवाहिक जीवनातले भावरम्य क्षण अनुभवाल! भरणी नक्षत्राच्या व्यक्तींना ता. २३ ते २५ ऑक्‍टोबर हे दिवस कृतार्थतेचा अनुभव देणारे. मात्र, शनिवारी वाहन चालवताना काळजी घ्या. अश्र्विनी नक्षत्राच्या व्यक्तींचा मानसन्मान होईल. 
=========== 
व्यवसायात तेजी राहील 
वृषभ :
सप्ताहारंभ व्यावसायिक धनवर्षावाचा. मोठे व्यवहार होतील. व्यावसायिक तेजीचा भर राहील. ता. २३ व २४ या दिवशी मृग नक्षत्राच्या व्यक्तींना अलौकिक फळं मिळतील. गुरुभ्रमणाचा अंतिम अध्याय खणखणीत शुभफळं देईल. रोहिणी नक्षत्राच्या व्यक्तींच्या आयुष्यात शुक्रवारी शुभ घटना घडतील. धन्यता अनुभवाल. 
=========== 
वैवाहिक जीवनात भाग्योदय 
मिथुन :
यंदाच्या दिवाळीची पूर्वसंध्या मोठी भावरम्य राहील. सप्ताहाची सुरवात घरातल्या तरुणांच्या भाग्योदयाची. काहींचे वास्तुप्रवेश. वैवाहिक जीवनातला भाग्योदय धन्यतेचा अनुभव देईल. पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींना ता. २४ व २५ हे दिवस मोठे झगमगाटाचे. सेलिब्रिटी व्हाल! 
=========== 
श्रीमंतांच्या यादीत जाल! 
कर्क :
यंदाच्या दिवाळीतली भाग्यवान रास. गुरुभ्रमणाचा अंतिम अध्याय एक प्रकारचा राज्याभिषेक घडवून आणेल. आश्लेषा नक्षत्राच्या व्यक्ती श्रीमंतांच्या यादीत जातील. पुष्य नक्षत्राच्या व्यक्तींना ता. २५ चा शुक्रवार कौटुंबिक समारोहातून धन्यतेचा अनुभव देणारा. शनिवारी दुखापतीपासून जपा. 
=========== 
दैवी गुण प्राप्त होतील! 
सिंह :
हा सप्ताह दिवाळीचा उत्तम ट्रॅक पकडेल! यंदाची दिवाळी तरुणांना नटण्या-मुरडण्याची! व्यावसायिक भाग्योदयातून मोठी रोषणाई कराल. यंदाच्या दिवाळीत पूर्वा नक्षत्राच्या व्यक्ती दैवी गुणांनी संपन्न होत आहेत! ता. २३ ते २५ हे दिवस सुवर्णाक्षरांनी नोंदले जातील. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींनी शनिवारी चीजवस्तू जपाव्यात. हरवण्याची शक्यता. 
=========== 
फटाक्‍यांशी खेळ नको 
कन्या :
राशीचा मंगळ ग्रहांचा पट ताब्यात घेण्याच्या तयारीत राहील. नका खेळू फटाक्‍यांशी. बाकी, बुध-शुक्राची जोडगोळी व्यावसायिकांना ‘व्हिटॅमिन एम’ भरपूर पुरवेल. हस्त नक्षत्राच्या व्यक्तींना तजेला येईल. ता. २५ ची गुरुद्वादशी ‘खुल जा सिम्‌ सिम्’‌ करणारी. गुंतवणूक यशस्वी होईल. 
=========== 
उपासनेचा नवा अध्याय 
तूळ :
जीवनातल्या दीपोत्सवाची उत्तम तयारी करणार आहात. 
एका नव्या फॅशनचा अंगीकार कराल. स्वाती नक्षत्राच्या व्यक्तींना दीपावलीच्या पूर्वसंध्येला मोठे लाभ होणार आहेत. ता. २३ ते २५ हे दिवस एकूण झगमगाटी. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींना आत्मतृप्तीचा अनुभव येईल. उपासनेचा नवा अध्याय सुरू होईल! 
=========== 
या दिवाळीत स्वयंभू व्हाल! 
वृश्‍चिक :
जीवनाच्या फील्डवर तुम्ही चांगलेच टिकून राहिले आहात. यंदाच्या शुक्रवारच्या गुरुद्वादशीला तुमच्या साधनेचं फळ तुम्हाला मिळणार आहे. ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना ही दिवाळी स्वयंभू, स्वावलंबी बनवेल. अनुराधा नक्षत्राच्या व्यक्तींचे मोठे करारमदार दिवाळीचा मुहूर्त साधून होतील. आजच्या रविवारी पाकीट सांभाळा. 
=========== 
उत्तम नोकरीची चाहूल 
धनू :
दिवाळीच्या पूर्वसंध्येचे सप्तरंग अनुभवाल! आजचा रविवार संध्याकाळी गाठीभेटींतून भाग्यबीजं पेरणारा. तरुणांना उत्तम नोकरीची चाहूल. पूर्वाषाढा नक्षत्राच्या व्यक्तींवर शुक्रकलांची उधळण! विवाहमेळाव्याला उपस्थित राहा. मोबाईल सतत चार्ज ठेवा! मूळ नक्षत्राच्या व्यक्तींना शनिवार नोकरीत कलहजन्य. सांभाळून राहा. 
=========== 
प्रेमीजनांना उत्तम सप्ताह 
मकर :
हा सप्ताह प्रेमवीरांना उत्तमच. राहा लव्हबर्ड्‌ससारखेच! ता. २२ व २३ हे दिवस सर्वच बाबतींत क्‍लिक होणारे. व्यावसायिकांना लाभच लाभ. यंदाची दिवाळी शुक्रकलांतून साजरी होईल. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना दैवी तेज प्राप्त होईल. श्रवण नक्षत्राच्या व्यक्तींचा सन्मान होईल. 
=========== 
कलाकारांना ग्लॅमर मिळेल 
कुंभ :
दिवाळीच्या पूर्वसंध्येचा सप्ताह तुमच्यातल्या कलाकाराला जागवणारा. पूर्वाभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना मोठं ग्लॅमर मिळेल. वृद्धांना खूप जगावंसं वाटेल! शततारका नक्षत्राच्या व्यक्ती सतत अधिकार गाजवतील. आजचा रविवार कौटुंबिक भावरम्य सोहळ्याचा. इच्छुकांचा विवाह ठरेल. 
=========== 
जास्त मनावर घेऊ नका! 
मीन :
मंगळभ्रमणाचा अप्रत्यक्ष धाक राहील! भावनाप्रधान व्यक्तींनी जास्त मनावर घेऊ नये. नवपरिणितांनी काळजी घ्यावी. बाकी, ता. २१ ते २३ हे दिवस रेवती नक्षत्राच्या व्यक्तींना शिक्षण, नोकरी आणि विशिष्ट वैयक्तिक उपक्रमांतून भरघोस यशाचे. नूतन वास्तुप्रवेश. नवपरिणितांना गोड बातमी! 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com