जाणून घ्या आठवड्याचे भविष्य : 22 ते 28 सप्टेंबर

जाणून घ्या आठवड्याचे भविष्य : 22 ते 28 सप्टेंबर

मानवी संस्कृतीचा खोलवर विचार करणारी आपली भारतीय संस्कृती खरोखरच महान आहे. सृष्टीमध्ये ८४ लक्ष योनी आहेत, असं आपली संस्कृती मानते. आपली संस्कृती मनुष्यजन्म किंवा मनुष्ययोनी ही सृष्टीतली एक मोठी उत्क्रांत अवस्था समजते. मनुष्यजन्म हा अतिशय दुर्लभ आहे आणि या मनुष्यजन्माचं सार्थक कशात आहे, हे सर्व संत मंडळी सांगून गेली आहेत. शब्द आणि शब्दांचे भाव जाणणारा मनुष्य नामरूपात्मक जगाचा सूक्ष्म भाव जाणतो आणि त्या सूक्ष्म अशा परात्परभावाशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करतो. मनुष्याच्या जीवनात नामरूपातलं जडत्व पाटीवर शब्दांत अवतरत असतं. अशी ही नेमप्लेट धारण करणारा माणूस नेमप्लेट फुटली, तरी खऱ्या अर्थानं मरत नसतो. मनुष्याचा देह ही अशीच एक स्थूल असणारी नामरूपात्मक नेमप्लेट आहे. ही नेमप्लेट फुटली किंवा नाश पावली, तरी त्या नेमप्लेटमागं जतन केलेला त्या मनुष्याचा भाव मेल्यानंतर पंचतत्त्वात विलीन होऊन ज्या तत्त्वाचं चिंतन करत त्यानं प्राण सोडला असेल, त्या तत्त्वाचा आधार घेतच तो नवी नेमप्लेट आपल्या नव्या देहाला लावून सृष्टीत अवतरत असतो. 

सृष्टी आणि ही पंचतत्त्वं अतिशय सूक्ष्म भाव जतन करून असतात. माणूस जीवनभर एखाद्या व्यक्तीला किंवा वस्तूला अतिशय चिकटून राहतो. अव्यक्त हे ज्यावेळी व्यक्त होतं, त्यावेळीच ते व्यक्ती किंवा वस्तू बनतं आणि ही व्यक्ती किंवा वस्तू मग कशाचा तरी आधार घेते. या वस्तू आणि व्यक्तींचा हा आधार अर्थातच जड असतो आणि ही जड वस्तू जागा व्यापते. ही जागा व्यापणारी वस्तू आणि व्यक्ती बंधनात अडकते आणि मग या वस्तूंचा आणि वास्तूंचा (जागेचा) सातबारा जन्मजन्मांतरीचे हिशेब ठेवतो. असा हा अनंत जीवांना बांधून ठेवणारा सातबारा पितरांशी संबंधित असतो. आणि हा पितरलोक परलोकातून एका वेगळ्याच पारपत्राची (व्हिसाची) वाट पाहत असतो. 

ज्योतिष हे जीवाचं पारपत्र (व्हिसा) तपासून पाहणारं अद्‌भुत असं अध्यात्मशास्त्राचं अंगच म्हणावं लागेल. मित्र हो, सप्ताहात शनिवारी सर्वपित्री अमावस्या आहे. कालातला असा व्हिसा प्राप्त करण्यासाठी मनुष्यजन्म आहे. त्यामुळंच तो दुर्लभ आहे! असं हे संसार उल्लंघून जाणारं पारपत्र मनुष्यजन्मातच मिळू शकतो. हा खरा पीआर! 

आरोग्यविषयक पथ्यं पाळा 
मेष : मंगळाचं राश्‍यंतर ता. २८ च्या सर्वपित्री अमावस्येजवळ आपली लक्षणं दाखवेल. सप्ताह एकूणच आरोग्यविषयक पथ्यं पाळण्याचा. अश्‍विनी नक्षत्रास अमावस्येचं प्रभावक्षेत्र एकूणच दखलपात्र. भरणी नक्षत्रास ता. २६ व २७ हे दिवस महत्त्वाच्या गाठीभेटींतून शुभ. सरकारी कामं. 

घरात रुसवेफुगवे 
वृषभ : सप्ताह अतिशय नावीन्यपूर्ण शुभ फळं देईल. मार्गी झालेला शनी शुभग्रहांचा मार्ग पूर्ण मोकळा करून देईल. ता. २५ ते २७ सप्टेंबर हे दिवस वेगवान! रोहिणी नक्षत्रव्यक्ती परिस्थितीचा फायदा घेतील. अमावस्या घरात रुसव्या फुगण्याची. लक्ष देऊ नका! 

वाहतुकीत स्वतःला सांभाळा 
मिथुन : राशीच्या चतुर्थात आलेला मंगळ अमावस्येच्या प्रभावक्षेत्रात दखलपात्र. आर्द्रा नक्षत्रास ता. २९ चा शनिवार संध्याकाळी विचित्र जागरणाचा. बाकी ता. २७ चा शुक्रवार पुनर्वसू नक्षत्रास वैयक्तिक सुवार्तांचा. मात्र शनिवार विसरविसरीचा. वाहतुकीत सांभाळा. 

परदेशगमनाच्या संधी 
कर्क : सप्ताहात ता. २५ ते २७ सप्टेंबर हे दिवस मनपसंत गाठीभेटींचे. काहींना पुत्रोत्कर्ष धन्य करेल. आश्‍लेषा नक्षत्रव्यक्तींच्या हातात सत्ता येईल. नोकरीत वर्चस्व गाजवाल. परदेशगमनाच्या संधी. पुष्य नक्षत्रास अमावस्येचं प्रभावक्षेत्र भांडणात ओढणारं. 

मित्रांकडून कामं करून घ्या 
सिंह : बुध-शुक्रांची जोडगोळी सप्ताहावर अधिपत्य गाजवणारी. मित्रांकडून कामं करून घ्या. पूर्वा नक्षत्रव्यक्तींना ता. २६ आणि २७ सप्टेंबर हे दिवस शुभग्रहांचा फास्ट ट्रॅक ठेवतील. नोकरीत प्रशंसा. आई-वडिलांच्या सुवार्ता. मधा नक्षत्रास अमावस्या खर्चाची. 

सरकारी कामं उरका 
कन्या : राशीतले बुध-शुक्र सुरवातीस मोठी धमाल करतील. सरकारी कामं उरका. वादग्रस्त व्यावसायिक येणी येतील. हस्त नक्षत्रास ता. २४ आणि २५ हे दिवस वन-डे जिंकून देणारे. कोर्टप्रकरणं मार्गी लागतील. अमावस्येचं प्रभावक्षेत्र राशीच्या मंगळाची दहशत ठेवेल. गावगुंडांपासून जपा. तरुणांनी जपावं. 

संशयास्पद आर्थिक व्यवहार टाळा 
तुला : सप्ताहात संशयास्पद आर्थिक व्यवहार टाळा. लॅंड माफियांपासून सावध. वास्तूविषयक व्यवहार जपून करा. बाकी बुध-शुक्रांची जोडगोळी ता. २२ ते २५ सप्टेंबर या दिवसांत विशाखा नक्षत्रास फास्ट ट्रॅक मोकळा करून देईल. पटापट कामं. अमावस्या स्त्रीचिंतेची. 

मौजमजा कराल 
वृश्‍चिक : शनी मार्गी झालेला आहे. त्यामुळंच शुभग्रहांची कनेक्‍टिविटी सतत अबाधित राहीलच. सप्ताहाच्या सुरवातीस ऑफ तासांतला दंगा कराल. अर्थातच मौजमजा कराल. ता. २५ ते २६ सप्टेंबर हे दिवस चढत्या क्रमानं शुभ. ज्येष्ठा नक्षत्रास मोठा लाभ. 

एखादं स्पर्धात्मक यश 
धनू : मार्गी झालेला शनी आता आपल्याकडं जरा दुर्लक्ष करेल. घ्या मजा करून! ता. २६ व २७ हे दिवस जल्लोषाचे. एखादं स्पर्धात्मक यश. उत्तरा नक्षत्रव्यक्ती प्रचंड फार्मात येतील. अमावस्येजवळ मूळ नक्षत्रव्यक्तींनी सार्वजनिक जीवनात आचारसंहिता पाळावी. 

सप्ताह नावीन्यपूर्ण शुभफळं देणारा 
मकर : सप्ताह अतिशय नावीन्यपूर्ण शुभफळं देणारा. बुध-शुक्राची जोडगोळी अर्थातच लव्हबर्ड्‌स सप्ताहात अतिशय ऍक्‍टिव्ह राहतील. त्यामुळंच सप्ताहात सतत जोडीनं राहा. सर्व मंगल होईल! ता. २४ आणि २५ हे दिवस, श्रवण नक्षत्रास मोठे शुभलक्षणी. धनिष्ठा नक्षत्रास अमावस्या घबाडयोगाची. 

संसर्गजन्य रोगांपासून जपा 
कुंभ : सप्ताहावर मंगळभ्रमणाची पकड राहीलच. संसर्गजन्य रोगांपासून जपाच. पूर्वाभाद्रपदा व्यक्तींना सप्ताह संमिश्र स्वरूपाचा. घरातल्या कोणाच्या आजारपणाची छाया राहील. बाकी शततारका नक्षत्रास ता. २७ चा शुक्रवार नोकरीत सुवार्तेचा. अमावस्येला भाजण्याची भीती. 

दंतव्यथा, ज्वरपीडा शक्य 
मीन : सप्ताहात ग्रहांच्या संमेलनात अध्यक्षीय स्थान भूषवणार आहात. संमेलनात बुध-शुक्र जोडगोळी आपलं उत्तम स्वागत करतील. और क्‍या! ता. २४ आणि २५ हे दिवस सर्वतोपरी शुभलक्षणी. रेवती नक्षत्र भारदस्त होईल. अमावस्येजवळ दंतव्यथा. उत्तराभाद्रपदास ज्वरपीडा. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com