esakal | राशिभविष्य (ता. २४ जानेवारी २०२१ ते ३० जानेवारी २०२१)
sakal

बोलून बातमी शोधा

weekly horoscope

लीलाविंभराचं आलंबन!
गुरुत्वाकर्षण हा एक ताणच म्हणावा लागेल, त्यामुळेच आपली ग्रहमाला ओघानंच एका ताणानं बांधली गेली आहे. त्यामुळेच माणसाचं जीवन म्हणजे एक प्रकारची ताण-तणावांची रस्सीखेच म्हणावी लागेल! आकाशस्थ ग्रहगोलांचा ताण स्थिर झाला की एक स्थिती परिस्थिती निर्माण करते आणि ही परिस्थिती काही काळानंतर स्थित्यंतरित होऊन पुन्हा एक स्थिती निर्माण होत असते.

राशिभविष्य (ता. २४ जानेवारी २०२१ ते ३० जानेवारी २०२१)

sakal_logo
By
श्रीराम भट saptrang@esakal.com

लीलाविंभराचं आलंबन!
गुरुत्वाकर्षण हा एक ताणच म्हणावा लागेल, त्यामुळेच आपली ग्रहमाला ओघानंच एका ताणानं बांधली गेली आहे. त्यामुळेच माणसाचं जीवन म्हणजे एक प्रकारची ताण-तणावांची रस्सीखेच म्हणावी लागेल! आकाशस्थ ग्रहगोलांचा ताण स्थिर झाला की एक स्थिती परिस्थिती निर्माण करते आणि ही परिस्थिती काही काळानंतर स्थित्यंतरित होऊन पुन्हा एक स्थिती निर्माण होत असते. असं हे शह-काटशहासारखं असलेलं गुरुत्वाकर्षण विशिष्ट ताण सांभाळत पिंगा घालत असतं! याला ग्रहमालेचं खगोलशास्त्र म्हणतात! ‘ख’ म्हणजे आकाश. ‘गोल’ म्हणजे ग्रह आणि उत्पत्ती-स्थिती-लय या त्रिगतींच्या शाश्र्वततत्त्वाचं अनुसंधान ठेवणारं किंवा खगोलातील ‘रोख’ बघणारं तेच खगोलशास्त्र!

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

‘पिंडी ते ब्रह्मांडी’ या न्यायानं आकाशस्थ खगोलाचा पृथ्वीगोलावर परिणाम हा होणारच! त्यामुळेच पृथ्वीगोल खगोलातील आलंबन किंवा प्रत्यावलंबन अनुभवतच असतो आणि हेच ते खगोलातील सूर्याभोवती फिरणारं ज्योतिष!
मित्र हो, येत्या गुरुवारी येणाऱ्या शाकंभरी पौर्णिमेच्या आसपासच्या काळात ग्रहयोगांतून ग्रहांची मोठीच रस्सीखेच होणार आहे. रवी-शनी, रवी-गुरू आणि शुक्र-प्लूटो यांच्या युतीयोगांतून पौर्णिमेचं आलंबन रवी-हर्षल केंद्रयोगातूनही आंदोलित होणार आहे. शरीर आणि मन यांना जपणारा माणूस हा एक खगोलातला म्हणा किंवा पत्रिकेतला म्हणा एक योग आहे! ज्या वेळी हा माणूस मनोजय करणाऱ्या हनुमंताचं स्मरण करतो त्या वेळीच तो ब्रह्मांडाच्या पार होत या पिंडब्रह्मांडाच्या ताणाच्या पलीकडे जात असतो हेच खरं!

सप्तरंगमधील इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा.

होतकरूंना दिशा मिळेल
मेष :
हा सप्ताह मोठ्या ग्रहयोगांचा! पौर्णिमेचं प्रभावक्षेत्र उसळतं राहील. भरणी नक्षत्राच्या व्यक्तींना सर्व प्रकारची आचारसंहिता पाळावी लागेल. बाकी, पौर्णिमा होतकरू तरुणांना निश्र्चितच दिशा देईल. अश्र्विनी नक्षत्राच्या व्यक्तींना ता. २९ व ३० हे दिवस वैयक्तिक उपक्रमांद्वारे आनंदाचे जातील.

व्यवसायात मोठी प्राप्ती
वृषभ :
हा सप्ताह रोहिणी नक्षत्राच्या व्यक्तींना प्रगतीची दालनं खुली करून देणार आहे. पौर्णिमेच्या या सप्ताहात शुभ ग्रहांची लॉबी कार्यान्वित राहील. पौर्णिमेच्या आसपासच्या काळात व्यवसायात मोठी प्राप्ती. वास्तुविषयक व्यवहार करताना सावध. मृग नक्षत्राच्या व्यक्तींना पौर्णिमा सन्मानाची. मात्र, कुसंगती टाळा.

संशयास्पद व्यवहार टाळा
मिथुन :
रवी-शनी योगानं सुरू होणारा हा सप्ताह आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्तींची वादग्रस्तता वाढवणारा. संशयास्पद व्यवहार टाळा. बाकी, पौर्णिमेच्या आसपासच्या काळात जुन्या गुंतवणुकी लाभदायक ठरतील. पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींना बुधवारी अलौकिक फळं मिळतील. नोकरीत मोठा भाग्योदय.

शैक्षणिक भाग्योदय होईल
कर्क :
हा सप्ताह रवी-शनी योगातून सुरू होणारा. नकारात्मक विचार टाळा. पौर्णिमेच्या आसपासच्या काळात रवी-गुरू शुभयोगाची शुभ फळं मिळतील. पुष्य नक्षत्राच्या व्यक्तींचा शैक्षणिक भाग्योदय होईल. आश्र्लेषा नक्षत्राच्या व्यक्तींना बुधाच्या विशिष्ट स्थितीमुळे कोर्टप्रकरणात यश येईल. शुक्रवार भाग्याचा!

घरात मनावर ताबा ठेवा
सिंह :
पौर्णिमेच्या आसपासच्या काळात रवी-शनी-गुरू यांचं सान्निध्य होईल. पौर्णिमेचं प्रभावक्षेत्र अतिशय उसळतं राहील. पूर्वा नक्षत्राच्या व्यक्तींना व्यवसायात मोठा लाभ; परंतु वैवाहिक जीवनातील तणाव वाढू शकतात. मनावर ताबा ठेवा. कोरोनाचा एकांत ग्रासू देऊ नका. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्ती धनसंपन्न होतील. राजकारणी व्यक्तींपासून दूर राहा.

उपासनेचं फळ मिळेल
कन्या :
हा सप्ताह कुयोगांचा असला तरी चंद्रकलांतून अमृतस्पर्श अनुभवाल! उपासनेचं फळ मिळेल. हस्त नक्षत्राच्या व्यक्तींवर देवतासमूह प्रसन्न राहील. पौर्णिमेच्या आसपासच्या काळात देवदर्शन घ्या. अलौकिक अशा गुरुपुष्यामृतयोगाचा लाभ घ्या. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना घबाडयोग. पुत्रचिंता जाईल.

छंदामुळे प्रकाशात याल!
तूळ :
पौर्णिमेच्या आसपासच्या काळात ग्रहयोगांचा मोठा ताण राहील. काही प्रतिकूल घटना-प्रसंग घडू शकतात. स्वाती नक्षत्राच्या व्यक्तींना मातृ-पितृचिंता शक्‍य. बाकी, बुध-शुक्राच्या विशिष्ट स्थितीमुळे शुक्रवारी संध्याकाळी चित्रा नक्षत्राच्या व्यक्ती वैयक्तिक छंद-उपक्रमांमुळे प्रकाशझोतात येतील! विशाखा नक्षत्राच्या व्यक्ती पुत्रोत्कर्षामुळे धन्यता अनुभवतील.

मनाजोगी नोकरी मिळेल
वृश्र्चिक :
या सप्ताहातील रवी-गुरू शुभयोग पौर्णिमेच्या आसपासच्या काळात इतर कुयोगांवर मात करणारा. ता. २८ रोजी येणाऱ्या पौर्णिमेचा गुरुपुष्यामृतयोग अतिशय शुभ. अनुराधा नक्षत्राच्या व्यक्तींवर नक्षत्रलोकांतून पुष्पवृष्टी! शुक्रवारी ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना मनाजोगी नोकरी मिळेल. मात्र, शेजाऱ्यांशी जपून वागा.

तरुणांना स्पर्धात्मक यश
धनू :
हा सप्ताह ग्रहांच्या मोठ्या शह-काटशहाचा! राजकीय व्यक्तींनी सावधच राहावं. बाकी, बुध-शुक्र-गुरू या ग्रहांच्या विशिष्ट स्थितीतून स्वतंत्र व्यावसायिकांना मोठे लाभ होतील. तरुणांना विशिष्ट स्पर्धात्मक यश. मूळ नक्षत्राच्या व्यक्तींचा परदेशी भाग्योदय. पूर्वाषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना विवाहयोग.

संकट दूर होईल
मकर :
हा सप्ताह चंद्रकलांच्या उत्कर्षातून साजरा होणारा! सद्भक्तांना शुभदायीच. पौर्णिमेच्या आसपासच्या काळात उद्भवणारं संकट रवी-शनी-गुरू या त्रिग्रहयोगामुळे दूर होईल. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना ओळखी-मध्यस्थींतून नोकरी मिळेल. श्रवण नक्षत्राच्या कलाकारांना पौर्णिमेचा गुरुपुष्यामृतयोग भाग्याचा.

आर्थिक कोंडी फुटेल
कुंभ :
या सप्ताहात रवी-शनी युतीयोगाचं सेन्सॉर राहील. क्रिया-प्रतिक्रिया देताना सांभाळून! बाकी, रवी-गुरू शुभयोगातील पौर्णिमेमुळे व्यवसायातील आर्थिक कोंडी फुटेल. शततारका नक्षत्राच्या व्यक्ती पौर्णिमेच्या आसपासच्या काळात उत्सव-प्रदर्शनांचं आयोजन करतील. पूर्वाभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना बुधवारी संध्याकाळी सुवार्ता मिळेल.

नवं पर्व सुरू होईल
मीन :
चंद्रकलांचा उत्कर्ष कुयोगांची छाया घालवणारा. गुरुपुष्यामृताच्या पौर्णिमेला उत्तराभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींच्या जीवनातील नवं पर्व सुरू होईल. तरुणांना स्पर्धात्मक यश. ओळखींतून नोकरी मिळेल. रेवती नक्षत्राच्या व्यक्तींची शुक्रवारची संध्याकाळ सुवार्तांमुळे अधिक सुखद होईल. 

Edited By - Prashant Patil

loading image