जाणून घ्या आठवड्याचे भविष्य : 26 जानेवारी ते 1 फेब्रुवारी 

bhavishya
bhavishya

पूर्णकाम होऊ या! 
ज्योतिष हे परावाणीशी संबंधित आहे आणि आकाशालाही गिळून राहिलेली परावाणी श्रीगणेशविद्येशी संबंधित आहे. ज्योतिष हे जाणून घ्यायचं असतं. अशी ही जाणती विद्या असलेलं ज्योतिष अप्रत्यक्षपणे श्रीगणेशविद्येशी जोडलं गेलं आहे. त्यामुळेच पंचांगाचं आधिदैवत होऊन श्रीगणेश पंचांगावर अवतरत असतात. 

सगुण-निर्गुणाचा आधार घेत अव्यक्त हे काळरूपानं नांदत असतं. काळाच्या संगतीत माणसाचं सुख-दुःख जगत असतं. जडबुद्धीला धरून असलेलं सुख-दुःख देहबुद्धीच्या आरशात आपला चेहरा बघत असतं. अशा या आरशासमोर सतत उभा राहणारा माणूस उजळलेलं सुख किंवा सुकलेला किंवा सुरकुत्या पडलेला दुःखाचा चेहरा बघत असतो. ज्योतिष हे वेदांग आहे. वेदांची भाषा श्रीगणेशांच्या परावाणीचा स्पर्श घेतच वदली आहे. ‘त्वमेव केवलम्‌ कर्तासि, त्वमेव केवलम्‌ धर्तासि आणि त्वमेव केवलम्‌ हर्तासि’ असा पूर्णतेचा बोध देणारी श्रीगणेशविद्या परेचा संग घेत जीवनात श्रीगणेशाच्या रूपानं शांततेची प्रतिष्ठापना करत असते. कालसत्ता, कलासत्ता आणि वस्तुसत्ता या त्रिविधसत्तांना एकाच वेळी धारण करत श्रीगणेश एक प्रकारचा अद्भुत विश्वप्रपंच चालवत असतात. कर्ता, धर्ता आणि हर्ता एकमेव असलेले श्रीगणेश हे एक योगांगस्वरूप आहेत. श्रीगणेशविद्या ही एक योगाची युक्ती आहे. अशी ही श्रीगणेशांची योगविद्या शिकली की खरं ज्योतिष किंवा ज्योतिषाचं पंचांग जाणता येऊन आत्मसिद्धीचा मुहूर्त किंवा आत्मसिद्धीची चंद्रकला साधता येते. चतुर्थीच्या चंद्रोदयाचा अर्थ समजून घेऊन मनाचं उन्मन गाठलेला योगीच आपल्या जन्माला येण्याचा मुहूर्त सार्थकी लावत असतो. 

मित्र हो, सध्या मकर राशीत शनी आणि धनू राशीत गुरू मार्गक्रमण करत आहे. जीवन ही एक मार्गक्रमणा आहे आणि ही जीवनाच्या पंचांगाची मार्गक्रमणा एक प्रदक्षिणाच आहे. शनीची पावलं आणि गुरूची निष्ठा अशा संयोगातून आपण या सप्ताहात येणाऱ्या श्रीगणेशजन्माचा मुहूर्त साधत पूर्णकाम होऊ या! 
=========== 
स्वतंत्र व्यावसायिकांना तेजी 
मेष :
शुक्रभ्रमणाची ग्रहयोगांतर्गत एक उत्तम स्थिती राहील. स्वतंत्र व्यावसायिकांना हा तेजीचा कालावधी प्रसन्न करेल. अनेकांसाठी श्रीगणेशजयंती भाग्य घेऊन येईल. भरणी नक्षत्राच्या व्यक्तींचा मोठा आवाका राहील. ता. २७ व २८ हे दिवस मोठ्या चैनीच्या पॅकेजचे. शनिवारी पाकीट सांभाळा. अश्‍विनी नक्षत्राच्या व्यक्तींनी प्रवासात काळजी घ्यावी. गोंधळाची शक्यता. 
=========== 
जीवनात वसंत फुलेल! 
वृषभ :
तुमची रास श्रीगणेशजन्माच्या या सप्ताहात मोठे विक्रम प्रस्थापित करेल. तरुणांनो, सप्ताहाची सुरुवात अतिशय उत्तम. ता. २७ व २८ हे दिवस सर्व प्रयत्नांना उत्तम प्रतिसाद देणारे. अर्थात प्रेमिकांनाही! तर मग साद घालाच. मृग नक्षत्राच्या व्यक्तींवर धनवर्षांव. रोहिणी नक्षत्राच्या व्यक्तींच्या जीवनात गुरुवारी वसंत फुलेल. 
=========== 
नोकरी-व्यवसायात चमत्कार 
मिथुन :
गुरुभ्रमणाची एक आत्मप्रभा राहीलच. पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींना श्रीगणेशजन्माचा हा सप्ताह पर्वणीसारखा. नोकरी-व्यवसायात चमत्कार घडतील. ता. २७ ते ता. ३० हे दिवस चढत्या क्रमानं शुभ. आर्द्रा नक्षत्राच्या तरुणांना परदेशगमनाची संधी. शनिवारी काळजी घ्या. भुरट्या चोरीची शक्यता. वाहनं जपा. 
=========== 
उत्तम मार्गदर्शक भेटतील 
कर्क :
या सप्ताहात जीवनातलं मांगल्य वाढेल. तरुणांना उत्तम मार्गदर्शक भेटतील. काहींना स्पर्धा परीक्षांत उत्तम यश मिळेल. काहींना गृहकर्ज मिळेल. और क्‍या! आश्‍लेषा नक्षत्राच्या व्यक्ती शुभघटनांमुळे फ्लॅश न्यूजमध्ये येतील. मात्र, शनिवारी उत्सवसमारंभात लहान मुलांची विशेष काळजी घ्या. 
=========== 
नोकरीच्या उत्तम संधी 
सिंह :
या सप्ताहात श्रीगणेश निश्चितच प्रसन्न राहतील आणि होतील. ता. २७ व २८ या दिवशी पूर्वा नक्षत्राच्या व्यक्ती आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतील. सेलिब्रेटी व्हाल. तरुणांना हा सप्ताह पंचवार्षिक योजना घोषित करणारा! नोकरीच्या उत्तम संधी. गॉडफादर भेटेल. मघा नक्षत्राच्या व्यक्तींनी शनिवारी काळजी घ्यावी. अचानकपणे विचित्र खर्च उद्भवेल. 
=========== 
ऑनलाईन संमोहनं टाळा 
कन्या :
या सप्ताहात तरुणांनी ऑनलाईन संमोहनं टाळावीत. नका अडकू कुणाच्या मोहात. जुगारापासून दूर राहा. बाकी, ता. २९ व ता. ३० हे दिवस शुभग्रहांच्या पॅकेजद्वारे वसंतपंचमी साजरे करणारे! चित्रा नक्षत्राच्या व्यक्ती जगाला संमोहित करतील. शनिवार अग्निभयाचा. 
=========== 
चैनीवर खर्च होईल 
तूळ :
तुमच्या राशीचा या सप्ताहात एक प्रकारचा धुडगूसच राहील! तरुणांना रसिक मित्रमंडळी भेटून त्यांची मरगळ जाईल. सप्ताहात चैनीवर खर्च कराल. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. २७ व २८ हे दिवस नावीन्यपूर्णच. जीवनात काही शुभारंभ होतील. स्वाती नक्षत्राच्या व्यक्तींचा शनिवारी बेरंग होण्याची शक्यता. नका देऊ मानवी देहबोलीकडे लक्ष! 
=========== 
काही विक्रम नोंदवाल 
वृश्‍चिक :
या सप्ताहात राशीचा मंगळ ग्रहांचा पट ताब्यात घेईल. अर्थात, तुम्ही काही विक्रम नोंदवणार आहात. हा सप्ताह एकूणच गतिमान. ता. २९ ते ३१ हे दिवस तुम्हाला शुभघटनांद्वारे फ्लॅश न्यूजमध्ये आणतील. व्यावसायिक मार्केटिंग यशस्वी होईल. ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना श्रीगणेश प्रसन्न होतील. 
=========== 
कुणाशीही हुज्जत नको 
धनू :
राशीचा गुरू तुमच्यासाठी शनिमहाराजांशी चर्चाच करत आहे! काळजी करू नका. ‘तस्मै श्रीगुरुवे नमः’. सप्ताह छानच. मात्र अहंकार टाळा. हुज्जत घालू नका. मौन ही श्रीकृष्णाची विभूती आहे हे लक्षात ठेवा! पूर्वाषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. २८ ते ३० या दिवशी दिवशी चमत्कारांची प्रचीती येईल. शनिवारी मात्र पाकीट सांभाळा. 
=========== 
शॉर्टकट मारू नका! 
मकर :
शुक्र-मंगळाची स्थिती तुमच्या राशीसाठी अद्भुत अशीच राहील. कोणताही शॉर्टकट मारू नका! धावत्या गाडीबाहेर डोकं काढू नका. बाकी, हा सप्ताह व्यावसायिक संदर्भातून उत्तमच. श्रवण नक्षत्राच्या व्यक्तींना उत्सव-समारंभातून लाभ. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींचं मार्केटिंग उत्तम चालेल. वास्तुयोग. शनिवारी चिडचिड होण्याची शक्यता. 
=========== 
नोकरीत वरिष्ठांची मर्जी 
कुंभ :
या सप्ताहात राशींच्या एक्‍स्चेंजमध्ये मोठा प्रभाव टाकणारी रास. सर्वसामान्यांमध्ये तुमचा अदृश्‍य असा दबदबा राहील. और क्‍या! पूर्वाभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्ती प्रेमाचं जाळं टाकतील! शततारका नक्षत्राच्या व्यक्तींना या सप्ताहात नोकरी-व्यावसायात अद्वितीय लाभ. नोकरीत वरिष्ठांची मर्जी राहील. मात्र, शनिवार उगाचच गैरसमजाचा. 
=========== 
कलाकारांचं परदेशगमन 
मीन :
श्रीगणेशजन्माचा हा सप्ताह गुरुभ्रमणाच्या पार्श्‍वभूमीवर उत्तमच. तीर्थाटनाचे बेत आखाल. स्वतंत्र व्यावसायिकांना सप्ताह मोठ्या तेजीचा. रेवती नक्षत्राच्या व्यक्ती ओळखी-मध्यस्थीतून मोठे लाभ उठवतील. एखाद्या स्त्रीकडून मोठं काम होईल. कलाकारांना परदेशगमनाची संधी. शनिवारी घरात लहान मुलांचा धुडगूस. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com