जाणून घ्या आठवड्याचे भविष्य : 29 सप्टेंबर ते 6 ऑक्टोबर

श्रीराम भट 
रविवार, 29 सप्टेंबर 2019

जीव हा शिव आहे आणि हा चिदम्बर असलेला जीव आपल्या हृदयाकाशातला हुंकार ज्यावेळी या चिदम्बरामध्ये विरवून टाकतो. त्यावेळीच त्या जीवघटकाची घागर शिवतत्त्वाची अनुभूती घेते आणि हेच खऱ्या अर्थानं जीवाचं घागरी फुंकणं होय! 

सूर्य, चंद्र आणि आकाश यांना साक्षी ठेवून या विश्‍वात आदिशक्ती सर्व काही आपणच होऊन, आपल्या आपल्याशीच खेळत असते. नवद्वारं तीच होते, नवचक्रं तीच होते; आणि जागृत, स्वप्न आणि सुषुप्ती तीच होते आणि सर्वांत आश्‍चर्य म्हणजे या आदि चित्‌शक्तीला धारण करणारा चिदम्बर दिशांचं वस्त्र पांघरून आदिशक्ती आपणच होऊन,

तिच्याच पोटी जीव म्हणून जन्माला येतो! 
अचिंत बाळक सावध जालें । निःशब्दी बोभाइले मीचि मिचि। 
गरोदरेविण बाळक जाले । माया मारुनि गेले निरंजना । 
सत्तीस करा घोंटु पै घेतला । उदरेविण भरले पोट देखा । 
सहजगुण होते निर्गुण जाले । भलत्या झोंबले निराकारे । 
बापरखमा देविवरू शून्याशून्याहूनि वेगळे । 
त्या बालका सामाविले । आपल्या व्योमी ।। 
शून्य नाही निरशून्य नाही । तेथे पाळणा पाही लावियेला । 
जातिविण बाळ उपजले पाही । तेथे परिये देते माय ते ही नाही ।। 
बापरखुमा देविवरू विठ्ठली पाळणा नाही । तेथे मी बाळ पाही पहुडलो।। 
- संत ज्ञानेश्‍वर महाराज 

पृथ्वीच्या घटाघटांमध्ये चिदंबर आदिशक्तीचं रूप होऊन नांदत असतो. या आकाशामध्ये सूर्याच्या प्रकाशाचा सत्त्वगुण घेऊन चंद्रकला पोसल्या जातात आणि या पृथ्वीवर जीव जन्माला येतो किंवा जीव जन्माला येतात. जीव हाच मुळी एक घट आहे आणि या घटात आदिशक्तीचा हुंकार निःशब्द आकाशातून अवतरत असतो. असा हा सोऽहं सोऽहं म्हणणारा जीव दशादिशांच्या झुल्यामध्ये झोका घेत असतो. 

जीव हा शिव आहे आणि हा चिदम्बर असलेला जीव आपल्या हृदयाकाशातला हुंकार ज्यावेळी या चिदम्बरामध्ये विरवून टाकतो. त्यावेळीच त्या जीवघटकाची घागर शिवतत्त्वाची अनुभूती घेते आणि हेच खऱ्या अर्थानं जीवाचं घागरी फुंकणं होय! 

तरुणांना उत्तम विवाहस्थळं 
मेष :
बुध-शुक्राची राश्‍यंतरं नवरात्रात घागरी फुंकतील. तरुणांना सप्ताह उत्तम विवाहस्थळं आणून देईल. ता. ३० सप्टेंबर आणि ता. १ ऑक्‍टो. हे दिवस अश्‍विनी नक्षत्रास जनसंपर्कातून शुभ. नोकरीच्या उत्तम मुलाखती. स्त्रीचं उत्तम सहकार्य. भरणी नक्षत्रास ता. ३ चा गुरुवार धनचिंता घालवेल. 

व्यावसायिक तेजी जाणवेल 
वृषभ :
सप्ताहात आहारविहारादी पथ्यं पाळाच. बाकी नवरात्रात गुरुभ्रणातून ता. ३ आणि ४ हे दिवस घरात तरुणांच्या सुवार्तांतून धन्य करतील. मृग नक्षत्रास मानसन्मान. कृत्तिका नक्षत्रास व्यावसायिक तेजी जाणवेल. रोहिणी नक्षत्रास शनिवार चोरीचा. 

कला, छंद, इतर उपक्रमांतून ग्लॅमर 
मिथुन :
सप्ताहात बुध-शुक्राची राश्‍यंतरं तात्काळ क्‍लिक होणारी. मृग नक्षत्रास कला, छंद वा इतर बौद्धिक उपक्रमांतून ग्लॅमर देणारं यंदाचं नवरात्र. व्यावसायिकांची उत्तम वसुली. पुनर्वसू नक्षत्रव्यक्तींना आजचा घटस्थापनेचा दिवस दैवी प्रचिती देणारा. सोमवार धनवर्षावाचा. गृहिणींना सुवार्तांचा. आर्द्रास नोकरी. 

शुभघटना घडतील 
कर्क :
नवरात्र शुभग्रहांच्या उत्तम सुरावटीचं. नवपरिणीतांना छानच. आश्‍लेषा नक्षत्रास यंदाचं नवरात्र अतिशय मंगलमय. अष्टसात्त्विक भाव जागृत होतील. पुष्य नक्षत्रव्यक्तींना ता. २ ऑक्‍टोबरचा ललितापंचमीचा दिवस शुभघटनांतून भावरम्य. वास्तुयोग. पुनर्वसू नक्षत्रास वास्तुयोग. 

भव्य यश खेचून आणाल 
सिंह :
सप्ताहात आपल्यावर आकाशस्थ देवतासमूह प्रसन्न राहील. पवित्र विचारांनी भारून जाल. मघा आणि उत्तरा नक्षत्रव्यक्ती एखादं भव्य यश खेचून आणतील. तरुणांनो, नोकरीच्या मुलाखतीसाठी तयारी कराच, ता. २ ऑक्‍टोबरची ललितापंचमी भाग्य घेऊन येणारी. 

नोकरीतलं आसन बळकट 
कन्या :
चित्रा नक्षत्रव्यक्ती सप्ताहात सुवार्तांतून फ्लॅशन्यूजमध्ये येतील. सप्ताह व्यावसायिक भाग्यबीजं पेरणारा. सप्ताहाची सुरवात नोकरीतलं आसन बळकट करणारी. सप्ताहात हस्त नक्षत्रास मानसन्मानाचे योग. मात्र, शनिवार वाहनपीडेचा. रस्त्यावर जपा. 

बढतीची चाहूल लागेल 
तूळ :
सप्ताहात राशींच्या एक्‍स्चेंजमध्ये धमाल उडवणारी रास. चित्रा नक्षत्रव्यक्ती जीवनातले मोठे चौकार- षटकार ठोकतील. एकूणच नवरात्र मंगलमयच राहील. विशाखा नक्षत्रास आजचा रविवार मोठा शुभशकुनी. नोकरीत बढतीची चाहूल. 

जीवनात स्त्रीशक्तीचं पदार्पण 
वृश्‍चिक :
या नवरात्रात आपल्यातल्या दैवी शक्तींचं जागरण होणार आहे. राशीतला गुरू आपल्या अंतिम अध्यायात सर्व शक्ती प्रदान करेल. यंदाची ललितापंचमी ज्येष्ठ नक्षत्रव्यक्तींचं पूर्ण शुद्धीकरण करणारी आहे. अनुराधा नक्षत्रास विवाहयोग. जीवनात स्त्रीशक्तीचं पदार्पण. 

मोठ्या माणसांच्या भेटी होतील 
धनू :
सप्ताहातली बुध-शुक्रांची राश्‍यंतरं तात्काळ फलदायी होणार आहेत. सप्ताहाची सुरवात मूळ नक्षत्रास जीवनसत्त्वांचा पुरवठा करणारी. सप्ताहात मोठ्या माणसांच्या भेटी होतील. जीवनातली एखादी खंत जाईल. उत्तरा नक्षत्रास आजचा रविवार दृष्टांत देणारा. शत्रू मित्र बनेल. स्त्री प्रसन्न होईल. 

मानसिक पातळीवर समाधान लाभेल 
मकर :
सप्ताह मानसिक पातळीवरून मोठ्या भावस्पंदनातून सुगंधित करणारा. उत्तराषाढा आणि धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना यंदाचं नवरात्र जीवनातली मुक्ती आणि शक्ती याचं सूत्र गवसून देणारे. यंदाची दसरा- दिवाळी व्यावसायिक तेजीचीच. श्रवण नक्षत्रास गुरुवार मानसन्मानाचा. 

विशिष्ट शुभघटनांतून जीवनात जान 
कुंभ :
बुध- शुक्रांची राश्‍यंतरं सप्ताहात तात्काळ सुपरिणाम करतील. तरुणांना हा सप्ताह विशिष्ट शुभघटनांतून जीवनात जान आणणारा. प्रेमिकांना हा सप्ताह अंगावरून मोरपीस फिरवणारा. धनिष्ठा नक्षत्रास नवरात्रात नोकरीचा लाभ. पूर्वाभाद्रपदा नक्षत्रास सप्ताहाचा शेवट मानसन्मानाचा. 

विशिष्ट शुभघटनांतून जीवनात जान 
मीन :
सप्ताह व्यावसायिक तेजीचाच. सप्ताहाच्या सुरवातीस मोठी वसुली. विशिष्ट वास्तुविषयक व्यवहार. पूर्वाभाद्रपदा आणि रेवती नक्षत्रास आजचा रविवार सप्ताहाचं सुंदर बजेट घोषित करेल. तरुणांना नोकरीच्या उत्तम संधी. कोर्टप्रकरणं मार्गी लागतील.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: weekly horoscope 29 September to 6 October 2019