राशिभविष्य (२९ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर २०२०)

weekly horoscope
weekly horoscope

आज कलिदाह संपवूच!
या विश्र्वात कोटी कोटी संकल्प क्षणाक्षणाला उठत असतात आणि विकल्पाच्या भोवऱ्यात सापडत, या पृथ्वीवरील अथांग विचारसमुद्रात खदखदतात, खळखळतात, उसळतात आणि फेसाळतातही! असं हे खदखदणारं, खळखळणारं, उसळणारं आणि फेसाळणारं सुख-दुःखांचं विचारवारं कधी कधी मंजूळ झुळूकही होतं आणि कधी कधी हे विचारवारं वादळी रूप धारण करून तडाखेही देतं. असं हे बिचाऱ्या तथाकथित विचारी माणसाचं जीवन हिंदोळ्यावर झोका घेत असतं म्हणे!

इच्छा द्वेषः सुखंदुःखं संघातश्र्चेतना धृतिः।
एतत्क्षेत्रं समासेनं सविकार मुदाहृतम्‌।।
- श्रीमद्भगवद्गीता

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

एकाच चैतन्याच्या प्रकाशात माणसं विकारग्रस्त होऊन विशिष्ट विचारगृहात राहत असतात. विकारलेली ही पृथ्वी अनेक अमृतवल्ली किंवा विषवल्ली समानतेनं पोसत असते. माणूस आपलं जीवन विषमय करत असतो. एकच ईशसंकल्प तेवढा या पृथ्वीवर ‘क्षमा’ होऊन राहिला आहे. ईशसंकल्पाच्या साक्षित्वात माणसाचं जीवन अमृतमय होत असतं. अर्थातच प्रभूच्या स्मरणात उठणारे संकल्प हे वासनारूप नसतातच! माणसाचा ‘संकल्प’ हा ज्या वेळी ‘इच्छा’ होतो त्या वेळी तो ‘विकारवश’ होतो. अशी ही विकारलेली इच्छा द्वेष जवळ करते आणि हा द्वेष माणसाला सुख-दुःखांच्या द्वंद्वात टाकून माणसाची विचारांची ॲसिडिटी वाढवत त्या तापलेल्या तव्यावर अक्षरशः त्याला परतून काढतो. यालाच कलिदाह म्हणतात!

मित्र हो, आजच्या त्रिपुरारी पौर्णिमेच्या प्रभावक्षेत्रात बौद्धिक कुंभ राशीत नेपच्यून मार्गी होत आहे. ज्योतिषात नेपच्यून हे माणसाचं अंतर्मन आहे. सध्या माणूस विचारांनी पोळला जातोय. माणूस हा त्रिगुणांच्या तावडीत सापडून सुख-दुःख भोगत असतो. कोणतीही गोष्ट मिळवण्याचा अट्टहास भोगत असतो. कोणतीही गोष्ट मिळवण्याचा अट्टहास हाच मुळी राक्षस आहे! माणसाचं जीवन हे ईशसंकल्पाच्या प्रकाशात एक सहजसाधना व्हायला पाहिजे, तरच या त्रिगुणांत अडकलेली राक्षसी वृत्ती संपवता येऊन आपल्याला त्रिपुरारी पौर्णिमा साजरी करता येईल.

संसर्गजन्य बाधेपासून सावध
मेष :
अश्र्विनी नक्षत्राच्या व्यक्तींसाठी हा सप्ताह पौर्णिमेच्या प्रभावक्षेत्रात दखलपात्र राहील. संसर्गजन्य बाधेपासून सावध. प्रवासात जपा. ता. तीन व चार या दिवशी भरणी नक्षत्राच्या व्यक्तींना महत्त्वाच्या कामांच्या गतिमानतेमुळे ताण पडेल. मात्र, नोकरीत शुभ. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींनी घरात गैरसमज होणार नाहीत याची काळजी घ्यावी.

मित्रांशी गैरसमज नकोत
वृषभ :
छायाकल्प ग्रहणाची पौर्णिमा तरुणांना मानसिक पातळीवरून प्रतिकूल. मित्रांशी गैरसमज होऊ देऊ नका. ता.तीन व चार या दिवशी वैयक्तिक सुवार्ता कळतील. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना नोकरी मिळेल. रोहिणी नक्षत्राच्या व्यक्तींना वास्तुयोग. मृग नक्षत्राच्या व्यक्तींना पौर्णिमा विचित्र गुप्तचिंतेची.

न बोलता कामं होतील!
मिथुन :
भावनात्मक ऊर्मी घेऊन जगणारी तुमची रास या सप्ताहात जीवनातील एक छानसा सूर आळवेल. छंदात मग्न राहा, ध्येयप्रकाशात वाटचाल करत राहा. गुरुवारची संकष्ट चतुर्थी अद्भुत फळं देईल. मौनात राहा. न बोलता कामं होतील! आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्तींना दैवी चमत्कार थक्क करतील. पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींविषयी पौर्णिमेच्या आसपासच्या काळात गैरसमज होतील. काळजी घ्या.

नोकरीत अनपेक्षित भाग्योदय
कर्क :
गुरूचं मंत्रालय या सप्ताहात प्रभावीरीत्या काम करेल! थोरा-मोठ्यांच्या ओळखींतून मोठे लाभ. आश्र्लेषा नक्षत्राच्या व्यक्तींना पौर्णिमेच्या आसपासचा काळ अपवादात्मक परिस्थितीत लाभदायक. पुष्य नक्षत्राच्या व्यक्तींना शुक्रवारी वैवाहिक जीवनातली सुवार्ता कळेल. नोकरीत अनपेक्षित भाग्योदय. वास्तुयोग.

वृद्धांची काळजी घ्या
सिंह :
पौर्णिमेच्या आसपासचा काळ तुमच्या राशीला संमिश्र स्वरूपाचा राहील. घरातील वृद्धांची काळजी घ्या. बाकी, पूर्वा नक्षत्राचे तरुण नोकरीतील घटनांमुळे प्रसन्नता अनुभवतील. गुरुवार अतिशय शुभदायक. विशिष्ट व्यावसायिक करारमदारांमुळे भविष्यात खात्रीपूर्वक लाभ होईल. शनिवार प्रवासात बेरंगाचा.

सरकारी कामं मार्गी लागतील
कन्या :
पौर्णिमेच्या आसपासच्या काळात व्यावसायिकांना मोठे लाभ. हस्त नक्षत्राच्या व्यक्तींना नोकरीतील विशिष्ट नव्या रचनेचा लाभ होऊन काहींना परदेशी जाण्याची संधी. या सप्ताहात आई-वडिलांशी भांडू नका. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्ती ता. तीन व चार या दिवशी बाजी मारतील. गुंतवणुकींतून लाभ. सरकारी कामं मार्गी लागतील.

उधार-उसनवारी करू नका
तूळ :
पौर्णिमा संमिश्र स्वरूपाची फळं देईल. व्यावसायिक जुगार टाळा. उधार-उसनवारी करू नका. बाकी, स्वाती नक्षत्राच्या व्यक्तींना प्रियजनांबाबत गुरुवारी सुवार्ता कळतील. आनंदोत्सव साजरा कराल. स्वतंत्र व्यावसायिकांना मोठे लाभ. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींना शनिवार कलहजन्य. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींची खरेदीत फसगत होण्याची शक्यता. 

व्यावसायिक संकट टळेल
वृश्र्चिक :
राशीतील छायाकल्प चंद्रग्रहण स्त्रीविरोधी! स्त्री-पुरुषसंबंधांबाबत सावधच राहा. बाकी, विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींना पौर्णिमेच्या आसपासच्या काळात शुभ ग्रहांचे अंडरकरंट गुप्तपणे लाभ देतील! व्यावसायिक संकट टळेल. अनुराधा नक्षत्राच्या व्यक्ती पुत्रोत्कर्षामुळे धन्यता अनुभवतील. ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींनी पौर्णिमेच्या आसपासच्या काळात राजकारण टाळावं.

मोठी झेप घेणार आहात! 
धनू :
उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना एका ऐतिहासिक ग्रहमानातून नेणारा सप्ताह. फक्त धीर धरा. मोठी झेप घेणार आहात! ता. दोन व तीन या दिवशी पूर्वाषाढा आणि उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींच्या भाग्योदयाचा प्रारंभ. मूळ नक्षत्राच्या व्यक्तींनी या सप्ताहात घरात मानसिक संतुलन राखावं. शनिवारी काळजी घ्याच.

शुभसंकेत मिळतील
मकर :
पौर्णिमेनं सुरू होणारा हा सप्ताह प्रगतीची सप्तपदीच घालणार आहे! श्रवण नक्षत्राच्या व्यक्तींच्या व्यवसायात सप्ताहाच्या सुरुवातीला मोठी तेजी येईल. शुक्रवारी जीवनातील मोठे शुभ संकेत मिळतील. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्ती नोकरीत स्थिरावतील. शनिवारी भांडू नका!

उगाचच व्याकुळ व्हाल!
कुंभ :
नेपच्यूनच्या विशिष्ट स्थितीतून होणाऱ्या आजच्या पौर्णिमेला काहीजण उगाचच व्याकुळ होतील! या सप्ताहात सद्विचारात राहा. पूर्वाभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना एखाद्या माणसाची अकारण दहशत राहील. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींनी गैरसमज होऊ देऊ नयेत. बाकी, शततारका नक्षत्राच्या व्यक्ती पौर्णिमेच्या आसपासच्या काळात शुक्रभ्रमणाचा लाभ घेतील. वैयक्तिक पातळीवर काही सुवार्ता मिळतील.

आचारसंहिता पाळाच!
मीन :
राशीच्या मंगळाच्या पार्श्वभूमीवरची पौर्णिमा आणि इतर ग्रहस्थिती आचारसंहिता पाळायलाच लावणारी! घरात क्रिया-प्रतिक्रिया व्यक्त करताना सावध! बाकी, उत्तराभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. दोन ते चार हे दिवस नोकरी-व्यवसायाच्या पार्श्वभूमीवर छानच. रेवती नक्षत्राच्या व्यक्तींना मंगळवार विचित्र मनोव्यथेचा.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com