जाणून घ्या आठवड्याचे भविष्य : 6 ते 12 ऑक्टोबर 

जाणून घ्या आठवड्याचे भविष्य : 6 ते 12 ऑक्टोबर 

ज्योतिष हे एक तत्त्व आहे. अर्थात वेदांगाशी संबंधित सर्व शास्त्रं एक तत्त्व घेऊन महद्‌तत्त्वांचा विचार करतात. माणसाचं जीवनवस्त्र किंवा माणसाच्या जीवनाचे पदर मोठे अजब असतात. या जीवनवस्त्रात गुंडाळलेली माणूस नावाची वस्तू मोबाईलसारखीच व्हायब्रेट होत असते. काहींच्या ट्युन्स कर्कश असतात. काहींच्या ट्युन्स सायलेंट असतात, तर काहींच्या ट्युन्स सायलेंटमध्येही व्हायब्रंट असतात. अशा प्रकारे अशा पाशांनी बद्ध असलेली ही माणूस नावाची वस्तू राग, द्वेष, प्रीती यांना कवटाळून कामक्रोधांच्या आवेगात सायलेंट मूडमध्येसुद्धा खदखदत असते किंवा कर्णकर्कश ट्युनमध्ये आसमंत दणाणत असते, तर काही मनुष्यरूपी मोबाईल उसने गोड आवाज घेऊन मोहाचं जाळं पसरवत असतात. 

माणूस ही एक कालसत्ता आहे. माणूस ही एक कला आहे किंवा तो एक कलेचा उन्मेष किंवा उन्मादही आहे. अशी ही काल आणि कला यांच्या दुपट्यात गुंडाळलेली माणूस ही एक अजब वस्तू आहे म्हणा किंवा मोबाईल आहे म्हणा! एवंच कालसत्ता, कलासत्ता आणि वस्तुसत्ता या त्रिविध सत्ता जगात अस्तित्वात येऊन माणूसरूपी मोबाईल खिशात घालून मोठ्या मोहमायेचं बंधन निर्माण करतात आणि अनेक कॉंटॅक्ट्‍स सेव्ह करून त्या माणसाच्या मेमरीची वाट लावतात णि मग त्याला स्मृतिभ्रंशाचा आजार जडतो. मग वेळेचं भान संपतं. ज्ञानकलेचं भान हरपतं आणि मग स्थळकाळस्थितीचंही भान राहत नाही. अशी भीषण परिस्थिती माणसाची होऊन बसते! 

हल्ली माणसानं आपल्या मेमरीमध्ये काय सेव्ह करावं किंवा करू नये याचं भान ठेवणं आवश्‍यक आहे. माणसानं आपली मेमरी सतत अपडेट ठेवायला पाहिजे. मोहमाया वाढवणाऱ्या आणि कामक्रोधांच्या अग्नीत जाळणाऱ्या मेमरी आपल्यातून काढून टाकल्या पाहिजेत. शिवाय आपण मोबाईल जसा चार्ज करतो, तसंच गुरुस्मरणातून किंवा सद्‌विचारांतून आपण सतत चार्ज होत राहिलं पाहिजे. श्रुती-स्मृती पुराणोक्त फळं मागणाऱ्या माणसानं आपल्यातल्या श्रुती आणि स्मृती गाळून घेऊन जीवनाचं तत्त्वसार सांगणाऱ्या श्रुती-स्मृती जतन केल्या पाहिजेत. तरच माणसाचा मोहमायेतून होणारा स्मृतिभ्रंश होणार नाही,आणि तुमचा देहरूपी मोबाईल हॅंग होणार नाही. 

मित्रहो, ता. ८ ऑक्टोबर रोजीच्या विजयादशमीनंतरची पाशांकुशा एकादशी दसऱ्यानंतर येण्याचं कारण असं, की माणसानं देहभावाचं सीमोल्लंघन केल्यावर कोणतेही आशापाश जिवंत न राहता, काळाच्या कलेचा ग्राहक माणूस नावाचा मोबाईल एक अनंत जीबीची कनेक्‍टिविटी साधत एका निरतिशय अशा आनंदस्पंदातून कोजागरी पौर्णिमेकडे वाटचाल करतो! 

वैवाहिक जीवनातून सुवार्ता 
मेष : सप्ताह राजकीय व्यक्तींना मानवी उपद्रवाचा वा प्रदूषणाचा. ता. ७ चा सोमवार एकूणच आपल्या राशीस विचित्र संगतीचा. बाकी अश्‍विनी नक्षत्रास ता. १० चा गुरुवार व्यावसायिक उत्सव, प्रदर्शनांतून लाभाचा. वैवाहिक जीवनातून सुवार्ता. भरणी नक्षत्रास शनिवार प्रवासात त्रासाचा. 

व्यावसायिक शत्रुत्वातून त्रास 
वृषभ : सप्ताहाची सुरवात सप्ताहाची एकूणच संगती बिघडवणारी. व्यावसायिक शत्रुत्वातून त्रास. रवी-शनी केंद्रयोगाची पार्श्‍वभूमी विचित्र भयचिंता ठेवेल. मृग नक्षत्रास जाणवतील अशी फळं मिळू शकतात. रोहिणी नक्षत्रास दसऱ्याचा दिवस अचानक धनलाभाचा. वसुली होईल. शुक्रवारी मोठी चैन कराल. 

विचित्र मानसिक दडपण येईल 
मिथुन : सप्ताहाची सुरवात घरात अशांततेची. पुनर्वसू नक्षत्रास रवी-शनी कुयोगातून विचित्र मानसिक दडपण येईल. घरगुती हेवेदावे. वास्तुविषयक व्यवहार साशंक बनतील. आर्द्रा नक्षत्रास ता. ९ ते ११ ऑक्टोबर हे दिवस वैयक्तिक सुवार्तांचे. स्पर्धात्मक यश. परदेशगमनाची संधी. 

नोकरीतून परदेशगमन 
कर्क : बुध-शुक्रांच्या लव‍बर्ड्‌सची जोडी क्रियाशील राहील. गोडीगुलाबीनं कामं करून घ्याल. विजयादशमीचा दिवस विजयोत्सवाचा. नोकरीतलं एक सुंदर पर्व सुरू होईल. पुष्य नक्षत्रास सप्ताहात नोकरीतून परदेशगमन. काहींना अपवादात्मक पार्श्‍वभूमीवर बढती. आश्‍लेषास जुनाट व्याधींतून त्रास. 

रोगनिदानातून अस्वस्थता 
सिंह : सप्ताहाच्या सुरवातीस रवी-शनी कुयोगाच्या पार्श्‍वभूमीवर विचित्र मानसिक त्रास. रोगनिदानातून अस्वस्थता. पूर्वा नक्षत्रास प्रेमभंगातून मानसिक औदासीन्य. बाकी मघा नक्षत्रास ता. ९ आणि १० हे दिवस अकल्पित यश देणारे. ओळखी-मध्यस्थीतून लाभ. नोकरीत आनंदोत्सव. व्यावसायिक वसुली. 

आई-वडिलांशी मतभेद 
कन्या : वादग्रस्त पार्श्‍वभूमीवर विचित्र पैलू दाखवणारा सप्ताह. रवी-शनी कुयोगाची विचित्र छाया राहील. काहींना राजकारणातून त्रास. आई-वडिलांशी मतभेद. हस्त नक्षत्र सप्ताहाच्या सुरवातीस अस्वस्थ राहील. उत्तरा नक्षत्रास विजयादशमीजवळ मोठे धनलाभ. शनिवार स्त्रीविरोधी. 

मोठे आर्थिक व्यवहार 
तुला : विशाखा नक्षत्रास रवी-शनी कुयोगाची पार्श्‍वभूमी रसभंग करणारी. उत्सवसमारंभातून बेरंग. विचित्र गाठीभेटी. काहींना सुरवातीस राजकीय दहशत. स्वाती नक्षत्रास ता. ८ ते ९ ऑक्‍टोबर हे दिवस विजयादशमीच्या पार्श्‍वभूमीवर सीमोल्लंघन करणारे. मोठे आर्थिक व्यवहार. 

सप्ताह दगदगीचा 
वृश्‍चिक : सप्ताहात ‘स्टॉपिंग ॲट ऑल’ स्टेशन्सची एक लोकल गाडी राहील. एकूणच दगदगीचा सप्ताह. सप्ताहातली बुध-हर्षल योगाची पार्श्‍वभूमी धक्काबुक्की करणारी. सतत सांडासांड आणि नुकसानी. ज्येष्ठा नक्षत्रास जाणवतील अशी फळं मिळतील. सप्ताहात अनुराधा नक्षत्राची प्रसन्न देवदर्शनं. 

गुंतवणुकींतून लाभ 
धनू : विचित्र मानसिक दडपणाचाच सप्ताह. सप्ताहाची सुरवात रवी-शनी कुयोगाच्या पार्श्‍वभूमीवर ढगाळच. घरातल्या तरुणांचे प्रश्‍न उद्‌भवतील. पूर्वाषाढा नक्षत्रास सप्ताहाची सुरवात मानसिक गोंधळाची. मूळ नक्षत्रास यंदाचा दसरा व्यावसायिक मोठ्या प्राप्तीचा आणि उलाढालीचा. गुंतवणुकींतून लाभ. 

नोकरीत सुवार्तांची पार्श्‍वभूमी 
मकर : सप्ताहात कौटुंबिक कलह टाळाच. रवी-शनी कुयोगाच्या पार्श्‍वभूमीवर घरातल्या ज्येष्ठांची काळजी घ्या. विश्वासू नसलेल्या आणि जुगारी, व्यसनी व्यक्तींची संगत टाळाच. श्रवण नक्षत्रास सुरवातीस यंत्र, वाहनं आणि कामगार इत्यादी घटकांतून मनःस्ताप. उत्तराषाढास दसरा मानसन्मानाचा. नोकरीत सुवार्तांची पार्श्‍वभूमी. 

सरकारी कामांचा पाठपुरावा करा 
कुंभ : सप्ताहात बुध आणि शुक्र हे लव्हबर्ड्‌स प्रेमस्पंदनं सोडणारे. विवाहासाठी कनेक्‍टिविटी ठेवाच. ता. ९ व १० हे दिवस शततारका व्यक्तींचेच! सर्व बाबतींत फिल्डिंग लावा. सरकारी कामांचा पाठपुरावा करा. पूर्वाभाद्रपदास शनिवार वेदनायुक्त. 

नसते उपद्‌व्याप टाळाच 
मीन : सप्ताहात ग्रहांची खराब समीकरणं होत आहेत. नसते उपद्‌व्याप टाळाच. स्त्रीवर्गाशी जपून वागा. रेवती नक्षत्रास सप्ताह नोकरीत मानवी प्रदूषणाचाच. राजकारणाचे बळी व्हाल. उत्तराभाद्रपदास शनिवार मंगळाच्या हाय व्होल्टेजचा. भाजण्या-कापण्याच्या दुर्घटना शक्‍य. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com