जाणून घ्या आठवड्याचे भविष्य : 8 ते 14 सप्टेंबर 

श्रीराम भट 
रविवार, 8 सप्टेंबर 2019

जीवन हेच मुळी एक अनंताचं सूत्र आहे; किंबहुना चतुर्दशभुवनांना बांधून ठेवणारं हे अनंताचं सूत्र म्हणजेच अनंतचतुर्दशीच्या व्रताचं सूत्र किंवा दोरा होय! भाद्रपद महिना हा भगवंताचा अर्थातच भागवताचा महिना आहे. माणसाचे भोग हे ज्या वेळी भक्तिरूप होतात त्या वेळीच ते भोग भगवंतमय होतात. नाहीतर हे भोग नरकाची वाट धरतात. कौंडिण्य ऋषींनी अहंकारग्रस्त होऊन अनंताचा अपमान केला आणि आपल्या हृदयातली शांतता हद्दपार केली व आपलं आध्यात्मिक ऐश्‍वर्य घालवलं.

अनंताचं सूत्र! 
या सप्ताहात अनंतचतुर्दशी आहे. त्यानंतर होणारी भाद्रपदा पौर्णिमा नेपच्यूनच्या प्रतियुतीत एक प्रकारे व्हायरसग्रस्तच होत आहे. नेपच्यून हा ग्रह माणसाच्या आंतर्मनाशी संबंधित आहे. माणसाचं मन अहंकाराचा वारा घेत बुद्धीच्या संधी-फटींमध्ये अज्ञानाची धूळ साठवत असतं आणि या ‘डस्ट अॅलर्जी’मुळे ते क्षयग्रस्त होत असतं! असं हे खंगणारं, खोकणारं आणि खाजवणारं माणसाचं जीवनभर खटपट करत खडबडत असतं. माणसाच्या जीवनाचा असा हा खडखडणारा खटारा सतत खंत करत विषयांचं खाद्य गोळा करत खवखव करत असतो. ज्योतिष हा माणसाच्या जीवनाचा विषय आहे; परंतु हा विषय विषासारखा झाल्यास हे ज्योतिष माणसाला प्रकाशाकडं न नेता ते एका अंधारकोठडीतच डांबतं-कोंबतं. माणसाची जीवनज्योत ही ज्योतिषाशीच संबंधित आहे. माणसाचा जीव/जन्म हा जन्मांतरीचा प्रारब्ध-संचिताचा कचरावाहक असतो. माणसाची कर्मकेरसुणी विवेकाच्या मुठीत धरल्यास ही कर्मकेरसुणीच माणसाच्या जीवनातला आंतर्बाह्य कचरा पूर्णपणे काढून टाकून जीवनातली आंतर्ज्योत खऱ्या अर्थानं प्रज्वलित करते. गीतेत कायिक, वाचिक आणि मानसिक तपांचा उल्लेख आहे आणि या तपांच्या त्रिसूत्रीची गाठ अनन्यभावानं घालून कर्माला लागलेली अहंकाराची धूळ पुसली पाहिजे. 

जीवन हेच मुळी एक अनंताचं सूत्र आहे; किंबहुना चतुर्दशभुवनांना बांधून ठेवणारं हे अनंताचं सूत्र म्हणजेच अनंतचतुर्दशीच्या व्रताचं सूत्र किंवा दोरा होय! भाद्रपद महिना हा भगवंताचा अर्थातच भागवताचा महिना आहे. माणसाचे भोग हे ज्या वेळी भक्तिरूप होतात त्या वेळीच ते भोग भगवंतमय होतात. नाहीतर हे भोग नरकाची वाट धरतात. कौंडिण्य ऋषींनी अहंकारग्रस्त होऊन अनंताचा अपमान केला आणि आपल्या हृदयातली शांतता हद्दपार केली व आपलं आध्यात्मिक ऐश्‍वर्य घालवलं. तात्पर्य, माणूस अहंकारानं कर्मदरिद्री होतो आणि शांतता देणाऱ्या अनंताच्या व्रताचा त्याला विसर पडतो. भगवंताच्या अष्टभार्या किंवा अष्टसिद्धी अनंताचं व्रत करून समर्पित होत असतात. त्यामुळेच अनंताजवळ त्यांचा वास असतो. 

मित्र हो, यंदाच्या अनंतचर्तुदशीला कायिक, वाचिक आणि मानसिक तपांच्या त्रिसूत्रीची गाठ घट्ट बांधून अनंताचं भक्तिसूत्र पकडू या आणि अष्टसिद्धीचं ऐश्वर्य मिळवून अखंड शांततेचा लाभ घेऊ या! 
=========== 
रेकॉर्डब्रेक यश मिळेल! 
मेष :
बुध-शुक्र सहयोगाच्या पार्श्‍वभूमीवर या सप्ताहाच्या प्रारंभी सुखद धक्का देणाऱ्या सुवार्ता मिळतील. भरणी नक्षत्राच्या व्यक्तींना धनवर्षावाचा लाभ. विशिष्ट मान-सन्मान मिळतील. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना रेकॉर्डब्रेक यश मिळेल! मात्र, पौर्णिमेच्या आसपास पंचमहाभूतांपासून काळजी घ्या. वाहन जपून चालवा. 
=========== 
व्यवहार मार्गी लागतील 
वृषभ :
ग्रहयोगांचा एक फास्ट ट्रॅक राहील. मृग नक्षत्राच्या व्यक्तींना ता. आठ व नऊ रोजी यश मिळेल. खरेदी-विक्रीचे विशिष्ट व्यवहार मार्गी लागतील. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्ती कधी नव्हे एवढी धमाल करतील! कलाकारांचा भाग्योदय. मृग नक्षत्राच्या व्यक्तींनी पौर्णिमेच्या आसपासच्या काळात प्रवास करताना काळजी घ्यावी. 
=========== 
थोरा-मोठ्यांची मर्जी बसेल 
मिथुन :
बुध-शुक्र सहयोगातून जीवनातले विशिष्ट प्युअर सिक्वेन्स लागतील. थोरा-मोठ्यांच्या मर्जीचा लाभ करून घ्याल. पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींना नोकरीची लॉटरी. पौर्णिमेच्या आसपासच्या काळात भाजण्या-कापण्याच्या घटना घडण्याची शक्यता. स्त्रीवर्गाशी जपून वागावं. गैरसमज होऊ देऊ नयेत. 
=========== 
व्यवसायात भाग्योदय 
कर्क :
आश्‍लेषा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाची सुरवात बुध-शुक्र सहयोगातून व्यावसायिक भाग्योदयाची. विशिष्ट वसुली होईल. सरकारी काम फत्ते होईल. पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींना ता. दहा रोजी सकाळी वैवाहिक जीवनातली गोड बातमी कळेल. पती वा पत्नीस नोकरीचा लाभ. पौर्णिमेला विचित्र खर्च होण्याची शक्यता. 
=========== 
मजेदार फळं मिळतील 
सिंह :
राशींच्या एक्‍स्चेंजमध्ये भाव खाऊन जाणारी रास. काहींना बोनस शेअर्स मिळतील. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाच्या प्रारंभी मोठी मजेदार फळं मिळतील. सौंदर्यवतीचा सहवास लाभेल. परिचयोत्तर विवाह. ऑनलाईन राहाच. पौर्णिमेच्या आसपासच्या काळात वाट थोडी निसरडी राहील. पावलं जपून टाका! 
=========== 
मानवी व्हायरसपासून सावधान! 
कन्या :
उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींना या सप्ताहात फॉर्म गवसणार आहे. सोमवारची परिवर्तिनी एकादशी अक्षरशः परिवर्तन घडवणारी. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींनी पौर्णिमेच्या आसपासच्या काळात मानवी विषारी व्हायरसपासून काळजी घ्यावी. सत्त्वगुणांच्या ऑक्‍सिजनची गरज भासेल. मौल्यवान वस्तूंची नासधूस होण्याची शक्यता. 
=========== 
बाहेरचं अन्न टाळावं 
तूळ :
या सप्ताहातला बुध-शुक्र सहयोग तुम्हाला सहकार्य करणार नाहीतर मग कुणाला! फक्त गोड बोला! विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाची सुरवात अद्वितीय अशीच. जीवनातली शैलीदार फलंदाजी कराल. स्वाती नक्षत्राच्या व्यक्तींनी पौर्णिमेच्या आसपासच्या काळात संसर्गजन्य व्हायरसपासून काळजी घ्यावी. बाहेरचं अन्न टाळावं. 
=========== 
भाग्यकलिका फुलतील! 
वृश्‍चिक :
या सप्ताहातली ग्रहसमीकरणं परस्परविरोधी राहतील. 
रवी-नेपच्यून योगाचा एक व्हायरस राहील. विशिष्ट संशयास्पद स्थितीमुळे त्रास होईल. बाकी, बुध-शुक्र सहयोग विशिष्ट भाग्यकलिका घेऊन येईल आणि त्या पौर्णिमेच्या आसपासच्या काळात फुलतील. अनुराधा नक्षत्राच्या व्यक्ती त्यांचा सुगंध घेतील. ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना विवाहयोग. 
=========== 
व्यावसायिक येणं येईल 
धनू :
नोकरीतल्या विशिष्ट शुभ वार्तांमुळे मूळ नक्षत्राच्या व्यक्ती 
प्रसन्न राहतील. एखादं सावट दूर होईल. परिवर्तिनी एकादशी दैवी प्रचीतीची. व्यावसायिक येणं येईल. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींनी पौर्णिमेच्या आसपासच्या काळात प्रवासात काळजी घ्यावी. बेरंग होण्याची शक्यता. 
=========== 
नोकरीत शुभदायी काळ 
मकर :
या सप्ताहात मंगळभ्रमणाची एक धग राहील. देण्या-घेण्यातून वाद होतील. काहींना पौर्णिमा विशिष्ट नुकसानीच्या भयामुळे त्रासदायक ठरण्याची शक्यता. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्ती पौर्णिमेच्या आसपासच्या काळात संशयाच्या भोवऱ्यात सापडतील. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना पौर्णिमेच्या आसपासचा काळ नोकरीत शुभदायी. 
=========== 
सतत चर्चेत राहाल 
कुंभ :
सप्ताहातली सर्व ग्रहसमीकरणं तुमच्या राशीला बरोबर घेऊन तयार होत आहेत. अर्थात, तुमची रास या सप्ताहात घटनांच्या माध्यमातून सतत चर्चेत राहील. पूर्वाभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्ती बुध-शुक्र सहयोगाचं पॅकेज उत्तम प्रकारे वापरून घेतील; अर्थातच, युक्तीनं लाभ घेतील. मात्र, पौर्णिमेच्या आसपासच्या काळात मंगळाची धग जाणवेल. पित्तप्रकोपाची शक्यता. 
========== 
हाती घेतलेला डाव जिंकाल 
मीन :
या सप्ताहात मंगळभ्रमणाचा एक सापळा राहील. 
भाजण्या-कापण्याचे प्रसंग घडू शकतात. रेवती नक्षत्राच्या व्यक्ती पौर्णिमेच्या आसपासच्या काळात लक्ष्य होऊ शकतात. बाकी, उत्तराभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्ती बुध-शुक्र सहयोगातून विशिष्ट सिक्वेन्स लावतील आणि डाव जिंकतील. ता. दहा रोजीची सकाळ सुवार्तांची. 
=========== 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: weekly horoscope 8 September to 14 September 2019