जाणून घ्या आठवड्याचे भविष्य : 14 जुलै ते 20 जुलै

Rashi Bhavishya
Rashi Bhavishya

अमृतकलेला स्पर्श करू या! 

प्रपंच हे एक विरजण आहे आणि हे विरजण राग, द्वेष आणि प्रीती यांच्या माध्यमातून माणसाच्या प्रपंचाला लागत असतं किंवा लावलं जात असतं. प्रपंच हे प्रीतीचं पात्र आहे. प्रिय आणि अप्रिय यातून प्रपंच नासत असतो. प्रीती आणि स्नेह यांत फरक आहे. प्रीती ही आसक्ती आहे आणि स्नेह हे निरासक्त प्रेम आहे. अर्थातच शुद्ध प्रेम! दुधाला विशिष्ट दह्याचं विरजण लावल्यावरच त्याचं मंथन करून नवनीत काढण्यात येतं. प्रपंच हे कायमचं विरजण आहे. अर्थातच या विरजणासाठीचं दही कायमच उपलब्ध असतं. समर्थ रामदास म्हणतात, "प्रपंच मुळातच नासका आहे'. अर्थात, तो कायमच विरजण लावलेल्या अवस्थेतला आहे. अशा या विरजणाचं मंथन करून प्रपंचातून नवनीत काढायचं असतं आणि हे स्नेहरूपी नवनीत कढवून आणि मग त्यानं प्रपंचाची वात पेटवून निरांजन ओवाळायचं असतं आणि निरांजनाशी जवळीक साधायची असते. 

ज्योतिष हे एक निरांजन आहे. ज्योतिष हे - निरांजनाशी जवळीक साधण्यासाठी - सूर्याला मध्ये ठेवून सकाळ, संध्याकाळचा मुहूर्त साधून निरांजन ओवाळत असतं. असं हे निरांजन ओवाळणारं ज्योतिष माणसाला कर्मबंधनातून खरंतर सुटण्याचा मार्ग दाखवत असतं. कर्मबंधन हे आत्मतत्त्वाला एक प्रकारे विरजणच लावत असतं. "आत्मानात्मविवेका'च्या रवीनं हे प्रपंचाच्या प्रीतिपात्रातल्या कर्मबंधनाचं विरजण पूर्णत: घुसळून त्यातून सिद्धान्तरूप नवनीत काढायचं असतं, असंच गीता सांगते! 

या सप्ताहात ता. 16 जुलै रोजी गुरुपौर्णिमेच्या दिवशी खंडग्रास चंद्रग्रहण होत आहे. गुरूच्या धनू राशीत होणारं हे चंद्रग्रहण आत्मतत्त्वाकडं शरसंधान किंवा अनुसंधानच लावावयास सांगत आहे. सध्या मानवी मनाच्या अमृतकलेला कलियुगानं नासवलं आहे. राग, द्वेष आणि प्रीती यांच्या स्पर्शातून ही डागाळलेली अमृतकला माणसाला "सिद्धान्तनवनीत' चाटूच देत नाहीय! मित्र हो, "राहू' हे विरजण आहे. या कर्मबंधनाच्या विरजणातून सुटण्यासाठी गुरुतत्त्वाचं चिंतन करत ध्यान लावलं पाहिजे, तरच या विरजणातून 

"सिद्धान्तनवनीत' आपल्याला हस्तगत होईल! म्हणूनच या दुर्मिळ गुरुपौर्णिमेला गुरुस्मरणपूर्वक ध्यान लावून चंद्राच्या अमृतकलेला स्पर्श करू या! 

परिचयोत्तर विवाहाची संधी 
मेष : भरणी नक्षत्राच्या व्यक्तींना या सप्ताहात उत्तम फॉर्म गवसेल. परिचयोत्तर विवाहाची संधी. सप्ताहाच्या सुरवातीला शुक्रभ्रमणाचं एक पॅकेज अस्तित्वात राहील. घरातल्या तरुणांना नोकरी मिळेल. बुधवारी जीवनातलं एखादं ग्रहण सुटेल. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना ग्रहणाच्या आसपासच्या काळात दुखापतीची शक्‍यता. 

नोकरीत प्रसन्नतेचा काळ 
वृषभ : मृग नक्षत्राच्या व्यक्तींना ता. 16 व 17 हे चंद्रग्रहणाचं प्रभावक्षेत्र संमिश्र स्वरूपाचं. विचित्र गाठी-भेटी घडतील. एखादी स्त्रीचिंता सतावण्याची शक्‍यता. रोहिणी नक्षत्राच्या व्यक्तींसाठी शुक्रभ्रमणाचं एक पॅकेज रन होईल! नोकरीत प्रसन्नतेचा काळ. नोकरीतल्या नव्या जडणघडणीतून लाभ. ग्रहणाच्या आसपासच्या काळात कुत्र्यांपासून सावध राहा. 

नोकरीतली बदली टळेल 
मिथुन : अतिशय संमिश्र स्वरूपाचा सप्ताह राहील. पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींसाठी चंद्रग्रहणाचं प्रभावक्षेत्र नातेवाइकांशी विसंवादाचं. तरुणांच्या ठरलेल्या विवाहात अडचणी येण्याची शक्‍यता. बाकी, आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्ती घरात लष्करशहा बनतील! नोकरीच्या ठिकाणी राजकारणात यशस्वी व्हाल, बदली टाळाल! 

व्यवसायात तेजी राहील 
कर्क : तुम्हाला चंद्रग्रहणाचा व्हायरस सतावणार आहे. असंगाशी संग नकोच. आश्‍लेषा नक्षत्राच्या व्यक्तींना नियतीचे ट्रॅप्स लावले जातील. जग जसं दिसतं तसं नसतंच! बाकी, आजचा रविवार उत्तमच. पुष्य नक्षत्राच्या व्यक्तींना समारंभांना जाण्याचा योग. कलाकारांना लाभदायक काळ. व्यवसायात तेजी राहील. 

तरुणांना परदेशगमनाची संधी 
सिंह : काहींना ता. 16 व 17 हे ग्रहणप्रभावक्षेत्र घबाडयोगासारखं! काहींना अनपेक्षित विवाहयोग. तरुणांना परदेशगमनाची संधी. पूर्वा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहात मोठं ग्लॅमर प्राप्त होईल. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींना हा सप्ताह व्याधिग्रस्त करणारा. प्रकृती सांभाळावी. गर्भवतींनी ग्रहणकाळात काळजी घ्यावी. 

परिस्थिती चिघळवू नका! 
कन्या : हा सप्ताह अतिशय संवेदनशील राहील. शुक्रभ्रमणाचं पॅकेज तरुणांना मोठी साथ देईल. ता. 17 व 18 हे दिवस आत्यंतिक प्रवाही. हस्त नक्षत्राच्या व्यक्तींनी लाभ घ्यावा. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना चंद्रग्रहणाच्या आसपासच्या काळात एखाद्या प्रखर घरगुती विरोधाला तोंड द्यावं लागेल. परिस्थितीला वेगळं वळण लागू देऊ नका! 

मनाला लावून घेऊ नका 
तूळ : हा सप्ताह अतिशय प्रवाही राहील. सरळमार्गी वागूनच लाभ घ्या. गृहिणीवर्ग घरगुती बाबींमुळे व्याकुळ होईल. विशिष्ट गोष्टी तेवढ्यापुरत्याच घडतील. त्या मनावर घेऊ नयेत. स्वाती नक्षत्राच्या व्यक्तींना या सप्ताहात अपवादात्मक परिस्थितीतून लाभ होईल. व्हिसा मिळेल. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींनी प्रकृतीची काळजी घ्यावी. 

गुंतवणुकी फलद्रूप होतील 
वृश्‍चिक : ता. 16 व 17 हे चंद्रग्रहणाचं प्रभावक्षेत्र संमिश्र स्वरूपाची फळं देणारं. व्यावसायिकांना लाभ. जुन्या गुंतवणुकी फलद्रूप होतील. अनुराधा नक्षत्राच्या व्यक्तींना पुत्रोत्कर्षातून धन्यतेचा अनुभव. ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींच्या प्रिय वस्तूंचं चंद्रग्रहणाच्या आसपासच्या काळात नुकसान होण्याची शक्‍यता. चुटपुट लागून राहील. 

संसर्गापासून काळजी घ्या 
धनू : तुमची रास ही या सप्ताहातली ग्रहणग्रस्त रास राहील; परंतु "शुक्र तारा, मंद वारा' सुखावत राहील! पूर्वाषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. 16 जुलैची सकाळ वैयक्तिक सुवार्तांची. मूळ नक्षत्राच्या व्यक्तींना चंद्रग्रहण अन्न-पाण्यातल्या संसर्गाचं. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना भ्रातृचिंता शक्‍य. पायाला दुखापतीची शक्‍यता. 

डासांपासून सावध राहा! 
मकर : या सप्ताहात "अँटिव्हायरस टॅब्लेट्‌स' घ्याच! काहींना ज्वरपीडेची शक्‍यता. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींनी चंद्रग्रहणाच्या आसपासच्या काळात डासांपासून सावध राहावं. ता. 17 च्या संध्याकाळी श्रवण नक्षत्राच्या व्यक्तींची गुप्त चिंता दूर होईल. बाकी, आजचा रविवार एकूणच उत्तम. 

आध्यात्मिक संकेत मिळतील 
कुंभ : नेपच्यूनच्या योगातून धावणारं शुक्रभ्रमण तरुणांसाठी शैक्षणिक गोष्टींसंदर्भात उत्तमच. चंद्रग्रहणाच्या आसपास परदेशगमनाची संधी. शततारका नक्षत्राच्या व्यक्तींना चंद्रग्रहण घबाडयोगासारखं! संततीचा भाग्योदय. आध्यात्मिक संकेत मिळतील. पूर्वाभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्ती ग्रहणाच्या आसपासच्या काळात स्वत:ला कोंडून घेतील, अर्थात विचित्र वागतील! 

आई-वडिलांशी सुसंवाद राखा 
मीन : या सप्ताहात चंद्रग्रहणाच्या आसपासच्या काळात विचित्र काल्पनिक भयभीतीचा पगडा तुमच्यावर राहू शकतो. रेवती नक्षत्राच्या तरुणांनी उगाच डोकं कुरतडत बसू नये. आई-वडिलांशी संवाद साधून राहा. बाकी, उत्तराभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींसाठी हा सप्ताह जीवनातली प्युअर सिक्वेन्स लावणारा. एखादी "अनुष्का' भेटेल, अर्थातच जीवनाच्या फ्लील्डवर!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com