आठवड्याच्या भविष्यात काय लिहिलंय? जाणून घ्या : 16 ते 22 जून

bhavishya
bhavishya

पृथ्वी सूर्याला अखंड अशी सामोरी असताना पृथ्वीवरील माणसं मात्र दिवस आणि रात्र अनुभवत असतात. हा प्रकृतीचा अजब खेळ आहे. माणूस प्रकृतीचा एक अंश आहे; किंबहुना प्रकृतीच्या प्रांगणात दिवस आणि रात्रीच्या वन डे खेळणारा माणूस नावाचा प्राणी प्राणपणानं जीवनाची बाजी लावत असतो! माणसं एकीकडं जगत असतानाच त्या वेळी दुसरीकडं इतिहास घडवत असतात आणि शिवाय इतिहासापासून धडे घेऊन परत एक इतिहास घडवतही असतात! असा हा वर्ल्ड रेकॉर्ड करणारा किंवा ते मोडणारा माणूस जगावेगळा ठरत असतो! 

जगाला धरून असलेला माणूस जगावेगळा वागतो किंवा राहतो हे एक आश्‍चर्यच आहे. प्रकृतीच्या अंगानं वागणारं किंवा बागडणारं जग किंवा त्या जगात जगणारा माणूस आपली "अंगडाई' सतत दाखवत असतो. माणसाचं अंग आणि माणसाचं अंतरंग हीच दोन वेगवेगळी जगं आहेत. प्रकृती आणि अंतरंगातली विकृती या जुळ्या बहिणी असल्यासारख्या आहेत. या जुळ्या बहिणींनी माणूस नावाच्या भावाच्या भावजगतात नको इतकी लुडबुड करून माणसाला जगावेगळा प्राणी बनवलं! माणसाचा जगावेगळेपणा निःसंगातून निर्माण झाला तरच तो दिव्यत्वाची प्रचीती घेऊन खरा जगावेगळा होतो! परंतु माणूस ज्या वेळी विकृतीचा संग घेतो त्या वेळी तो जगावेगळाच होत असतो; मात्र त्या स्थितीत तो रात्रीच्या अंधकारात जन्मठेपेची अर्थातच जन्म-मरणरूपी शिक्षा भोगत असतो! 

मित्र हो, या सप्ताहात ता. 21 जूनचा "लॉंगेस्ट डे' उगवत आहे. मनुष्यजन्म हा एक दिव्यत्वाचा स्पर्श आहे. योगांगाच्या साह्यानं हा दिव्य स्पर्श अनुभवणाऱ्या माणसाच्या जीवनातच एक पूर्ण, अखंड असा दिवस उगवत असतो. पांडवांच्या जीवनात असाच अखंड तळपणारा "कृष्णसूर्य' कायमचा उगवला होता. अशा या 21 जूनच्या योगदिनी योगसाधना करून आपलं जीवन "कृष्णरूपी सूर्या'नं कायमचं उजळून टाकून एका वेगळ्या जगात प्रवेश करू या! अर्थातच जगात राहूनही जगावेगळेपण अनुभवून दिव्यत्वाची प्रचीती घेऊ या! 

भावोत्कटतेचा अनुभव 
मेष ः पौर्णिमेचा हा सप्ताह अभूतपूर्व राहील. शनी-मंगळ यांचा दबाव ग्रहांच्या पटावर राहीलच. चीजवस्तू जपा. ता. 19 व 20 हे दिवस नैसर्गिक साथसंगत देणार नाहीत. महत्त्वाच्या कामांना स्पीड ब्रेकर्स लागण्याची शक्‍यता. बाकी, भरणी नक्षत्राच्या व्यक्तींना शुक्रवार भावोत्कटतेचा अनुभव देईल. घरातल्या प्रिय व्यक्तींचा भाग्योदय. 
================== 
महिलावर्गाशी हुज्जत नको 
वृषभ ः राशीचा शुक्र पौर्णिमेच्या प्रभावक्षेत्रात उत्तम "खिलाडी' राहील. आजची रविवारची संध्याकाळ अतिशय मस्त. रोहिणी नक्षत्राच्या व्यक्तींना विवाहयोग. नोकरीतला विशिष्ट भाग्योदय आनंदोत्सव साजरा करावा असा. मृग नक्षत्राच्या व्यक्तींना सोमवार संमिश्र फलस्वरूप होईल. प्रवासात बेरंगाची शक्‍यता, पैशाचं पाकीट जपा. महिलावर्गाशी हुज्जत नको. 
================== 
मोह व प्रलोभनं टाळा 
मिथुन ः हा सप्ताह तुमची एक प्रकारची सत्त्वपरीक्षाच पाहील. मोह वा प्रलोभनं टाळा. पौर्णिमेचं फील्ड आध्यात्मिक साधनेला बळ देईल. अवश्‍य लाभ घ्या. पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींना दिव्य प्रचीती येऊ शकते! बाकी, मानवी संबंधातून नैराश्‍य आणणाराच सप्ताह. अकारण जनसंपर्क नकोच. ता. 19 व 20 हे दिवस आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्तींना संसर्गजन्य बाधेचे. 
================== 
महत्त्वाच्या वन डेज्‌ जिंकाल 
कर्क ः पौर्णिमेच्या आसपासच्या काळात ग्रहांचे दोन तट पडतील. पौर्णिमेच्या प्रभावक्षेत्रात भांडणं नकोतच. बाकी, पुष्य नक्षत्राच्या व्यक्तींना ता. 20 ते 22 हे दिवस जीवनातल्या महत्त्वाच्या वन डेज्‌ जिंकून देतील. तरुणांच्या भाग्योदयाचा काळ. आश्‍लेषा नक्षत्राच्या व्यक्तींनी राजकारणी व्यक्तींचा सहवास टाळावा. 
================== 
फोटोफिनिश यश मिळेल 
सिंह ः ग्रहांचा चक्रव्यूह भेदणारी सप्ताहातली एकमेव रास! जीवनातलं चातुर्य गवसेल. पूर्वा नक्षत्राच्या व्यक्ती "बाजीगर' होतील. सप्ताहाच्या सुरवातीला मोठी अजब फळं मिळतील. विशिष्ट फोटोफिनिश यश अपेक्षित आहे. सप्ताहाचा शेवट तरुणाईचाच. घ्या मजा करून! 
================== 
कुणाशीही स्पर्धा नको 
कन्या ः पौर्णिमेचं घातक फिल्ड राहीलच. नका करू कुणाशी स्पर्धा! घरी स्वस्थ बसा. न भांडता! चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना हा सप्ताह उपद्रवमूल्याचाच राहील. तरुणांनो, थट्टा-मस्करी टाळा. बाकी, ता. 20 ते 22 हे दिवस तुमच्या राशीला विशिष्ट वन डेज्‌ जिंकून देतील. मात्र, नका पडू प्रेमात. चॅटिंग करताना सांभाळून! 
================== 
नाजूक भावबंध जपा 
तूळ ः सप्ताहातली पौर्णिमा ग्रहांच्या सत्तासंघर्षाचीच. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींनी कोणत्याही प्रकारची बाजी लावू नये. जीवनातले नाजूक भावबंध जपावेत. तुमच्या राशीला ता. 18 व 19 हे दिवस विचित्र मनोव्यथा देणारे. जागरण होईल. 
================== 
मर्यादांचं उल्लंघन नको 
वृश्‍चिक ः पौर्णिमेच्या प्रभावक्षेत्रात जीवनातली आचारसंहिता पाळाच. सिग्नल्स तोडू नका, अर्थातच मर्यादांचं उल्लंघन करू नका. बाकी, ता. 20 ते 22 हे दिवस अतिशय शुभलक्षणी. ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना संकटांतून "लाईफ बोट्‌स' मिळतील. परदेशस्थ तरुणांचे प्रश्‍न सुटतील. प्रेमिकांचं मनोमीलन होईल! 
================== 
नोकरीत संयम राखा 
धनू ः सप्ताह ग्रहयोगांतून मोठा "ऍलर्जिक' राहील. सतत चिडचिड होईल. सरकारी कामांसंदर्भात अडथळे निर्माण होण्याची शक्‍यता. पूर्वाषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना नोकरीच्या ठिकाणी राजकारणातून लक्ष्य केलं जाऊ शकतं. काळजी घ्या. ता. 19 चा दिवस सत्त्वपरीक्षेचा. बाकी, सप्ताहाचा शेवट कर्जमंजुरीचा. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना गॉडफादर भेटेल. 
================== 
व्यावसायिक कर्जवसुली 
मकर ः आजचा रविवार श्रवण नक्षत्राच्या व्यक्तींना अतिशय शुभलक्षणी. नोकरीचं आश्‍वासन मिळेल. व्यावसायिक कर्जवसुलीतून लाभ. बाकी, ता. 19 चा दिवस एकूणच बॅड डे राहील. नका काढू चोरट्या धावा. यष्टिरक्षक मंगळ हा या सप्ताहात लक्ष ठेवून राहणार आहे! पतीचं वा पत्नीचं मन राखा. 
================== 
तरुणांचे प्रश्‍न सुटतील 
कुंभ ः पौर्णिमेच्या आसपासचं शुक्रभ्रमण शततारका नक्षत्राच्या व्यक्तींना वादळी वाऱ्यात आसरा देणारं. घरातल्या तरुणांचे प्रश्‍न सुटतील. नोकरीतली बदली टळेल. आजचा रविवार विलक्षण गाठी-भेटींचा. पूर्वाभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींसाठी ता. 19 चा बुधवार मोठ्या गोंधळाचा. प्रवासातल्या व्यक्तींची चिंता. काहींना चोरी-नुकसानीचा फटका शक्‍य. 
================== 
परिस्थिती संयमानं हाताळा 
मीन ः मोठा स्ट्रेसफुलं सप्ताह. अनपेक्षित दगदग होईल. घरातल्या वृद्धांच्या समस्यांनी घेरले जाल. जरा कळ काढा. रेवती नक्षत्राच्या व्यक्तींना पौर्णिमेचं समीकरण सोडवताना अवघड जाईल. बाकी, ता. 20 ते 22 हे दिवस अतिशय आनंदाचे. मुला-बाळांच्या सुवार्तांमुळे आनंद द्विगुणित होईल. हॉलिडे होम! 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com