जाणून घ्या आठवड्याचे भविष्य : 21 जुलै ते 27 जुलै

श्रीराम भट
रविवार, 21 जुलै 2019

जाणून घ्या आठवड्याचे भविष्य : 21 जुलै ते 27 जुलै

जग हा एक आकार आहे आणि या आकारात अनेक आकृत्या आकार घेऊन वावरत असतात. दृश्‍यमान जग हा एक प्रकाश आहे आणि हाच सूर्य आहे. सूर्य अर्थातच वस्तूचं किंवा वस्तूच्या आकाराचं प्रकाशन करत असतो. अशा या उगवत्या-मावळत्या आकृतींची जणू प्रकाशन संस्था असलेलं हे जग या आकृतींच्या असंख्य आवृत्ती काढत असतं. माणूस आपला आकार किंवा आकृती ज्या वेळी प्रथम आरशात पाहतो तेव्हा तेच आपलं रूप आहे, असं धरून चालतो. आरशावर तो पूर्ण विश्‍वास ठेवतो. ‘आरशावर विश्‍वास ठेव’ असं त्याला सांगावं लागत नाही. कारण, आरसा हे एक प्रकाशातून अवतरलेलं निखालस सत्य आहे. ‘बिंब-प्रतिबिंब न्याया’नुसार, आरसा हा प्रकाशाच्या 
घटनाचौकटीत आपलं कार्य करत असतो.

आरशात जर आपण कधीच पाहिलं नाही तरी आपलं अस्तित्व प्रकाशाप्रमाणे सतत अस्तित्वात असतंच. आरसा फुटला म्हणून काही आपण मरत नसतो! माणसं प्रपंचरूपी आरशात दिसणाऱ्या दृश्‍यरूपी प्रतिभासाला घट्ट पकडून ठेवतात आणि आपण जन्मलो आणि मेलो असं म्हणतात किंवा आपल्या प्रतिमेला धक्का बसला किंवा तिला चरा गेला असंही म्हणतात. माणसाची सुख-दुःखं ही प्रतिमेशी निगडित असतात. माणसाचा आकार हा निराकाराच्या चैतन्यप्रकाशातून अवतरत असतो. तसं पाहायला गेलं तर हा निराकारातून अवतरलेला आकार म्हणजेच एक शून्य असतं. अशा अनेक शून्यांचे बिंदू मिळून एक महाशून्य बनत असतं आणि हे महाशून्य ‘एक शून्य झेलू बाई, दोन शून्य झेलू’ असा शून्यांचा जगद्व्यापार खेळत असतं. शेवटी, शून्यांची बेरीज, वजाबाकी किंवा गुणाकार-भागाकार हा अखेरीस महाशून्यात शून्य होऊन राहत असतो! 

मित्र हो, गुरुपौर्णिमा नुकतीच होऊन गेली. सध्या गुरू हा वृश्‍चिक राशीतल्या ज्येष्ठा नक्षत्रातून वक्री स्थितीत भ्रमण करत आहे. ज्येष्ठाचा संबंध मृगजळाशी आहे. प्रपंच हे एक मृगजळ आहे, याचं ज्ञान झालं की माणसाचा प्रवास मुळाकडं सुरू होतो. त्यामुळेच ज्येष्ठानंतर मूळ नक्षत्र येतं. सध्या माणसं मृगजळात अडकली आहेत! त्यांना ज्ञानबोध देण्यासाठी गुरू हा ज्येष्ठा नक्षत्रात अधिक काळ वास्तव्य करून आहे. यंदाच्या कार्तिक महिन्यात तो शेवटी मूळ नक्षत्रात प्रवेश करेल. असा हा अद्वितीय असा गुरूचा आध्यात्मिक प्रवास राहील. या सप्ताहात मंगळ-गुरू शुभ योगातून हा गुरू अनेकांना ज्ञानबोध देईल आणि त्यांची मुळाकडं वाटचाल घडवून आणेल. 
 
वास्तूचे व्यवहार जपून करा 
मेष : हा सप्ताह कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना विशिष्ट यशामुळे चर्चेत आणेल. तरुण-तरुणींना विशेष फलदायी सप्ताह. ता. २४ व २५ हे दिवस विशिष्ट फायनल्स जिंकून देतील. अश्‍विनी नक्षत्राच्या व्यक्तींना हर्षलचं फील्ड गुगली गोलंदाजीचं. नका सोडू मर्यादा! वास्तुविषयक व्यवहार जपून करा. बाकी, शुक्राचं राश्‍यंतर वैवाहिक जीवनात उत्तम संकेतांचं. 
 
व्यवसायात धनवर्षाव होईल 
वृषभ : मृग नक्षत्राच्या व्यक्तींची स्वैर फटकेबाजी या सप्ताहात पाहायला मिळेल. बुध-शुक्र योगातून धमाल होईल. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना परदेशगमनाचा योग. ता. २२ व २३ हे दिवस एकूणच सुसंगत. रोहिणी नक्षत्राच्या व्यक्तींना आजचा रविवार व्यवसायात धनवर्षावाचा. 
 
राजकीय व्यक्तीकडून लाभ! 
मिथुन : या सप्ताहात पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्ती आयुष्यातला मोठा शृंगार साजरा करतील. गोड व्यक्ती जीवनात येतील! वास्तुविषयक व्यवहार यशस्वी होतील. ता. २३ व २४ हे दिवस ‘बहारों फूल बरसाओ’चा अनुभव देतील. आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्तींना राजकारणी व्यक्तीकडून लाभ होतील. लावा फील्डिंग! 
 
नोकरीतलं वर्चस्व वाढेल 
कर्क : राशीचा मंगळ गुरूच्या योगात तरुणांना उत्तम फलदायी ठरेल. एखादी महत्त्वाकांक्षा पूर्ण होईल. नोकरीतलं वर्चस्व वाढेल. मॅनेजमेंटच्या गुड बुक्‍समध्ये जाल! आश्‍लेषा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. २२ ते २४ हे दिवस जीवनातल्या महत्त्वाच्या वन डेज् जिंकून देणारे! पुष्य नक्षत्राच्या व्यक्तींचं कौतुक होईल. 
 
व्यवसायाचा विस्तार होईल 
सिंह : या सप्ताहाची सुरवात उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींना बुध-शुक्रांच्या विशिष्ट स्थितीतून अतिशय शुभ. ता. २४ व २५ हे दिवस जबरदस्त क्‍लिक होणारे. व्यावसायिक क्षिजितं रुंदावतील. परदेशी व्यापारात लाभ होतील. मघा नक्षत्राच्या व्यक्तींचा या सप्ताहात कार्याप्रीत्यर्थ प्रवास. प्रेमिकांच्या गुप्त गाठी-भेटी होतील! 
 
वैवाहिक जीवन बहरेल 
कन्या : या सप्ताहातली नशीबवान रास! सप्ताहातल्या बुध-शुक्र सहयोगातून सप्तपदी घालाल. अर्थातच वैवाहिक जीवन फुलेल-बहरेल. जीवनातली ‘हम दोनो’ अवस्था ता. २२ ते २४ या कालावधीत साजरी कराल! चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींचं जीवनाचं सुंदर बजेट घोषित होईल. और क्‍या! 
 
सरकारी कामं फत्ते होतील 
तूळ : या सप्ताहातला बुध-शुक्र योग तुमच्या राशीला विशेष लाभदायक. ओळखी-मध्यस्थी फलद्रूप होतील. सरकारी कामं फत्ते होतील. विशाखा नक्षत्राच्या व्यक्ती मिरवण्याची संधी साधतील! ता. २४ चा दिवस चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींसाठी अप्रतिम. स्वाती नक्षत्राच्या व्यक्तींना नोकरीत राजकारणातून त्रास होण्याची शक्यता. धीरानं घ्या! मात्र, तरुणांच्या मुलाखतींना यश. 
 
सुवार्तांद्वारे फ्लॅश न्यूजमध्ये याल! 
वृश्‍चिक : या सप्ताहात मंगळ-गुरू योगाचं पॅकेज अस्तित्वात राहील. ता. २२ ते २४ हे दिवस प्रत्येक वन डे जिंकून देणारे. ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्ती सुवार्तांद्वारे फ्लॅश न्यूजमध्ये येतील. अनुराधा नक्षत्राच्या व्यक्तींमध्ये पतीच्या वा पत्नीच्या भाग्योदयाचे संकेत आहेत. इच्छुकांना परदेशगमनाची संधी. 
 
दिलखेचक यश मिळेल! 
धनू : या सप्ताहात उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना ‘दिव्य संजीवनी’चा लाभ होईल. तरुणांना हा सप्ताह दिलखेचक यश देईल! ता. २३ ते २५ हे दिवस शुभ ग्रहांच्या अखत्यारीतले. साडेसाती विसराल! मूळ नक्षत्राच्या व्यक्तींना कोर्टप्रकरणातून यश. पूर्वाषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा शेवट वेदनायुक्त व्याधीचा. दंतव्यथा सतावेल. 
 
धावपट्टीवर टिकून राहा! 
मकर : हा सप्ताह जीवनाच्या धावपट्टीवर फक्त टिकून राहण्याचाच! नका मारू शॉर्टकट. वाहनं चालवताना काळजी घ्या. बाकी, बुध-शुक्रांची विशिष्ट स्थिती उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींची व्यावसायिक मंदी घालवेल. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींचा सामाजिक गौरव होईल. श्रवण नक्षत्राच्या व्यक्तींची कर्जवसुली. ता. २५ चा दिवस घरात कलहजन्य ठरण्याची शक्यता. 
 
मुला-बाळांचे प्रश्न सुटतील 
कुंभ : या सप्ताहात पूर्वाभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना बुध-शुक्र योगातून मोठे लाभ अपेक्षित आहेत. मुला-बाळांचे प्रश्‍न सुटतील. वास्तुविषयक व्यवहार पूर्णत्वास जातील. ता. २२ ते २४ हे दिवस अतिशय सुसंगत आणि प्रवाही राहतील. शततारका नक्षत्राच्या व्यक्तींना गुरुवार सार्वजनिक जीवनातून कटकटीचा. यंत्रपीडा वा वाहनपीडा. 
 
एखादं शत्रुत्व संपेल 
मीन : हा सप्ताह तुम्ही गाजवणार आहात. शुभ ग्रहांचे योग ग्रहांच्या पटावर आधिपत्य गाजवतील. रेवती नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहात अपवादात्मक असे लाभ होतील. एखादं शत्रुत्व संपेल. विवाहेच्छूंना मॅरेज मार्केटमधून उत्तम संकेत मिळतील. आलेल्या विवाहप्रस्तावांचा गांभीर्यानं विचार करा. पूर्वाभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना नोकरीच्या संधी. वास्तूसाठी कर्ज मिळेल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Weekly Horoscope and Panchang for 21 July to 27 July 2019