स्वागत नव्या पुस्तकांचे

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 23 एप्रिल 2017

संमोहन शास्त्र आणि उपचार
प्रकाशक ः रिया पब्लिकेशन्स, कोल्हापूर / पृष्ठं ः २०८ / मूल्य ः २५० रुपये.

संमोहन शास्त्र आणि उपचार
प्रकाशक ः रिया पब्लिकेशन्स, कोल्हापूर / पृष्ठं ः २०८ / मूल्य ः २५० रुपये.
संमोहन हे एक शास्त्र आहे आणि काही मानसिक आजारांसाठी त्याचा उपयोग होऊ शकतो, असाही एक दावा केला जातो. डॉ. राजसिंह सावंत (०२३१-२५२३७७७) यांनी या संमोहनाविषयी वेगवेगळ्या गोष्टी समजावून सांगितल्या आहेत. मन, मनाचे भाग, संमोहनाच्या अवस्था, त्याच्या पद्धती, त्याच्याबद्दलचे गैरसमज, मनोरंजक कार्यक्रम वगैरे गोष्टींविषयी त्यांनी माहिती दिली आहे. नैराश्‍यापासून भयगंडापर्यंत वेगवेगळ्या मनोविकारांची माहिती त्यांनी दिली आहे आणि संमोहन त्यासाठी कसं उपयुक्त ठरू शकतं, हेही विशद केलं आहे. 

गोड शेवट
प्रकाशक : तरुण प्रकाशन, पुणे (yogitagokhale@gmail.com) /  पृष्ठं ः १४६.
चंद्रशेखर गोखले यांनी लिहिलेली ही कादंबरी. त्यांनी सुमारे ५८ वर्षांपूर्वी ही कादंबरी लिहिली; मात्र नोकरी किंवा कौटुंबिक कारणांमुळं ती प्रकाशित होऊ शकली नाही. आता त्यांच्या सुहृदांनी ही कादंबरी प्रकाशित केली आहे. त्या काळातल्या मध्यमवर्गीय कुटुंबातलं चित्रण करणारी आणि त्या काळातलं वातावरण उभं करणारी ही कादंबरी. त्या काळाप्रमाणंच साधी-सरळ मांडणी असलेली आणि साध्या माणसांची ही कथा. कुटुंबव्यवस्था, नात्यांचे बंध, मूल्यव्यवस्था आदी गोष्टी कादंबरीतून समोर येतात. 

कबीर चिंतन
प्रकाशक ः परममित्र पब्लिकेशन्स, नौपाडा, ठाणे (पश्‍चिम) (९९६९४९६६३४) / पृष्ठं ः १९८ / मूल्य : २५० रुपये.
कबीरदास हे उत्तर भारतातले मानवतावादी संत. त्यांचं चरित्र, त्यांचे विचार-चिंतन, त्यांचं वाङ्‌मय आदींचा अनेक अंगांनी वेध घेणारं हे पुस्तक. ‘भारतीय तत्त्वज्ञान आणि कबीर’, ‘संत कबीरांचा भक्तिमार्ग’, ‘संत कबीर आणि समाजप्रबोधन’ ‘संत कबीरांचे योगविषयक योगदान’ आदी लेखांचा पुस्तकात समावेश आहे. मंगेश पाडगावकर, डॉ. सच्चिदानंद परळीकर, प्रवीण दवणे, धनश्री लेले, उद्धव कानडे, डॉ. फादर टोनी जॉर्ज आदींनी कबीरांविषयी लिहिलेल्या लेखांचा पुस्तकात समावेश आहे. देविदास पोटे यांनी संपादन केलं आहे.

तिरुपती दर्शन
प्रकाशक ः ज्ञान प्रकाशन, पुणे (९८२२२८०४२४) / पृष्ठं ः २१६ / मूल्य ः ३२५ रुपये.
तिरुपतीच्या बालाजी व्यंकटेशाशी संबंधित धार्मिक माहिती देणारं हे पुस्तक. तिरुपतीचं मंदिर, बालाजीची मूर्ती, व्यंकटेश स्तोत्र आदी गोष्टींविषयी चिंतामणी देशपांडे यांनी लिहिलं आहे. विविध आख्यायिका, स्तोत्रं, श्‍लोकांचे अर्थ यांचाही पुस्तकात समावेश आहे. धार्मिक पर्यटनाच्या दृष्टीनंही वेगवेगळी उपयुक्त माहिती देशपांडे यांनी दिली आहे. 

गुंतवणूक : एक आवश्‍यक आर्थिक नियोजन
प्रकाशक ः गोयल प्रकाशन, पुणे (०२०-२४४५३२६७) / पृष्ठं ः २१४ / मूल्य ः १९९ रुपये.
आर्थिक नियोजन हा अतिशय अवघड असा विषय आहे. शेअर बाजारापासून म्युच्युअल फंडापर्यंत गुंतवणुकीचे अनेक मार्ग असले, तरी प्रत्यक्षात त्यांच्याबाबत नेमकी माहिती फार कमी जणांना असते. अरविंद ब्रह्मे यांनी आर्थिक नियोजन करणं गरजेचं का आहे इथपासून ते गुंतवणुकीच्या वेगवेगळ्या प्रकारांबाबत या पुस्तकात माहिती दिली आहे. मुदत ठेवी, आवर्ती ठेवी, राष्ट्रीय बचतपत्र, टपाल कार्यालय मासिक उत्पन्न योजना, ज्येष्ठ नागरिक बचत योजना, पीपीएफ, शेअर्स, म्युच्युअल फंड्‌स, ईएलएसएस अशा वेगवेगळ्या योजनांविषयीच्या माहितीचा समावेश पुस्तकात करण्यात आला आहे. सोनं, स्थावर मालमत्ता, आयुर्विमा आदींबाबतही पुस्तकात विवेचन आहे. 

बखर शिक्षणाची
प्रकाशक ः राजहंस प्रकाशन, पुणे (०२०-२४४७३४५९) / पृष्ठं ः १५० / मूल्य ः १६० रुपये.
शिक्षक आणि पालक यांना उपयुक्त ठरतील अशा पुस्तकांचा परिचय करून देणारं हे पुस्तक. हेरंब कुलकर्णी यांनी ते लिहिलं आहे. पारंपरिक संकल्पना बदलायला भाग पाडणाऱ्या विचारांपासून जगभर चाललेल्या शिक्षणातल्या प्रयोगांपर्यंत अनेक गोष्टी मांडणारं हे पुस्तक. शिक्षणविषयक पुस्तकांमधल्या नेमक्‍या गोष्टी कुलकर्णी यांनी उलगडून दाखवल्या आहेत. तेत्सुको कुरोयानागी यांचं ‘तोत्तोचान’, जे. कृष्णमूर्ती यांची ‘या गोष्टींचा विचार करा’, ‘शिक्षण संवाद’, अनुताई वाघ यांचं ‘कोसबाडच्या टेकडीवरून’, रेणू दांडेकर यांचं ‘कणवू’, अरुण शेवते यांचं ‘नापास मुलांची गोष्ट’, सिल्व्हिया वॉर्नर यांचं ‘टीचर’ अशा उपयुक्त पुस्तकांचा परिचय त्यांनी करून दिला आहे. 

कोकण गांधी अप्पासाहेब पटवर्धन
प्रकाशक ः प्रा. सतीशचंद्र तोडणकर, चिंचवड (८३८००६४६४०) / पृष्ठं ः ७२ / मूल्य ः ८० रुपये.
‘कोकणातले गांधी’ अशी ओळख असणाऱ्या अप्पासाहेब पटवर्धन यांची ओळख करून देणारं हे पुस्तक प्रा. सतीशचंद्र तोडणकर यांनी लिहिलं आहे. अप्पासाहेबांचं बालपण आणि कौटुंबिक पार्श्‍वभूमी, त्यांचं शिक्षण आणि प्राध्यापकी, त्यांचं झालेलं जीवनपरिवर्तन, महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांच्याबरोबरचे त्यांचे
भावबंध आदींविषयी तोडणकर यांनी माहिती दिली आहे. अप्पासाहेबांचे विचार, त्यांची पुस्तकं, त्यांनी शौचकुपांबाबत केलेलं संशोधन, त्यांचा जीवनपट आदींविषयीही माहिती पुस्तकात समाविष्ट आहे.

बंधुताचा परिसस्पर्श
प्रकाशक ः काषाय प्रकाशन, पुणे (९०११३७२०२३) / पृष्ठं ः २६४ / मूल्य ः २५० रुपये.
बंधुता परिवारातर्फे विविध साहित्यिक आणि सामाजिक उपक्रम राबवणारे प्रकाश रोकडे यांच्या षष्ट्यब्दीपूर्तीनिमित्त तयार करण्यात आलेला हा चरित्रग्रंथ. ॲड. भास्करराव आव्हाड, डॉ. रामचंद्र देखणे, उद्धव कानडे, डॉ. अश्‍विनी धोंगडे, प्रा. अशोककुमार पगारिया, ॲड. प्रमोद गुजर आदींनी रोकडे यांच्याविषयी लिहिलं आहे. विविध पुस्तकांत रोकडे यांच्याविषयी मान्यवरांनी केलेलं लेखनही या पुस्तकात पुनर्मुद्रित करण्यात आलं आहे. रोकडे यांचं आत्मनिवेदनपर लेखन, त्यांच्या कविता, त्यांची भाषणं, त्यांच्याविषयी प्रसिद्ध झालेल्या बातम्या, त्यांनी लिहिलेल्या प्रस्तावना, निवडक छायाचित्रं आदींचाही पुस्तकात समावेश आहे. डॉ. नयनचंद्र सरस्वते यांनी संपादन केलं आहे. 

वैद्यकीय उपकरणांच्या जगात
प्रकाशक ः स्नेहल प्रकाशन, पुणे (०२०-२४४५०१७८) / पृष्ठं ः २०८ / मूल्य ः २२५ रुपये.
स्टेथोस्कोपपासून इंजेक्‍शनपर्यंत अनेक प्रकारची वैद्यकीय उपकरणं वापरली जात असली, तरी प्रत्यक्षात त्यांचं काम कसं चालतं, त्याचे उपयोग काय होतात, ती उपकरणं विकसित कशी झाली वगैरे गोष्टींची माहिती फारच थोड्या लोकांना असते. डॉ. अविनाश भोंडवे यांनी ही माहिती सोप्या भाषेत करून दिली आहे. थर्मामीटरसारख्या नेहमीच्या वापरातल्या उपरणापासून सोनोग्राफी, सिटी स्कॅनसारख्या अत्याधुनिक उपकरणांपर्यंतची माहिती त्यांनी दिली आहे. कॅप्सूल एंडोस्कोपी, निद्रायंत्र यांसारख्या वेगळ्या उपकरणांची आणि भविष्यात येऊ घातलेल्या उपकरणांचीही माहिती पुस्तकात समाविष्ट आहे.

दीपस्तंभ आपल्या हक्क आणि अधिकारांचा
प्रकाशक ः दीपस्तंभ, पुणे (९१६८१२९५१६) / पृष्ठं ः १३४ / मूल्य ः १२५ रुपये.
सरकारच्या लोकोपयोगी योजना, कायदे, नियम आणि उपक्रम यांची माहिती सर्वसामान्य नागरिकांना व्हावी, यासाठी ‘दीपस्तंभ’ या संस्थेनं हे पुस्तक तयार केलं आहे. लोकशाही दिन, ई-शासन प्रणाली, सरकारी हेल्पलाइन्स अशा लोकोपयोगी २५ विषयांची माहिती अतिशय साध्या भाषेत या पुस्तकात देण्यात आली आहे. वेगवेगळ्या ऑनलाइन सेवा, तक्रार निवारण प्रणाली, मोबाईल ऍप्लिकेशन्स आदींबद्दलही माहितीचा समावेश आहे. ग्रामसभेपासून मुख्यमंत्री सहायता निधीपर्यंत वेगवेगळ्या उपयुक्त उपक्रमांची थेट माहिती, नियम, अर्ज, सर्वसामान्यांना पडणारे प्रश्‍न आणि त्यांची उत्तरं अशा गोष्टींचा समावेश असल्यामुळं हे पुस्तक उपयुक्त झालं आहे.

महर्षी विठ्ठल रामजी शिंदे एक दर्शन (भाग १)
संपादक, प्रकाशक ः रमेश चव्हाण, पुणे (९८६०६०१९४४) / पृष्ठं ः २२४ / मूल्य ः २५० रुपये.
महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्याविषयी विचारवंत आणि समाजविश्‍लेषक रा. ना. चव्हाण यांनी वेळोवेळी केलेल्या लेखनाचं हे संकलन. महर्षी शिंदे यांच्या विविध पैलूंविषयी चव्हाण यांनी लिहिलं आहे. महर्षी शिंदे यांचं जीवन, त्यांचे विचार, त्यांची मतं, कौटुंबिक पार्श्‍वभूमी आदी गोष्टी पुस्तकातून माहीत होतात. महर्षी शिंदे आणि ब्राह्म समाज आणि प्रार्थना समाज यांच्याशी असलेलं नातं, विविध महापुरुषांबरोबरचे त्यांचे भावबंध आणि वैचारिक संबंध, ‘अहिल्याश्रमा’शी त्यांचं नातं, त्यांच्या कार्याची प्रेरणा, त्यांनी दलित समाजासाठी केलेलं काम, सेवा अशा अनेक गोष्टींवर रा. ना. चव्हाण यांनी लिहिलं आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महर्षी शिंदे यांच्या विचारांचा तौलनिक अभ्यासही त्यांनी केला आहे. 

स्वस्थायू आहारविशेष
प्रकाशक ः डॉ. विलासिनी चौधरी (९९३०१०८३१०) / 
पृष्ठं ः ७६ / मूल्य ः १०० रुपये.
अनेक व्याधी आणि रोग यांचं मूळ चुकीच्या वेळी, चुकीच्या पद्धतीनं सेवन केलेला आणि शिजवलेला आहार हे असतं. त्यामुळं त्याविषयी योग्य माहिती देणारं हे पुस्तक डॉ. विलासिनी चौधरी यांनी लिहिलं आहे. आहारविषयक योग्य सवयी, पाणी किती कसं प्यावं, झोप किती घ्यावी, पदार्थ कसे खावेत आणि कसे खाऊ नयेत, कोणत्या ऋतूंत कोणता आहार घ्यावा आदींविषयी त्यांनी माहिती दिली आहे. याशिवाय पुरणपोळी, बुंदीचे लाडू, मसाला, कढी, शेवयांची खीर, जिलेबी, मेदूवडा, श्रीखंड असे विविध पदार्थ आयुर्वेदिक दृष्टीनं कसे तयार करावेत, कसे खावेत यांविषयीही त्यांनी लिहिलं आहे. योग्य त्या ठिकाणी संस्कृत श्‍लोक आणि त्यांचे अर्थही त्यांनी दिले आहेत.

साभार पोच 
   ईव्हीएममुळे लोकशाहीची हत्या/ माहितीपर, वैचारिक / लेखक, प्रकाशक ः अनिल वामन महाजन, ठाणे (०२२-२५४०४५८०) / पृष्ठं ः ४४ / मूल्य ः ६१ रुपये.
    द्राक्ष लागवड / कृषिविषयक / लेखिका ः मंगल देशपांडे / चेतक बुक्‍स, पुणे (९८२२२८०४२४) / पृष्ठं ः १५२ / मूल्य ः १५० रुपये.
    कल्पवृक्षातळी / आध्यात्मिक, अनुभवविषयक / लेखक ः अरुण केसकर / प्रकाशक ः अपर्णा बोरकर, पिंपरी (९८८१५४६०२०) / पृष्ठं ः १२६ / मूल्य ः १५० रुपये.
    आरक्षण आणि ॲट्रॉसिटी / वैचारिक / लेखक ः रंगा दाते (०२१६६-२२२२४०) / प्रकाशक ः श्रीरंग प्रकाशन, पुणे / पृष्ठं ः ९८ / मूल्य ः १०० रुपये.
    पासपोर्ट मॅन ऑफ इंडिया डॉ. ज्ञानेश्‍वर मुळे / माहितीपर / लेखिका ः दीपा देशमुख / मनोविकास प्रकाशन, पुणे (०२०-६५२६२९५०) / पृष्ठं ः ६० / मूल्य ः ७० रुपये

Web Title: welcome books review