स्वागत नव्या पुस्तकांचे

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 20 नोव्हेंबर 2016

काव्यकस्तुरी

काव्यकस्तुरी
मराठीतल्या शंभर कवींच्या माहीत असलेल्या आणि दुर्मिळ अशा कवितांचं हे संकलन. अगदी संत ज्ञानेश्‍वर, संत जनाबाई यांच्यापासून सुरू झालेला हा काव्यप्रवास बालकवी, केशवसुत यांच्यापासून फ. मुं. शिंदे, चंद्रशेखर गोखले अशा समकालीन कवींनाही सामावून घेतो. स्मरणरंजन करणाऱ्या आणि मनमुराद आनंद देणाऱ्या जुन्या कवितांबरोबरच अर्चना मायदेव, ललिता कोलते, शंकर घोगरे, सुनंदा पाटील अशा किती तरी कवींच्या कवितांनी हे पुस्तक सजलं आहे. अभंगांपासून मुक्तछंदापर्यंत कवितांचे कती तरी प्रकार या पुस्तकात आपल्याला भेटतात. परमेश्‍वर उमरदंड यांनी मेहनतीनं या सगळ्या कवितांचं हे संकलन केलं आहे आणि एक प्रकारचा ठेवाच हातात दिला आहे.
प्रकाशक : प्रभुरत्नाई प्रकाशन, बुधोडा, जि. लातूर (९३२५५०९४५०) / पृष्ठं : ३८४ / मूल्य : ५०० रुपये

सरदार भगतसिंग
शहीद भगतसिंग यांचं हे चरित्र संजय नहार यांनी लिहिलं आहे. भगतसिंगांच्या जीवनाचा वेध घेणाऱ्या या पुस्तकाच्या आधी काही आवृत्त्या प्रसिद्ध झाल्या आहेत. मात्र, सद्य:स्थितीत त्यांचे कोणते विचार, कृती लागू होतील, अशा प्रकारचं भाष्य करणाऱ्या काही लेखांचा समावेश करून पुढची विस्तारित आवृत्ती त्यांनी प्रसिद्ध केली आहे. साँडर्सचा वध, असेंब्लीतील बाँबस्फोट, न्यायालयांतलं कामकाज, भगतसिंगांचं उपोषण, फाशी, त्यांनी लिहिलेली पत्रं, अशा सगळ्या गोष्टी नहार यांनी विस्तारानं लिहिल्या आहेत. भगतसिंग यांच्याशी संबंधित अनेकांशी, विशेषत: त्यांचे बंधू कुलतारसिंग आणि इतरही कुटुबीयांशी बोलून त्यांनी अनेक तपशील नेमके करून घेतले आहेत. भगतसिंगांच्या अनुषंगाने आलेले काही ताजे अनुभवही त्यांनी मांडले आहेत.
प्रकाशक : चिनार पब्लिशर्स, पुणे (www.chinarpublishers.com) / पृष्ठं : १९० / मूल्य : १७५ रुपये

गवसले सूर जीवनाचे
उद्योगपती मदनभाई सुरा यांचं हे आत्मचरित्र. रत्नागिरीतल्या खेडसारख्या ग्रामीण भागातून आलेल्या मदनभाईंनी नंतर ‘शेठ अँड सुरा इंजिनिअर्स’ या कंपनीचा विस्तार करण्यापर्यंतची वाटचाल तपशीलवारपणे या पुस्तकात लिहिली आहे. आधीच्या व्यवसायातील अनुभव, कुटुंबीयांबाबतची माहिती, नंतर पाइपलाइन टाकण्याच्या व्यवसायात मिळालेली निपुणता, त्यात केलेली वाढ, वेगवेगळ्या देशांत केलेला प्रवास, समाजसेवेचं व्रत, मित्रांसोबतचे बंध अशा सगळ्या गोष्टींवर त्यांनी लिहिलं आहे. त्यांचे वेगवेगळ्या प्रसंगांतले फोटो, त्यांच्याविषयी वेगवेगळ्या व्यक्तींनी व्यक्त केलेली मतं, त्यांचे वेगवेगळ्या गोष्टींवरचे विचार अशा सगळ्या गोष्टीही पुस्तकात समाविष्ट करण्यात आल्या आहेत. सुहासिनी देशपांडे यांनी शब्दांकन आणि संकलन केलं आहे. सविता भावे यांनी संपादन केलं आहे.
प्रकाशक : उत्कर्ष प्रकाशन, पुणे (०२०- २५५३७९५८) / पृष्ठं : १८० / मूल्य : २०० रुपये

उड्डाण
जगन्नाथ काळे या ग्रामीण कथालेखकाचा हा कथासंग्रह. गावातलं वातावरण, वेगवेगळ्या इरसाल - भाबड्या व्यक्ती, वेगवेगळे प्रसंग अशा सगळ्या गोष्टी त्यांनी कथांमधून उभ्या केल्या आहेत. गालातल्या गालात हसू फुलवणाऱ्या, अनेक समस्यांचा गमतिशीरपणे वेध घेणाऱ्या, छान निरीक्षण असलेल्या या कथा आहेत.
लेखक : जगन्नाथ काळे, तळेगाव दाभाडे, जि. पुणे (९९२२२०७८०५) / प्रकाशक : सुरेश साखवळकर (९८२३५७२३२७) / पृष्ठं : १५२ / मूल्य : १५० रुपये

पॉइंट ब्लॅंक
निवृत्त पोलिस अधीक्षक काशिनाथ मिसाळ यांचं हे आत्मकथन. पोलिसांच्या जीवनाचं अंतरंग अगदी सखोलपणे आणि मोकळेपणे त्यात उलगडण्यात आलं आहे. मिसाळ यांची ही प्रामाणिक संघर्षाची गाथा प्रेरणादायी आणि अनेक नवी गोष्टी आपल्यापुढे उलगडून दाखवणारी आहे. कारकिर्दीमध्ये अनेक आव्हानं, वेदना, कष्ट आणि त्रास यांना सामोरं जात असतानासुद्धा त्यांनी कधी तत्त्वांशी तडजोड केली नाही. त्याचंच प्रतिबिंब या पुस्तकात पडतं. भोकरदन, लोहा, औरंगाबाद, कल्याण, बीड, उल्हासनगर, ठाणे, पुणे, परभणी, अलिबाग, जालना अशा वेगवेगळ्या ठिकाणी आलेले अनुभव त्यांनी पुस्तकात मांडले आहेत. किती वेगळ्या प्रकारे, संघर्ष करत, अनेक टोकाच्या व्यक्तींना- अनुभवांना सामोरं जात पोलिसांना काम करावं लागतं, ते त्यांनी या पुस्तकात खूप मनापासून लिहिलं आहे.
प्रकाशक : सायन पब्लिकेशन्स, पुणे (०२०- २४४७६९५४) / पृष्ठं : ३६० / मूल्य : ३८० रुपये

शब्दरूपेरी
प्रवीण दवणे यांनी लिहिलेल्या किश्‍शांचा हा संग्रह. अनेक चित्रपट दिग्दर्शकांबरोबर काम करताना त्यांना कोणते अनुभव आले, ते त्यांनी मांडले आहेत. एकीकडे गीतलेखन करत असतानाच त्यांचे डोळे चित्रपटाच्या कॅमेऱ्याप्रमाणे भवताल टिपत होते आणि तेच चित्रण त्यांनी शब्दांमध्ये मांडलं आहे. अनेक नवीन किस्से, गाण्यांच्या जन्मकथा आपल्याला या पुस्तकातून समजतात. अनेक दिग्दर्शक, कलाकार यांची व्यक्तिमत्त्वंही पुस्तकातून उलगडतात, नवी दृष्टी देतात. दिनकर द. पाटील, दिलीप कोल्हटकर, कमलाकर तोरणे यांच्यापासून सचिन, महेश कोठारे अशा अनेकांबद्दल आणि त्यांच्याबरोबर केलेल्या गीतलेखनाच्या प्रक्रियेबद्दल दवणे यांनी लिहिलं आहे. चित्रपट रसिकांना ते निश्‍चितच आवडेल.
प्रकाशक : सुरेश एजन्सी, पुणे (०२०- २४४७०७९०) / पृष्ठं : ११२ / मूल्य : १५० रुपये

शरद जोशी शोध अस्वस्थ कल्लोळाचा
शेतकरी संघटक, अर्थशास्त्रज्ञ, आंदोलक, नेता अशी ओळख असलेले शरद जोशी यांच्या व्यक्तिमत्त्वाचे निरनिराळे पैलू शोधणारं हे पुस्तक वसुंधरा काशिकर- भागवत यांनी लिहिलं आहे. एका शिबिराच्या निमित्तानं त्यांची जोशी यांच्याशी ओळख झाली आणि १७ वर्षं वेगवेगळ्या निमित्तानं जोशी यांचं व्यक्तिमत्त्व जाणून घेता आलं. ते त्यांनी या पुस्तकात उलगडलं आहे. जोशी यांचं पुस्तकांवरचं प्रेम, विचारशील लेखन, कुटुंबीयांशी त्यांचं असलेलं नातं, संवादाची हातोटी, अर्थशास्त्रावरची हुकमत, गझलेची आवड, निरीक्षण, चिंतनशीलता अशा किती तरी गोष्टी पुस्तकातून समोर येतात. वेगवेगळ्या निमित्तानं काशिकर यांना जोशी यांच्याशी संवाद साधता आला. त्यातूनही सापडत गेलेले जोशी त्यांनी शब्दांत मांडले आहेत.
प्रकाशक : राजहंस प्रकाशन, पुणे (०२०- २४४७३४५९) / पृष्ठं : १५४ / मूल्य : २०० रुपये

अवनवी
उषा सेठ यांची ही कादंबरी. अवनी नावाची एक तरुणी गुजराती कुटुंबातून लग्न होऊन जैन कुटुंबात जाते. एकेका सांस्कृतिक, कौटुंबिक बदलाला सामोरं जात, संसारचक्र पुढं नेत स्वत: कशी घडत जाते, त्याची ही कथा. नेहमीचंच जगणं असलेली नायिका आपला भवताल डोळसपणे बघते, पती- मुलं- घर असा पैस ओलांडून काही करू बघते आणि वाचकांनाही नवी दृष्टी देते. बाईपणाचा प्रवास ही कादंबरी मांडतेच; पण गुजराती- जैन संस्कृतीचं मराठी साहित्यात तसं दुर्मिळपणे येणारं वातावरणही छानपणे मांडते.
प्रकाशक : ग्रंथाली, मुंबई (०२२- २४२१६०५०) / पृष्ठं : ३७४ / मूल्य : ४०० रुपये

अनुभवानंद
सीना गरसोळे यांच्या लेखांचं हे संकलन. निरनिराळ्या विषयांवर त्यांनी हे लेखन केलं आहे. ललित आणि संतांची संबंधित अशा दोन्ही विषयांवरचं त्यांचं लेखन या पुस्तकात आहे. शब्दसृष्टी, गंधांची उधळण, समाजाची सकारात्मकता, क्षण आनंदाचे असे विषय त्यांनी ललितलेखनासाठी निवडले आहेत. अनुभव, नवे विचार, एखाद्या विषयावरची मतं, कुटुबीयांची माहिती अशा गोष्टींना त्यांनी शब्दरूप दिलं आहे. संतसंग असा वेगळा विभागच त्यांनी केला असून, संत नामदेव, गजानन महाराज, रामदास स्वामी, जंगली महाराज, शंकर महाराज, गोंदवलेकर महाराज, गुलाबराव महाराज यांच्याविषयी लेखन केलं आहे. गीतेतली भक्ती, लोकसंग्रह, दान महात्म्य या विषयांवरसुद्धा त्यांनी लिहिलं आहे.
प्रकाशक : उत्कर्ष प्रकाशन, पुणे (०२०-२५५३७९५८)/ पृष्ठे : १३२/ मूल्य : १२५ रुपये

परिसस्पर्श सुरांचा
सतारवादक जया जोग यांचं हे सांगीतिक आत्मकथन. ज्येष्ठ सतारवादक उस्मानखाँ यांच्या त्या शिष्या. या गुरू-शिष्येचं नातं पुस्तकातून उलगडतं. जया जोग यांनी पुस्तकाची मांडणीही खूप वेधक केली आहे. स्वत:चे सांगीतिक अनुभव आणि उस्मानजी त्यांचे अनुभव सांगत आहेत अशा प्रकारचं कथन अशी एकमेकांत गुंफलेली लडच त्यांच्या या पुस्तकात आहे. त्यांच्या आधीच्या पुस्तकाचं नाव ‘गोफ दुहेरी’ होतं; मात्र या पुस्तकात त्यापासून प्रेरणा घेऊन खरा दुहेरी गोफ त्यांनी विणला आहे आणि तो खूप रंजक झाला आहे. चित्रपटांत ज्या प्रकारे फ्लॅशबॅक असतात, तशा प्रकारे जया जोग यांच्या कथनातून ‘ट्रॅक’ एकदम उस्मानजींच्या फ्लॅशबॅकमध्ये जातो आणि पुन्हा जोग यांच्या कथनात येतो, अशी मांडणी आहे. अनेक सांगीतिक अनुभव त्यातून समोर येतात, शिवाय पुस्तकाच्या वेगळ्या मांडणीमुळे वाचक शेवटपर्यंत खिळून राहतो.
प्रकाशक :  उन्मेष प्रकाशन, पुणे (०२०-२४३३६२१९) / पृष्ठे : ११८/ मूल्य : १३० रुपये

मी झारा गहरमानी एक देशद्रोही
इराणमधल्या झारा गहरमानी या एका तरुणीची ही कहाणी. राजकीयदृष्ट्या चळवळ्या असलेल्या झारावर देशद्रोहाचा आरोप होतो आणि अनेक मानसिक, शारीरिक छळ तिला सहन करावे लागतात. कुख्यात एव्हिन तुरुगात कैदेच्या अंधारात ती लुप्त होते आणि नंतर सुटका झाल्यावर पुन्हा धीटपणानं भानावरही येते. एकीकडे छळ, धक्के सहन करत असताना झारा स्वत:ला शोधत कशी जाते आणि धैर्यवान कार्यकर्तीमध्ये स्वत:चं रूपांतर करून घेते याची ही कहाणी आहे. सध्या ऑस्ट्रेलियात स्थायिक झालेल्या झारानं ‘माय लाइफ ॲज अ ट्रेटर’ हे पुस्तक लिहिलं. त्याचाच हा अनुवाद रेश्‍मा कुलकर्णी-पाठारे यांनी केला आहे. नकारात्मक परिस्थितीत स्वत:ला कसं सावरता येतं, त्याची प्रेरणा देणारं आणि त्याच वेळी तिथल्या विदारक परिस्थितीमुळे अस्वस्थ करून टाकणारं हे पुस्तक. इराणमधलं जीवन, तिथलं वातावरण, तिथली मानसिकता अशा सगळ्या गोष्टी या पुस्तकातून उभ्या राहतात. 
प्रकाशक : मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे (०२०-२४४७६९२४) / पृष्ठे : १८६/ मूल्य : २०० रुपये

अन्वयार्थ
कांचन प्रकाश संगीत यांचा हा कथासंग्रह. आकाशवाणीत अनेक वर्षं काम केल्यामुळे शब्दांतून उभी राहणारी दृश्‍यात्मकता हे त्यांच्या लेखनाचं वैशिष्ट्य. वरकरणी छोटे वाटणारे; पण तरल अनुभव हळूहळू त्या कथांमध्ये रूपांतरित करतात. बहुतेक सगळ्या कथांची कोण तरी कथन करत आहे, अशा पद्धतीनं रचना करण्यात आली आहे. हे अनुभव लेखिकेचेच आहेत असं नाही. काही त्यांचे, काही इतरांचे असे हे अनुभव आहेत. त्यांचा लेखिकेनं ‘अन्वयार्थ’ लावला आहे आणि त्यांना शब्दांची, नाट्यमयतेची जोड दिली आहे. ललित लेखनाच्या अंगानं मांडलेल्या, शब्दकळेचं सामर्थ्य दाखवणाऱ्या आणि वाचकांनाही तरल अनुभव देणाऱ्या, अंतर्मुख करणाऱ्या या कथा आहेत.
प्रकाशक : प्राजक्त प्रकाशन, पुणे (९८९०९५६६९५) / पृष्ठं : २४०/ मूल्य : २५० रुपये

इतस्तत:
मुक्त पत्रकार उषा बढे यांनी वेगवेगळ्या विषयांवर लिहिलेल्या लेखांचा हा संग्रह. अनेक वैयक्तिक अनुभव, निरनिराळ्या विषयांवरची निरीक्षणं, मतं, कुटुंबीय, निसर्ग अशा अनेक गोष्टींवर त्यांनी लिहिलं आहे. जनरेशन गॅप, अपेक्षांचं ओझं, संस्कार, विश्‍वास अशा अनेक विषयांवर त्यांनी लिहिलं आहे. गृहलक्ष्मीला एक दिवसाची सुटी मिळाली पाहिजे, ज्येष्ठ नागरिकांनी संयमाशी नातं राखलं पाहिजे, वस्तूंची किंमत ठेवली पाहिजे असे विचारही त्यांनी मांडले आहेत.
प्रकाशक : नंदिनी पब्लिशिंग हाउस, पुणे (९४२२०३७७१४) / पृष्ठं : १३० / मूल्य : १२५ रुपये

शुन:शेप, उत्तंक आणि अष्टावक्र
शनु:शेप, उत्तंक आणि अष्टावक्र या पुराणकालीन व्यक्तिरेखांवर आधारित दीर्घकथा वसु भारद्वाज यांनी लिहिल्या आहेत. केवळ पुराणकथा म्हणून न बघता त्यातल्या माणसांकडे वेगळ्या दृष्टिकोनातून बघून त्यातल्या वेदना कथा म्हणून भारद्वाज मांडतात. फारशा प्रचलित किंवा चर्चेत नसलेल्या व्यक्तिरेखा त्यांनी निवडल्या आहेत आणि त्यांचं मानसशास्त्रीय विश्‍लेषण करून मांडणी केली आहे. मांडणी आणि भाषा वेगळी असली, तरी मूळ गाभ्याला आणि आशयाला धक्का न लावता त्यांनी या कथा लिहिलेल्या आहेत.
प्रकाशक : काँटिनेंटल प्रकाशन, पुणे (०२०-२४३३७७८२) / पृष्ठं : २७६ / मूल्य : २५० रुपये

-------------------------------------------------------------------
साभार पोच

  •      सफर कॅडबरी वर्ल्डची / बालवाङ्‌मय / लेखिका : कविता मेहेंदळे (९३२६६५७०२७) / प्रकाशक : नीहारा प्रकाशन, पुणे (०२०- २४४९१२९२) / पृष्ठं : ६४ / मूल्य : ६० रुपये
  •      काव्यांजली / कवितासंग्रह / कवयित्री : अंजली गाडेकर (८६००००८२३७) / प्रकाशक : यशोदीप पब्लिकेशन्स, पुणे (९८५०८८४१७५) / पृष्ठं : ९६ / मूल्य : १०० रुपये
  •      पाऊसपाणी / कवितासंग्रह / कवी : साहेबराव ठाणगे / प्रकाशक : संवेदना प्रकाशन, चिंचवड (९७६५५५९३२२) / पृष्ठं : ६४ / मूल्य : ८० रुपये.

-------------------------------------------------------------------

Web Title: welcome new books

फोटो गॅलरी