स्वागत नव्या पुस्तकांचे

स्वागत नव्या पुस्तकांचे

शोध महाराष्ट्राचा
महाराष्ट्राच्या जवळपास दोन हजार वर्षांच्या इतिहासातल्या अनेक स्थित्यंतरांचा वेध विजय आपटे यांनी या ग्रंथात घेतला असून, सातवाहनांच्या काळापासून ते संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनापर्यंत असा या पुस्तकाचा सुदीर्घ आवाका आहे. वाकाटक, चालुक्‍य, राष्ट्रकूट, यादव या घराण्यांपासून ते शिवशाही, पेशवाई अशा महाराष्ट्राच्या इतिहासातल्या विविध महत्त्वपूर्ण टप्प्यांची माहिती यात वाचायला मिळेल. ‘महाराष्ट्र असा घडला’, ‘महाराष्ट्रात असे घडले’, ‘महाराष्ट्रात असे घडावे’ असे या ग्रंथाचे तीन विभाग आहेत. आपटे यांचा हा पहिलाच ग्रंथ. ‘भूमिका आणि ऋणनिर्देश’मध्ये आपटे म्हणतात - ‘‘...या पुस्तकाची माझ्या मनात सुरवात झाली ती ‘मराठी माणसाला झालंय तरी काय?’ या मला पडलेल्या कोड्यापासून. या कोड्याचं उत्तर शोधता शोधता माझं इतिहासाचं वाचन सुरू झालं.’’ या ग्रंथाच्या निर्मितीसाठी आपटे यांनी संदर्भसाहित्य म्हणून असंख्य पुस्तकं तर वाचलीच; पण संकीर्ण लेख, इंटरनेटवरची माहिती, मान्यवरांची भाषणं- मुलाखती यांचाही उपयोग करून घेतला आहे.
प्रकाशक - राजहंस प्रकाशन, पुणे (०२०- २४४७३४५९/rajhansprakashan1@gmail.com) / पृष्ठं  - ६४४ /मूल्य - ५०० रुपये

छांदस

ज्येष्ठ कवी- गझलकार सदानंद डबीर यांच्या निवडक काव्यरचनांचं हे संकलन संपादित केलं आहे डॉ. राम पंडित यांनी. गझल, कविता आणि  गीत अशा तीन विभागांत मिळून १३६ रचनांचा समावेश या संकलनात आहे. डबीर हे प्रामुख्याने गझलकार म्हणूनच परिचित असल्यानं या रचनांमध्ये गझलांची संख्या सर्वाधिक म्हणजे ९७ आहे. अन्य कविता २६, तर गीतं १३ आहेत. संग्रहाच्या प्रारंभी पंडित यांनी डबीर यांच्या रचनांविषयी संकलक- संपादक या नात्यानं सविस्तर भाष्य केलेलं आहे, त्यात ते म्हणतात : ‘‘डबीर यांनी आपली सृजनप्रक्रिया एकसुरी होऊ दिलेली नाही. विधावैविध्य, विषयवैविध्य, विचारवैविध्य ही त्यांच्या पद्यरचनेची त्रिपुटी म्हणता येईल.’’
प्रकाशक - ग्रंथाली, मुंबई (०२२- २४२१६०५०/ २४३०६६२४ /granthali02@gmail.com)/ पृष्ठं - १७९ / मूल्य : २०० रुपये

जीझसचे भारतातील अज्ञात जीवन

‘जीझस लिव्हड्‌ इन इंडिया’ या जर्मन धर्माभ्यासक होल्जर कर्स्टन यांच्या मूळ पुस्तकाचा हा प्रा. विजय गाट यांनी केलेला अनुवाद. ‘जीझस अर्थात प्रभू येशू ख्रिस्त हे भारतात राहिले होते, ते भारतातच वृद्धावस्थेत निधन पावले,’ याचे अनेक पुरावे या पुस्तकात दिले असल्याचा दावा करण्यात आला आहे. या पुराव्यांच्या आधारे कर्स्टन यांनी काढलेले काही निष्कर्ष असे आहेत : १) तारुण्यात जीझस प्राचीन ‘रेशीममार्गा’नं भारतात आले. त्यांनी बौद्ध धर्माचा अभ्यास केला. बौद्ध धर्मतत्त्वांचा अभ्यास करून ते आध्यात्मिक सिद्धपुरुष बनले. २) क्रुसावर चढवले गेल्यानंतरही जीझस जिवंत राहिले. ३) पुनरुत्थानानंतर ते भारतात परतले आणि वृद्धावस्थेत मरण पावले. ४) जम्मू-काश्‍मीरची राजधानी श्रीनगर इथं जीझस यांच्यावर अंत्यसंस्कार केले गेले. काश्‍मीरमध्ये आजही जीझस यांचे स्मृतिस्थळ असल्याचा निष्कर्ष कर्स्टन यांनी या पुस्तकात मांडला आहे.
प्रकाशक - सायन पब्लिकेशन प्रा. लि., पुणे (०२०- २४४७६९५४/ scionpublications@rediffmail.com) / पृष्ठं - ३३६/ मूल्य - ३५०  रुपये

दोन विदुषी

आपल्या सुस्पष्ट आणि परखड विचारांसाठी अवघ्या महाराष्ट्राला ज्ञात असलेल्या साहित्य- संशोधन क्षेत्रातल्या दोन विदुषी म्हणजे इरावती कर्वे आणि दुर्गा भागवत. या दोघींविषयीचं हे पुस्तक लिहिलं आहे डॉ. नीला पांढरे यांनी. दोघी समकालीन विदुषी, दोघी समाजशास्त्राच्या अभ्यासक, दोघींनी वैचारिक आणि ललित असं दोन्ही प्रकारचं लेखन केलं. दोघींनी वैचारिक खाद्य पुरवणारी चिंतनगर्भ व्याख्यानंही दिली. दोघींच्या जीवनदृष्टीत, चिंतनविषयांत काहीतरी साम्य असावं, असं वाचकांना वाटतं. याच भूमिकेतून दोघींच्या लेखनाचा, व्यक्तित्वाचा धांडोळा या पुस्तकातून घेण्यात आलेला आहे.
प्रकाशक - उन्मेष प्रकाशन, पुणे (०२०- २४३३६२१९) / पृष्ठं - १६९ / मूल्य - २०० रुपये

महापुरुषांचे विचार

देश-विदेशांतल्या विचारवंत- तत्त्ववेत्त्यांच्या सुविचारांचं- सुभाषितांचं हे संकलन. प्रेम, आनंद, क्रोध, सुख, दु-ख, धैर्य, भय, शिक्षण, विश्वास, लोभ, मैत्री, पुस्तकं, प्रार्थना, मौन, पाप-पुण्य, विवाह अशा वेगवेगळ्या विषयांवरची ही सुभाषितं आहेत. वृत्तपत्रांमध्ये वेळोवेळी प्रसिद्ध झालेले हे सुविचार- सुभाषितं टिपून ठेवून तेच संकलन आता पुस्तकरूपात येत असल्याचं संकलक जयंत हिरे यांनी मनोगतात नमूद केलं आहे.
प्रकाशक - आकांक्षा प्रकाशन, नवी सांगवी, पुणे (७७५७००२९८१) / पृष्ठं - १२६/ मूल्य - १५० रुपये

कर्मयोगी

अनिल देशपांडे यांची ही चरित्रात्मक कादंबरी. या कादंबरीचा घटनाकाल १९१३ ते २०१६ असा आहे. आपल्या मुलाच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या, पोटासाठी नाना प्रकारचे व्यवसाय कराव्या लागणाऱ्या, घरातल्या पुरुषांची उणीव स्वत- पुरुष बनून भरून काढणाऱ्या एका झुंजार आईची आणि स्वकर्तृत्वावर यशस्वी होणाऱ्या तिच्या मुलाची ही कहाणी आहे. शिक्षकी पेशातले सोमनाथ तात्याबा कळसकर ऊर्फ कळसकर गुरुजी हे या कादंबरीचे नायक. कळसकर गुरुजींनी सरकारी अथवा अन्य कुठलीही मदत न घेता स्वत-च्या आणि पत्नीच्या निवृत्तिवेतनाच्या रकमेतून गरीब, निराधार, मागासवर्गीय समाजातल्या मुलींसाठी ‘सांदिपनी ऋषी बालिकाश्रम’ स्थापन केला. हा सगळा प्रवास या कादंबरीतून उलगडत जातो.
प्रकाशक - शुक्रतारा प्रकाशन, संगमनेर (८९८३७७१२५७/shukratara@gmail.com) / पृष्ठं  - ३५२ / मूल्य - ३०० रुपये.

जातकुळी

सुजाता फडके यांच्या १५ कथांचा हा संग्रह. समाजात अवतीभवती घडणाऱ्या विविध प्रसंगांवरच्या, विविध विषयांवरच्या या कथा आहेत. स्त्रीस्वभावाचं, त्यांच्या इच्छा-आकांक्षांचं वैविध्यपूर्ण दर्शन अनेक कथांमधून घडतं. एखादी व्यक्ती केवळ एका विशिष्ट धर्माची आहे म्हणून तिच्याकडं संशयानं पाहण्याची वृत्ती माणुसकीला घातक आहे, असा संदेश ‘जातकुळी’ ही शीर्षककथा देते. मरणोत्तर होणारे श्राद्ध इत्यादी धार्मिक विधी आणि त्यानिमित्तानंही केलं जाणारं श्रीमंतीचं दर्शन या बाबीवर ‘मरणोत्सव’ ही कथा नेमकं बोट ठेवते. ‘सेकंड इनिंग’सारखी हलकीफुलकी कथाही या संग्रहात आहे.
प्रकाशक - नीहारा प्रकाशन, पुणे (०२०- २४४९१२९२/neeharaprakashan@rediffmail.com) / पृष्ठं  - १६०/ मूल्य - १६० रुपये.

-----------------------------------------------------------------------------------
आरोग्यदायी रानभाज्या
डॉ. मधुकर बाचुळकर यांच्या या पुस्तकात निवडक ६१ रानभाज्यांची माहिती रंगीत छायाचित्रांसह देण्यात आलेली आहे. प्रत्येक रानभाजीचं शास्त्रीय नाव, कूळ, स्थानिक नाव, इतर भाषांमधली नावं, या रानभाज्या जिथं आढळून येतात ते स्थान, त्यांची शास्त्रीय ओळख आदी माहिती त्यात सविस्तर वाचायला मिळेल. आरोग्याला पोषक असणारे या रानभाज्यांचे गुणधर्म, या रानभाज्यांपासून बनवल्या जाणाऱ्या रुचकर आणि पोषक पाककृतींची माहितीसुद्धा त्यात आहे. निसर्गप्रेमी, आयुर्वेदप्रेमी, आहारतज्ज्ञ, विद्यार्थी, शेतकरी, महिलावर्ग, हॉटेल व्यावसायिक अशा विविध स्तरांतल्या मंडळींसाठी हे पुस्तक उपयुक्त ठरावं. या पुस्तकातल्या रानभाज्यांविषयीची लेखमाला ‘सकाळ ॲग्रोवन’ या कृषिदैनिकात जानेवारी २०१४ ते जुलै २०१५ या कालावधीत ‘ओळख रानभाज्यांची’ या सदरात प्रसिद्ध झाली होती.
प्रकाशक - सकाळ प्रकाशन (०२०- २४४०५६७८/८८८८८४९०५०/ sakalprakashan@esakal.com)/ पृष्ठं - १६०+ भाज्यांच्या रंगीत छायाचित्रांची आठ पृष्ठं / मूल्य - १९५ रुपये

स्वराज्य

दिल्लीचे विद्यमान मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचं हे पुस्तक. मूळ इंग्लिशमधल्या या पुस्तकाचा अनुवाद केला आहे साधना कुलकर्णी यांनी. स्वराज्याची संकल्पना, त्याचं स्वरूप याविषयीचं मार्मिक विवेचन, तसंच देशातल्या समस्यांचं मूळ नेमकं कशात आहे, याविषयीचं चिंतन, स्वयंशासनाचं महत्त्व आणि त्यासाठी काय करायला हवं याचं मार्गदर्शन या पुस्तकातून करण्यात आलं आहे. व्यवस्थेतल्या बदलाचा अर्थ काय असतो, यावर हे पुस्तक विस्तृत भाष्य करतं. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची प्रस्तावना या पुस्तकाला आहे. हजारे म्हणतात - ‘‘प्रस्तुत पुस्तक म्हणजे उद्याच्या भारताचा जाहीरनामा आहे. बेरोजगारी, हिंसा, भ्रष्टाचार, महागाई, नक्षलवाद आणि अस्पृश्‍यता यांसारख्या समस्यांवर उत्तरं शोधण्यासाठी हे पुस्तक निश्‍चितच प्रेरणादायी ठरेल.’’
प्रकाशक - सकाळ प्रकाशन (०२०- २४४०५६७८/८८८८८४९०५०/ sakalprakashan@esakal.com) / पृष्ठं  - ११२ / मूल्य - १४० रुपये
-----------------------------------------------------------------------------------

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com