स्वागत नव्या पुस्तकांचे

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 डिसेंबर 2016

मोदी कालखंडातील भारताचे परराष्ट्र धोरण

मोदी कालखंडातील भारताचे परराष्ट्र धोरण
बदलत्या जागतिक स्थितीत भारताचं परराष्ट्र धोरण बदलत आहे. सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी परराष्ट्र धोरणावर जास्त भर देत आहेत. गेल्या काही वर्षांत बदललेले संदर्भ, गेल्या अडीच वर्षांतल्या घडामोडी, बदलत चाललेले आंतरराष्ट्रीय आयाम या सर्व गोष्टींचं विश्‍लेषण परराष्ट्र धोरण विश्‍लेषक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांनी केलं आहे. भारताचं परराष्ट्र धोरण कसं बदलत गेलं आणि त्यात कसे बदल होत आहेत, हे त्यांनी सुरवातीलाच स्पष्ट केलं आहे. चीन, पाकिस्तान, नेपाळ अशा वेगवेगळ्या शेजारी देशांबरोबरच्या संबंधांचं त्यांनी तपशीलवार विवेचन केलं आहे. ‘भारत आणि आग्नेय आशिया’, ‘भारत आणि पश्‍चिम आशिया’ यांच्यावर त्यांनी विशेष भर दिला आहे. अमेरिका, युरोप, जपान, फ्रान्स अशा प्रभावी सत्तांबरोबर भारताचे कसे संबंध आहेत, हेही त्यांनी वेगवेगळ्या घडामोडींनुसार मांडलं आहे. वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय संघटना, दहशतवाद यांच्या अनुषंगानंही त्यांनी वेगवेगळे विषय मांडले आहेत. समकालीन चित्र उभं राहत असल्यानं अभ्यासकांसाठी, विद्यार्थ्यांसाठी हे पुस्तक उपयुक्त ठरेल.
प्रकाशक - सकाळ प्रकाशन, पुणे (०२०-२४४०५६७८)/ पृष्ठं - ३२८/ मूल्य - २९५ रुपये

मनी वाईज
‘पैसा’ ही गोष्ट जगात सर्वांत जास्त महत्त्वाची असली, तरी तो हाताळावा कसा, याबाबतची शास्त्रशुद्ध माहिती अजून सर्वसामान्यांना नसल्याचं दिसतं. त्या दृष्टीनं शरथ कोमारराजू यांनी लिहिलेलं हे पुस्तक उपयुक्त ठरेल. पैशाचा संबंध जिथंजिथं येतो अशा सगळ्या गोष्टींच्या अगदी प्राथमिक स्वरूपाच्या माहितीपासून ते गुंतवणुकीपर्यंतच्या सगळ्या टप्प्यांचा त्यांनी परामर्श घेतला आहे.

पैशाची विविध रूपं, वैयक्तिक वित्त व्यवस्थापनाची मूलतत्त्वं या गोष्टींविषयी त्यांनी अगदी सर्वसामान्यांना समजेल अशा भाषेत माहिती दिली आहे. गुंतवणुकीच्या अनेक प्रकारांविषयीही त्यांनी सविस्तर भाष्य केलं आहे. स्थावर मालमत्ता, सोनं, कर्ज रोखे, शेअर, रोख मालमत्ता यांच्यासंबंधीचे वेगवेगळे समज, संकल्पना, प्रकार, संदर्भ या गोष्टींचाही त्यांनी ऊहापोह केला आहे. पोर्टफोलिओ व्यवस्थापन हा सध्या खूप आवश्‍यक मानला जाणारा भाग आहे. त्याबाबतही कोमोरराजू यांनी विवेचन केलं आहे. मनोहर सोनवणे यांनी अनुवाद केला आहे. आर्थिक सामान्य ज्ञान वाढवण्यासाठी आणि ते प्रत्यक्षात आणण्यासाठीसुद्धा पुस्तकाचा उपयोग होईल.
प्रकाशक - सकाळ प्रकाशन, पुणे (०२०-२४४०५६७८) / पृष्ठं - २०८ / मूल्य - २२५ रुपये
-----------------------------------------------------------
स्त्रीसक्षमीकरण - विविधांगी प्रवास
स्त्रीसक्षमीकरणाशी संबंधित वेगवेगळ्या पैलूंचा वेध घेणाऱ्या लेखांचा हा संग्रह. मोहिनी कारंडे यांनी त्याचं संपादन केलं आहे. वेगवेगळ्या समूहातल्या स्त्रियांचे प्रश्‍न आणि समस्या वेगळ्या आहेत. त्या सर्वांचा परामर्श घेण्याचा प्रयत्न पुस्तकात करण्यात आला आहे. ‘अपंग महिलांच्या समस्या’, ‘बचत गटांची झेप’, ‘गोष्टी अनाथ मुलींच्या’, ‘प्रशासनातील स्त्रीसक्षमता’, ‘स्त्रीसक्षमीकरणात कायद्याचा आधार’, ‘महिलांचे राजकीय सबलीकरण’, ‘स्त्रीसक्षमीकरणात पुरुष सहभाग’ आदी लेखांचा पुस्तकात समावेश आहे. परंपरांच्या जंगलात हरवलेला डॉ. माधवी खरात, नीला सत्यनारायण, डॉ. वृषाली रणधीर, ॲड. सुप्रिया कोठारी, प्रयागा होगे, डॉ. बेनझीर तांबोळी, डॉ. उज्ज्वला हातागळे आदींनी वेगवेगळ्या विषयांवर लेखन केलं आहे.
प्रकाशक - मैत्री पब्लिकेशन, पुणे (७३५०१२३३७७) / पृष्ठं - १५२ / मूल्य - १५० रुपये

गांधार-पंचम
लेखक आणि सतारवादक विदुर महाजन यांचं हे वेगळ्या प्रकारचं पुस्तक. महाजन यांना एका भावावस्थेत सुचलेल्या काही कविता आणि त्यांच्या आधीची पार्श्‍वभूमी असलेलं गद्य असा हा एकत्र मिलाफ आहे. त्यांनी लिहिलेल्या कविता मुक्तछंदात आहेत आणि जे लेखन केलं आहे ते एखाद्या कवितेसारखं आहे, त्यामुळे या दोन्हींचं मिश्रण जमून गेलं आहे. संगीतातले असल्यामुळे पुस्तकात एक छान लयही आहे. लेखनाची मांडणी आणि लेखनातून उभ्या राहणाऱ्या प्रतिमांशी मिळतीजुळती पूरक छायाचित्रं यांमुळेही पुस्तक उल्लेखनीय ठरलं आहे.
प्रकाशक - उन्मेष प्रकाशन, पुणे (०२०-२४३३६२९९) / पृष्ठं - ४८ / मूल्य - १५० रुपये

अमेरिकी राष्ट्रपती
जगातली सर्वांत प्रभावशाली व्यक्ती म्हणून वर्णन केल्या जाणाऱ्या अमेरिकी अध्यक्षांविषयी माहिती देणारं हे पुस्तक अतुल कहाते यांनी लिहिलं आहे. अमेरिकेचे पहिले अध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन यांच्यापासून ते मावळते अध्यक्ष बराक ओबामा यांच्यापर्यंतच्या सगळ्या अध्यक्षांची ओळख त्यांनी करून दिली आहे. अमेरिकेतल्या जनतेची मानसिकता, तिथलं वातावरण, जगभरातल्या त्या-त्या वेळच्या स्थिती, वेगवेगळी युद्धं अशा अनेक गोष्टी या पुस्तकातून समजतात. प्रत्येक अध्यक्षाचा अल्प परिचय, त्याचं बालपण, जडणघडण, त्याची निवड होण्याची कारणं, त्याचा प्रचार, त्यानं अध्यक्ष म्हणून घेतलेले निर्णय, त्या निर्णयांमुळे झालेले परिणाम, गैरव्यवहार, ऐतिहासिक पायंडे अशा किती तरी गोष्टी कहाते यांनी या पुस्तकात समाविष्ट केल्या आहेत. अमेरिकेच्या मनोवृत्तीवर त्यांनी वेगळी टिप्पणीही केली आहे. सोप्या शब्दांत ओळख करून दिली असल्यामुळे पुस्तक रंजक झालं आहे.
प्रकाशक - मेहता प्रकाशन, पुणे (०२०-२४४७६९२४) / पृष्ठं - ४९०/ मूल्य - ४९५ रुपये

बर्फाच्छादित दुर्गम प्रदेशाची सफर लेह-लडाख
सुधीर फडके यांनी लेह-लडाख या भागांची ओळख करून दिली आहे. स्वत- गाडीतून प्रवास केला असल्यामुळे सगळे तपशील त्यांनी नमूद केले आहेत. त्या भागात कसं पोचायचं त्याची माहिती, तिथली प्रसिद्ध ठिकाणं, वातावरण, आकर्षण अशा गोष्टी त्यांनी पुस्तकात दिल्या आहेत. त्या भागाची सर्वसाधारण भौगोलिक माहिती, नकाशे, छायाचित्रं, तिथं प्रवास करताना घ्यायची खबरदारी इत्यादी गोष्टींचाही पुस्तकात समावेश आहे.
प्रकाशक - क्रिएटिव्ह कम्युनिकेशन्स, नगर (९८२२२१८४२५) / पृष्ठं - ४० / मूल्य - ८० रुपये

वळख
वंजारी समाजासाठी काम करणारे उमाकांत वाघ यांचे अनुभव, त्यांनी वेगवेगळ्या विषयांवर व्यक्त केलेले विचार, मतं यांचं हे संकलन. प्रतिकूलतेवर मात करतानाही त्यांनी उभा केलेला गोतावळा, सामाजिक चळवळीचा प्रवास, गोड-कडू अनुभव अशा सगळ्या गोष्टींवर त्यांनी प्रांजळपणे लिहिलं आहे. नाती हा त्यांच्या पुस्तकातला मोठा भाग आहे. जीवन संघर्षाशी नातं, नात्यातलं मैत्र, परिवर्तनाचं नातं, रस्त्यांशी नातं, व्यक्तिगत नात्यांची सुख-दु-खं, नात्यांचं संचित अशा वेगवेगळ्या गोष्टींवर त्यांनी लिहिलं आहे. समाजकार्याशी नातं, सामाजिक एकी, वितुष्टाशी नातं अशा गोष्टींवरही त्यांनी विवेचन केलं आहे.
प्रकाशक - ग्रंथाली (०२२-२४२१६०५०) / पृष्ठं - ११६/ मूल्य - १२५ रुपये

घेई छंद
अभिनेता आणि दिग्दर्शक सुबोध भावे या पुस्तकाच्या निमित्तानं लेखक बनला आहे. ‘कट्यार काळजात घुसली’ नाटकाच्या दिग्दर्शनापासून याच शीर्षकाच्या चित्रपटापर्यंतचा प्रवास त्यानं शब्दबद्ध केला आहे. अभिनयाच्या क्षेत्राकडे तो कसा ओढला गेला, सुरवातीचा संघर्ष कसा होता, यावरही त्यानं लिहिलं आहे. त्यानंतर ‘कट्यार’ हे नाटक दिग्दर्शनासाठी कसं आलं, त्यासाठी काय काय केलं हे त्यानं लिहिलं आहे. ‘लोकमान्य’ आणि ‘बालगंधर्व’ या चित्रपटांचं त्याच्या आयुष्यात महत्त्वाचं स्थान आहे. त्यांच्याबाबतचे अनुभवही त्यानं मांडले आहेत. या पुस्तकात सर्वांत भर आहे तो ‘कट्यार’ चित्रपटावर. मराठी चित्रपटसृष्टीत महत्त्वाचा टप्पा मानल्या जाणाऱ्या या चित्रपटाची सगळी जन्मकहाणी, त्याच्याशी संबंधित किस्से, सुबोधचे विचार अशा गोष्टींमुळे पुस्तक रंगतदार झालं आहे. अभय इनामदार यांनी शब्दांकन केलं आहे. या पुस्तकाबरोबर ‘बालगंधर्व’, ‘लोकमान्य’ आणि ‘कट्यार काळजात घुसली’ या चित्रपटांच्या डीव्हीडीजही देण्यात आल्या आहेत.
प्रकाशन - रसिक आंतरभारती (०२०-२४४५११२९) / पृष्ठं - २०८ / मूल्य - ४०० रुपये

दहशत
दहशतवाद, अंधश्रद्धा आणि झटपट श्रीमंतीची हाव या समस्यांचा वेध घेणारी सुखलाल चौधरी यांची ही कादंबरी. राज्य अन्वेषण विभागाचे (सीआयडी) निरीक्षक भीमराव यांच्याकडे नरबळीसंदर्भात तपास करण्याचं एक प्रकरण येतं आणि एकेक गोष्टी उलगडत दहशतवादापर्यंत त्याचे धागेदोरे कसे जातात, यांची गुंतागुंत मांडणीही ही कहाणी. अनेक सामाजिक, आर्थिक समस्यांवरही चौधरी यांनी या निमित्तानं भाष्य केलं आहे. या विषयाचा, स्थानिक भाषांचा, भौगोलिक अभ्यास करून चौधरी यांनी ही कादंबरी लिहिली आहे. अनेक प्रकारची पात्रं त्यांनी तयार केली आहेत आणि कथानकाची सुसंगतपणे मांडणी केली आहे. त्यामुळे कादबंरी शेवटपर्यंत खिळवून ठेवते.
प्रकाशक - आनंदयात्री प्रकाशन, जळगाव (०२५७-२२३२५०१) / पृष्ठं - २४२ / मूल्य - २५० रुपये

रघुवंशातील उपमासौंदर्य
महाकवी कालिदासाचं अमर महाकाव्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘रघुवंश’चा हा रसास्वाद. त्यातल्या वेगवेगळ्या उपमांचा अर्थ आणि सौंदर्य उलगडून दाखवणारं हे पुस्तक विद्याकर भिडे यांनी लिहिलं आहे. संस्कृत न कळणाऱ्यांनाही रघुवंशाचा साहित्यिक आस्वाद घेता यावा, या हेतूनं त्यांनी हे संशोधनपर पुस्तक लिहिलं आहे. सूर्य, चंद्र, मेघ, समुद्र, नदी, पर्वत, पशु, हत्ती, वृक्ष, पुष्प, स्त्री अशा अनेक विषयांवर रघुवंशात आलेल्या उपमा, त्यांचे संदर्भ आणि अनुषंगिक गोष्टी भिडे यांनी उलगडून दाखवल्या आहेत. संस्कृतच्या आणि अभिजात कवितांच्या अभ्यासकांना हे पुस्तक उपयुक्त ठरेल.
प्रकाशक - ऋतुराज प्रकाशन, पुणे / पृष्ठं - ४२२/ मूल्य - ४०० रुपये

अनुभवाचिया वाटा
वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आपला ठसा उमटवणाऱ्या व्यक्तींशी प्रा. नरेंद्र पाठक यांनी साधलेल्या संवादाचं हे संकलन. साहित्य, नाट्य, चित्रपट, संगीत, सामाजिक, वैद्यकीय अशा वेगवेगळ्या क्षेत्रांतील या व्यक्तींची जडणघडण या पुस्तकातून उभी राहते. प्रा. द. मा. मिरासदार, मंगेश पाडगावकर, राजदत्त, प्रभाकर पणशीकर, गिरीश प्रभुणे, यशवंत देव, सयाजी शिंदे, स्वाती वानखेडे अशा वेगवेगळ्या व्यक्तींच्या मुलाखती प्रा. पाठक यांनी घेतल्या आहेत. त्या त्या व्यक्तींचं मोठेपण, त्यांचे विचार, त्यांच्यावर झालेले संस्कार, महत्त्वाचे अनुभव अशा गोष्टी या पुस्तकातून समजतात. प्रकाशक - साकेत प्रकाशन, औरंगाबाद (०२४०-२३३२६९२)/पृष्ठं - १६८/ मूल्य - २०० रुपये

चिरेबंदी कळा
सरंजामशाहीमध्ये स्त्रियांची सर्वांत जास्त घुसमट होते. या सरंजामशाहीच्या वेगवेगळ्या प्रतीकांमध्ये अडकलेल्या अशाच महिलांच्या कहाण्या डॉ. शारदा देशमुख यांनी मांडल्या आहेत. वेगवेगळ्या काळातल्या सरंजामशाहींचा त्यांनी सूक्ष्म पद्धतीनं विचार करून स्त्रियांची दु-खं मांडली आहेत. वेगवेगळ्या वर्गांतल्या या स्त्रिया आहेत; पण प्रत्येकीची व्यथा वेगळी. डॉ. देशमुख यांनी त्यांच्या मनोवस्थेत जाऊन शब्दरूप दिलं आहे.
प्रकाशक - साकेत प्रकाशन, औरंगाबाद (०२४०-२३३२६९२) / पृष्ठं - १२८ / मूल्य - १५० रुपये

-----------------------------------------------------------
साभार पोच

  •      आयुष्याचा सातबारा / कवितासंग्रह / कवी - रामदास कोरडे (९९२३८२२८२४)/ प्रकाशक - नभ प्रकाशन, अमरावती (७७९८२०४५००) / पृष्ठं - ८२ / मूल्य - १२० रुपये
  •      रानोमाळ /कवितासंग्रह / कवी - मो. ज. मुठाळ (०७२४-२४५६५९०)/ प्रकाशक - स्नेहवर्धन प्रकाशन, पुणे (०२०-२४४७२५४९) / पृष्ठं - १०२ / मूल्य - १०० रुपये
  •      नाटिका नाट्यछटा / नाटककार - कुमुद राळे (८४०७९९२६२२) / प्रकाशक - नीहारा प्रकाशन, पुणे (०२०-२४४९१२९२) / पृष्ठं - ६४ / मूल्य - ५० रुपये
  •      पाथेय/कवितासंग्रह/कवी - ल. सि. जाधव (९४२३८५८६९८)/ सुविद्या प्रकाशन, सोलापूर (०२१७-२७२२५१०)/ पृष्ठं - १२४ / मूल्य - १५० रुपये
  •      पाणपोई/बालसाहित्य/कवी - अय्युब पठाण लोहगावकर (९७६४३५०३७४)/गाव प्रकाशन, औरंगाबाद (९८६०५१६०३८) / पृष्ठं - २४ / मूल्य - ५० रुपये

-----------------------------------------------------------

Web Title: welcome new books