स्वागत नव्या पुस्तकांचे

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 जानेवारी 2017

धुक्‍यात हरवली वाट
प्रकाशक - दिलीपराज प्रकाशन, पुणे  
(०२०-२४४९५३१४) /
पृष्ठं - २००/ मूल्य - २३० रुपये

धुक्‍यात हरवली वाट
प्रकाशक - दिलीपराज प्रकाशन, पुणे  
(०२०-२४४९५३१४) /
पृष्ठं - २००/ मूल्य - २३० रुपये

विजया मारोतकर यांची ही कादंबरी. लग्न या संस्थेबाबत थेट भाष्य न करताही तिचा उभा छेद घेऊ पाहणारी ही कादंबरी. सुनेत्रा ही कादंबरीची नायिका. तिच्या वैयक्तिक आयुष्यात अनेक संकटं कोसळतात, त्यातून ती मार्ग काढत जाते आणि तो काढताना अनेक प्रश्‍न उपस्थित करते आणि काही प्रश्‍नांची उत्तरंही देते. वेगवेगळी पात्रं, प्रसंग बदलत्या समाजाचं, कुटुंबव्यवस्थेचं चित्रण करतात. तडजोड करून आजचे प्रश्‍न निकालात काढले, तर उद्याच्या वाटा धुक्‍यात हरवणार नाहीत आणि जगणं सुसह्य होईल, असं मारोतकर या कादंबरीतून सांगतात. घाईनं निर्णय घेतले तर काय होऊ शकतं हेही कादंबरीतून समजतं.

पोलादी राष्ट्रपुरुष
प्रकाशक - स्नेहल प्रकाशन, पुणे (०२०-२४४५०१७८) /
पृष्ठं - ४०८/ मूल्य - ४५० रुपये

एकनिष्ठ अनुयायी आणि धुरंधर नेतृत्व यांचा समतोल साधणारे आणि अनेक गुणांनी भारतीयांना परिचित असणारे सरदार वल्लभभाई पटेल यांचं हे प्रेरणादायी चरित्र. अरुण करमरकर यांनी ते लिहिलं आहे. सरदार पटेल यांच्या नेतृत्वशैलीचं समग्र आकलन त्यांनी घडवून आणलं आहे. निर्णयक्षमता, संघटनशीलता, चतुराई, परिश्रमशीलता, मुद्द्याबद्दलचा आग्रह न सोडण्याची चिकाटी असे अनेक गुण नेतृत्वाला खोली मिळवून देतात. या गुणसंपदेचं दर्शन करमरकर यांनी सुरेखपणे घडवलं आहे. वेगवेगळी उदाहरणं, प्रसंग यांतून सरदार पटेल यांचं व्यक्तिमत्त्व उलगडत जातं.

प्रॉमिसलॅंड
 प्रकाशक - ग्रंथाली, मुंबई  (०२२-२४२१६०५०) /
पृष्ठं - १५८/ मूल्य - १८० रुपये

अमेरिकेत तब्बल ५५ वर्षं राहिलेल्या आणि अमेरिकेची वेगवेगळी रूपं जवळून बघितलेल्या अविनाश बागल यांनी लिहिलेलं हे पुस्तक. एक पाय मातृभूमीत ठेवलेल्या आणि दुसरा पाय अमेरिकेत ठेवलेल्या बागल यांनी त्यांचे अनुभव, त्यांचा झालेला प्रवास, अमेरिकेतली वेगवेगळी ठिकाणं, संघर्षाचे दिवस अशा अनेक गोष्टींविषयी लिहिलं आहे. अमेरिकेतली जीवनशैली, तिथले लोक, तिथं राहणाऱ्या भारतीयांची मानसिकता अशा अनेक गोष्टी या पुस्तकातून उलगडतात. अमेरिकेत असले तरी बागल यांची, त्यांच्या कुटुंबीयांची नाळ कायम भारताशी जोडलेली आहे. ते नातंही या पुस्तकातून उलगडतं. रंजक पद्धतीनं बागल यांनी हा सगळा प्रवास मांडला आहे. जी. बी. देशमुख यांनी
अनुवाद केला आहे.

नस्त्या उचापती
प्रकाशक - मेनका प्रकाशन, पुणे (९५९५३३६९६०) / पृष्ठं - १५८ / मूल्य - १७५ रुपये

सु. ल. खुटवड यांनी लिहिलेल्या विनोदी कथांचा हा संग्रह. ‘आवाज’ आणि ‘जत्रा’सारख्या दिवाळी अंकांमध्ये प्रसिद्ध झालेल्या या कथा. प्रसंगनिष्ठ विनोद हे या कथांचं वैशिष्ट्य आहे. ग्रामीण बाजाच्या, शहरी मध्यमवर्गीय वळणाच्या अशा वेगवेगळ्या कथांचा संग्रहात समावेश आहे. अर्कचित्रांसारख्या वेगवेगळ्या व्यक्तिरेखा, खुमासदार प्रसंग, शाब्दिक कोट्या, छोट्या प्रसंगांतून विनोदनिर्मिती करण्याची शैली, माणसांचं निरीक्षण यांमुळे पुस्तकातल्या कथा रंगल्या आहेत. ‘आजारीपणाचं कौतुक’, ‘बाईलवेडा’, ‘नासक्‍या नारळाचे महाभारत’, ‘वैतागवाणा छंद’ अशा कथा वाचनीय झाल्या आहेत. विनोदी कथांचं प्रमाण सध्या कमी होत चाललेलं असताना हा प्रयत्न उल्लेखनीय आहे.

व्हेज ट्रीट
 प्रकाशक - उद्वेली प्रकाशन, ठाणे (पश्‍चिम) (०२२-२५८१०९६८) /
पृष्ठं - १४४ / मूल्य - २५० रुपये

स्वयंपाक हे शास्त्र आणि कला आहे. वेगवेगळे पदार्थ कसे करावेत, त्याचं साहित्य, घटकांचं प्रमाण, कृती अशा विषयांवर कमला कळके यांनी लिहिलेलं हे पुस्तक. थोड्या वेळात आणि सोप्या पद्धतीनं तयार करता येणाऱ्या शाकाहारी पदार्थांविषयी त्यांनी प्रामुख्यानं लिहिलं आहे. काही पारंपरिक, तर काही नवीन प्रकारच्या पदार्थांविषयी त्यांनी लिहिलं आहे. चटण्या, सॅलड्‌स, कोशिंबिरी, नाश्‍त्याचे पदार्थ, भजी, भाज्या, अळूचे प्रकार, उसळी, आमट्यांचे प्रकार, भातांचे, पुलावांचे प्रकार, पुऱ्या, परोठे, धिरडी, वडे, पोळ्यांचे प्रकार, गोड पदार्थ, खिरी, लाडू, चकल्या, जाम, उपवासाचे पदार्थ, लोणची, पापड अशा अनेक गोष्टींविषयी त्यांनी लिहिलं आहे. प्रत्येक पदार्थ तयार करण्याच्या कृती मोजक्‍या आणि नेमक्‍या शब्दांत दिल्या आहेत.

शब्द चि रत्ने
प्रकाशक - विष्णुपंत जोगळेकर स्मारक न्यास, रत्नागिरी (९८२३६५३२६५) /
पृष्ठं - ९४/

वृत्तपत्रांत लेखनाची आवड अनेक जण जोपासतात. नीळकंठ नामजोशी हे असेच लेखक. वेगवेगळ्या विषयांवर त्यांनी वेगवेगळ्या वृत्तपत्रांत लेखन केलं. त्यातल्या निवडक पत्रांचं आणि लेखांचं संकलन त्यांनी या पुस्तकात केलं आहे. वेगवेगळ्या सणांच्या, धार्मिक प्रसंगांच्या निमित्तानंही त्यांनी लेखन केलं, त्याचाही समावेश या पुस्तकात आहे. काही बातम्यांवर, लेखांवर त्यांनी लिहिलेल्या आणि प्रसिद्ध झालेल्या प्रतिक्रियाही पुस्तकात आहेत.

मराठी संगीत रंगभूमीची वाटचाल
प्रकाशक - शिवराज प्रेस अँड प्रकाशन (९८२३३२१८३२) /
पृष्ठं - ८४ / मूल्य - ८० रुपये

संगीत रंगभूमी हा महाराष्ट्राचा सोनेरी ठेवा. जवळजवळ दीडशे वर्षांची परंपरा लाभलेल्या या रंगभूमीतले महत्त्वाचे टप्पे श्रीकृष्ण श्रीपाद लाटकर यांनी शब्दबद्ध केले आहेत. सौभद्र, शारदा, एकच प्याला अशी गाजलेली नाटकं; बालगंधर्व, दीनानाथ मंगेशकर, केशवराव भोसले यांच्यासारखे रंगभूमीचे दिग्गज आधारस्तंभ; ललितकलादर्श, गंधर्व नाटक मंडळी, मराठी संगीत रंगभूमी यांसारख्या संस्था अशा अनेक गोष्टींविषयी लाटकर यांनी माहिती दिली आहे. विविध दुर्मिळ छायाचित्रांचाही त्यांनी पुस्तकात समावेश केला आहे.

Web Title: welcome new books