स्वागत नव्या पुस्तकांचे

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 15 जानेवारी 2017

कलास्वाद
प्रकाशक - पॉप्युलर प्रकाशन, मुंबई (०२२- २२७३०६७९) / पृष्ठं - ३९८ / मूल्य - ६५० रुपये

कलास्वाद
प्रकाशक - पॉप्युलर प्रकाशन, मुंबई (०२२- २२७३०६७९) / पृष्ठं - ३९८ / मूल्य - ६५० रुपये

कला आस्वादक, समीक्षक, सौंदर्यशास्त्राचे अभ्यासक संभाजी कदम यांनी या विषयाशी संबंधित वेगवेगळ्या विषयांवर वेळोवेळी लिहिलेल्या लेखांचं हे संकलन. सुमारे चाळीस वर्षांत त्यांनी लिहिलेले तेरा अभ्यासपूर्ण, मार्गदर्शक लेख या पुस्तकात समाविष्ट आहेत. एका वेगळ्या सौंदर्यशास्त्रीय शैलीनं प्रत्येक गोष्टीचा समग्रपणे त्यांनी केलेला विचार या लेखनातून प्रतिबिंबित होतो. कला आणि बालचित्रं, ग्रामीण आणि नागर अभिरुची, दलित साहित्यातला रसशास्त्रीय अर्थ, आदिवासी- आदिमतेचं आधुनिकतेशी नातं, ध्वनिसिद्धांतातलं आकृतितत्त्व, महाराष्ट्रातलं दृश्‍यकला विश्‍व, लिपी रेखनाचं काव्याभिव्यक्तीतलं स्थान, कलेच्या संदर्भात संस्कृती आणि समता असे किती तरी विषय त्यांनी मांडले आहेत. विचारांना, अभ्यासाला चालना देणारं, व्यापक दृष्टिकोन मांडणारं असं हे लेखन आहे.

स्मार्ट परीक्षावही-भूमिती-बीजगणित
प्रकाशक - सन पब्लिकेशन, पुणे (९०२८९५०१७०) पृष्ठं - १३४ आणि १४८ मूल्य - भूमिती - १६० रुपये. बीजगणित - १४० रुपये

दहावीची परीक्षा सगळ्यांनाच महत्त्वाची वाटत असते. त्या वर्षीचे सगळेच विषय मार्काच्या दृष्टीने सगळ्यांना कसोटीचे असतात. बीजगणित आणि भूमिती खरं तर पैकीच्या पैकी गुण मिळवण्याचे विषय. मात्र अनेक विद्यार्थ्यांना याच विषयाची धास्ती वाटत असते. पुण्यातले गणिताचे प्राध्यापक रवी वरे यांनी याच गोष्टीचा विचार करून या दोन विषयावर मार्गदर्शन करणारी दोन पुस्तके लिहिली आहेत. दहावीच्या विद्यार्थ्यांना या दोन विषयांचा नेमकेपणाने अभ्यास करता येईल, त्याचबरोबर हॉट्‌स प्रश्‍न कसे सोडवायचे याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले आहे. ही दोन्ही पुस्तके म्हणजे भूमिती आणि बीजगणित या दोन विषयांत अधिकाधिक गुण कसे मिळवता येतील, तसेच यातल्या अवघड बाबी सोप्या रीतीने कशा लक्षात ठेवता येतील, याची माहिती या दोन पुस्तकांतून मिळते. पाठ्यपुस्तक योग्य रीतीने समाजावून देऊन सरावासाठी काही उदाहरणे देऊन तसेच मागील सहा वर्षांच्या प्रश्‍नपत्रिका सोडवण्यासाठी दिलेल्या आहेत. ही दोन्ही पुस्तके मराठी व इंग्लिश माध्यम अशा दोन्ही विभागातल्या मुलांसाठी उपलब्ध आहेत.

देठ जगण्याचा
प्रकाशक - राजहंस प्रकाशन, पुणे (०२०- २४४७३४५९) / पृष्ठं - १०४ / मूल्य - १२५ रुपये

डॉ. नीलिमा गुंडी यांनी लिहिलेल्या वेगवेगळ्या विषयांवरच्या भावपूर्ण, चिंतनपर ललितलेखांचा हा संग्रह. आठवणी, अनुभव, वाचन आणि निरीक्षण यांचा सहज स्पर्श लाभलेलं हे लिखाण. अगदी दगडापासून अंधारापर्यंत अनेक विषय लेखिकेनं घेतले आहेत. ते वेगळ्या शैलीत मांडत, काही उदाहरणं सांगत, कवितांमधल्या ओळींची पखरण करत त्या शब्दांचा अवकाश मांडतात. काही वेळा त्या स्वत-चे अनुभव मांडतात, कधी मिस्कीलपणे टिप्पणी करतात, कधी निरीक्षणं, विचार मांडतात. निसर्ग, बालमन, नातेसंबंध, भाषा-संस्कृती, लेखन अशा सगळ्याच गोष्टींबाबतची आत्मीयता त्यांच्या लेखनातून जाणवत राहते. त्यांची शैलीही खूप वेगळी, प्रसन्न असल्यामुळं लेखन वाचनीय ठरतं.

एकूण कविता-४
प्रकाशक - पॉप्युलर प्रकाशन, मुंबई (०२२- २२७३०६७९) / पृष्ठं - १५१ / मूल्य - २६५ रुपये

काळाच्या पुढचा विचार करणारे कवी दिलीप पुरुषोत्तम चित्रे यांच्या अप्रकाशित कवितांचा हा संग्रह. वेगवेगळ्या विषयांवरच्या, भावनांचं वादळ निर्माण करणाऱ्या, भाषेचे पापुद्रे उलगडणाऱ्या त्यांच्या कविता. ‘एकूण कविता-३’नंतर त्यांनी लिहिलेल्या आणि त्या आधीच्याही काही असंकलित कवितांचा या संग्रहात समावेश आहे. चित्रे अनेक वेळा अगदी कागदाच्या तुकड्यांवरसुद्धा कविता लिहीत असत. विजया चित्रे यांनी त्यांचे एकूण एक कागद जपून ठेवले आणि त्यातूनच हे पुस्तक समोर आलं आहे. चित्रे यांनी अगदी सुरवातीला लिहिलेल्या काही गझला, लावण्या, गीतं आणि काही हिंदी कवितांचाही पुस्तकात समावेश आहे. चंद्रकांत पाटील यांनी पुस्तकाचं संपादन केलं आहे.

भक्तीची फुले
प्रकाशक - अपर्णा देशपांडे (०२०- २५४६०४५७) / पृष्ठं - १९२ / मूल्य - १२० रुपये

कृष्णा विनायक देशपांडे यांनी सांगितलेल्या या बोधकथा. किशोरवयीन वाचक लक्षात घेऊन भक्तीशी संबंधित कथा त्यांनी सांगितल्या आहेत. देवावरची, आई-वडिलांवरची, गुरुजनांवरची, मातृभूमीवरची अशा वेगवेगळ्या प्रकारची भक्ती त्यांना अपेक्षित आहे. मुलांवर चांगले संस्कार व्हावेत, काही बोध मिळावा, शिकवण मिळावी या उद्देशानं त्यांनी साध्या, सोप्या शब्दांत या कथा मांडल्या आहेत. शबरी, श्रावणबाळ, सुदामा अशा पौराणिक व्यक्तिरेखांपासून साने गुरुजी, सरदार वल्लभभाई पटेल, आचार्य विनोबा भावे यांच्यापर्यंतच्या अनेक कथा त्यांनी संकलित केल्या आहेत. सचिन तेंडुलकर, बाबा आमटे अशा समकालीन व्यक्तींबाबतच्याही प्रेरणादायी कथा पुस्तकात आहेत.

अल्पसंख्याकवाद एक धोका
प्रकाशक - चंद्रकला प्रकाशन, पुणे (०२०-२३३२७२७) / पृष्ठं - १४८ / मूल्य - १६० रुपये

पत्रकार, विचारवंत मुजफ्फर हुसैन यांनी अल्पसंख्याकवादासंबंधात व्यक्त केलेल्या विचारांचा समावेश असलेलं हे पुस्तक. अल्पसंख्याक या शब्दाची व्याख्या, जागतिक नकाशावरचे अल्पसंख्याक, भारताच्या शेजारी देशांतले अल्पसंख्याक, अल्पसंख्याकवादाचा धोका, मानवी हक्क आयोग, उपाय अशा अनेक गोष्टी हुसैन यांनी मांडल्या आहेत. भारतातल्या मुस्लिम, ख्रिस्ती, पारशी आणि यहुदी या समाजांची माहिती, त्यांचे प्रश्‍न, समस्या यांविषयीही त्यांनी लिहिलं आहे. भारतीय राज्यघटनेनं अल्पसंख्याकांना दिलेले हक्क, त्यांची टक्केवारी इत्यादी गोष्टींविषयीही त्यांनी विवेचन केलं आहे. पद्माकर कार्येकर आणि डॉ. रविकांत पागनीस यांनी अनुवाद केला आहे.

हाफ गर्लफ्रेंड
प्रकाशक - रूपा पब्लिकेशन्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, दिल्ली / वितरक - गोयल बुक एजन्सी, पुणे (०२०- २४४५३२६७) / पृष्ठं - २८० / मूल्य - १९५ रुपये

तरुण वाचकांमध्ये लोकप्रिय असलेल्या चेतन भगत यांच्या ‘हाफ गर्लफ्रेंड’ या गाजलेल्या कादंबरीचा हा मराठी अनुवाद. माधव नावाचा बिहारी मुलगा रिया नावाच्या मुलीच्या प्रेमात पडतो; पण तिला त्याच्याशी फक्त मैत्रीचं नातं ठेवायचं असतं. एका क्षणी रिया त्याची ‘हाफ गर्लफ्रेंड’ होण्याचा मध्यममार्ग सुचवते आणि कथा पुढे सरकत आणि वेगवेगळी वळणं घेत शेवटापर्यंत येऊन पोचते. एखाद्या चित्रपटाच्या पटकथेसारखी मांडणी भगत यांनी केली आहे, त्यामुळं ती खिळवून ठेवते. समकालीन जाणिवा, स्थिती, विचार या कादंबरीतून सहजपणे प्रतिबिंबित होतात. तरुणांच्या भावना, मनोवस्था यांच्याबरोबरच बिहारसारख्या राज्यांतली स्थिती, अमेरिकेतला प्रभाव, नव्या पिढीची विचारशैली अशा अनेक गोष्टीही भगत सहजपणे मांडतात. डॉ. कमलेश सोमण यांनी अनुवाद केला आहे.

बाबूजी
प्रकाशक - स्नेहल प्रकाशन, पुणे (०२०- २४४५०१७८) / पृष्ठं - २८० / मूल्य - ३५० रुपये

बहुपैलू संगीतकार- गायक सुधीर फडके ऊर्फ बाबूजी यांच्याविषयी अनिल बळेल यांनी लिहिलेलं हे पुस्तक. बाबूजींच्या वैयक्तिक आयुष्यावर बळेल यांनी लिहिलं आहेच; पण त्यात जास्त भर आहे तो बाबूजींच्या सांगीतिक कारकिर्दीवर. हिंदी, मराठी चित्रपटांसाठी त्यांनी दिलेलं संगीत, चित्रपटेतर संगीत, गीतरामायण अशा वेगवेगळ्या गोष्टींवर पुस्तकात भर देण्यात आला आहे. बाबूजींबरोबर काम करणारे गीतकार, वाद्यवृंदकार, इतरांच्या संगीत रचनांत बाबूजींनी गायलेली गीतं अशा अनेक गोष्टींवर पुस्तकात झोत टाकण्यात आला आहे. काही गाण्यांशी संबंधित किस्से, प्रसंग यांचाही पुस्तकात समावेश आहे. स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्यावरचं बाबूजींचं प्रेम, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी, ग्राहक चळवळीशी त्यांचं नातं, चित्रपटनिर्मिती अशा पैलूंचाही बळेल यांनी पुस्तकात समावेश केला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: welcome new books