स्वागत नव्या पुस्तकांचे

स्वागत नव्या पुस्तकांचे

कोप्पेश्‍वर (खिद्रापूर) मंदिर आणि मूर्ती
प्रकाशक - स्नेहल प्रकाशन, पुणे (०२०- २४४५०१७८) / पृष्ठं - ६४ / मूल्य - १०० रुपये

कोल्हापूर जिल्ह्यातल्या खिद्रापूर या गावातलं कोप्पेश्‍वर हे प्राचीन मंदिर प्रसिद्ध आहे. आठशे वर्षं प्राचीन असलेल्या या मंदिरातलं शिल्पवैभव अक्षरश- दिपवून टाकणारं. अजूनही सुस्थितीत असलेल्या आणि अनेक वैशिष्ट्यांनी नटलेल्या या मंदिराचा परिचय या क्षेत्रातील तज्ज्ञ डॉ. गो. बं. देगलूरकर यांनी करून दिला आहे. मंदिराची ऐतिहासिक पार्श्‍वभूमी, तिथला मंडप, बाह्यभाग, शिखर, गर्भगृह इत्यादींविषयी त्यांनी माहिती दिली आहे. या मंदिरातल्या देवदेवतांच्या मूर्तींचं सौंदर्य, त्यांचं वैशिष्ट्य त्यांनी उलगडून दाखवलं आहे. केवळ जंत्री न देता त्या मंदिरातल्या शिल्पांच्या सौंदर्याचा आस्वाद कसा घ्यायचा हे त्यांनी सांगितल्यामुळं पुस्तक वाचनीय झालं आहे.

खैरखानाची वस्त्रोद्योजिका
प्रकाशक - मेहता प्रकाशन, पुणे (०२०-२४४७६९२४)/
पृष्ठं - १७८/ मूल्य - २०० रुपये

अफगाणिस्तानातल्या काबूलमधल्या खैरखाना या उपनगरातल्या कमिला सिद्दिकीची ही प्रेरणादायी कहाणी. हार्वर्डमधल्या अभ्यासाचा एक भाग म्हणून गेल झेमॉक लेमॉन पत्रकार महिलेनं अफगाणिस्तानातल्या महिला उद्योजकांचा शोध घ्यायचे ठरवलं. त्यातूनच तिला कमिलाची कहाणी सापडली आणि त्यातून ‘ड्रेसमेकर ऑफ खैरखाना’ हे पुस्तक तयार झालं. त्याच पुस्तकाचा हाच अनुवाद. तालिबानी राजवटीत अनेक जुलूम, हिंसाचार चालू असतानाही कमिलानं स्वत-मधल्या उद्यमशीलतेला झळाळी दिली. शिवणकाम करून तिनं तो व्यवसाय वाढवत नेला. कमिलाची धडपड, इतरांच्या सुरक्षिततेसाठी स्वत-चा जीव धोक्‍यात घालण्याची वृत्ती, तिची बंडखोरी, सर्जनशीलता, तिच्या बहिणी, त्यांचं कुटुंब, त्यांची धडपड यांची ही कहाणी. या कहाणीत अफगाणिस्तानमधलं भयाण वास्तव उलगडत जातं आणि त्याच वेळी कमिलाची आणि एकूणच तिथल्या महिलांची सकारात्मकताही समोर येते.

बुद्ध आणि त्यांचा धम्म
प्रकाशक - बहुजन साहित्य प्रसार केंद्र, नागपूर (९४२०३९७०९५) / पृष्ठं - ४९६ / मूल्य - १५० रुपये

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्म केवळ स्वीकारला नाही, तर त्याचा अतिशय सखोल अभ्यास केला. तो सगळ्यांना उलगडून दाखवला. त्यांनी केलेल्या सखोल चिंतनातून, अभ्यासातून साकारलेलं हे पुस्तक. ‘सिद्धार्थ गौतम-बोधिसत्व बुद्ध कसे झाले’, ‘प्रवर्तनाचे आंदोलन’, ‘तथागत बुद्धांनी काय शिकविले’, ‘धर्म आणि धम्म’, ‘संघ’, ‘तथागत बुद्ध आणि बुद्धांचे समकालीन’, ‘महान परिव्राजकाची अंतिम चारिका’ आणि ‘महामानव सिद्धार्थ गौतम’ अशा चार खंडांत हे चिंतन विभागलेलं आहे. बौद्ध धर्माचं तत्त्वज्ञान, त्यातला विचार, त्यांत सांगितलेला जीवनमार्ग, या धर्माची वैशिष्ट्यं, तथागत बुद्धांची शिकवण, त्यांची महानता, त्यांनी सांगितलेली मानवता अशा अनेक गोष्टी डॉ. आंबेडकर यांनी अतिशय सोप्या शब्दांत उलगडून दाखवल्या आहेत. सर्वांनीच वाचावं, अभ्यासावं असं हे पुस्तक.

भारतरत्न कलाम, कलामांचे आदर्श, विद्यार्थ्यांचे कलाम
प्रकाशक - उद्वेली बुक्‍स, ठाणे (पश्‍चिम) (०२२-२५८१०९६८) / पृष्ठं - १३६, १७२, ७२ (अनुक्रमे) / मूल्य - १३०, १७०, ७० रुपये (अनुक्रमे)

तत्कालीन राष्ट्रपती आणि बहुपेडी व्यक्तिमत्त्व डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्याविषयी डॉ. सुधीर मोंडकर यांनी ही तीन पुस्तकं लिहिली आहेत. ‘भारतरत्न कलाम’ या पुस्तकात त्यांनी कलाम यांचं चरित्र उलगडून दाखवलं आहे. साहसवीर, विकासपुरुष, पर्यावरणस्नेही, मुत्सद्दी, निष्कलंक, क्षेपणास्त्रपुरुष, ग्रंथप्रेमी असे कलाम यांचे एकेक गुण घेऊन ते त्यांनी या पुस्तकात उलगडून दाखवले आहेत. कलाम यांच्याविषयी समकालीनांनी व्यक्त केलेले विचार, त्यांचा चरित्रपट, त्यांना मिळालेले सन्मान यांचीही माहिती त्यांनी या पुस्तकात दिली आहे. कलाम यांनी अनेक व्यक्तींकडून गुणांचा संचय केला. ‘कलामांचे आदर्श’ या पुस्तकात डॉ. सुधीर मोंडकर यांनी त्याविषयी लेखन केलं आहे. वेगवेगळ्या पुस्तकांतून त्यांनी कलामांच्या आदर्शांविषयी माहिती गोळा केली आणि अशा ७३ व्यक्तींचा परिचय या पुस्तकातून करून दिला आहे. महात्मा गांधी यांच्यापासून लता मंगेशकर यांच्यापर्यंत अनेक व्यक्तिमत्त्वांचा अभ्यास करून मोंडकर यांनी विस्तारानं लिहिलं आहे. कलाम यांनी ई-मेलद्वारे किंवा प्रत्यक्षपणे विद्यार्थ्यांच्या अनेक प्रश्‍नांना अनेकदा उत्तरं दिली. त्यांतल्या साठ निवडक शंकानिरसनाचं संकलन मोंडकर यांनी ‘विद्यार्थ्यांचे कलाम’ या पुस्तकात केलं आहे.

परिवर्तनाच्या वाटेवरील काटे
प्रकाशक - सुगावा प्रकाशन, पुणे (०२०-२४४७८२६३) / पृष्ठं - ११६ / मूल्य - १२० रुपये

जुनाट परंपरांवर, त्यांचा पुरस्कार करणाऱ्यांवर टीका करणारं आणि दांभिकता दाखवून देणारं हे लिखाण. प्रा. चंद्रसेन टिळेकर यांनी कधी कोरडे ओढत, कधी तिरकसपणे, तर कधी वेगवेगळे दाखले देत पुस्तक लिहिलं आहे. अंधश्रद्धा निर्मूलन, जातिभेद, वर्णभेद, रुढी-परंपरा अशा अनेक विषयांशी संबंधित मुद्दे त्यांनी वेगवेगळ्या निमित्तानं मांडले आहेत. अगदी महिलांच्या मंदिरप्रवेशापासून रामगोपाल वर्मा यांच्या ट्‌विटपर्यंत अनेक विषयांवर त्यांनी लिहिलं आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर, पु. ल. देशपांडे यांच्याविषयीही त्यांनी लिहिलं आहे.

समग्र ज्योतिषशास्त्र
प्रकाशक - उद्वेली बुक्‍स, ठाणे (पश्‍चिम)
(०२२-२५८१०९६८) / पृष्ठं - २९२ / मूल्य - ३०० रुपये

ज्योतिषाबाबत अनेक समज-गैरसमज असले, तरी त्याचा अभ्यास करणाऱ्या किंवा त्याच्यावर विश्‍वास असणाऱ्या वर्गाची संख्याही मोठी आहे. कुंदा ठोसर यांनी असा वाचकवर्ग समोर ठेवून हे पुस्तक लिहिलं आहे. या विषयाशी संबंधित अनेक संकल्पना, शब्द, ग्रहविचार, राशिविचार इत्यादी गोष्टी त्यांनी पुस्तकात स्पष्ट केल्या आहेत. साडेसाती म्हणजे काय, पत्रिका कशा जुळवायच्या, वैद्यकज्योतिष, जन्मपत्रिका वगैरे गोष्टींबद्दलही त्यांनी लिहिलं आहे. ज्योतिषविषयक गणिताचाही त्यांनी ऊहापोह केला आहे.

मोरोपंत चरित्र आणि काव्य विवेचन
प्रकाशक - कमलप्रभा प्रकाशन, पुणे (०२०-२५४६८२१०) / पृष्ठं - ४५० / मूल्य - ४५० रुपये

आर्या हा काव्यप्रकार लोकप्रिय करणारे मोरोपंत यांनी केकावली, हरिवंश, कृष्णविजय, आशसाष्टक महाभारत अशी उत्तम साहित्यसंपदा तयार केली. त्यांतलं सौंदर्य उलगडून दाखवणारं आणि मोरोपंतांच्या जीवनप्रवासाचे टप्पे उलगडून दाखवणारं हे पुस्तक लक्ष्मण रामचंद्र पांगारकर यांनी लिहिलं आहे. त्याची ही पुढची आवृत्ती. मोरोपंतांचं शिक्षण, त्यांचं कुटुंब, त्यांचा मित्रपरिवार, त्यांचे विचार, त्यांचे नातलग यांविषयी पांगारकर यांनी माहिती दिली आहे. त्या त्या निमित्तानं मोरोपंतांनी रचलेल्या आर्यांचं रसग्रहणही त्यांनी त्या त्या ठिकाणी केलं आहे. याशिवाय वेगवेगळ्या ग्रंथांमधल्या मोरोपंतांच्या साहित्यसंपदेचंही त्यांनी वेगळं वर्णन केलं आहे.

युज अँड थ्रो
प्रकाशक - गोल्डन पेज पब्लिकेशन्स, पुणे (९५५२३४०१६७) / पृष्ठं - १४८ / मूल्य - १७५ रुपये

नाती आणि गिफ्ट रॅपर या दोन्हींत एक साम्य असतं. त्या दोन्हींचाही ‘युज अँड थ्रो’ या पद्धतीनं वापर होतो. त्यांच्या आत अगदी नाजूक, हळुवार गोष्टी असतात; पण उपयोग संपला, की ती फेकून दिली जातात. याच विचारांवर आधारित कथा डॉ. रजनी शेठ यांनी लिहिल्या आहेत. अगदी छोट्या छोट्या प्रसंगांतून मोठी शिकवण देणाऱ्या, डोळे उघडवणाऱ्या अशा या कथा. काही नात्यांसंबंधी त्यांनी केलेल्या विचारांतून, आजूबाजूच्या निरीक्षणातून, अनुभवांतून या कथा साकार झाल्या आहेत. प्रत्येक कथा काही तरी शिकवण देते आणि जगाकडे बघण्याचा एक वेगळा अनुभव देते. नेहमीचेच विषय, प्रसंग असूनही डॉ. शेठ यांनी त्या वेगळ्या पद्धतीनं, नाट्यमय शैलीत मांडल्यामुळे कथा वाचनीय झाल्या आहेत.

----------------------------------------------------------------------------
धुमाळी (करंट-अंडरकरंट)
प्रकाशक - सकाळ प्रकाशन, पुणे (०२०-२४४०५६७८ /८८८८८४९०५०)/पृष्ठं - ३२० / मूल्य - ३३० रुपये

‘सकाळ’च्या ‘सप्तरंग’ पुरवणीत ‘करंट-अंडरकरंट’ या सदरात मुख्य संपादक श्रीराम पवार यांनी लिहिलेल्या लेखांचं हे संकलन. अनेक घटनांमागं, राजकारणामागं पडद्याआड खूप काही होत असतं. किंबहुना दिसतं त्याहून अधिक काही प्रत्यक्षात असतं. दिसणाऱ्या घडामोडींच्या न दिसणाऱ्या भागांचा अर्थ लावणं, त्याचे संदर्भ तपासणं आणि त्यातले अंत-प्रवाह वाचकांसमोर मांडणं ही या सदरामागची पवार यांची भूमिका; मात्र, तत्कालीन घडामोडींचा समावेश करतानाच त्याचे इतिहासातले धागेदोरे आणि भविष्यातले परिणाम यांचाही वेध त्यांनी घेतला आहे. पुस्तकात साधारणपणे २०१४ च्या निवडणुकांच्या आसपासचा काळ आहे. दीर्घकालीन परिणाम करणाऱ्या अनेक घडामोडी या काळात राज्यात, देशात आणि जगात घडल्या. राजकारणापासून दहशतवादापर्यंत विविध गोष्टींचे प्रवाह पवार यांनी पुस्तकात मांडले आहेत.

सेंद्रिय शेती-मानके आणि प्रमाणीकरण
प्रकाशन - सकाळ प्रकाशन /
पृष्ठं - १८४/ मूल्य - २२५ रुपये

प्रदूषणरहित, आरोग्यपूर्ण अन्नधान्यासाठी अनेकांचा कल आता सेंद्रिय उत्पादनांकडं वाढत चालला आहे; मात्र, त्यासाठी सेंद्रिय शेतीच्या मानकांनुसार प्रमाणीकरण करून घेणंही आवश्‍यक असतं. मालाला योग्य किंमत मिळण्यासाठी, उत्पादनं निर्यात करण्यासाठी, अधिकाधिक फायदा मिळवण्यासाठी या उत्पादनांचं सेंद्रिय प्रमाणीकरण आवश्‍यक असतं. डॉ. प्रशांत नाईकवाडी यांनी त्यासंदर्भात विवेचन केलं आहे. प्रमाणीकरण म्हणजे काय? त्याचा इतिहास, सेंद्रिय शेतीची आंतरराष्ट्रीय मानकं, आंतरराष्ट्रीय संघटना-संस्थांच्या प्रमाणीकरणावर आधारित भारतीय सेंद्रिय शेतीची मानकं, अशा गोष्टींची माहिती त्यांनी दिली आहे. भारताच्या सेंद्रिय शेतीचा राष्ट्रीय कार्यक्रम, प्रमाणीकरणाच्या पद्धती आणि प्रकार, पीजीएस पद्धत, प्रमाणीकरणासाठी लागणारी कागदपत्रं आणि त्यांचे नमुने आणि इतर अनुषंगिक गोष्टींचीही त्यांनी सविस्तर माहिती दिली आहे.

----------------------------------------------------------------------------
साभार पोच
तुझं माझं नातं, देवा! / आध्यात्मिक / लेखिका - नंदिनी शहाणे / स्नेहल प्रकाशन, पुणे (०२०-२४४५०१७८) / पृष्ठं - ९२ / मूल्य - ९० रुपये

माधव राजगुरू - व्यक्तित्व आणि कार्यपरिचय / व्यक्तिविशेष / संपादक - अनिल गुंजाळ / माधव राजगुरू गौरव समिती, पुणे (९४०४२३५१४५) / पृष्ठं - ४८
----------------------------------------------------------------------------

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com